फडणवीसांचे ‘अधिक’ आणि ‘उणे’

तेव्हा मंत्री असलेल्या गणेश नाईक यांनी शिवसेना सोडतांना केलेल्या टीकेला उत्तर देतांना  तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी “जे कालपर्यंत प्रेम करत होते , पाया पडत होते , ते माझा आज एवढा तिरस्कार का करु लागले “, असा प्रश्न विचारला   होता , याचं स्मरण सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी तुफान टीका आणि पक्षांतर्गत कथित उठाव पाहून आठवला .  महिना-सव्वा महिनाभरापूर्वीपर्यंत ज्यांच्यावर , महाराष्ट्र भाजपचा आधारस्तंभ म्हणून स्तुतीसुमने उधळली जात होती , ज्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रभावी नेतृत्व म्हणून पहिलं जात होतं , ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आत्ताच्या घडीला जोरदार टीकेची राळ उठली आहे , समाज माध्यमांवर तर अत्यंत तिरस्करणीय भाष्य केली जात आहेत . महाराष्ट्राचा ‘अयशस्वी मुख्यमंत्री’ असा ठपका त्यांच्यावर ठेवला जात आहे ; घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असं जे म्हटलं जातं ते हेच आहे .

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्ण अयशस्वी ठरले ही टीका वास्तवाला धरुन नाही असं माझं ठाम मत आहे , असं भाष्य मी गेल्या आठवड्याच्या मजकुरात शेवटी केलेलं होतं त्याचं कारण कोणत्याही पदावर आलेला कुणीही माणूस शंभर टक्के यशस्वी नसतो आणि शंभर टक्के अयशस्वीही नसतोच . जसं , माणूस शंभर टक्के सदवर्तनी नसतो आणि शंभर टक्के दुर्वर्तनीही नसतो तसंच हे आहे . तस्सच मुख्यमंत्री आणि राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं कांही ‘अधिक’ आणि कांही ‘उणे’ आहे . यातलं कोणतं पारडं जड आहे हे प्रत्येकजण त्याच्या आकलनाप्रमाणं ठरवू शकतो . अर्थात हे ठरवण्यासाठी कोणत्या तरी राजकीय विचाराचा गडद रंगाचा चष्मा न घालता , एकारलेपणा न करता , विवेक बुद्धीनं बघण्याची गरज आहे .

एक महत्वाचा भाग म्हणजे मी यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री म्हणून  कारकीर्द पाहिलेली नाही . त्याच्या संदर्भात ऐकलं , वाचलं आहे . पत्रकार म्हणून मी जे पहिलं त्या पार्श्वभूमीवर सांगतो – काहींना ना पटणार नाही , काहींना तर  मिरच्या झोंबतील तरी सांगतोच , महाराष्ट्राच्या सर्वोत्कृष्ट तीन मुख्यमंत्र्याचा माझा क्रम असा आहे ; एक- वसंतदादा पाटील , दोन-सुधाकरराव नाईक आणि तीन-देवेंद्र फडणवीस . मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बजावलेली कामगिरी निश्चितपणे उजवी आहे .  विरोधी पक्षात प्रदीर्घ काळ गेल्यानं लोकांच्या प्रश्नाची फडणवीस यांची जाण आणि संवेदनशीलता किंचितही बोथट नव्हती . उच्चविद्याविभूषित असलेले देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या विकासाची तळमळ आहे आणि त्यासाठी ते पायाला चक्र लाऊन फिरले याबद्दल कोणतंही दुमत नाही . मात्र , पहिल्या दिवसापासून फडणवीस यांना विरोधाला तोड द्यावं लागलं . कोणी कितीही नाकारो आधी स्वपक्षातच त्यांची सर्वात जातीवरुन हेटाळणी झाली , हे अनेकांनी अनुभवलं आहे . मुख्यमंत्रीपदाच्या पक्षांतर्गत इच्छुकांनी सुरुवातीला तर भर मंत्रीमंडळाच्या बैठकीतही त्यांचा एकेरी उल्लेख केला गेलेला आहे ; त्याबद्दल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर हे उल्लेख थांबले . माझ्या चार दशकांच्या पत्रकारितेत मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीच्या जातीची एवढी चर्चा झाल्याचं आठवत नाही पण , फडणवीस यांनी कोणाच्याही जातीचा कधी उल्लेख केला नाही .

