|| नोंद …२० ||
आठवण तशी खूप जुनी आहे ; १९८४ या वर्षीची , ऑक्टोबरचा शेवटचा आणि नोव्हेंबरचे पहिले कांही दिवस .
तत्कालीन पंतप्रधान , आयर्न लेडी , श्रीमती इंदिरा गांधी यांच्या झालेल्या निर्घृण हत्येची आणि त्याच्याशी संबंधित ‘प्रियदर्शिनी’ या पुस्तकाची ही स्मृती आहे .
इंदिरा गांधी यांच्या विषयी माझ्या भावना संमिश्र आहेत म्हणजे , देशावर आणीबाणी लादली म्हणून नफरत , ‘किचन कॅबिनेट’ पद्धत आणून काँग्रेस पक्षातल्या लोकशाहीच्या केलेल्या संकोचाबद्दल अढी आणि दुसरीकडे त्यांच्या अफाट कर्तृत्वाचं गारुड अशी .
त्या दिवशी सकाळी एका कार्यक्रमाला जायचं म्हणून बेगमला सकाळी नऊलाच नागपूर पत्रिका या दैनिकाच्या कार्यालयात सोडलं ; तेव्हा ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाच्या रविवार पुरवणीची मंगला संपादक तर मी मुख्य वार्ताहर होतो .
नंतर बेगम म्हणाली त्याप्रमाणे , अचानक टेलिप्रिंटरच्या ( वृत्त संस्थांच्या बातम्या पूर्वी या मशिनवर दिवसाचे २४ तास सुरु असत ) फ्लॅशची घंटी जोरजोरात आणि सलग वाजू लागली .
कार्यालयात चपराशीही यायचा होता म्हणून खुर्चीतून उठून मंगला टेलिप्रिंटरकडे गेली आणि बातमी वाचल्यावर तिची कांही सेकंद बोलतीच बंद झाली कारण बातमी श्रीमती इंदिरा गांधी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची होती .
स्वत:ला सावरत तिनं बातम्याचे टेक ( त्या बातमीचा कागदाचा तुकडा ) फाडले आणि जागेवर परतून फोनाफानी सुरु केली .
मी पत्रकार भवनात होतो ; मंगलाकडून बातमी ऐकताच कार्यालयात धावलो .
अनेक सहकारीही तातडीनं कार्यालयात पोहोचले .
एव्हाना देशात एकमेव असलेल्या आकाशवाणीवर शोकधून सुरु झालेली होती ; दूरदर्शनचं २४ तास प्रसारण तोवर सुरु व्हायचं होतं .
आमचे कार्यकारी संचालक नरेश गद्रे यांनी तकालीन केंद्रीय मंत्री वसंत साठे तसंच एन . के. पी . साळवे यांना फोन करुन माहिती घेतली आणि श्रीमती इंदिरा गांधी त्या हल्ल्यात बळी पडल्या असल्याचं कळलं…
‘नागपूर पत्रिका’ या दैनिकातले बहुसंख्य सहकारी भाजपचे समर्थक होते पण , त्यांच्यासकट आम्ही सर्वच सुन्न झालो…मंगलासह कांहीना तर हुंदकाच फुटला…
बुलेटिनची तयारी सुरु झाली ; त्यात बातमी लिहिणं , मांडणी वगैरेसाठी इंदिराजींच्या हत्त्येनं मुसमुसणार्या आणि नऊ महिन्याची गर्भार असलेल्या मंगलाची धावपळ बघितल्यावर नरेश गद्रे यांनी आधी मंगलाला एका जागी शांत बसवलं .
घरी जाण्यास सांगूनही मंगला तयार नव्हती ; अखेर बुलेटीन छापून आल्यावर नरेश गद्रे यांनी त्यांच्या कारमधे बसवून मंगलाची तिच्या आईकडे रवानगी केली .
त्यानंतर दर चार तासांनी एक बुलेटिन काढत पुढचे दोन दिवस आमचा मुक्काम कार्यालयातच होता .
आताच्या वाचकांच्या महितीसाठी सांगतो – तेव्हा प्रकाश वृत्त वाहिन्या नव्हत्या म्हणून महत्वाची कांही घटना घडली तर दैनिकाचा दुसर्या दिवशीचा अंक प्रकाशित होईस्तवर वाचकांपर्यंत ताजी माहिती पोहोचवण्यासाठी सर्वच वृत्तपत्रांचे विशेष बुलेटिन प्रकाशित केले जात असत .
♦♦♦
अमरावतीच्या ‘जनमाध्यम’ या दैनिकाचा संस्थापक-प्रबंध संपादक असलेला आणि मराठीतील एक आघाडीचा पत्रकार प्रदीप देशपांडे त्या दिवसात आमच्यासोबत ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकातच पत्रकारिता करत होता .
विवाहपूर्वी तो नागपूरला असतांना आम्ही दोघं अनेक महिने एकत्र राहिलेलो होतो .
प्रदीप आणि त्याची पत्नी शैला , मंगला आणि मी-आमचा प्रेमविवाह आणि त्या प्रेम कथेचे आम्ही भागीदार आणि साक्षीदारही ; आम्हा चोघांचं मस्त बॉंडिंग होतं .
कामासाठी प्रदीप नागपूरला आला होता आणि या धावपळीत तोही नागपूरलाच अडकून पडला .
दरम्यान इंदिराजी गांधी यांच्यावर प्रकाशित होणारा मिळेल तो मजकूर मंगला , प्रदीप आणि मी आधाशासारखा वाचून काढत होतो ; नरेश गद्रे यांना आमच्या वाचनाची आवड माहिती असल्यानं तेही त्यांना सापडेल तो मजकूर आमच्याकडे पाठवत होते आणि त्याआधारे आम्ही दररोज नवनवीन माहिती प्रकाशित करत होतो.
त्या काळात केवळ भारतातील्च नव्हे तर , ‘न्यूयॉर्क टाईम्स’पासून जगभरातील अनेक मान्यवर दैनिकांनी इंदिरा गांधी यांच्या संदर्भात सलग तीन-चार दिवस पहिल्या पानावर मजकूर प्रकाशित केलेला होता .
याच दरम्यान , प्रकाशित झालेला निवडक मजकूर समाविष्ट करुन एखादा विशेषांक पुस्तकाच्या स्वरुपात काढावा अशी कल्पना माझ्या आणि प्रदीपच्या मनात आली .
आमचे तत्कालीन संयुक्त संपादक युधिष्ठिर जोशी यांनी मात्र ( त्यांच्या स्वभावानुसार ) आमची ती कल्पना साफ उडवून लावली .
पण , आम्ही निराश न होता कार्यकारी संचालक नरेश गद्रे यांना गाठलं ; गद्रे यांनी ती कल्पना एकदम उचलून धरली .
यमुनाताई शेवडे , डॉ . मधुकर आष्टीकर , डॉ . विनय वाईकर , डॉ . रुपा कुळकर्णी-बोधी यांनी टाकोटाक नवीन लेख लिहून दिले .
फ्रेंच पत्रकार इम्यानुएल पौचपादास यांनी इंदिरा गांधी यांची घेतलेली ‘माय ट्रूथ’ ही मुलाखत तेव्हा गाजली होती ; बीना लालवाणी यांनी ‘इंडिया टुडे’ या पक्षिकासाठी घेतलेली मुलाखतही चर्चेत होती .
या दोन्ही मुलाखती आणि त्या प्रकाशित करण्याच्या परवानग्या प्रदीपनं , कोणती जादू चालवून कोण जाणे पण , तातडीनं मिळवल्या .
मंगला आणि प्रदीपनं त्या मुलाखतींचा बिनचूक आणि रसाळ अनुवाद करेस्तवर मी अन्य मजकूर आणि छायाचित्रांची जुळवाजुळव केली .
अवघ्या २४ तासात पुस्तकाच्या आकाराची १२८ पाने होतील एवढा मजकूर तयार करण्यात आम्ही यश मिळवलं आणि मांडणी करुन पुढच्या २४ तासात मुखपृष्ठासह १३२ पानाचं न्यूज प्रिंट ( वृत्तपत्रीय कागदावर ) वर ‘प्रियदर्शिनी’ हे पुस्तक इंदिराजी गांधी यांची हत्त्या होण्यास पंधरा दिवस पूर्ण होण्याच्या आंत प्रकाशित केलं ; तेव्हा नुकत्याच आलेल्या मुद्रणाच्या ऑफसेट या तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालं होतं .
♦♦♦
प्रदीप आणि माझं हे ( संपादित केलेलं का असेना पण , ) पहिलंच पुस्तक .
त्यानंतर कोणताही प्रोजेक्ट आम्ही दोघांनी एकत्र केला नाही ; तशी संधीच आम्हा दोघांना मिळाली नाही , कारण पत्रकारितेत राहूनही आमच्या वाटा वेगळ्या झाल्या !
मुखपृष्ठ तयार करणारे विजय काकडे यांच्यासह हर्षवर्धन निमखेडकर , गणेश शिरोळे , छायाचित्रकार बाळू नागभीडकर , चित्रकार शरद देशमुख यांच्यासह अनेकांचं सहकार्य तेव्हा लाभलं , हेही अजून आठवतं .
५ रुपये किंमत असलेल्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती पांच हजार प्रतींची काढली ती अवघ्या चारच दिवसात संपली .
नंतर ‘प्रियदर्शिनी’च्या आणखी दहा हजार प्रती छापाव्या लागल्या होत्या तरी प्रदीप किंवा माझ्याकडे मात्र त्याची प्रत सापडत नव्हती .
अनेकांना विचारलं पण , ‘प्रियदर्शिनी’ची प्रत मिळाली नाही .
दरम्यान आमचा सुमारे साडेतीन-पावणेचार हजार पुस्तकांचा खजिना नागपूरला श्रीकांत विंचुर्णे याच्या स्वाधीन करुन कांही निवडक पुस्तकांसह बेगम आणि मी औरंगाबादला
स्थायिक झालो .
औरंगाबादला स्थायिक झालो म्हणून पुस्तकांचं आमच्या घरी दिसामाजी येणं कांही थांबलेलं नाही .
पुस्तकं आणि चित्रं वाढतच आहेत .
कपाटं कमी पडू लागल्यानं सध्या कांही पुस्तकं सोफ्यावर तर कांही डायनिंग टेबलवरही विराजमान झालेली आहेत .
औरंगाबादची पुस्तकं आवरण्याचं काम सुरु असतांना तब्बल ३६ वर्षांनंतर ‘प्रियदर्शिनी’ या पुस्तकाची एक प्रत एका मोठ्या पाकिटात असलेल्या कागदाच्या कुशीत सापडली आणि खजिना गवसल्यासारखा आनंद झाला .
हरवलेलं एखादं पुस्तक गवसणं म्हणजे मनात लक्ष दिवे उजळण्याचं सुख कसं असतं त्याची प्रचीती आली .
३६ वर्ष आणि वर कांही महिने वयाची ती न्यूजप्रिंटवर छापलेलेली ती प्रत आता जीर्ण झालीये ; कागद म्हातारा झालाय , त्यानं आता रंग बदलला आहे मात्र , त्या पुस्तकाशी जोडल्या गेलेल्या आठवणी मात्र अजूनही वृद्ध होण्यास तयार नाहीत .
इंदिराजी १९८४ सालीच गेल्या आमच्या चौघांपैकी शैला आणि बेगम मंगला आता मृत्यू नावाच्या अज्ञात प्रदेशात निघून गेल्या आहेत ; मी आणि प्रदीप आहोत पण , एकमेकापासून दूर अंतरावर .
‘प्रियदर्शिनी’ पुस्तकाची प्रत सापडल्याच्या आनंदाला आमच्या अनेक भावविभोर सयींचा गंध आहे ; तो कधीच उडून जाणार नाही …
⇑ जाता जाता आणखी एक- इंदिराजी गांधी यांच्या हत्त्येच्या दिवशी नागपूरच्या ‘तरुण भारत’ या दैनिकाच्या मुख्य शीर्षकाच्या ( Head Line ) असलेल्या संजय धोतरकरच्या अक्षरलेखनाची ‘नागपूर पत्रिका’ दैनिकाच्या रात्रपाळीच्या उपसंपादकांनी अतिउत्साहाच्या भरात केलेली असमर्थनीय कॉपी , ही आणखी एक उपकथा या आठवणींची कडी आहे पण , त्याबद्दल नंतर कधी तरी , नक्की ! ⇑
© या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत
–प्रवीण बर्दापूरकर
( ४ जानेवारी २०२१ )
Cellphone +919822055799