हेरॉल्ड ते जेटली : भूषणावह नक्कीच नाही !

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रवास ‘नॅशनल हेरॉल्ड ते अरुण जेटली’ असा झालाय आणि या निमित्ताने अलिकडच्या काही वर्षात, राजकारणात स्वच्छ समजले जाणारे देशातील दोन प्रमुख नेते, कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी आणि भारतीय जनता पक्षाचे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘ब्ल्यू आईड बॉय’ अरुण जेटली या दोघांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडाले आहेत. हेरॉल्ड प्रकरणात संसदेला वेठीस न धरता आणि सुब्रमण्यम स्वामी यांची वाचाळवीर, कायम खटले करत राहणारे निरुद्योगी गृहस्थ, खोटारडे अशी संभावना करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जर सरळ, आदराने न्यायालयाला सामोरे जात सोनिया गांधी यांनी त्यांचे निर्दोषत्व सिद्ध केले असते तर त्यांची प्रतिमा आणखी उंचावली असती; सोनिया गांधी आणि ‘शहजादे’ राहुल गांधी स्व:प्रतिमा आणि राजकारणासाठी संसदेला वेठीला धरत नाहीत हा संदेश तर गेलाच असता पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे न्यायालयात निर्दोषत्व सिद्ध झाले असते तर सुब्रमण्यम स्वामी उघडे पडले असते, त्यांची पार छी-थू झाली असती. पण, ही संधी सोनिया गांधी, शहजादे राहुल आणि कॉंग्रेसने गमावली आहे. एक अत्यंत नाममात्र न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्याऐवजी सोनिया आणि राहुल यांनी संसदेला वेठीला धरून त्यांच्याविषयी असणारी सहानुभूती घटवून घेतली.

प्रमोद महाजन यांच्या आकस्मिक हत्येनंतर भाजपात जे नेते मोठ्या प्रकाशझोतात आले त्यात अरुण जेटली हे एक. भारतीय जनता पक्षाचा स्वच्छ चेहेरा, ख्यातनाम व निष्णात वकील अशी त्यांची प्रतिमा आजवर राहिली. नरेंद्र मोदी यांचा उदय होण्याआधी आणि उदय झाल्यावर त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका जेटली यांनी घेतली त्यामुळे तर, पक्षात त्यांचे प्रस्थ वाढणे स्वाभाविकच होते. १९५२च्या डिसेंबर महिन्यात २८ तारखेला अरुण जेटली यांचा जन्म एका संपन्न कुटुंबात दिल्लीत झाला तर २०१५ साली डिसेंबर महिन्यातच त्यांचे पक्षात आणि सरकारात स्थान डळमळीत झाले आहे, त्यांच्या आजवरच्या स्वच्छ प्रतिमेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

विद्यार्थी दशेपासून अरुण जेटली भाजपशी संलग्नित आहेत. विद्यार्थी दशेत ते अ.भा.वि.प.चे नेते होते. वाणिज्य शास्त्रात पदवी आणि दिल्ली विद्यापीठातूनच त्यांनी कायद्याची उच्च पदवी संपादन केली. उजळ गोरा वर्ण, नितळ काळे डोळे-त्यावर सोनेरी काडीचा चष्मा, किंचित मागे वळवलेले केस, मृदू वर्तन आणि फक्कड नाही तर अतिफक्कड इंग्रजी ही अरुण जेटली यांच्या व्यक्तीमत्वाची वैशिष्ट्ये. विषय समजून घेण्याची त्यांची क्षमता जलद आहे आणि विषय घेऊन त्यांच्यासमोर तयारीने जावे लागते. एक अनुभव सांगतो- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तत्कालिन न्यायमूर्ती असलेले अशोक देसाई यांनी एका विषयात त्यांचे वरिष्ठ तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालिन प्रभारी मुख्य न्यायमूर्ती पेंडसे, लोकसत्ताचे तत्कालिन संपादक डॉ. अरूण टिकेकर आणि माझ्यावर एक ‘सु-मोटो क्रिमिनल कन्टेप्ट’ दाखल केला. न्यायालयीन जगतात ती एक अभूतपूर्व घटना होती. (माझ्या ‘दिवस असे की…’ प्रकाशक ग्रंथाली, या पुस्तकात पृष्ठ ३७वर ही हकिकत विस्ताराने आहे.) या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे ठरले. न्या. पेंडसे आणि डॉ. टिकेकर यांनी न्या. अशोक देसाई यांच्या न्यायालयासमोर पहिल्या तारखेलाही येण्यास नकार देण्याची ठाम भूमिका घेतली. राज्याचे विद्यमान महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या सल्ल्यानुसार मी मात्र न्या. देसाई यांच्या न्यायालयात पहिल्या तारखेला हजर राहिलो. उच्च न्यायालयात सुनावणीला येण्याआधीच ज्येष्ठ विधिज्ञ अरुण जेटली यांनी प्रभावी युक्तीवाद करत या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयातून विधिवत अंतरीम स्थनागादेश प्राप्त केला. हा अंतरीम स्थगनादेश कायम करणे आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळून घेणे यासाठी अरुण जेटली यांची भेट घेण्याचे ठरले. या काळात त्यांनी माझे सर्व फोन आवर्जून रिसिव्ह करुन मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व संबधित मराठी कागदपत्रे इंग्रजीत भाषांतरीत करून आणण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्याप्रमाणे संबधित दस्तावेज आधी पाठवून भेटायला गेलो तेव्हा जुजबी एक-दोन प्रश्न विचारून अवघ्या पाचच मिनिटात जेटली यांनी आम्हाला वाटेला लावले! कारण, ते केस वाचून आलेले होते. पूर्ण तयारीनिशी कामाला भिडण्याची त्यांची ही अशी सवय आहे.

अरुण जेटली यांनी वकील म्हणून अनेक प्रकरणे लढवली. लालकृष्ण अडवाणी, शरद यादव, माधवराव शिंदे अशा अनेक मान्यवरांचे खटले त्यांनी लढवले. वकिली आणि राजकारणातल्या एकेक वरच्या पायऱ्या वर चढत असतानाच क्रिकेट, हॉकी असे खेळ आणि अन्य काही संघटनात ते सक्रीय राहिले. सर्वोच्च न्यायालयात त्यांना विधिवत ‘ज्येष्ठ वकील’म्हणून मान्यता मिळाली, राजकारणातही ते वाजपेयी सरकारात केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचले, वाजपेयी राजवट संपल्यावर ते राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते झाले. संयत, नेमकी, समोरच्याला ‘कन्व्हिन्स’ करणारी मांडणी, आक्रमकता दाखवताना आततायीपणा नाही आणि कठीण प्रसंगात कोणतीही कायदेशीर गुंतागुंत न होऊ देता मार्ग काढण्याचे त्यांचे याकाळातील कसब वाखाणले गेले. भाजप आणि कॉंग्रेस ; विशेषत: गांधी कुटुंबीय यांच्याशी सौहार्द्र आणि त्यामुळे राजकारणात भाजपचे गांधी कुटुंबीयासोबत संवादक, पक्षासाठी संकटमोचक असे त्यांचे स्थान निर्माण झाले. एखाद्या विषयावर राज्यसभेत जेटली बोलणार हे कळले की त्यांचे भाषण ऐकायला जाणाऱ्यांच्या पत्रकारांच्या कळपात दिल्लीत असताना मीही सहभागी होतो. आता त्यांचे हे स्थान डळमळीत झाले आहे; जेटली यांच्या कन्येच्या विवाहाच्या स्वागत समारंभात सोनिया किंवा राहुल सहभागी झाले नाहीत, इतके संबध ताणले गेले असल्याची दिल्लीत चर्चा आहे.

नॅशनल हेरॉल्डप्रकरणाने संसदेचे काम ठप्प असताना सीबीआय-केंद्रीय गुप्तचर विभागाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्रकुमार यांच्या कार्यालयावर धाड टाकली आणि दिल्लीच्या राजकारणाचा रंग एकदम बदलला ; ऊबदार थंडीची चाहूल लागलेल्या दिल्लीतील राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली. सीबीआय म्हणजे केंद्र सरकारला राजेंद्रकुमार यांच्या भ्रष्टाचारात मुळीच रस नव्हता तर दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या बांधकामात अरुण जेटली अध्यक्ष असताना झालेल्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स हव्या होत्या मात्र, त्या ‘माझ्या ताब्यात आहेत’, असा गौप्यस्फोट करून केजरीवाल यांनी खळबळ माजवली. त्यात भारतीय जनता पक्षाच्या कीर्ती आझाद आणि चेतन चौहान या दोन खासदारांनी ‘दाल मे कुछ काला है’ (इथेही पुन्हा डाळच!) असे म्हणत तेल ओतल्याने भडका उडण्यास वेळ लागला नाही. कीर्ती आझाद तर नंतर जेटली यांचे नाव न घेता पण, जेटली यांच्या विरोधात थेट मैदानातच उतरले. त्यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेत जेटली यांना निर्दोषत्व सिद्ध करण्यास सांगण्याऐवजी भाजपने कीर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित करून आणि दिल्ली सरकारने दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या पर्यायाने अरुण जेटली यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी आयोग नेमत हे संशयाचे ढग आणखी गडद केले. परिणामी अरुण जेटली आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले आहेत. रामपत्नी सीतेलाही अग्निदिव्याला तोंड द्यावे लागले होते याचा रामाचे मंदिर बांधण्याची भाषा करणारांना विसर पडला ; ‘मंदिर वही बनायेंगे’च्या उन्मादोत्तर काळात रामायण तसेच रामावर नैराश्य येण्याचा आणि उपेक्षेला सामोरे जाण्याचा असा अन्य दुर्धर प्रसंग नक्कीच ओढावला नसावा! त्यातच आता, हॉकी महासंघाचे अध्यक्ष सेवानिवृत्त सनदी अधिकारी के.पी.एस. गिल यांनीही अरुण जेटली पदाधिकारी असताना झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करून जेटली यांच्यासमोरच्या अडचणी वाढवल्या आहेत.

अरुण जेटली यांनी आर्थिक अनियमितता किंवा भ्रष्टाचार केला आहे किंवा नाही हे चौकशीनंतर सिद्ध होईलच. अरुण जेटली यांनी दिल्ली क्रिकेट संघटनेत अशा काही आर्थिक लांड्या-लबाड्या केल्या असतील असे मला स्वत:ला (आत्ता तरी) वाटत नाहीये! पण, ते असो ; नैतिकतेच्या बातांच्या ढगांवर कायम विहरणाऱ्या अरुण जेटली यांनी आधी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाण्याची भूमिका बाणेदारपणे घेतली असती तर त्यांची प्रतिमा आणखी उंचावली असती. शिवाय नॅशनल हेरॉल्डच्या निमिताने नैतिकता बाजूला गुंडाळून ठेवत सोनिया आणि राहुल गांधी यांनी न्यायालयावर दबाव आणण्यासाठी संसदेला वेठीला धरण्याचे राजकारण केल्याचा अरुण जेटली आणि भाजपचा दावाही प्रबळ ठरला असता. या प्रकरणात राजकारण आणि नैतिकता अशा दोन्ही पातळ्यावर भाजप तोंडावर आपटला आहे आणि पक्षासोबत फरपट (?) झाल्याने अरुण जेटली यांच्या प्रतिमेवर उमटलेले डाग ‘अच्छे नही’त. अरुण जेटली यांना स्वच्छतेचे प्रमाणपत्र देतांना लालकृष्ण अडवाणी यांचे चारित्र्य जसे ‘हवाला’ प्रकरणात तावून सुलाखून निघाले तसेच अरुण जेटली यांचे होईल असे म्हणत नरेंद्र मोदी यांनीही मेख मारून ठेवली आहे. हवालाच्या चौकशीपूर्वी अडवाणी यांनी राजीनामा दिला होता ही ती मेख आहे. नेमके तेच मोदी यांनी सुचवून आता जेटली यांची पक्षाला आणि त्यांना असलेली गरज संपली आहे हे सूचित केले आहे.

भ्रष्टाचार तर सोडाच गैर-व्यवहार केल्याच्या चर्चेची जरी सुई जरी इतरांकडे वळली तरी चौकशी आयोग स्थापन करण्याची आणि ऊठसूठ पदाच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या, ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा नैतिकतेचा आव कसा ढोंगीपणा आहे, हेच या निमिताने पुन्हा एकदा समोर आले आहे. देशाच्या राजकारणाचा प्रवास ‘हेरॉल्ड ते अरुण जेटली’ असा होण्याच्या निमिताने कॉंग्रेस तसेच भारतीय जनता पक्ष, वर्तन आणि आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत ‘एकाच माळेचे मणी’ आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असले तरी एक लोकशाहीवादी समाज आणि देश म्हणून हे भूषणावह नक्कीच नाही…

-प्रवीण बर्दापूरकर

​9822055799 / 9011557099
भेट द्या – www.praveenbardapurkar.com
कृपया वाचा- www.praveenbardapurkar.com/newblog

संबंधित पोस्ट