नंतर त्यांच्या देहयष्टीवरुन यथेच्छ टिंगलटवाळी सुरु  झाली ती अजूनही थांबलेली नाही . खरं तर समाज माध्यम आणि लोडेड कार्यकर्त्यांनी हे लक्षातच घेतलं नाही की समाजात असंख्य लोक बेढब आहेत . देवेंद्र फडणवीस ​हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्यावर ‘बच गया साला’ अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या , हे निरोगी समाजाचं लक्षण कसं समजता येईल ? ज्याची पत्नी प्रचंड

देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता आणि कन्येसह . एखाद्या मुख्यमंत्र्याचे कुटुंबीय प्रचंड ट्रोल होण्याची महाराष्ट्रातली ही पहिलीच वेळ आहे .

कुरुपपणे ट्रोल झाली , असे देवेंद्र फडणवीस एकमेव मुख्यमंत्री आहेत . आपण बहुसंख्य अर्धवट किंवा चूक माहितीवर आधारित आणि जहाल व विवेकशून्य प्रतिक्रियावादी ( Mis or half informed rabid reactionary ) समाजात राहतो  असा समज त्यामुळे कुणाचा झाला तर त्यात गैर कांहीच नाही . मात्र त्या टीकेकडे लक्ष न देता  कार्यरत राहिलेल्या फडणवीस यांच्या ‘अधिक’मध्ये त्यांच्यातला हा समंजसपणा म्हणा की उमदेपणा म्हणा महत्वाचा आहे .

मराठा आरक्षण , शेतकऱ्यांना कर्जमाफी , मराठा तरुणाना रोजगारासाठी आर्थिक मदत , समृद्धी महामार्ग , सर्व लाभार्थीना पैसे थेट खात्यात , २४ तास वीज पुरवठा , जलयुक्त  शिवार , नियुक्त्यांसाठी महापोर्टल , पत्रकार सन्मान योजना , एसटी महामंडळात महिलांना चालक म्हणून संधी , खाजगी शिक्षण संस्था चालकांच्या त्यांच्या सरकारने आवळलेल्या मुसक्या ,  दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोफत पास , मराठवाड्यासाठी ​वॉटर ग्रीड औद्योगिक विकासासाठी प्रयत्न , विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याला जास्त निधी , नागपूरवर तर मेहेरनजर अशी असंख्य चांगली कामं फडणवीस सरकारच्या नावावर आहेत .  त्यात त्रुटी नक्कीच काढता येतील पण ,  अशी अनेक लोकहिताची कामं फडणवीस सरकारच्या नावे आहेत . कर्जमाफीसाठी लाभार्थी शेतकरी निवडतांना या सरकारने निश्चित केलेले निकष निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत , त्यामुळे धनदांडगे माफीपासून दूर राहिले . महापोर्टलमुळे निवड प्रक्रियेत होणारे घोटाळे बंद होणार आहेत . असो , सत्तेत पांच वर्ष पूर्ण राहिलेल्या कोणत्याही सरकारने केलेल्या कामाची यादी नेहेमीच लांब असते .

तरीही , या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावी झालेली नाही हेही तितकंच खरं पण , याची कारणंही समजून घेणं आवश्यक आहे . सरकारच्या आणि प्रशासनाच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट निर्णयाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते हे खरं असलं तरी लोक सरसकट सरकार आणि प्रशासन एकाच मापाने मोजतात म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की , सरकारनं निर्णय घ्यायचे आणि प्रशासनानं अंमलबजावणी करायचे असते . नेमका घोळ  इथेच झाला , सुरुवातीला प्रशासनानं सहकार्य केलं नाही ; नंतर निर्माण झाला तो  मुख्यमंत्री कार्यालयात उभारल्या गेलेली  समांतर यंत्रणा ‘चहापेक्षा किटली गरम’ ठरली . ही गरम केटली आणि  प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा ( की परस्परांवर कुरघोडी करण्याचा ? ) होता . स्वत: देवेंद्र फडणवीस स्वच्छ राहिले पण या गरम किटल्यांतून उडालेले शिंतोडे आणि कांही सहकारी व अधिकाऱ्यांच्या संशयास्पद वर्तनाचे डाग फडणवीस यांच्या प्रतिमेवर पडलेच . त्यासाठी जणू ‘क्लीन चीट’ची टांकसाळच फडणवीस यांनी सुरु केलेली होती .  देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकचालकानुवर्ती आहे असा समज त्यातून जो साधार पसरत गेला .

सरकारच्या अनेक चांगल्या योजना आल्या पण शेवटच्या स्तरावरील सामान्य लोकांपर्यंत लाभ पोहोचण्यास उशीर तरी झाला किंवा ते लाभ पोहोचलेच नाही  . या संदर्भात देवेंद्र फडणवीस कायमच अंधारात राहिले . Too good is too bad also हे ते विसरले . योजनांच्या अंमलबजावणीचे जे कागदी घोडे प्रशासनाने नाचवले गेले त्यावर फडणवीस विसंबून राहिले . अनेक प्रामाणिक व कार्यक्षम अधिकाऱ्याची योग्य जागी नियुक्त करणंही फडणवीस यांना जमलं नाही . प्रवीण परदेशी , अजोय मेहेता , राधेश्याम मोपलवार , यशस्वी यादव , सतीश माथुर , संजीव जैस्वाल , ब्रजेश सिंग यांच्यासारख्या अनेक अधिकाऱ्यांना ‘अभय’ देण्यानंही प्रशासनात वाईट तर ज्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली त्यांना मोकळं सोडल्यानं जनतेत विपरीत संदेश गेला . सरकारच्या ‘स्टार्ट अप’ या योजनेची वाट लावण्यात असे कांही अधिकारीच जबाबदार आहेत . या योजनेत म्हणूनच १०० पैकी ८२ उद्यमी परराज्यातले समाविष्ट झाले . फडणवीस यांनी जाहीर करुन आणि त्याबाबत विधानपरिषदेत आश्वासन देऊनही नागपूरच्या महिला पत्रकार सुनीता झाडे यांना आर्थिक सहाय्य मिळालं नाही ; त्याला कारण ही बथ्थड नोकरशाही आणि या गरम किटल्याच आहेत .  मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बसून कारभार चालवण्यावर भर न दिल्यानं प्रशासनात शिस्त आलीच नाही . सांगली , कोल्हापूरच्या भीषण पुराच्या काळात देवेंद्र फडणवीस निवडणूकपूर्व प्रचार यात्रेत रमले ही तर फार मोठी घोडचूक होती . या पुरापासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेला ओहोटी झपाट्यानं लागण्यास प्रारंभ झाला .

मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राजकीय पातळीवरही देवेंद्र फडणवीस  राज्यातले यशस्वी नेते म्हणून पुढे आले . ( पक्षातल्या कांहीना फडणवीस यांनी डावललं यात आश्चर्य आणि गैरही कांहीच नाही ; फडणवीस यांच्याऐवजी पंकजा मुंडे , खडसे , तावडे मुख्यमंत्री असते तरी त्यांनीही कुणाला न कुणाला असंच डावललं असतं , त्यालाच राजकारण म्हणतात ! ) या काळात राज्यातल्या सर्व निवडणुकात पक्ष विस्तार करण्यात देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती यश मिळवलं ; उद्धव ठाकरे यांच्याशी मैत्री राखूनही शिवसेनेची कोंडी करण्याची कोणीही संधी त्यांनी सोडली नाही आणि महाराष्ट्र भाजपचा एकमेव चेहेरा म्हणून ते पुढे आले . पण, त्याच वेळी  सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती नकारात्मक होत गेली ; ‘मी म्हणजे महाराष्ट्र’ आणि ‘ मी म्हणतो तीच पूर्व दिशा’ असा (अहं )भाव त्यांच्या वृत्ती व देहबोलीत हळूहळू आला . त्यातच अन्य पक्षातून आवक वाढली . देवेंद्र  फडणवीस यांनी त्याला उत्तेजन दिलं आणि ‘केडर’ नाराज होतं गेलं . ( यातील दस्तुरखुद्द नागपुरातील अनेकांनी नंतर भाजपला मतदान करणं टाळलं ; त्यातील अनेकांची नावं मला माहिती आहेत . ) शरद पवार म्हणजे महाराष्ट्र हे रुढ झालेलं राजकीय समीकरणही देवेंद्र फडणवीस यांनी  मोडीत काढल्यासारखं चित्र निर्माण झालं आणि त्यांच्या भाषेत ‘आम्ही’ ऐवजी ‘मी’ असा दर्प आला . पण , त्यांना शरद पवार यांचा नेमका अंदाज आला नाही आणि अलीकडच्या दीड-दोन महिन्यातल्या शरद पवार यांच्या खेळीनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीतून विरोधी पक्ष नेत्याच्या जागेवर नेऊन बसवलं !  विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही शिवसेना आणि भाजपत ( उद्धव आणि अमित शहा  यांच्यात )  बंद दाराआड ‘काय ठरलं’ होतं हे सांगण्याचं धारिष्ट्य फडणवीस यांनी का दाखवलं नाही हे एक कोडंच आहे .

मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस ‘नॉट रिचेबल’ झाले  हाही एक आक्षेप अगदी नागपूर ते मुंबई असा केला जातो आणि त्यात तथ्यही असलं ( त्यात चहाच्या केटलींचा वाटा मोठा असला ) तरी सत्तेत गेलेल्या कुणाचीही ती अपरिहार्य मजबुरीही असते हे विसरता कामा  नये . मुख्यमंत्रीच नव्हे तर राज्य मंत्रीपदाचीही व्यवधानं व्यापक असतात . मुख्यमंत्र्यांची वेळ मिळणं आणि सुरक्षा हे फार मोठे अडथळे असतात . कुणाला आणि त्यातही कोणत्याही राजकीय विचाराच्या  ज्येष्ठांना टाळणं किंवा ताटकळवत ठेवणं हा देवेंद्र फडणवीस यांचा  स्वभाव नाही , हे मी स्वानुभावानं सांगतो . ते आधी आमदार होते , त्याकाळात फोन केला तर आमची भिन्न राजकीय विचारसरणी आड न आणता आणि  वडिलकीचा मान राखून ते कमी-अधिक उशीरा का असेना नागपूरच्या आमच्या कार्यालयात किंवा माझ्या घरी येत असत . प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांचे व्याप वाढले ; ते कसे वाढतात हे ठाऊक असल्यानं मी त्यांना एसएमएस टाकून ठेवत असे आणि वेळ मिळताच त्यांचा फोन येत असे . माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्या कन्येच्या विवाहाचा अपवाद वगळता मुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीस यांच्याशी एकही निवांत भेट नाही ; झाली ती भेटही तशी ओझरतीच होती . त्यावेळीही मला पाहताच ते पट्कन माझ्याकडे चालत आले . मी आता पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात नाही किंवा वृत्त वाहिन्यांवरही जात नाही तरी , ‘मुख्यमंत्री’ देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माझा कोणताही एसएमएस अनुत्तरीत राहिला नाही किंवा प्रतिसाद म्हणून त्यांचा फोन आला नाही असं घडलं नाही . आज प्रथमच वाच्यता करतो , ( प्रशासनानं दीर्घ वेळ लावला तरी ) ‘ग्रंथाली’च्या मुंबईतील जागेचं आणि पत्रमहर्षी अनंतराव भालेराव स्मृती ग्रंथासाठी सरकारकडून अनुदान देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून केवळ एका एसएमएसवर केलेलं आहे . असं सांस्कृतिक भान जपणारे शरद पवार , विलासराव देशमुख आणि सुधाकरराव नाईक यांच्यानंतरचे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचा हा अनुभव आहे .

देवेंद्र फडणवीस जर पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर आज भाजपत दिसणारी कथित नाराजी म्हणा की बंडाळी झाली नसती उलट त्यांची स्तुती करण्याची अहमहमिका बघायला मिळाली असती . एका मोठ्या भूकंपानंतर अनेक लहान धक्के बसतात तसं हे काहींसं मुख्यमंत्रीपद हातून गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना अनुभवायला मिळत आहे . त्या धक्क्यांच्या गर्दीत सहभागी न होता मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून त्यांच्यावर पूर्ण अयशस्वी असा ठप्पा मारताच येणार नाही ; तो त्यांच्यावर अन्याय ठरेल . अन्य सर्व मुख्यमंत्र्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्यातही कांही ‘अधिक’ आणि कांही ‘उणे’ आहे . शिवाय राजकारणात कोणतीच परिस्थिती कायम नसते हे लक्षात घेता , उद्या कांहीही घडू शकतं . देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही घडी , झालेल्या चुकांबाबत आत्मपरीक्षण  करण्याची आणि त्यातून धडा घेण्याची आहे !

( देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे विवेक रानडे  , नागपूर यांच्या सौजन्याने )

 

 

 

 

 

Cellphone  ​+919822055799 / www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट