…सोपान बोंगाणे आणि अशोक तुपे 

 || नोंद …२५ ||

ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे याच्या निधनाची बातमी ऐकायला आली आणि भोवंडूनच गेलो . किती वर्षांचं असेल आमचं मैत्र ? या प्रश्नाचं काही ठोस उत्तर नाही , कदाचित ४४-४५ वर्षेही उलटली असतील .

सोपान आणि माझ्यामध्ये काही योगायोग आहेत . त्याची ओळख ‘लोकसत्ता’चा ठाण्याचा ‘अनधिकृत‘ वार्ताहर होण्याआधीपासूनची पण , आमची घसट वाढली ती , तो ‘लोकसत्ता’चा ठाण्याचा पूर्णवेळ वार्ताहर झाल्यावर . आमचे खूप ज्येष्ठ सहकारी श्याम घाटगे यांच्या अनुपस्थितीत तो ‘लोकसत्ता’चा ठाण्याचा ‘अनधिकृत’ वार्ताहर म्हणून काम बघत असे ( त्या संदर्भात माझे ज्येष्ठ सहकारी रमेश झवरसाहेब यांनी त्यांच्या ‘आनंदयात्री पत्रकार’ या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे . लिंक अशी – https://rgzawar.blogspot.com ) तर मंगला बर्दापूरकर हिच्यासाठी नागपूरहून मी ‘लोकसत्ता’साठी बहुतांश काम करत असे . महत्त्वाचं म्हणजे सोपान अन् माझी ही ‘अनधिकृत’ पत्रकारिता ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक माधवराव गडकरी यांच्या संमतीनं सुरु होती आणि तेव्हाचे ज्येष्ठ सहकारी रमेश झवर , सुभाष सोनवणे , विश्वनाथ मोरे , यांच्यासह सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांना मान्य होती . याचं एक कारण सोपान आणि मी अशा दोघांचीही पत्रकारितेची समज आणि कॉपी बऱ्यापैकी होती , असं म्हणायला हवं . कारण रमेश झवर साहेबांच्या करड्या नजरेतून आमच्या बातम्या जात असतांनाही फारशा चुका निघत नसत ! ‘लोकसत्ता’तल्या त्या पिढीतल्या आमच्यासारख्या अनेक वार्ताहर तसंच वार्ताहराच्या लेखनाला अचूक        भाषा , शैलीचं नेमकं वळण आणि शिस्त लावण्यात झवर साहेबांचा वाटा मोठा आहे .

‘लोकसत्ता’च्या मुंबईसोबतच पुणे आणि नागपुरातही आवृत्त्या असाव्यात असा माधवराव गडकरी यांचा व्यवस्थापनाकडे आग्रह होता पण , तसं काही घडत नव्हतं . किमान राज्यातील महत्त्वाच्या शहरात तरी लोकसत्ताचे पूर्णवेळ वार्ताहर असावेत , असा आग्रह मग माधवरावांनी रेटून धरल्यावर अखेर नागपूर , ठाणे , रत्नागिरी , पणजी आणि पुण्याला पूर्णवेळ वार्ताहरांची पदं मंजूर झाली . यातही सोपान सोबतचा योगायोग म्हणजे त्यानं आणि मी नोकरीसाठी अर्जच केला नाही , तर थेट ‘मुलाखतीसाठीच या’ असे माधवरावांचे आदेश आले . एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे प्रकाशक रंगनाथन , ‘सांज लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक चंद्रशेखर वाघ , ‘लोकसत्ता’चे तत्कालीन डेप्युटी एडिटर अरुण टिकेकर आणि माधवराव गडकरी असे मातब्बर मुलाखत घेणाऱ्या मंडळात होते . मुलाखतीसाठी पहिलाच नंबर माझा लागला . केबिनमध्ये गेल्यावर ‘नागपूरसाठी बर्दापूरकर आणि ठाण्यासाठी बोंगाणे याची निवड मी करुन ठेवलेली आहे . तरी कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा’ , असं माधवरावांनी जाहीर केलं . संपादकासमोर अगदी प्रकाशकाचं ही काहीही न चालण्याचे ‘लोकसत्ता’तले ते दिवस होते (आता ते गेले ! ) . स्वाभाविकच कुणी काही प्रश्नच विचारले नाही आणि पुढचा योगायोग घडला…तो म्हणजे सोपान बोंगाणे आणि माझी पूर्णवेळ वार्ताहर म्हणून ‘लोकसत्ता’साठी एकाचवेळी निवड झाली . इथे एक छोटीशी उपकथा सांगायला हवी . ही मुलाखत दिल्यावर आठच दिवसांनी , माधवराव गडकरी यांच्या पुढाकारानं भरलेल्या जागतिक मराठी परिषदेच्या वृत्तसंकलनासाठी मी ( ‘लोकमत’साठी ) मॉरिशिसला गेलो . त्यामुळे मला ‘लोकसत्ता’त रुजू व्हायला थोडा विलंब लागला . यातली अजून एक उल्लेखनीय बाब  म्हणजे प्रख्यात व्यंगचित्रकार विकास सबनीस आणि मी रुजू होत असल्याची घोषणा ‘लोकसत्ता’च्या पहिल्या पानावर चौकटीत प्रकाशित झाली . संपादकाव्यतिरिक्त कुणी वार्ताहर किंवा उपसंपादक नोकरीत रुजू होत असल्याची माहिती अशी पहिल्या पानावर प्रकाशित होण्याची ‘लोकसत्ता’च्या इतिहासातली ती पहिली आणि शेवटची वेळ . पुढे माझा ‘लोकसत्ता’तला प्रवास ज्येष्ठ वार्ताहर ते निवासी संपादक आणि विदर्भ आवृत्तीचा संपादक असा झाला . पण , ते असो .

उजळ गव्हाळ वर्ण , साडेपाच फुटांवर ऊंची , छापून बसवलेले डोईवरचे केस , नीट नेटके कपडे परिधान केलेल्या पण , शर्टाचं वरचं बटन न लावणार्‍या  सोपानचं बोलणं किंचित वरच्या पट्टीत असायचं मात्र , त्याचा स्वर कधी कर्कश झाल्याचं आठवत नाही , त्यांच्या स्वराला एक लय असायची . सतत लागबगीत असणं ही सोपानची खासीयत ; घाईत आहे असं म्हणत स्वत: उभा राहात आणि समोरच्यालाही उभं ठेवत सोपान २० /२५ मिनिटं गप्पा सहज मारत असे ! सोपानची आणि माझी मैत्री होण्याचं आणखी एक कारण आम्हा दोघांचीही मुळं मराठवाड्यातली होती आणि बहरण्यासाठी तो ठाण्यात तर मी नागपुरात डेरेदाखल झालेलो होतो . मात्र कौटुंबिक पातळीवर आम्ही कधीच एकत्र आलो नाही ; मुंबईच्या अंतर आणि एसटीएसटी धावपळ असण्याचा तो माहिमा असावा .

सोपान बोंगाणे चैतन्याचं बहरलेला होता . सतत काही तरी करत राहणं ; अगदी काहीच नाहीतर गप्पांची मैफिल तरी रंगवणं हे त्याचं वैशिष्ट्य होतं . गप्पांची मैफिल रंगवायला जुने–जाणते मित्रच पाहिजेत , असा त्याचा आग्रह नसायचा . नवख्या आणि तरुण पत्रकारांनाही तो त्याच्या गप्पात सहभागी करुन घेताना मंत्रालयातल्या प्रेस रुममध्ये अनेकदा दिसत असे . एका राष्ट्रीयकृत बँकेतली भरपूर उत्पन्नाची हमी आणि लौकिकार्थाने संसारात स्थिरावण्याच्या जास्त संधी असूनही सोपान पत्रकारितेत आला , कारण पत्रकारिता त्याच्या रक्तात होती . लिहिण्याच्या बाबतीत तो ‘ग्रीन फिंगर्ड ‘ सदरात मोडणारा होता . तो ‘लोकसत्ता’त असतांना आमच्या नियमित भेटीगाठी होत . गप्पा रंगत . रात्री उशिरापर्यंत मैफिलीही रंगत . उत्सुकता ठासून भरलेली असल्याने ती निवळवण्यासाठी विविध मार्गांनं सोपान प्रयत्नशील असे . पत्रकारिता करताना कान आणि डोळ्यांचा जास्त वापर करण्याच्या आणि ओठ आवळून घेण्याचच्या सवयीमुळेही त्याच्याकडे चटपटीत कथा आणि माहितीचा भरपूर खजिना असे .

खरं तर , ‘लोकसत्ता’त तेव्हा आम्हा सगळ्यांचच चांगलं सुरु होतं . पण , माधवराव गडकरी हळूहळू बाजूला झाले आणि ‘लोकसत्ता’ची सर्व सूत्र अरुण टिकेकर यांच्या हातात गेली . टिकेकर आणि त्यांच्या चमच्यांचा , द्वेषमूलक समजांवर आधारित कारभार सुरु झाला . त्यात अनेक बळी गेले . धनंजय कर्णिक , तानाजी कोलते , नरेंद्र बोडखे , नागेश केसरी , अरुण खोरे आणि सोपान बोंगाणे असे अनेक ‘बावन्नकशी मोहरे’ त्या कारभाराचे बळी ठरले . सुमारांना मिळालेल्या पदन्नोत्या , अन्य मोठ्या संधी आणि ब्लॅक लिस्टमधल्या ज्येष्ठांना अवमानकारक वागणूक ही त्या कारर्किदीची वैशिष्ट्ये वाचकांपर्यंत पोहोचण्याचं काही कारणच नव्हतं आणि तसंच घडलंही . मी मात्र त्याच काळात मुंबईहून औरंगाबादला बदली करुन घेण्यात यशस्वी झालो त्यामुळे टिकेकरांच्या ब्लॅक लिस्टमध्ये असूनही वाचलो .

‘लोकसत्ता’ सोडल्यावर सोपानची पत्रकारितेतली भटकंती अव्याहत सुरु राहिली . स्थैर्य असं त्याला लाभलंच नाही . पाहिजे तशा आव्हानात्मक संधीही मिळाल्या नाहीत . सामना , पुण्यनगरी अशा अनेक दैनिकात त्यानं काम केलं पण , त्यात ना कामाचा आनंद होता ना आर्थिक स्थैर्य . एकदा  ‘लोकसत्ता’सारख्या ब्रॅंडमधे काम केल्यावर दुसरी कडे कामाचा आनंद आणि स्वातंत्र्य मिळत नाही हा अनुभव इतरांप्रमाणे त्यालाही आला पण , तो खचला नाही ; ती त्यांची वृत्तीच नव्हती . याच काळात काही विशेषांकही सोपाननं संपादित आणि प्रकाशित केले . अलीकडे मराठवाडा मुक्तीदिनाच्या निमित्ताने १७ सप्टेंबरला एक विशेषांक प्रकाशित करण्याची प्रथा त्यानं सुरु केली होती . त्याच्या या प्रकल्पासाठी लिहावं म्हणून तो आवर्जून साद घालत असे . प्रत्येकवेळी प्रतिसाद देणं मलाच जमलं नाही.

माझी बेगम मंगलाच्या आजारपणामुळ आमच्यातला संवाद अलीकडच्या तीन वर्षात तुटक-तुटक होत गेला . त्यानंतर गेले साडे तेरा-चौदा महिने कोरानानं सर्वांनाच मृत्युच्या सावटातली नजरकैद ठोठावली . माणसा-माणसांतला संवाद कमी होत गेला आणि माणूस एकांतवासाला सरावला . सोपान आणि माझ्यातल्या संवादाबाबतही असंच होत गेलं . आमच्यातलं शेवटचं बोलणं बहुधा चार-साडेचार महिन्यांपूर्वी झालं . सोपानचा स्वर तसाच उत्साही होता . नवनवीन काहीतरी करण्याची उमेदी भाषा त्याच्या बोलण्यात होती .त्याच्या नवीन प्रकल्पात लिहिण्याची माझ्याकडून हमी हवी होती . वगैरे वगैरे असं बरंच बोलणं झालं .

-आणि अचानक आली भोवंडून टाकणारी सोपन बोंगाणेच्या मृत्युची वार्ता . सोपान चे सर्व मनसुबे हवेतच विरुन गेले…

■■■

शोक तुपेशी माझी फार कांही जवळीक नव्हती पण , एकाच ब्रॅंडमध्ये काम करत असल्यानं एकमेकाला ओळखत होतो मग  टेलिफोनिक मैत्री झाली . मे १९९८ ते मार्च २००३ मी औरंगाबादला असतांना हा टेलिफोनिक संवाद बराच वाढला आणि पुढे कायमही राहिला . तेव्हा लक्षात आलं , स्वभाव लाघवी होता त्याचा . वयानं तो दहा वर्षानी धाकटा होता आणि माझा वडीलधारेपण त्यानं श्रद्धेनं सांभाळलं . तो धार्मिक होता की नाही माहिती नाही पण , मी एकदा तरी शिर्डीला यावं असा त्याचा आग्रह असायचा .

अशोक तुपेचा शेती , राजकारणाचा अभ्यास जबरा होता . त्यामुळे त्याचे कॉपी कधी वरवरची वाटत नसे . कधी एखादा संदर्भ लागला तर तो तत्परतेनं पुरवायचा . मी दिल्ली आणि नागपूरला असतांना अशोकनं दोन वेळा कार्यक्रमाला येण्याचं आमंत्रण दिलं पण , त्या तारखा माझ्यासाठी सोयीच्या नव्हत्या . कधीच भेट न झालेला हा मित्र कायमचा मनात मुक्कामाला आलेला होता . ‘भेटू या’ असं अनेकदा ठरवूनही त्याच्या गावी कधी जाणं झालं नाही . आमची समोरासमोर कधी भेट झालीच नाही ते नाहीच . कोरोनाग्रस्त झाल्याची अशोकची पोस्ट वाचली आणि काळजात चर्र झालं आणि आता भेट होण्याची शक्यता मुळीच उरलेली नाही…

सोपान आणि अशोक तुपे हे ‘लोकसत्ता’तले सहकारी एकाच दिवशी जावेत हे जास्तच दु:खद आहे . मित्रांवर असा मजकूर लिहिण्याची वेळ येते तेव्हा पत्रकारितेतल्या सुख-दुख:ला सरावलेले स्थितप्रज्ञतेचे डोळे नकळत ओलावतातच …सध्या तर दररोजची सकाळ अशा मृत्युच्या वार्तांची किरण घेऊन उगवते आणि दिवसावर त्याचं भेसूर सावट पसरलेलं राहतं . म्हणून  सकाळ होऊच नये असं वाटतं .

एक छोटीशी ख्वाईश है , कोरोनाच्या सध्याच्या सावटात एखादी तरी सकाळ मृत्यू वार्तेविना उजाडावी…

© या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत 

प्रवीण बर्दापूरकर

( २६ एप्रिल  २०२१ )

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com /  praveen.bardapurkar@gmail.com

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

||आठवणीतले मान्यवर-६ ||

BARDAPURKAR’S V-BLOG :

दिवाकर रावते 

लिंक- https://youtu.be/U3bx1z42FYU

शहरी शिवसेनेचा ग्रामीण चेहेरा कोण , या प्रश्नाचं उत्तर दिवाकर रावते हेच आहे .

शब्दाला पक्के , मैत्रीला अभंग आणि डिएनए शिवसेना तसंच ‘ ठाकरे’ असणारं हे नेतृत्व आहे .

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित पोस्ट