■ राजकारणाचे गेले ते दिन गेले…

दिवस अन तारीख नक्की आठवत नाही पण , हे नक्की आठवतं की १९७७चा मे महिना होता .

मुंबईच्या आताच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला एक टॅक्सी थांबली . खादीचा पांढरा कुडता , त्यावर जाकीट घातलेले एक गृहस्थ उतरले आणि प्रवासाची बॅग हातात घेऊन ते गृहस्थ औरंगाबादला ( आताचे छत्रपती संभाजी नगर ) जाणाऱ्या रेल्वेत जाऊन बसले . पुढे मध्यरात्री मनमाडला उतरले आणि बॅग स्वत:च घेऊन दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसले . कांही लोक त्यांच्या हातातली बॅग घेण्यासाठी धावले पण त्यांनी ठाम नकार दिला . औरंगाबादला सकाळी उतरल्यावर ऑटोरिक्षानं ते सुभेदारी विश्रामगृहात जाऊन विसावले .

त्यांच्या या कृतीची एक बातमी चौकटीत ‘मराठवाडा’ दैनिकात दुसऱ्या दिवशी प्रकाशित झाली कारण , हे गृहस्थ कुणी सामान्य नागरिक नव्हते  तर जेमतेम दोन आठवड्यांपूर्वी म्हणजे १७ मे १९७७ रोजी देशातल्या एका मोठ्या आणि महत्वाच्या महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झालेले ते शंकरराव चव्हाण होते . आमदार , मंत्री , मुख्यमंत्रीपद भूषवूनही त्यांचं मुंबईत घर नव्हतं !

बाय द वे , तेव्हा माजी मुख्यमंत्र्याला निवास , वाहन आणि पोलिस बंदोबस्त अशा सुविधा नव्हत्या . पुढे १९९५मध्ये सेना-भाजपयुतीचं सरकार राज्यात सत्तारुढ झाल्यावर त्या सुविधा माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्र्याना देण्याचा निर्णय झाला तसंच त्या काळात मुंबईहून औरंगाबादला येताना किंवा जाताना मनमाडला जाताना रेल्वे बदलावी लागत असे .

लोकप्रतिनिधी इतका जमिनीवर वावरणारा असतो , यावर आजच्या पिढीचा विश्वासच बसणार नाही , अशी स्थिती आहे पण , माझ्या पिढीच्या म्हणजे आज सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्यांना ही बातमी नक्की आठवत असेल . ही आठवण झाली त्याचं कारण सध्या व्हायरल झालेली मार्क रुट ( Mark Rutte) यांची सायकल स्वारी आहे . मार्क रुट हे नेदरलँड या देशाचे सलग १४ वर्ष पंतप्रधान होते . नुकताच त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला . पदाची सूत्रे सोपवल्यावर मार्क रुट कार्यालयाबाहेर आले आणि चक्क सायकल चालवत त्यांच्या घरी रवाना झाले ! इतका साधा राजकारणी असू शकतो आणि तो आपल्या देशात का नाही , अशा चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाल्या आणि मन भूतकाळात गेलं…मार्क रुट तसंच शंकरराव चव्हाण यांच्यासारखी माणसं आपल्या देशाच्या आणि राज्याच्याही राजकारणात बहुसंख्येनं कशी होती , यांची आठवण झाली आणि जाणवलं , खरंच गेले ते ते दिन गेले…

१९७७साली मी पत्रकारितेत आलो . तेव्हा पत्रकारिता म्हणजे मुद्रीत माध्यम असं समीकरण होत. १९८०पासून मंत्रालय आणि विधीमंडळात वावर सुरु झाला  तेव्हापासून राज्याचे राजकारणी आणि प्रशासक पाहतो आहे . त्यातील अनेक मित्र झाले , अनेकांशी बैठकीची दोस्ती झाली . सत्तेच्या दालनातील वावरामुळे ही माणसं जवळून बघता आली . राजकारण हे मिशन म्हणजे सेवाभाव आहे आणि लोकांच्या हितासाठी आपण लोकप्रतिनिधी झालो आहोत , अशी भावना प्रबळ होती . लोकप्रतिनिधींचे पाय जमिनीवर होते आणि जनतेशी त्यांचा थेट संपर्क होता . सभागृह जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष  वेधण्यासाठी आणि सरकारला सळो की पळो करुन सोडण्यासाठी आहे , अशी त्यांची ठाम धारणा होती .

तेव्हा राज्यात प्रवासाचं सार्वजनिक  साधन केवळ एस. टी. होती , रेल्वे सर्वत्र नव्हती . बसमध्ये पहिल्या पांच जागा लोकप्रतिनिधी व पत्रकारांसाठी राखीव असत . महत्वाचं म्हणजे याच बसनं किंवा रेल्वेनं तेव्हाचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी प्रवास करत . असा प्रवास करतांना जॉर्ज फर्नांडिस , ग . प्र . प्रधान , मृणालताई  गोरे , भाई वैद्य , उत्तमराव पाटील , राम नाईक , राम कापसे , मधू देवळेकर , हशू अडवाणी , गंगाधरराव फडणवीस , महादेवराव शिवणकर , विठ्ठलराव हांडे , दत्ता पाटील , अरविंद देशमुख , एन . डी . पाटील . गणपतराव देशमुख , बी . टी. देशमुख , जांबुवंतराव धोटे , बबनराव ढाकणे , मनोहर जोशी , छगन भुजबळ , प्रमोद नवलकर , सुधीर जोशी , भारत बोंदरे , बबन चौधरी , व्यंकप्पा पतकी , संभाजी पवार , बी. जे खताळ , ए. बी. बर्धन , सुदामकाका देशमुख , नरसय्या आडम , केशवराव  धोंडगे , शंकरराव गेडाम , प्रभाकर कुंटे , प्रमिलाताई टोपले , रजनीताई  सातव  , सूर्यकांता पाटील , शोभाताई फडणवीस , किती नावं घ्यावी ? अशा किती तरी जणांना पाहिलं आहे ; त्यांच्यापैकी अनेकांसोबत अनेकदा प्रवासही  केलेला आहे  . महाराष्ट्र विधानसभेचचं सदस्यत्व सर्वाधिक काळ भूषवण्याचा विक्रम असलेले गणपतराव देशमुख तर शेवटपर्यंत एस . टी .नं प्रवास करणारे शेवटचे लोकप्रतिनिधी .

त्याकाळात मी तर नागपूर-मुंबई आणि मुंबई-नागपूर प्रवास रेल्वेनं करतांना कधीच जेवणाचा डबा सोबत नेला नाही . रेल्वेच्या डब्यात ८/१० आमदार , खासदार हमखास भेटत आणि खाण्याची सोय होऊन जात असे . रणजीत  देशमुख , सतीश चतुर्वेदी , जयप्रकाश  गुप्ता , अशोक धवड अशी कांही खास दोस्त मंडळी यात असली की प्रवासभर गप्पा आणि खाण्या-पिण्याची चंगळ असे . मनोहर जोशी , छगन भुजबळ , प्रमोद नवलकर , सुधीर जोशी , हे तर नागपुरात बिनधास्त ऑटोरिक्षानं फिरत ; माझ्या तसंच धनंजय गोडबोलेच्या मोटार सायकलवरून शहराचा फेरफटका मारत आणि ‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱ्या सर्वांना प्रतिसाद देत असत .

मंत्रीमंडळातले सदस्य वगळता सर्व विधिमंडळाचे सर्व सदस्य आमदार निवासात वास्तव्याला असत ( एखाद-दुसराच ‘चुकार’ असे ) . एकदा मी प्रधान मास्तरांना भेटायला आमदार निवासातील त्यांच्या खोलीवर गेलो . तर प्रधान मास्तर चक्क कपडे धूत होते . मी त्यांना म्हटलं , ‘अहो , अधिवेशनाच्या काळात आमदारांचे कपडे कापड मोफत  धुवून मिळतात’ , तर प्रधान मास्तर उत्तरले , ‘आपले कपडे धुण्यात लाज कशाची ? त्यासाठी कशाला माणूस पाहिजे ?’

भाई वैद्य यांची तर कमालच . ते मंत्री होते तेव्हा त्यांना लांच देण्याचा प्रयत्न झाला तर त्यांनी लांच  देणाराला चक्क पोलिसांच्या स्वाधीन केलं . इतके स्वच्छ आणि सोज्वळ लोकप्रतिनिधी  तेव्हा बहुसंख्येनं होते , हे आता खरं वाटणार नाही .  विधिमंडळ सदस्यांना मिळणारं निवृत्ती वेतन नाकारणारे मी पाहिलेले पहिले आमदार ए. बी. बर्धन ( आणि दुसरे अशात गिरीश गांधी ) . ए. बी. बर्धन , गंगाधरराव फडणवीस , नितीन गडकरी यांना स्कूटरवर भटकताना पाहिलेले नागपुरात पायलीला पन्नास मिळतील . मंत्रीपद भूषवलेले शंकरराव गेडाम , टी. जी. देशमुख असे अनेकजण शेवटपर्यंत हाऊसिंग बोर्डाच्या गाळ्यात राहिले , यावर आज कुणाचा विश्वासही बसणार नाही .

आमदार निवासातून विधिमंडळात जा-ये करण्यासाठी आमदारांसाठी साध्या बसेस असत . याच बसेसचा वापर बहुसंख्य आमदार करत असत . कांही आमदार , विशेषत: विरोधी पक्षांचे अनेक आमदार अनेकदा पायी जा-ये करतांना दिसत . जाता-येताना रस्त्यात उपोषण करणाऱ्या , आंदोलन करणाऱ्यांना भेटत , रस्त्यात लोकांनी दिलेली  निवेदने स्वीकारत आणि त्यांच्या समस्या मग सभागृहात मांडत असत . एकदा तर शरद पवार यांनाही ते समाजवादी काँग्रेसमधे असतांना या बसमधून आमदारांसोबत हास्यविनोद करत प्रवास करताना बघितल्याचं अजूनही स्मरतं . ते सगळं आता स्वप्नवत वाटतं कारण विसाव्या शतकाच्या नव्वदीनंतर हे चित्र हळूहळू बदलत गेलं आणि आता तर पूर्ण बदललं  आहे ; लोकप्रतिनिधी लोकांपासून तुटले आहेत कारण राजकारण करण्याचे हेतू वेगळे झालेले आहेत . राजकारण सत्ताप्राप्तीसाठी आणि सत्तेसाठी ‘वाट्टेल ते’ अशी मानसिकता आता दृढ झालेली आहे .

केवळ राजकारणच नाही तर सर्वच क्षेत्रात ‘डाऊन टू अर्थ’ असणारे अनेक लोक त्या काळात होते आणि त्यांची आठवण

मार्क रुट

मार्क रुट यांच्या सायकल   सवारीच्या निमित्ताने झाली . राजकरणाबाहेरचं एक उदाहरण . आताच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि तेव्हाच्या नागपूर विद्यापीठाचं कुलगुरुपद प्रभारी म्हणून जाल पी. गिमी यांनी दोनदा भूषवलं . कुलगुरु असतांना ते चक्क सायकलनं विद्यापीठात येत आणि सायकलनं घरी परतत . कुलगुरुपदाच्या काळात आमचे मित्र हरिभाऊ केदार स्कूटर चालवत कार्यालयात येत…असो . अशी एक ना अनेक उदाहरणं देता येतील . महापौर असतानाही स्वत:च्या कामासाठी स्कूटरवर फिरणारे अटल बहादूर आणि बेस्टच्या बसने फिरणारे मुंबईचे महापौर महादेव देवळे अनेकांनी पाहिले असणारच .

अजून नोकरित  कायम न झालेल्या एका महिला अधिकाऱ्याचे पदाचा गैरवापर आणि अधिकार मर्यादा उल्लंघनाच्या माजाचे  ‘प्रताप’ सध्या गाजत असताना पदाचा तोरा न बाळगता वावरणाऱ्या , सध्या , स्वच्छ व कार्यक्षम असणाऱ्या अनेक विद्यमान तसेच सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे सांगता येतील पण  , नंतर कधी तरी कारण आजचा विषय लोकप्रतिनिधी पुरताच मार्यादित आहे .

बदल अपरिहार्य असतात आणि ते सकारात्मकतेनं स्वीकारायचे असतात हे खरं असलं तरी राज्याच्या राजकारण आणि ते करणारात  झालेले सर्वच बदल सकारात्मक नाहीत म्हणून जनहिताचेही नाहीत . त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी घेतलेला कोणताही निर्णय खरंच जनतेच्या हितासाठी आहे का असा संशय दाटून येत असतो ; त्यातून राजकारणात आलेली ‘खोका’ संस्कृती ही महाप्रलयंकारी कीड आहे ; जनहित आणि लोकशाहीलाही ती मारक आहे . साध्या नगर पंचायतीचं सदस्यत्व एक टर्म मिळालं तरी तो माणूस पार बदलून जातो . त्याच्या मनगटावर जाड ब्रासलेट , हातात महागडा सेलफोन , बुडाखाली वातानुकूलित चार चाकी येते , त्याचा वावर पंचतारांकित होतो , राहणीत मोठ्ठा चंगळवादी बदल होतो . तो लोकांपासून तुटतो , असा  आपला राजकारण्याविषयीचा अनुभव सध्या  झालेला आहे . आपल्या देशात राजकारण ‘धंदा’ आणि निवडणुका ‘इव्हेंट’ झाल्याचे हे राष्ट्रीय दुष्परिणाम आहेत .

-म्हणूनच पद सोडल्यावर मार्क रुट यांच्या सायकलवर घरी परतण्याचं , पंतप्रधानपदी राहूनही स्वच्छ व सोज्वळ असण्याचं आजच्या पिढीला स्वाभाविक कौतुक वाटतं . त्यावरच्या कडवट प्रतिक्रिया वाचताना आमच्या  पिढीला आपल्या राज्यातही झालेले मार्क रुट आठवतात आणि आमच्या पिढीच्या मनातील राजकारणाच्या त्या गेलेल्या दिवसांची हुरहूर गडद होतं जाते…

■ प्रवीण बर्दापूरकर

Cellphone  +919822055799
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट