परक्या शहरात माणसानं झाडासारखं रुजावं…

|| नोंद …१३  ||

 

 

 

दिल्लीतल्या मराठी माणसाच्या परकेपणाच्या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार आणि दोस्तयार विजय सातोकर यानं माझी प्रतिक्रिया ‘आमची दिल्ली’ या उपक्रमासाठी घेतली , तेव्हा त्यानं विचारलं अनेक वर्ष एखाद्या शहरात राहूनही ते गाव अनेकांना आपलं का वाटत नाही ?’

त्यावर मी उत्तर दिलं , ‘परक्या शहरात माणसात झाडासारखं रुजावं…’अवघ्या पावणे दहा मिनिटांची ही मुलाखत आहे ही .

–आणि हो , त्यात मराठी माणसाचं पंतप्रधानपद हाही हमखास प्रश्न आणि त्यावरचं माझं उत्तर आहे !

( विजय सातोकर कोण हा प्रश्न विचारु नका त्याच्यावर  मी लिहिलेल्या मजकुराची लिंक आहे- https://bit.ly/2YhPaeb . हा मजकूर वाचा म्हणजे विजयच्या कर्तृत्वाची गाथा समजेल ! )

विजय सातोकर – मराठी माणसाला दिल्ली अजूनही आपली वाटत नाही दूरची वाटते आणि दिल्लीमध्ये अधिकारी म्हणा किंवा खासदार आणि  मंत्रीसुद्धा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते आपापल्या गावी म्हणजे महाराष्ट्रात परत येतात .  त्या लेखावर ब-याच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या .  काही लोक म्हणाले हे खरंय .  काही लोकांना वाटलं की , आम्ही     ५०-६० वर्षापासून दिल्लीत आहोत पण , दिल्ली आपली वाटत नाही किंवा दिल्लीवाल्यांना आपण त्यांचे वाटत नाहीत किंवा मराठी लोक उपरे वाटतात वगैरे…तुम्ही दिल्लीला होतात आणि एका मोठ्या मराठी वृत्तपत्राचे संपादक होतात तर , तुम्हाला यावर काय म्हणावसं वाटतं ? मराठी माणसाला दिल्ली अजूनही दूर वाटते का ? आपली वाटत नाही का?

माझं उत्तर – त्याचं असं आहे की ,  मुळामध्ये कुठल्या गावामध्ये रुजणं म्हणा किंवा गावामध्ये फुलणं मला फारसं अवघड वाटत नाही . माझे वडील फार लहानपणी गेले आणि माझी आई नर्स असल्यामुळे आमच्या सातत्याने बदल्या होत . पत्रकारितेत आल्यावरही पणजी,  कोल्हापूर,  सातारा , चिपळूण , नागपूर , मुंबई , दिल्ली , औरंगाबाद अशी माझी भरपूर भटकंती झाली आहे . मुळामध्ये यासंदर्भात माझी स्वत:ची एक धारणा आहे . माणूस एक झाड असतं .  एखाद्या माणूस दुस-या गावी जातो म्हणजे काय असतं ? तर ते  झाड त्या दुस-या गावी जातं , मग तिथल्या मातीमध्ये ते रुजतं , फुलतं , फळतं म्हणजे ते तिथल्या वातावरणाशी , तिथल्या निसर्गाशी , तिथल्या पाण्याशी , तिथल्या लोकांशी एकरुप होतं .  कुठल्याही गावात गेल्यानंतर तिथल्या गावाच्या सांस्कृतिक , सामाजिक , त्या गावाच्या राजकीय वातावरणाशी एक माणूस म्हणून आपण कशा पद्धतीनं गुंतत जातो किंवा आपण त्या वातावरणात कसं फुलत जातो , यावर खूप सारं अवलंबून आहे . ते आपलं आहे , अशी एक धारणा जर मनामध्ये तयार झाली तर मग ते गाव आपलं आहे परकं वाटत नाही , असं माझं म्हणणं आहे.

सातोकर– तुम्ही आता म्हणालात की , झाड असणं किंवा होणं पण , एका ठिकाणावरुन उपटून समजा तुम्ही दुस-या ठिकाणी लावलेलं झाड जास्त जगत  नाही , कारण जे ट्रान्सप्लाँटेशन आहे . मला वाटतं त्याच्यामध्ये फेल्यूअर रेटच जास्त आहे , जगण्याचा रेट कमी आहे . एक गोष्ट ही की ,  मुंबई , पुणे, नागपूर  आणि दिल्ली यात काही फरक आहे का आणि दुसरं हे की , हे एक गाव आणि दुसरं गाव , हे सारखंच आहे ? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे रुजण्यात भाषेचा अडसर येतो ?

उत्तर- फरक आहे आणि नाहीही .  झाड हे आपण प्रतिकात्मक घ्यायला हवं .  माणूस एका गावामध्ये जातो आणि तिथे कसा मिसळून जातो , त्या गावाच्या जनजीवनाचा दैनंदिन जगण्याचा एक कसा अविभाज्य घटक होऊन जातो , ही जी वृत्ती आहे यावर खूप सारं अवलंबून आहे . अगदी प्रामाणिकपणे सांगतो की ,  मला दिल्ली सोडायची जीवावर आलं होतं .  मी ज्या संस्थेत काम करत होतो त्या संस्थेत माझं मन रमलं नाही म्हणून मी दिल्ली सोडली पण , दिल्ली सोडताना मला नागपूर सोडण्याइतकीच हळहळ वाटत होती .

झाडं हे प्रतिकात्मक घ्यायचं आहे . माणसानं मुळात ‘हे विश्वची माझे घर’ असं जर डोक्यात  पक्कं केलं तर कुठेही जाऊन रुजण्यामध्ये अडचण येण्याचं कांही कारण नाही . माणसाचा स्वभाव , वृत्ती आणि सांस्कृतिक,  सामाजिकदृष्टया एखाद्या गावात माणसानं एकरुप होणं याच्यामध्ये भाषेचा अडसर नसतो . मला किंवा माझ्या पत्नीला दिल्लीच्या भाषेचा कधीच अडसर आला नाही किंबहुना मी इतक्या देशात–परदेशात फिरलो .  तिथे पंधरा दिवस किंवा महिनाभर राहात असताना मला तिथे भाषेचा अडसर कधीच जाणवला नाही . तिथल्या जनजीवनात मी मिसळून गेलो . आपल्या मनात अजूगपणाची , एक  अलगपणाची भावना असते . आपल्या मूळ गावाच्या संदर्भामध्ये एक गतकातर हळवा कोपरा असतो . तो जर जास्त  प्रभावी असेल तर अन्य कुठेही गेल्यानंतर आपल्याला थोडसं परकेपण वाटतं पण , मला एक गोष्ट समजू शकत नाही की , ज्या गावामध्ये पंचवीस , तीस , चाळीस , पन्नास वर्ष माणसं राहतायेत , त्या गावामध्ये त्यांना परकेपण कसं जाणवू शकतं ?  औरंगाबाद काही माझं गाव नाही पण , आता मी इथे रुळलो ; इथं मला परकेपणा वाटत नाही . प्रदीर्घ काळ मी नागपुरात होतो मग मुंबईत होतो , दिल्लीत होतो . मी तिथल्या जनजीवनात मिसळून गेलो ,  तिथल्या सांस्कृतिक वातावरणाशी एकरुप झालो किंवा एकरुप झाल्याचा प्रयत्न केला असे म्हणू  यात . म्हणून झाडं हे प्रतिकात्मक घ्यायचं .  आजूबाजूचा परिसर हा माझा आहे , आपला आहे आणि मी त्यांचा एक भाग आहेअशी, मानसिकता एकदा निर्माण झाली की , परकेपणाची भावना निघून जाते , असं मला वाटतं.

सातोकर बरं , अजून एक , आपण थेट आपण राजकारणावर येऊ. बरेचवेळा चर्चेत एक म्हटलं जातं की , महाराष्ट्रातील पंतप्रधान व्हावा . होऊ शकेल का ? तुम्हाला तुमच्या दिल्लीतल्या वास्तव्यात असं जाणवलं का की , मराठी माणूस तिथं टिकत नाही . म्हणजे यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधानपदी पोहोचले . आपल्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदावर होत्या पण , पंतप्रधानपद हे महाराष्ट्रातील राजकारण्यांचं मोठ्ठं  स्वप्न नाही किंवा त्यांची जिद्द नाही , याविषयी तुम्हाला काही बोलावसं वाटेल?

माझं उत्तर- महाराष्टातला माणूस देशाचा गृहमंत्री होतो ,  अर्थमंत्री होतो ,  संरक्षणमंत्री होतो पण , पंतप्रधान होत नाही हा आपल्या अस्मितेचा जास्त प्रश्न आहे . अस्मिता आली की डोळसपणा अधू होतो आणि वास्तवाचा विसर पडतो .  एक लक्षात घ्या ,  मुळात दिल्लीच्या आणि मुंबई-महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज म्हणा की शैली , खूप वेगळी आहे . महाराष्ट्रात राजकीय मतभेद कितीही जरी असले तरी वैयक्तिक पातळीवर मैत्री जोपासायची पद्धत आहे . मी दिल्ली आणि मुंबईतील राजकारण कव्हर केल्यामुळे हे मला चांगलं माहीत आहे . दिल्लीच्या राजकारणाची शैली सातत्यानं कुरघोडी करण्याची आहे . डोक्यावर      बर्फ , जीभेवर खडीसाखर आणि चेह-यावरची सुरकुती हलू न देता राजकारणातील गोट्या हलवणं किंवा षडयंत्र करणं , कारस्थानं करणं अशी आहे . त्यालाच दिल्लीत राजकारण असं म्हणतात . मराठी माणसाला असं साधारणपणे जमत नाही .  तो पटकन म्हणणार , अरे तो काय शत्रू आहे का ? त्यानं मुलीच्या लग्नाला बोलावले तर जायला पाहिजे किंवा तो आजारी आहे तर त्याला भेटायला जायला पाहिजे . दिल्लीचा राजकारणी अशा वेळी एखादा फुलांचा गुच्छ , भेटवस्तू पाठवून मोकळा होईल . अशा अनेक गोष्टी  आहेत .

दिल्लीच्या राजकारणाच्या शैलीत ‘आकंठ मुरण्याचा’ मराठी माणसाचा स्वभाव  नाही .  त्याला मराठी नाटक लागतं ,  त्याला मराठी चित्रपट लागतो ,  मराठी गाणी हवी असतात . अमुक मराठी आणि तमुकही मराठीच लागतं आणि दिल्लीमध्ये राजकारणामध्ये तो कमी पडतो . दिल्लीच्या ‘दरबारी’ शैलीमध्ये तो रुळू शकतं नाही . उदाहरणार्थ , लोकसभेचं अधिवेशन सुरु आहे तर मराठी माणसाला शुक्रवारी रात्री महाराष्ट्रात परतण्याचे वेध लागतात .  दिल्लीमध्ये राजकारण करुन यशस्वी होण्यासाठी दिल्लीमध्ये कायमचं ठाण मांडून बसलं पाहिजे . गेल्या पंचवीस वर्षांपासून आपण महाराष्ट्राच्या ज्या नेत्यांचं नाव पंतप्रधानपदासाठी घेतो त्यांचं चित्त ’घार उडते उंच आकाशी पण , चित्त तिचे पिलापाशी‘’ या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातचं असतं .  मुळात राजकारणाचा अस्सल दिल्लीकर जो भाग आहे ना तो अंगवळणी पाडून घ्यावा लागतो .  महाराष्ट्राचे अनेक राजकारणी दिल्लीमध्ये यशस्वी झाले.  यशवंतराव चव्हाण यांनी दीर्घकाळ सत्ता गाजवली . नरसिंहराव हे देखील आपल्या महाराष्ट्रातीलच होते एका वेगळ्या अर्थाने .  प्रमोद महाजन किती मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाले . शंकरराव चव्हाण दीर्घकाळ दिल्लीत होते, .आता नितीन गडकरी यशस्वी होतायेत . दिल्लीमध्ये बस्तान बसवण्यासाठी दिल्लीच्या सांस्कृतिक वातावरणाशी ,  तिथल्या जनजीवनाशी एकरुप व्हावं लागेल . तेव्हा महाराष्ट्रातील माणूस दिल्लीचं राजकारण करायला लागेल . हे करण्यात मराठी माणसं कमी पडतात ,  हे खरं आहे.

( © या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत  )

प्रवीण बर्दापूरकर

( ३१ ऑगस्ट २०२० )

Cellphone  +919822055799 / www.praveenbardapurkar.com /  praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट