दिल्लीची उत्कंठा शिगेला !

उत्कंठा शिगेला पोहोचवणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अगदी अंतिम टप्प्यात दिल्लीत होतो. निवडणुकीच्या रणांगणातल्या भाषेत ‘कत्तल-की-रात’ असणारे जाहीर प्रचाराचा शेवटचा आणि संपल्यानंतरचा हेही दोन दिवस त्यात होते. हा मजकूर प्रकाशित होईपर्यंत दिल्लीत मतदान झालेले असेल. मतदारांचा कौल १० फेब्रुवारीला दुपारी बाराच्या आत कळेल. त्याआधी मतदार पाहण्याचे निष्कर्ष प्रकाशवृत्त वाहिन्यांवरून आलेले असतील. दिल्लीहून दुपारी चार वाजता विमानाने उड्डाण घेतले त्याच्या अर्धातास आधी सट्टा बाजारात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या ‘आप’च्या अरविंद केजरीवाल यांचा भाव ३० पैसे, भाजपच्या उमेदवार किरण बेदी यांचा भाव ४५ पैसे तर काँग्रेसच्या अजय माकन यांचा भाव १ रुपया ७४ पैसे होता. बहुमतासाठी ‘आप’चा भाव २२ पैसे तर भाजपचा भाव २४ पैसे, इतकी जबरदस्त चुरस निर्माण झालेली आहे. आप आणि भाजपतच घमासान आहे. ५५ ते ६० टक्के मतदान झाले तर भाजपची सत्ता येईल आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले तर ५० पेक्षा जास्त जागा ‘आप’च्या पारड्यात पडू शकतात असे पत्रकारांचे म्हणणे आहे. दिल्लीच्या राजकीय इतिहासातील ही सर्वात अटीतटीची निवडणूक आहे हे बहुसंख्य  दिल्लीकरांचे म्हणणे ऐकल्यावर लहानपणी प्रवचनाच्या ओघात कथेकरी सांगत ती एक बोधकथा आठवली-

अफूच्या नशेत तर्र असणाऱ्या सिंहाला एकदा एका धष्ठपुष्ठ उंदरानेही अफूच्या नशेतच युद्धाचे आव्हान दिले. सिंहाने ते स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता हे युद्ध करण्याचे त्या दोघांनी ठरवले. हे कळल्यावर सकाळी  कोल्हा सिंहाकडे गेला. त्याने सिंहाला समजावण्याचा  प्रयत्न केला. सिंह म्हणाला, ‘तू कां घाबरतोस ? मी पंजाच्या एका फटक्यात त्या उंदराचा निकाल लावतो.

त्यावर कोल्हा म्हणाला, ‘राजा तुझ्यासारख्या जंगलाच्या बलाढ्य राजाने उंदराला मारण्यात काय मर्दुमकी आहे ? तुझा विजय थट्टेचा ठरणार आणि चुकून पकडीतून उंदीर निसटला तर तुझ्या झालेल्या फजितीवर जंगलातील प्रजा हंसणार. काही घडले तरी तो थिल्लरपणाच ठरणार. अशा थिल्लरपणापासून राजाने स्वत:चा आब राखत कायम लांब राहावे. अफूची नशा एव्हाना ओसरली असल्याने कोल्ह्याचे म्हणणे सिंहाला पटले. त्याने योग्य तो मार्ग काढण्याचे काम कोल्ह्यावरच सोपवले.

कोल्हा त्या उंदराकडे गेला तर, दुपारी सिंहाशी लढण्याच्या आणि विजयाच्या कल्पनेनेच उंदराने सकाळपासून पुन्हा अफूची नशा करायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे त्याला विजयाची एक हजार टक्के खात्री होती. कोल्ह्याने ठरल्याप्रमाणे मखलशी केली. उंदराला हरबऱ्याच्या झाडावर चढवले. नशेतच उंदराने आधी लांडग्याशी आणि त्याला हरवल्यावर सिंहाशी युद्ध करण्याचे मान्य केले.

मग कोल्हा लांडग्याकडे गेला. राजाज्ञा सांगून लांडग्याला लढाईसाठी सज्ज केले आणि त्यालाही अफूच्या नशेत धुत्त केले. ती लढाई अत्यंत चुरशीची आणि रोमांचकारी झाली. निकाल  कोणाच्या बाजूने लागला हे कथेकऱ्यांनी सांगितले नाही पण, कथेकरी सांगत, कोणताही निर्णय नशेत घेऊ नका !

या कथेतील पात्रांचा दिल्ली निवडणुकीच्या संदर्भात कोणाचा संबंध कोणाशी जोडायचा हे ज्याचे-त्याने ठरवावे. हे मात्र खरे की , दिल्ली विधानसभेची निवडणूक नशेतील त्या लांडगा आणि उंदराच्या लढाईसारखी रोमांचकारीही झालेली आहे. सत्ता (पक्षी: भाजप) आणि जनता (पक्षी : आप) असे स्वरूप आता निवडणुकीला आलेले आहे. मतदारांचे कल जाणून घेणाऱ्या चाचण्या शंभर टक्के खऱ्या निघत नाहीत आणि शंभर टक्के खोट्याही. त्याकडे बघायचे असते ते केवळ एक कल म्हणून, तोही निवडक काही लोकांचा म्हणून. तरीही अडीच-तीन महिन्यांपूर्वीपर्यंत झालेल्या मतदारांच्या चाचण्यांचा कल भाजपकडे होता, नंतर तो कल ‘आप’कडे झुकला, इतका झुकला की काही चाचण्यांचा कल ‘आप’चे ५० पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील यावर गेला. प्रचाराची रणधुमाळी संपायला आली तेव्हा हे कल आणि बहुसंख्य पत्रकार म्हणू लागले की, लढाई बरोबरीत आली आहे. मग शक्यतांचा पूर आला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले, ‘दिल्लीचा निकाल हा काही मतदारांनी केंद्र सरकारबद्दल दिलेला कौल समजण्याचे कारण नव्हे’. याचा राजकीय अर्थ दिल्लीचा कौल भाजपला अनुकूल नसेल असा घेतला जाणे स्वभाविक आहे. शहा यांच्या या विधानाने शक्यतांचा मग मिडियात अंदाज आणि शक्यतांचा महापूर आला.

केंद्रात सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदी सरकारने जनतेसाठी काहीच केले नाही. जन धन योजनेत प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू आणि देशातला प्रदेशातला काळा पैसा परत आणू या घोषणा कशा खोट्या निघाल्या यावर अरविंद केजरीवाल आणि अजय माकन यांनी हल्ला केल्यावर आणि त्या जनतेला पटत असल्याचे रिपोर्ट मिळाल्यावर सारवासारव करताना अमित शहा म्हणाले, ‘त्या निवडणूक प्रचारासाठी केलेल्या घोषणा होत्या. असे प्रत्यक्षात घडू शकत नाही हे सर्वानाच ठाऊक आहे. अमित शहा यांचे हे म्हणणे मतदारांना पटले का आणि ते भाजपला मतदान करतात का, हे निकाल जाहीर झाल्यावरच कळणार आहे आणि त्यासाठी फार मोठी प्रतिक्षा करण्याची गरज नाही ! याचे एक उपकथानक म्हणजे, जनतेचा कल ‘आप’कडे वळतो आहे हे सांगण्यात कुचराई केली म्हणून केंद्रीय गृहसचिव यांची अनिल गोस्वामी यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. परराष्ट्र सचिव सुजाता सिंह, पाठोपाठ डीआरडीओचे संचालक यांच्यापाठोपाठ गोस्वामी यांची हकालपट्टी करण्यात आल्याने प्रशासनात दहशतीचा संदेश गेला आणि आता केंद्र तसेच राज्य सरकारचे ‘बाबू’ भाजपच्या विरोधात गेले आहेत , असेही सांगितले जात आहे. तसेही वेळेवर कार्यालयात येणे आणि नीट काम करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या सवयीमुळे दिल्लीतील बाबू मंडळी त्रस्त आहेत. कारण त्यांनाही वेळेवर यावे लागते आणि काम करण्याचे सोंग आणत कां होईना कार्यालयात बसावेच लागते. सारदा चिट फंड घोटाळ्यातील एक वादग्रस्त संशयित, माजी मंत्री मतंग सिंह यांची अटक टाळण्यासाठी दबाव आणला म्हणून गोस्वामी यांची हकालपट्टी झाली असे भाजपच्यावतीने सांगण्यात आले. नरसिंहराव पंतप्रधान असतानापासून गोस्वामी यांचे सरंक्षण मतंग सिंह यांना होते आणि गोस्वामी यांच्या हकालपट्टीमुळे प्रशासनात कोणाचीही गय केली जाणार नाही असा कणखर संदेश गेला अशाही बातम्या (या बातम्यांचे स्रोत वेगळे सांगायची आवश्यकता नाही!) प्रकाशित झाल्या आहेत, ते क्षणभर खरे जरी मानले तरी, गोस्वामींच्या हकालपट्टीचे टायमिंग चुकले हे मात्र खरे.

