साहित्यातली हुल्लडबाजी !

यवतमाळच्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची बिनविरोध निवड झाल्यावर दहाएक दिवसांनंतरची घटना आहे- नागपूरच्या शुभदा फडणवीस आणि स्वाती खंडकर आमच्याकडे आल्या होत्या . शुभदा म्हणाली, अरुणाताई अध्यक्ष झाल्यानं यंदा तरी संमेलनात कोणतेच वाद निर्माण होणार नाहीत‘.  

समाज माध्यमांवर ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्या जर बिटविन द लाईन वाचल्या तर अरुणाच्या निवडीनं कांहीच फरक पडणार नाही . याही वर्षी टोळी युद्ध होईलच’, असं त्यावर मी म्हणालो . माझं म्हणणं रुचलेलं नसल्यानं अरुणाताई कशा अंतर्बाहय साहित्यिक आहेत , त्या अध्यक्ष झाल्यानं संमेलनाची ऊंची वाढली आहे , त्या कशा गटा-तटांपासून दूर ,      अ-राजकीय आहेत…वगैरे शुभदा बोलत राहिली तरी मी ठाम होतो कारणं-

मुद्दा एक- समकालीन मराठी साहित्य समाज आणि वास्तव यांच्याशी पाहिजे त्या प्रमाणात रिलेट होत नाही ; जागतिकीकरण आणि खूली अर्थव्यवस्था देशात आल्यावर ज्या भोवंडून टाकणार्‍या गतीनं समाज , माणसाचं जगणं आणि बदललेल्या मूल्यव्यवस्थेचं चित्रण मराठी साहित्यात प्रभावी आणि मुलभूतपणे उमटलेलं नाही . जी नवीन समाज रचना अस्तित्वात  आली , त्यात जुन्या समाजातला एक मोठा वर्ग मोडून पडला , कांही तर उध्वस्त झाला , एक आर्थिक सुस्थिती असणारा सर्व जाती-धर्मीय वर्ग समाजात अस्तित्वात आला ; या नवीन समाजाचं भावजीवन , जगणं , आसोशी , समस्या याचं चित्रण फारच अपवादानं मराठी साहित्यात व्यक्त झालं .   

मुद्दा दोन- शिक्षणाचं सुलभीकरण आणि सार्वत्रिकीकरण घिसाडघाईनं झाल्या(केल्या)मुळे लोक सुशिक्षित ऐवजी केवळ साक्षर झाले . त्यामुळे आकलन , निकोप दृष्टी  आणि सांस्कृतिक समज असणारी पिढी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली नाही . एकीकडे बर्‍यापैकी आर्थिक स्थैर्य आलं तरी सर्वसमावेशक ( म्हणजे अभिजात वाचन , श्रवण , वैयक्तिक-कौटुंबिक-सार्वजनिक वर्तन आणि व्यवहार , सांस्कृतिक समज येणं…इत्यादी ) प्रगल्भता सार्वत्रिक निर्माण झाली नाही . त्यामुळे हुच्चपण म्हणजे प्रगल्भता असं समीकरण झालं . त्यात भर घातली गेली ती अर्धवट राजकीय समजाची ; त्यातून बोकाळला तो सुमारपणा , एकारला कर्कश्शपणा आणि कोणत्या तरी राजकीय विचाराचे गडद चष्मे घातलेला टोळीवाद .    

आधीच आपल्याकडे म्हणजे साधारण १९८०च्या आधी निखळ , अभिजात , थेट जगण्याला भिडणारं साहित्य विपुल नव्हतं . साहित्याच्या असलेल्या त्या प्रवाहात ग्रामीण , दलित , आदिवासी , सामाजिक बांधिलकी मानणारे , वास्तववादी , अमूर्त , बंडखोर , परिवर्तनवादी असे सशक्त नवउपप्रवाह निर्माण झाले . हे उपप्रवाह मिसळून साहित्य नावाचा जो कांही मुख्य प्रवाह होता तो , मुद्दा नंबर एक आणि दोनमुळे गढूळला . मराठी साहित्यात साधारण १९८० नंतर जात-पोटजात-उपजात आणि धर्मनिहाय टोळ्या निर्माण झाल्या ;  प्रत्येक जात आणि धर्माच्या कथित अस्मितांची आणि राजकीय हेतूंची त्यात भर पडली . हे कमी की काय म्हणून अलीकडच्या सुमारे दोन-अडीच दशकात ; म्हणजे उन्मादीत झुंडशाही करुन बाबरी मस्जिद पाडून , समाजात धार्मिक दरी निर्माण करुन राजकीय हेतू  साध्य केल्यावर ; हिंदुत्ववादी विरुद्ध अन्य ( म्हणजे गांधीवादी , समाजवादी , डावे , सर्वधर्मसमभाववादी , काँग्रेसी , (महा)राष्ट्रवादी…असे , म्हणजे एक विरुद्ध अनेक ! ) अशी दरी निर्माण झाली . समाज माध्यमांचा प्रभाव वाढल्यापासून बहुसंख्य हुच्चात त्यांचे व यांचे अशा ( पगारी आणि अंधभक्त ) ट्रोल्सच्या टोळ्यांची भर पडली . टोळी म्हणजे कांही एक सुशिक्षित , समंजस , सुसंस्कृत समाज नव्हे की त्याला कायदा , घटना , नियम असतात . टोळी प्रमुखाच्या मनाला येईल तेच खरं , तोच कायदा आणि तो सर्वांनी मान्य केलाच पाहिजे असा हट्ट , दुराग्रह , हुल्लडबाजी…शेवटी दंडेली , असा तो मामला असतो त्याचा परिणाम म्हणून स्टॅम्प मारु संस्कृतीचं उदंड पीक सर्वच माध्यमांत आलेलं  आहे . कोणतीही शहानिशा न करता पुरोगामी आणि प्रतिगामी , डावे  आणि उजवे असे ठप्पे या टोळ्या/ट्रोल्स एकमेकावर किंवा अन्य कुणावर मारत असतात .

इथे आणखी एक मुद्दा माध्यमांचा आहे . आपण बातम्या , लेख , स्तंभ , अग्रलेख लिहितो ( आणि त्याची पुस्तकं प्रकाशित झाली ) म्हणजे आपण साहित्यिक आहोत आणि अमुक कवी/लेखक आपल्यामुळे घडला असा रविवार पुरवणी सांभाळणार्‍या तसंच बहुसंख्य अॅन्कर्स/पत्रकार/संपादकांचा गोड गैर समज आहे . आपल्यामुळेच साहित्य व्यवहार चालतो असा त्यांचा ठाम समज आहे . “थंड हवा बघायला मिळते आहे . हुडहुडीत थंडी पसरलेली आहे , या इतिहासाच्या मागचा इतिहास असा आहे की, खरं तर आज राखी पौर्णिमा आहे , एकंदरीत निर्भयाची निर्घृण हत्या झाली , बटाटे उकळून घ्यावेत , उमेदीची पुरचुंडी खिशात ठेवलेला , बलात्कार प्रकरणात दोषी ठरवल्याचे विशेष न्यायालयाचे निर्देश” , अशी दिव्य भाषा बोलत आणि लिहित मराठी भाषेचे धिंडवडे काढणार्‍या माध्यमातील बहुसंख्यांना साहित्य हा एक गंभीर विषय आहे याची फिकीर नसते ; त्यांच्यासाठी तो असतो केवळ एक न्यूज इव्हेंट आणि आली वेळ मारून नेण्याचं कौशल्य . आपल्याला माहिती आहे तेवढंचं ज्ञान अस्तित्वात आहे आणि त्या आधारे इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती जोपासणारी माध्यमातील सुमारांची ही एक टोळी साहित्य प्रांती धुमाकूळ घालते आहे .  

सुमारांची आणखी एक टोळी मराठी ( दासू वैद्य , प्रमोद मुनघाटे , संजय उत्रादकर , वीरा राठोड , श्रीधर नांदेडकर , प्रवीण बांदेकर , वणीकर अजय देशपांडे , ऋषिकेश कांबळे, पी. विठ्ठल , नीरजा , प्रज्ञा लोखंडे , वंदना महाजन …अशा कांही कसदार साहित्यिकांचा अपवाद वगळता ) भाषा शिकवणार्‍या शिक्षक आणि प्राध्यापकांची आहे . भाषा शिकवतो म्हणजे आपण साहित्यिक आहोत असा त्यांचाही अनेक माध्यमाकारांप्रमाणे गोड गैरसमज असतो . याशिवाय मुंबई-पुण्याच्या टोळ्या वेगळ्या , प्रत्येक माध्यम समूहाची वेगळी टोळी ( विश्वास बसत नसेल तर रविवार पुरवण्यातील लेखकांची नावं आणि कोणाच्या पुस्तकांची समीक्षणं प्रकाशित होतात याचं निरीक्षण करा ) आणि त्यांचा वेगळा अजेंडा अशाही टोळ्या आहेत . या सर्वांकडे संशयाच्या (Skeptical ) नजरेतून पाहणारीही आणखी एक टोळी  आहे ! भाषा , शैली , आशय , समज आणि आकलन थिटे असणार्‍या या अशा सुमारांच्या गल्लो-गल्ली असणार्‍या टोळ्या , अलीकडच्या कांही दशकात मराठी साहित्या हुल्लडबाजी करत  असून त्यांना अनेकदा जात-उपजात-पोटजातीचे गंध आहेत ही वस्तुस्थिती आहे .

समकालीन मराठी साहित्य हा असा , अनेक टोळ्यांचा एक गढूळ प्रवाह झाला असून त्यात अस्सल , कसदार , जगण्याला थेट भिडणारं , जागतिक बदलांचं भान असणारं जे कांही  थोडं-बहुत लेखन आणि ते करणारे लेखक आहेत ते कोपर्‍यात अंग चोरून उभे आहेत . मराठी भाषा आणि साहित्यासाठी या टोळ्या कशा घातक आहेत , हे यवतमाळला जो कांही तमाशा घडवून आणला गेला त्यातून पुन्हा एकदा समोर आलं . नयनतारा सहगल यांना आमंत्रण देण्याशी सुतराम संबंध नसणार्‍या , त्यांचा अवमान न केलेल्या संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांच्यावर यातले अनेक टोळीकर तुटून पडले . ( ढेरे का ढोर ? अशीही एक कमेंट वाचली . ) सहगल बाईंना दिलेलं निमंत्रण मागे घेणं मुळीच पसंत नसून त्याबद्दल मी व्यासपीठावरून बोलेन असं सांगितल्यावरही अरुणा ढेरेनी संमेलनावर बहिष्कार टाकावा अशी ( क्वचित जातीकडे निर्देश करत ) मोहीम माध्यमांत चालवली गेली . त्याला उत्तर देण्यासाठी अरुणाचे समर्थक उतरल्यानं साहित्यातल्या टोळी युद्धाचा वणवा पेटताच राहिला .             

( अरुणा ढेरे यांचे अर्कचित्र प्रभाकर भाटलेकर यांच्या सौजन्याने )

          

अरुणाला ९ जानेवारीला सक्काळी फोन केला . मृदु स्वभाव आणि लेखनाचा वसा ओंजळीतल्या दिव्यासारखा आयुष्यभर व्रतस्थपणे जपणार्‍या अरुणाशी असलेल्या मैत्रीनं आता चाळीशी पार केलेली आहे . साहित्य आणि राजकारणातील अनेक मुद्दयांवर आमचे परस्परांशी मतभेद आहेत तरी आमचं मैत्र छान टिकून आहे कारण ,  मतभेद  म्हणजे शत्रुत्व नाही ; मतभेद व्यक्त करण्यात एकारला कर्कश्शपणा नाही . आम्ही एकमेकांना अरे-तुरे करतो याचा धक्का बसून कुणी समाज माध्यमांच्या भिंतीवर कांही तरी बेताल-बेसूर-बेधार पोस्टायच्या आंतच हे सांगून टाकलं . आमच्या बोलण्यात संदर्भ अर्थातच वादाचा होता . संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा ही मागणी सर्वच माध्यमांत टिपेला पोहोचलेली होती तरी अरुणा शांत   होती . संमेलनाला जाणार आणि भाषणात जे कांही सांगायचं ते स्पष्टपणे आवाज न चढवता ठामपणे सांगणार हेही तिच्या बोलण्यात आलं . अध्यक्षपद अरुणाच्या डोक्यात शिरलेलं नाही आणि निर्माण झालेल्या वादानंतरही ती दबावाखाली आलेली नाही , हे जाणवून छान वाटलं . श्रीपाद भालचंद्र जोशी आणि माझ्यातली मैत्री १९८१पासून . अनेक साहित्यिक उद्योगात आम्ही सोबत वावरलो . तो तेव्हाही डावा होता आणि अजूनही आहे ( तेव्हा पक्षासाठी पूर्ण वेळ काम करण्याचं त्याचं स्वप्न होतं आणि ए.बी. बर्धन यांची इच्छा त्यानं दिल्लीला जावं अशी होती , हे अनेकांना ठाऊक नसणारच . ) विदर्भ साहित्य संघातील प्रस्थापित व  संघानुकूल लोकांच्या दबावाला न जुमानता त्यानं प्रगतीशील लेखक आणि लेखन हे व्यासपीठ सुरू केलं . विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी कुणीही असो , गेली तीन दशके सर्वेसर्वा आहेत मनोहरपंत म्हैसाळकरच . ( जसे मराठवाड्यात कौतिकराव ठाले पाटील  , एकेकाळी पुण्यात ग. वा. बेहेरे , मुंबईत अच्युत तारी ) . म्हैसाळकर ठरवतील तोच अध्यक्ष ( आता कळलं नं राम शेवाळकर आणि सुरेश द्वादशीवर अध्यक्ष का झाले आणि प्रदीर्घ काळ त्या पदावर का टिकले ते ! )  आणि त्यांची हीच संस्थेची भूमिका . वि. सा. संघाचे पदाधिकारी तीच भूमिका  मांडणार ; त्यांना मांडावीच लागणार नाही मंडळी तर संघातून डच्चू ठरलेला . मराठवाडा साहित्य परिषद , पुण्याची म. सा. प. , मुंबई संघात यापेक्षा काय वेगळा घडतंय ? श्रीपाद विदर्भ साहित्य संघात तेव्हाही कायम बंडाचं निशाण फडकावत असे . म्हैसाळकर यांची भूमिका आक्रमकपणे मांडत असल्यानं अखिल भारतीय साहित्य महामंडळात श्रीपादचे शत्रू कौतिकराव ते कौतिकराव समर्थक असे मुंबई ते नागपूर मार्गे पुणे , औरंगाबाद असे सर्वत्र पसरलेले . श्रीपादचा बकरा करण्यात यातील अनेकजण आहेत !

मनोहरपंत म्हैसाळकर यांनी श्रीपादला वि. सा. संघाचं अध्यक्ष होऊ दिलं नाही पण , महामंडळावर पाठवलं कारण त्यांना वय आणि प्रकृतीची साथ नाही म्हणून म्हणजे , नाईलाजानं . आधी अरुणा ढेरेंची बिनविरोध निवड आणि नंतर नयनतारा सहगल यांचं नाव उद्घाटक म्हणून निश्चित करवून घेण्यात श्रीपाद यशस्वी झाल्यावर ठसठस वाढली आणि बाईंचं भाषण हाती आल्यावर स्थानिक संयोजक मंडळी बिथरलीच ! संयोजकातील हिंदुत्ववादी सत्ताधार्‍यांनी हात आखडता घ्यायचा ठरवल्यावर यवतमाळकर संयोजकानी आधी सहगल बाईंचं भाषण माध्यमांकडे ( पुणे मार्गे ?) लिक करुन मनोहर म्हैसाळकर यांचा दरबार गाठला . सहगल बाईंचं निमंत्रण रद्द करण्याचा अपेक्षित प्रस्ताव आला पण , इंग्रजीत पत्र कोण लिहिणार ? मग तो निर्णय मंजूर नसूनही सदभावना म्हणून श्रीपाद जोशींनी मसुदा तयार करून दिला .  ( हा श्रीपादचा कोणतीही भेसळ नसलेला शुद्ध  मूर्खपणा होता ) सहगल बाईंची अपेक्षित तिखट प्रतिक्रिया आली . दरम्यान हिंदुत्ववाद्यांचा हस्तक असल्याच्या किरणात श्रीपाद उजळलेला होता ; तो मेल श्रीपाद जोशीनं लिहिल्याचा कथित पुरावा सादर होताच बहिष्कार सत्र सुरू झाल्यानं त्या किरणांचा वणवा पेटला आणि त्यात श्रीपाद जळून खाक झाला ! एक लक्षात घ्या , स्थानिक म्हणजे यवतमाळकर संयोजकांच्या मजबूरीची पावती श्रीपाद जोशींच्या नावावर फाडली आणि तीही त्यांच्यावर उजव्यांचा समर्थक असा ठप्पा मारुन…हा न्याय एका कवीसाठी असा अकाव्यगत ठरला !   

नयनतारा सहगल यांना निमंत्रण देणं आणि ते माघारी घेणं या पेटवलेल्या वादात अनेक मूळ मुद्दे बाजूला पडले आणि भलत्याच बाबींवर चर्चा झाली ; अखिल भारतीय (?) मराठी साहित्य संमेलन , त्याची रचना , नियम आणि प्यादी हलवणारी मंडळी हे मुद्दे नेहेमीप्रमाणे बाजूला राहिले . साहित्य संमेलनाच्या राजकारणाशी दिल्लीला जाईपर्यंत ( जून २०१३ ) मी जवळून निगडीत होतो ; मतदार होतो , अध्यक्षपदाच्या अनेक निवडणुकात सक्रिय सहभाग होता ; मनोहर म्हैसळकर कितीही नाकारोत , त्यांचा शिष्य म्हणून माझ्या सक्रियतेत सलगता असल्यानं या वादात पडद्याआड असणारे अनेक सहज लक्षात आले म्हणून माहिती नसणारांसाठी केवळ संदर्भ म्हणून हे नमूद केलं .  

एकुणात काय तर , मराठी साहित्य म्हणजे कांही सन्माननीय अपवाद वगळता हुल्लडबाज टोळ्यांचं कुरण झालंय !

Cellphone  +919822055799

 
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट