भारतीय लष्कराच्या पठाणकोट तळावर झालेला दहशतवादी हल्ला ते २९ सप्टेबरला भारताने पाकच्या सीमेत प्रवेश करुन पाकच्या भूमीवरील दहशतवाद्यांचे काही तळ उध्वस्त करण्याची केलेली कारवाई, या काळात आपण एक समाज म्हणून प्रगल्भ, समजूतदार, सभ्य आणि वास्तवाचं भान बाळगणारे आहोत का, असा प्रश्न मनात उभा राहिला आहे. भारतीय लष्कराच्या या एका कृतीनंतर जणू काही जगातील दहशतवाद संपुष्टात आलाय आणि पाकिस्तानला कायमचं नेस्तनाबूत करण्यात आलेलं आहे, असं आपलं वर्तन आहे आणि त्याचं वर्णन उन्माद या एकाच शब्दात करता येईल.
वर उल्लेख केलेल्या काळात आपले बहुसंख्य राजकीय नेते, राजकीय विश्लेषक, माध्यमकार आणि समाज माध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त करणारे कसं व्यक्त होत होते, हे बघितल्यावर यापैकी असंख्यांना सरकार कसं चालतं, प्रशासन कसं हलतं आणि रणनीती आखून सैन्य कसं आगेकूच करतं याची माहिती नाही, हेच दिसत होतं. दोन राष्ट्रातले परस्परातील संबंध-धोरण आणि एखाद्या निवडणुकीत एकाच मतदार संघातील दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकाच्या केलेल्या उखाळ्या-पाखाळ्याच्या दर्जाचे असतात असा गैरसमज होण्यासारखी परिस्थिती गेले काही दिवस होती. भारतीय लष्कर जर पाकचा मुकाबला करणार (खरं तर, पाकला धडा शिकवणार) नसेल तर भारतीय प्रकाश वृत्तवाहिन्यां जणू काही युध्द करण्यास सज्ज आहेत असा उथळपणा ठायीठायी दररोज दिसत होता. देशाच्या संरक्षणाची चिंता सरकार आणि लष्कराला राहिलेली नसून ती आता आपलीच जबाबदारी आहे असा आव आणण्यात कोणतीही वृत्तवाहिनी मागे नव्हती! एका मराठी वृत्तवाहिनीने तर ‘विश्वसनीय सुत्रां’च्या हवाल्याने भारत पाकविरुध्द युध्द पुकारणार आहे अशी बातमी प्रसारित करुन टाकली!
मी भाजपचा समर्थक/हितचिंतक/मतदार नव्हतो आणि नाही तरी नमूद करायला हवं- या काळात पंतप्रधान आणि केंद्र सरकार यांच्याविरोधात तर काय-काय नाही लिहिलं गेलं, याची यादी कोणी तरी करायला हवी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छातीपासून या असभ्य लेखनाची सुरुवात झाली आणि त्यांनी खाल्लेल्या-न खाल्लेल्या मातीपर्यंत, ‘कमजोरी’पर्यंत ती घसरली. ‘बोलका बाहुला’, ‘फेकू पंतप्रधान’ अशी शेलकी अवमानकारक विशेषणं नरेंद मोदी यांच्यासाठी वापरली गेली. पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार, पाकिस्तानात ज्यांना नंबर एकचा दुष्मन समजलं जातं त्या अजितकुमार डोवाल (की डोव्ह्ल) यांच्याविषयी लिहिताना तर अनेकांच्या मनात सरस्वती जणू कॅब्रेच करत होती…इतके त्यांचे शब्द बेताल झालेले होते. कुठल्या तरी ‘खुर्द’ किंवा ‘बुद्रुक’ गावच्या राजकीय विचारवंतानेही डोवाल यांना पाळलेला/नसबंदी झालेला कुत्रा म्हणण्याइतकी ही पातळी घसरली. इतकं वाईट लेखन तर डोवाल यांच्याविरोधात पाकिस्तानातही झालं नसेल. कधी देशाची सीमा न बघितलेले, बंदूक केवळ सिनेमात नायकाच्या हाती बघितलेले वाहिन्यांवरील राजकीय विश्लेषक देशाचं कोणत्या तरी, राजकीय पक्षाचे प्रवक्ते होऊन त्या पक्षाची भलावण करणारे संरक्षणविषयक धोरण कसं असावं आणि युध्दनीती कशी आखावी याबद्दल मार्गदर्शन करू लागले. या देशाला कोण वाचवणार असा क्रायसिस निर्माण झाला असल्याचं चित्र निर्माण करण्यात आलेलं होतं.
पूर्ण बहुमत मिळालेल्या मोदी यांनी पहिल्या काही महिन्यात अंतर्गत स्थिरस्थावर झाल्यावर एक निश्चित मोहीम आखलेली आखलेली असणार, असं आता म्हणता येईल. पाकिस्तानच्या विरोधात अनेक देशांना सोबतीला घेण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी परदेश दौरे सुरु केले तेव्हा जणू काही मोदी ‘मजा’ करायलाच परदेशी जातात अशी टीका सुरु झाली. या सर्व दौऱ्यात पाकचा दहशतवादी चेहेरा समजावून सांगण्याची एक शिस्तशीर मोहीम परराष्ट्र मंत्रालयानं हाती घेतलेली होती. पण त्यासाठी दौरे करणारे, मोदी हे देशाचे ‘अनिवासी भारतीय’ पंतप्रधान झालेले आहेत असे शिक्के, विचार कसा करावा याची मिशीही न फुटलेल्या विचारवंतांकडून मारले गेले. तावातावात चर्चा झाली ती मोदी यांनी अचानक केलेल्या शरीफ यांची भेट घेणाऱ्या पाक दौऱ्याची; त्या दोघांनी परस्परांना पाठवलेल्या भेटवस्तूंची. परराष्ट्र धोरणात दृश्य पातळीवर जे घडत असतं त्यापेक्षा पूर्ण वेगळं अदृश्य असतं, हे कोणी लक्षात घेतलं नाही. परराष्ट्र धोरण ही एक चिवट, संयमानी खेळली जाणारी कुटनीती असते; slow and steady wins the race हा त्या कूट खेळाचा पाया असतो. खरं तर, पंधरा ऑगस्टला केलेल्या भाषणात पाकिस्तानात होणाऱ्या मानवी हक्क उल्लंघनाचा आणि बलुचीस्थानचा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला तेव्हाच तोवर झालेल्या कुटनीतीतून काही तरी शिजतय, अशी शंका यायला सुरुवात झालेली होती. मोदींच्या वक्तव्यावर पाकिस्ताननं बरंच अकाडतांडव केलं पण, त्याला अमेरीकासकट कोणत्याच देशानं भिक घातली नाही; उलट अमेरिकेत तर पाकला ‘दहशतवाद्यांचा मित्र’ हा दर्जा द्यावा अशी मोहीम सुरु झाली.
गेल्याच आठवड्यात झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या सभेत काश्मीर प्रश्नावर पाकिस्तान पूर्णपणे एकटा पडला; अगदी बांगला देश आणि चीनचीही साथ पाकिस्तानला मिळाली नाही हे लक्षात घेतलं म्हणजे केंद्र सरकारनं गेली दीड-पावणेदोन वर्ष कोणती मोहीम हाती घेतलेली होती आणि तिचे काय परिणाम दृश्य झाले आहेत हे लक्षात येतं. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं तडाखेबंद भाषण आणि काश्मीरविषयक भूमिका संयुक्त राष्ट्रांनी पूर्ण स्वीकारली नाही तरी, त्याला यावेळी कोणी विरोधही केला नाही; हे लक्षात घ्यायला कोणी मोदी विरोधक तयारच नव्हता. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्र संघात भाषण करताना बाहेर बलुचीस्थानच्या मागणीसाठी निदर्शने व्हावीत हा काही निव्वळ योगायोग नव्हता तर, एका दीर्घ मोहिमेला आलेलं ते फळ होतं. भारतीय लष्कराच्या उरी तळावरील हल्ल्यांनंतर सौदी अरेबियानंही पाकची बाजू घेणं टाळलं. रशियानं अगदी गेल्या पंधरवड्यात पाकसोबत संयुक्त लष्करी कवायती केल्या पण, त्या भारताशी वाद असणाऱ्या भूमीवर होणार नाहीत अशी ठाम भूमिका घेतली. सार्कच्या अधिवेशनाच्या निमित्तानेही पाकिस्तानला एकटं पाडण्यात भारत यशस्वी झालेला असताना तर पाकिस्तानची चोहोबाजुंनी कोंडी झाली. या सर्व पार्श्वभूमीवर भारताच्या जवानांनी पाकच्या हद्दीत प्रवेश करुन दहशतवाद्यांच्या तळांवर कारवाई केली. पुढे जाऊन आम्ही पाकच्या हद्दीतील दहशतवाद्यांच्या तळावर कारवाई केली, हे जगासमोर पुराव्यासहित जाहीर करण्याचं धाडसही दाखवलं. आता तर त्या कारवाईची व्हिडीओ क्लीप जाहीर करण्याची तयारी झाली असल्याच्या बातम्या येताहेत.
अशी व्यापक कारवाई एका रात्रीत होत नसते. त्याची तयारी अनेक दिवस आधी सुरु झालेली असते. ती तयारी पूर्ण झाल्याशिवाय काहीच न बोलणं हा सर्वोत्कृष्ट शहाणपणा असतो; तो मोदी यांनी यावेळी दाखवला. तरी उरीच्या हल्ल्यानंतर भारताकडून काही तरी परिणामकारक कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यास ते मात्र विसरलेले नव्हते. ते संकेत मोदी विरोधकांनी लक्षात घेतले नाहीत किंवा त्यांना ते कळले नाहीत (केलेल्या कारवाईचं स्वरूप स्पष्ट होण्याआधीच ती निवडणुकीची खेळी आहे अशी उथळ प्रतिक्रियाही आली!) आणि त्याकडे पाकने दुर्लक्ष करुन नामुष्की ओढावून घेतली. उठावळ, उतावीळ आणि स्वत:ला सबसे तेज म्हणवून घेणाऱ्या बहुसंख्य भारतीय मिडियालाही या कारवाईचा सुगावा लागला नाही हे चांगलंच झालं अन्यथा, नको त्या प्रसंगाला तोंड देण्यात लष्कराची शक्ती खर्ची पडली असती.
या एका कृतीनं नरेंद्र मोदी हिरो झाले. त्या भारतीय कारवाईचे वृत्त जाहीर झाल्यावर नाच-गाणी सुरु झाली, देशभक्तीचे उमाळे वाहू लागले, फटाके फोडले गेले, मिठाई वाटली गेली. ‘उरी घाव’, ‘सूड’, ‘बदला’, ‘नांगी ठेचली’ अशी भडक शीर्षकं मीडियात आली. हे करतांना वास्तवाचं भान सुटलं. नरेंद्र मोदींवर टीका करताना जसा विवेक गमावला गेलेला होता त्यापेक्षा जास्त अविवेकी हे वर्तन होतं. ही खरं तर केवळ एक कारवाई आहे आणि अलिकडे भारतावर झालेले दहशतवादी हल्ले लक्षात घेता ती कारवाई व्हावी, अशी जवळ-जवळ प्रत्येक भारतीयाची इच्छा होती. निश्चित वेळ योजून आणि पध्दतशीर नियोजन करुन नरेंद्र मोदी यांनी लष्कराकडून ती कृती करवून घेण्याचं धाडस दाखवलं; त्याबद्दल नरेंद्र मोदी, त्यांचे अन्य सहकारी आणि भारतीय लष्कर अभिनंदनास पात्रच आहेत. पण, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी ही एक प्रतीकात्मक कारवाई आहे. या एका कारवाईनं पाकपुरस्कृत दहशतवाद संपुष्टात आलेला नाही आणि भारतासमोरचा धोका टळलेला नाहीये, हे वास्तव आहे. या कारवाईतून धडा घेऊन आपली भूमी दहशतवादी कारवायांसाठी वापरू देण्याचं धोरण पाकिस्ताननं यापुढेही सुरुच ठेवलं तर, असे आणखी शेकडो हल्ले करावे लागतील.
उद्या हे हल्ले असेच वाढवावे लागले किंवा त्यामुळे जर दोन देशात युध्द पुकारलं गेलं तर परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. (आज आपल्या बाजूने दिसणाऱ्या अमेरिकेने दिलेली शस्त्रे घेऊनच पाकिस्तान आपल्या विरुध्द लढत आहे, हेही एक बिकट वास्तव तेव्हा लक्षात येईलच.) बांगला युध्दाच्या वेळी निर्माण झालेले प्रश्न आपण अजूनही पूर्णपणे सोडवू शकलेलो नाहीत. आता युध्द झालं तर तंत्र-यंत्राच्या बदललेल्या आजच्या परिस्थितीत अण्वस्त्र वापराचा धोका आहे. अशा वेळी संभाव्य युध्दाचं स्वरूप वेगळे आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न, त्याचे परिणाम महाआक्राळविक्राळ असतील. या एका कारवाईची तयारी म्हणून जे काही उपाय केले गेले, त्यातून भाजी निर्यात बंद झाली आणि टोमाटो, कोबीचे भाव कोसळले; शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला. प्रत्यक्ष युध्द सुरु झालं तर परिणाम आणखी व्यापक व गंभीर असतील. आजची ही एक कारवाई म्हणजे भविष्यात गर्तेत जाण्याचे की विजेता होण्याचे संकेत आहेत याचं विवेकी, चिकित्सक, परखड विश्लेषण करण्याचं भान सुटायला नको. केवळ एका कारवाईने उन्मादित होण्याची गरज नाही; अजून विजय पूर्णपणे पदरात पडलेला नाहीये आणि दहशतवादाचे समूळ उच्चाटन झालेलं नाहीये. अनाठायी टीका नको आणि क्षणिक विजयाचा उन्मादही नको, वास्तवाचं भान तेवत ठेवलं पाहिजे.
-प्रवीण बर्दापूरकर
9822055799 / 9011557099
भेट द्या – www.praveenbardapurkar.com
कृपया वाचा- blog.praveenbardapurkar.com
To buy them download the Dailyhunt app from the google play store on your mobile. Select Marathi language.
search the books under – BHASYA or PRAVEEN BARDAPURKAR.