kiran_091411051712किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार करण्याचा निर्णय भाजपच्या अंगलट आलेला आहे. त्याबद्दल पक्षातच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातही नाराजी आहे. मी वाचले नाही पण, असे सांगितले गेले की संघाच्या मुखपत्रात डॉ. हर्षवर्धन यांना डावलल्याबद्दल नापसंती व्यक्त झाल्यावर पक्षातही बेदीविरोधी  नाराजीने उघड आणि उग्र रूप धारण केले आहे. आता तर बेदी पराभूत होणार अशी चर्चा भाजपच्या गोटातच ऐकू आली. बेदी यांचे नाव समोर आणून विझलेल्या अरविंद केजरीवाल नावाच्या आव्हानाला मोदी-अमित शहा जोडीने जणू पुनर्जन्मच दिला असे भाजपच्याच नाही तर काँग्रेस आणि आपच्याही नेत्यांचे म्हणणे आहे. दिल्लीत प्रभाव असणाऱ्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्यासह गेल्या निवडणुकीचे सूत्रधार नितीन गडकरी आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार डॉ. हर्षवर्धन यांना मोदी-शहा जोडगोळीने डावलल्याची तीव्र प्रतिक्रिया पक्षात आहे. ‘मुख्यमंत्रीपदासाठी डॉ. हर्षवर्धन हे उजवे ठरले असते’ अशी तोफच खासदार शत्रुघ्न सिंहा यांनी प्रचार संपता-संपता डागली आणि अडचणीत भर टाकली. हरियाणात जाट मुख्यमंत्री न दिल्याने दिल्लीतील जाट मतदार भाजपानुकुल नाहीत आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे बिहारी मतदार मतदानाला फिरकणार नाहीत दुहेरी भीतीने उमेदवाराना ग्रासले आहे. यावरून मलाआमच्या लोभस व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या अटलबहादूरसिंग या उमद्या मित्राने लढवलेल्या लोकसभा निवडणुकीची आठवण झाली. कट्टर राम मनोहर लोहियावादी असणारे आणि राजकारणात असूनही सुसंस्कृत, सुविद्य असणारे अटलबहादूरसिंग हे अख्ख्या नागपूरचे लाडके व्यक्तिमत्व. त्यांची एक अपक्षांची आघाडी होती, १२/१४ नगरसेवक निवडून आणण्याची त्या आघाडीची क्षमता निर्माण होती . त्या बळावर नागपूर महापालिकेचे सत्ताकारण अटलबहादूरसिंग यांनी प्रदीर्घ काळ चालवले. तेही दोन वेळा महापौर झाले. नागपूर लोकसभा मतदार संघात भाजप आणि संघाची अडीच-पावणेतीन लाख मते आहेत हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. ही, अधिक अटलबहादूरसिंग यांची मते मिळवून या लोकसभा मतदार संघातून भाजपचा उमेदवार विजयी होऊ शकत असल्याने नितीन गडकरी यांच्या हट्टापोटी भाजपने अटलबहादूरसिंग यांना २००४च्या निवडणुकीत उमेदवारी दिली. मात्र संघाचे मतदार मतदानाला बाहेर पडलेच नाही, कारण त्यांना तसा आदेश नव्हता. त्या निवडणुकीत अटलबहादूरसिंग यांचा दारुण पराभव झाला आणि ते शल्य रुग्णशय्येवर खिळलेल्या अटलबहादूरसिंग यांच्यासह आमच्यासारख्या अनेकांना आजही आहे. किरण बेदी यांच्या पराभवाच्या चर्चा ऐकल्यावर मला अटलबहादूरसिंग यांची आठवण झाली.

केंद्रात राज्यमंत्री झाल्यावर हंसराज अहीर यांची प्रथमच भेट झाली. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून तीन वेळा लोकसभेवर निवडून आल्यावरही हंसराज अहिर यांच्याकडे दिल्लीत स्वत:ची कार नव्हती, ते संसद सदस्यांसाठी असलेल्या वाहनाने दिल्लीत फिरत. अत्यंत चिकाटीने आणि भलेभले दबाव झुगारत कोळसा कांड उघडकीला आणणारे हंसराज अहिर मंत्री झाले तरी साधेच आहेत, अजून तरी. दिल्लीच्या प्रचारात ते आकंठ बुडाले होते. भाजपचे ३६ते४० उमेदवार विजयी होतील असा त्यांचा दावा होता . दिल्ली मुक्कामात भाजपच्या विजयाबद्दल खात्रीपूर्वक बोलणारे हंसराज अहिर हे एकमेव नेते मला भेटले. अन्य सर्व नेते-कार्यकर्त्यांची भाषा ‘टक्कर कांटे की है’ अशीच होती. अखेरच्या टप्प्यात नितीश कुमार, प्रकाश  कारंत या नेत्यांपाठोपाठ ममता बँनर्जी यांनी ‘आप’ला पाठिंबा जाहीर केला आहे. शाही इमाम यांनीही स्वत:हून पुढाकार घेत फतवा काढत पाठिंबा दिला. त्यामुळे वाद निर्माण झाल्यामुळे ‘आम्हाला अशा फतव्यांची गरज नाही’ अशी सारवासारव अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. इकडे डेरा सच्चा सौदाने भाजपला पाठिंबा जाहीर केला, त्यामुळे भाजपच्या गोटात बऱ्यापैकी हुरूप आहे.

एक खरे, मोदी-शहा याची जादू ओसरली असे दिल्लीत सध्या तरी दिसते आहे. काँग्रेसला नेस्तनाबूत करत सुसाट सुटलेल्या नरेंद्र मोदी यांना पर्याय उभा करणे काँग्रेससकट अन्य कोणत्याच पक्षाला जमले नव्हते, अरविंद केजरीवाल यांनी तशी किमान हवा तरी निर्माण केली आहे. त्यामुळे दिल्लीचे निकाल देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारे असतील. त्या निकालांची आता प्रतिक्षा आहे.

-प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९

praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट