डिलीट न होणारी माणसं…

एक म्हणजे, दैववादी किंवा नियतीवादी नसल्याचा तोटा काय असतो तर, आर आर पाटील यांच्या मृत्यूचे समर्थन करता येत नसल्याने त्याचे खापर कोणावर तरी फोडून मोकळे होता नाहीय. दुसरे म्हणजे, हे विधान करत असतानाच हेही स्पष्ट केले पाहिजे की, मी काही आरआर यांच्या खास वगैरे वर्तुळात नव्हतो. तरीही त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यावर मला माझ्या दैववादी किंवा नियतीवादी नसण्याची चीड आली.

आरआर यांना मी विधानसभेत पाहत होतो पण, ओळख नव्हती. सोमनाथ पाटील या स्नेहशील पत्रकार मित्राने बहुदा नोव्हेबर १९९६ मध्ये मला एकदा आरआर यांच्या मुंबईतील आमदार निवासातील खोलीवर नेले आणि ओळख करून दिली. तेव्हा मी ‘लोकसत्ता’त होतो. बंडी आणि पांढऱ्या लुंगीवर असणारे आबा वृत्तपत्रांच्या गराड्यात बुडालेले आणि समोर चहाचे कप इतस्तत: होते. उठून पिंक मारून आल्यावर आबांनी चहाची ऑर्डर दिली आणि सोमनाथला सांगितले, ‘ओळखतो यांना मी. पाह्यलंय यांना प्रेस ग्यालरीत..’ मग बराच वेळ आमच्या गप्पा झाल्या. तेव्हा राज्यात सेना-भाजपचे युती सरकार होते आणि आबा विरोधी पक्षात म्हणजे कॉंग्रेसमध्ये होते. पत्रकार दिनेश गुणेने उल्लेख केलेल्या सभागृहातील ‘अशांत टापू’चे आबा आघाडीवरचे आक्रमक सदस्य होते. तेव्हा धनंजय कर्णिक आणि प्रताप आसबे कॉंग्रेस बीट बघत. वृत्तपत्रात येणाऱ्या ‘अशांत टापू’ या उल्लेखाचे जनक धनंजय कर्णिक आणि प्रताप आसबे आहेत. अनेकदा आम्ही सोबत असल्याने या ‘अशांत टापू’तील सर्वच सदस्यांशी भेटी होऊ लागल्या. त्यात आरआरही होते. मग अधिवेशन सुरु असताना दुपारी जेवायला विधी मंडळाच्या खानावळीत जाणे अरबट-चरबट, चमचमीत खाणे.. वगैरे अशी घसट वाढली. कॉंग्रेसमध्ये असले तरी आरआर नावाचे ‘पाणी’ वेगळे आहे हे त्या काही भेटीत लक्षात आले. आमच्यात नियमित नाही तरी अधूनमधून नमस्कारचा, ख्याली खुशाली आत्मीयतापूर्वक विचारण्याचा संपर्क राहिला. त्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना झाली. निवडणुकीनंतर आरआर मंत्री झाले. दरम्यान माझी औरंगाबादला बदली झालेली होती. स्वाभाविकपणे भेटी कमी आणि फोनवर बोलणे जास्त होऊ लागले. मात्र, मंत्रालयात चक्कर झाली आणि आरआर असले तर दुपारी त्यांच्या चेम्बरमध्ये चमचमीत खाण्याचा डब्बा फस्त करण्याचा नेम मात्र चुकला नाही. आरआर पुढे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री झाले, राष्ट्रवादीचे ‘स्टार’ झाले. त्यांचा कामाचा व्याप आणि जबाबदाऱ्या वाढल्या, कार्यकर्त्यांचा पसारा वाढला, कर्तृत्वाला बहर आला. पद गेले-आले, आरआर पुन्हा गृहमंत्री झाले. याच दरम्यान बदली होऊन मी नागपूरला गेलो. दिवसभरात केव्हातरी एसएमएस टाकून ठेवला की रात्री उशीरा त्यांचा फोन येत असे. बोलणे, माहितीची देवाणघेवाण होत असे.

खरे तर, समोरचा माणूस कधीच आपल्याला पूर्णपणे कळत नसतो. ज्या आईच्या गर्भातून मूल जन्म घेते ती आई आणि ते मूलही एकमेकाला पूर्ण समजल्याचा दावा करू शकत नाही. पाच-सहा दशके सोबत संसार केल्यावर एकमेकाला पूर्ण आकळले आहेत असे पती-पत्नी बाबतही घडत नाही. ‘डोळ्यात वाचतो मी तुझ्या, गीत भावनांचे’ हे फक्त प्रेमातच आणि तात्पुरते असते! माणूस परस्परांना समजतो-आकळतो तो एकमेकात झालेल्या जीवाभावाच्या संवादातून, एकमेकासाठी नकळत टचकन आलेल्या अश्रूंतून, परस्परांसोबत घालवलेल्या सहवासातून, विविध प्रसंगात परस्परांकडून तावून-सुलाखून निघालेल्या प्रतिसादातून माणसं एकमेकाला तुकड्यांतुकड्यांत(च) समजतात. आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशा विविध पदावरील आरआर पाटील माझ्यासाठी तुकड्यातुकड्यांतून उलगडत गेले. त्यांच्यातला माणूस काहीसा समजत गेला, त्यांच्यातील सच्चेपण किती आश्वासक घनगर्द आहे हे बऱ्यापैकी कळत गेले.

मंत्री होऊनही आरआर उतले नाहीत, मातले नाहीत. आई आणि शरद पवार यांच्यावर त्यांची अमीट आणि अतडजोडवादी श्रद्धा होती. कधी जुन्या आठवणी निघाल्या तर आईने उपसलेल्या कष्टांच्या आठवणींनी त्यांना भरून येई. हे असे भरून येणे त्यांच्यातल्या भलेपणाची प्रीचीती देणारे असे. ते हांडामासांचे माणूस होते म्हणून त्यांना राग-लोभ होते ते त्यांनी लपवूनही ठेवले नाही हे भला माणूस असण्याचे लक्षण त्यांच्यात होते ते गेल्यावर त्यांच्या तंबाखूच्या व्यसनाबद्दल बरेच बोलले-लिहिले गेले आहे. ते हयात असतानाही त्यांच्यावर त्याबद्दल टीका झाली. पण, त्या व्यसनाच्या भल्या-बुऱ्या परिणामांबद्दल त्याना ठाऊक नव्ह्ते नव्हती असे काही नाही. त्याबाबतीतही ते पुरेसे समंजस तरी मजबूरच होते. एका भेटीनंतर जेवणावर ताव मारून झाला आणि आरआर यांनी फक्की मारली तेव्हा मी विचारले, ‘हे सुटले नाही म्हणजे अजून ?’ तेव्हा केवळ नजरेतून त्यांनी मजबुरी व्यक्त केली. (प्रसिद्धीच्या लाटेत वाहून जाण्याची काही काळ लागलेली सवय याच मजबुरीचा एक भाग होती पण, त्या व्यसनातून ते लवकर बाहेर आले अन्यथा स्वप्रतिमेच्या प्रेमात ते गुंग झाले असते.) स्वभावाचे वैशिष्ट्य हे की, त्या व्यसनी अगतिकतेबद्दल कोणतेही ढोंग त्यांनी केले नाही. कर्मकांडांचा त्यांना राग होता आणि त्यापासून ते कटाक्षाने लांब राहिले..अगदी मृत्यूनंतरही..हे भल्या-भल्यांना जमू शकलेले नाही.. उक्ती आणि कृतीत इतका सूत्रबद्ध आणि शुभ्र स्फटिकी पारदर्शीपणा ठेवता येणे मोठे कठीण असते. आरआर यांचे माणूसपण तुकारामाच्या अभंगासारखे होते. सत्तेतील अनेकांनी आग्रह करूनही त्यांनी मातीशी असलेली नाळ तोडली नाही आणि ती घरच्यानाही तोडू दिली नाही. राजकारणाच्या दलदलीत राहूनही आरआर भ्रष्ट झाले नाहीत ते बहुदा अभंगासारखे स्वच्छ असण्यामुळेच. पक्षाचे आणि राज्याचे एकमुखी निर्विवाद नेतृत्व आपल्याला मिळणार नाही हे कठोर भान त्यांना आले असावे तेही यामुळेच.

इतके लेखन आणि आठवणी प्रकाशित झाल्या पण आरआर पाटील यांच्या दातृत्वाबद्दल कुठेच काही वाचायला मिळाले नाही म्हणून स्वानुभावाने सांगतो, समाजकारणात वावरणाऱ्याबद्दल त्यांना स्नेहादारपूर्वक आत्मीयता होती. या आत्मीयतेचा एक भाग म्हणून मिळालेल्या कमाईतून (आरआरनां पैसा मिळाला तो वैध मार्गानेच) उरलेला पै-पैसा गरजूंना बिनबोभाट देण्याची मोठी दानत आरआर यांच्यात होती. अशा गरजू व्यक्ती आणि त्या करत असलेल्या कामाची माहिती वाचनात आली किंवा कोणाकडून कळली तर जात-धर्म-पंथ याचा कोणताही विचार न करता एक धनादेश आरआर यांच्याकडून पोहोचता होत असे. हे अनुच्चारित, सत्पात्री दान करताना त्याबद्दल कोठे ‘ब्र’ही न उच्चारण्याची अट साक्षीदार असणाऱ्या आमच्यासारख्यांना असे. एक महिला मिळेल तशी मदत घेऊन वृद्ध तसेच निराधारांना अन्न आणि निवारा देण्याचे अफाट काम मोठ्या जिकिरीने आणि निष्ठेने करत असल्याचे ज्येष्ठ स्नेही आणि मुलांचे डॉ. श्रीकांत चोरघडे यांनी एकदा मला सांगितले. तिच्या कामाबद्दल सर्व जाणून घेऊन एका स्तंभात ज्योती तिरपुडे या माझ्या सहकारी वार्ताहराने तिच्याविषयी लेख प्रकाशित केला. राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातले ज्येष्ठ कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी ते कात्रण आरआर यांच्याकडे पोहोचवले. खातरजमा करवून घेतल्यावर आरआर यांनी बाईंच्या नावे पन्नास हजारांचा धनादेशच पाठवून दिला. मग त्या महिलेच्या नावे खाते उघडून तो धनादेश वटवण्यासाठी डॉ. चोरघडेंना बरीच धावपळ करावी लागली! विदर्भातील अशी आठ-नऊ तरी उदाहरणे मला माहिती आहेत. बाजारात भाजी आणण्यासाठी गेलेल्या एका पोलीस कमांडोला शासनाकडून मदत मिळाली नाही त्याचे कारण ‘तो ड्युटीवर नव्हता तर, भाजी आणायला गेलेला होता’ असे देण्यात आले; असे एकदा चंद्पूरचा तेव्हाचा आमचा वार्ताहर देवेंद्र गावंडे याने सांगितले. आता राष्ट्रवादीचा प्रवक्ता असलेल्या अतुल लोंढेच्या नागपुरातल्या घरी आम्ही एकदा जेवायला भेटल्यावर ती बाब मी आरआर यांना सांगितली आणि प्रशासकीय मुर्दाडपणाबद्दल नाराजी व्यक्त केली, त्यांचे देवेंद्रशी बोलणे करवून देत सर्व तपशील पुरविले. नक्षलवाद्यांविरुद्ध लढणाऱ्याविषयी हा बेफिकिरीचा दृष्टीकोन आरआर यांना खूपच जिव्हारी लागला. ते लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले.. तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत ‘तुमचा निरोप येत नाही तोपर्यंत अन्नाचा घास घेणार नाही’, असा सज्जड दमच त्यांनी भरला.. आणि खरेच सांगतो, त्या शहीद पोलिसाच्या विधवेला मदत मिळण्याचा निरोप देणारा फोन येईपर्यंत आरआर यांनी घास घेतला नाही..असा हा संवेदनशील माणूस होता!

ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या मनात नक्षलवाद्यांनी हिंसाचार माजवलेल्या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांच्या जंगलात शांतीयात्रा काढण्याची कल्पना आली. त्यात गिरीश गांधी पूर्ण ताकदीने सक्रिय तर मी प्रवक्ता म्हणून म्हणून सहभागी झालो. या अतिहिंसाचारग्रस्त भागात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणेच होते पण, ते दिव्य सुरेश द्वादशीवार यांनी केले खरे. सुरेश द्वादशीवार अतिदुर्गम राना-वनात फिरत आदिवासींना धीर देण्याचे आव्हान पेलत असताना त्यावर आरआर यांची घारीसारखी नजर होती. त्याकाळात दररोज किमान एकदा तरी आरआर माझ्याशी फोनवर बोलून या शांतीयात्रेची माहिती घेत असत. ही मोहीम संपल्यावर पकडलेल्या एका नक्षलवाद्याच्या पेन-ड्राईव्हमध्ये आम्हा तिघांच्या नावाची नोंद आढळली. तो धोक्याचा इशारा आहे हे ओळखून मग आम्हाला कमांडोजच्या कवचात ठेवण्याचे आदेश आरआर यांनी दिले. अगदी पत्नी भाजी आणायला गेली तरी आणि डॉगीला फिरवायला नेतानाही हे कमांडोज सोबत ठेवण्याच्या सक्त सूचना आरआर यांनी दिलेल्या होत्या. नंतर या संरक्षणाचा आम्हाला जाचच होऊ लागला. ‘प्रायव्हसी संपली’ ही आमची भावना प्रबळ झाली आणि ते संरक्षण मी परत घ्यायला लावले तेव्हा आरआर खूपच नाराज झाले. नंतर मी, दिल्लीत गेलो आणि आमच्या अगदी हाताच्या बोटावर मोजता येण्याइतक्या भेटी झाल्या, बोलणेही खूप झाले नाही. विधानसभा निवडणुकीच्याआधी एकदा विमानतळावर ओझरती भेट झाली. ‘बोलू सविस्तर’ म्हणत, आम्ही एकमेकाचा निरोप घेतला. नंतर एकदा फोनवर बोलणे आणि मग आली ती आरआर यांच्या दुर्धर आजारपणाची बातमी…

munde_mahajan_deshmukh_20140616

‘आता आबांचा नंबर फोनबुकमधून डिलीट करायला हवा’, असे कोणी तरी त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यावर सहज स्वाभाविकपणे म्हणाला. आरआर काय किंवा गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन काय हे नेतृत्व ग्रामीण भागातून आले आणि राज्याच्या राजकारणावर त्यांनी स्वकर्तृत्वाची अमीट छाप उमटवली. चौघांचाही बाज वेगळा, पार्श्वभूमी वेगळी पण नेतृत्व बावन्नकशी, खणखणीत! या चौघांनीही त्यांच्या नेतृत्वाची पाळेमुळे खोलवर रुजवली आणि त्यातून जनमाणसाशी जीवाभावाचे नाते निर्माण केले. या चौघांशी कमी-अधिक प्रमाणात माझा संपर्क कधी एक मित्र तर कधी एक पत्रकार म्हणून आला. हे चौघेही मनाच्या अंगणात कायमचे ओल्या आठवणींसारखे मुक्कामाला आलेले आहेत. अशा ओल्या आठवणी अविरत ठसठसत असलेल्या जखमांसारख्या असतात..आरआर तर यासर्वांत वयाने लहान. मृत्यू अटळ आहे असे कितीही म्हटले तरी त्यांच्या मृत्यूचे समर्थन करता येणार नाहीच. विलासराव देशमुख, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासारखाच आरआर पाटील यांचाही मृत्यू असमर्थनीय आहे. कवेत न मावणाऱ्या जगण्याच्या पटावरून असे लोक कधीच डिलीट होत नसतात…

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट