चिपळूणचे दिवस काही लख्ख , काही अंधुक आठवतात तर बरेच आता विस्मरणात गेले आहेत . ते सहाजिकही आहे कारण आता म्हणजे , २०१८च्या डिसेंबर महिन्यात ते दिवस उलटून गेल्याला चार दशकं होताहेत . चिपळूणचे दिवस म्हणजे नानासाहेब उपाख्य निशिकांत जोशी आणि दैनिक ‘सागर’शी जोडला गेलेला संस्कार आहे , तिथे गिरवलेली आणि अमीट उमटलेली पत्रकारीतेची मुळाक्षरं आहेत ; भालचंद्र दिवाडकर नावाचा मनावर कायम उमटलेला ‘मैत्र’मास्तर आहे . त्या दिवसात भेटलेली अनेक माणसं अजूनही मनाच्या तळघरात ठाण मांडून बसलेली आहेत ; ते अनेक अनोळखी चेहेरे वर येण्याची संधी कधी मिळते याची वाट पहात दबा धरुन बसलेले आहेत .
तेव्हा मी सातारच्या ‘ऐक्य’ या दैनिकात वार्ताहर-उपसंपादक म्हणून नोकरी करत होतो ; वर्ष होतं १९७८ . ते दैनिक पळणीटकर बंधूंच्या मालकीचं होतं . त्या बंधूंच्या दुराग्रही स्वभावामुळे मी पार जेरीस आलेलो होतो आणि तिथून बाहेर पडण्याची संधी शोधत असताना एक दिवस रात्री उशीरा चिपळूणहून ट्रंककॉल आला . कुणी धनंजय कुळकर्णी पलीकडून बोलत होते . त्यांनी मला ‘सागर’ या दैनिकात नोकरीची ऑफर दिली . नंतर तीन-चार वेळा त्यांचा फोन आला . तेव्हा पत्रकारीतेत मी फारच नवखा , खरं तर कच्च मडकं होतो ; माझं फार काही लेखनही प्रकाशन झालेलं नव्हतं तरी नोकरीसाठी माझ्याकडे लकडा लागावा याचं आश्चर्य वाटत होतं . दरम्यान एकदा ‘सागर’चे संपादक निशिकांत जोशी यांच्याशीही धनंजय कुळकर्णी यांनी बोलणं करून दिलं . ‘ऐक्य’पेक्षा १०० ( ही रक्कम १९७९ची आहे ! ) रुपये पगार जास्त देण्याचा वादा त्यांनी केला . त्यांनी कुठं तरी काही तरी माझं लेखन वाचलेलं होतं म्हणून त्यांनी मला हेरलं होतं म्हणे . मग एका साप्ताहिक सुटीच्या दिवशी मी ‘ऐक्य’मधे कोणालाच काहीही न सांगता एकदा चिपळूणला जाऊन आलो . हिरव्या गर्द झाडीत लपलेलं चिपळूण गाव मला प्रथमदर्शनीच आवडलं . बसस्टँडवरुन चालतच ‘सागर’ या दैनिकाच्या तेव्हा चिंच नाका चौकातल्या एका गल्लीत असणार्या कार्यालयात गेलो . जांभ्या रंगाचा दगड आणि सिमेंट अशा मिश्रणात बांधलेल्या एका दुमजली इमारतीत तळमजल्यावर ‘सागर’चं कार्यालय होतं ; वरच्या मजल्यावर संपादक निशिकांत जोशी कुटुंबीय राहात . निशिकांत जोशी यांच्याशी भेट झाली . पाहताच तो माणूस मला आवडला . काहीशी स्थूल आणि धिप्पाडतेकडे झुकणारी शरीरयष्टी , आश्वासक चेहेरा आणि प्रसन्न हंसू , कांहीसा रुंद भालप्रदेश आणि त्यावर बहुसंख्य वेळा अस्ताव्यस्त पसरलेले काळे केस , उजळ गव्हाळ वर्ण असलेल्या निशिकांत जोशी यांची लगेच छाप पडली . खादीचा पांढरा पायजामा आणि बंडी घातलेले निशिकांत जोशी देत असलेलं डिक्टेशन एक गौरवर्णीय स्त्री लिहून घेत होती . निशिकांत जोशी यांच्या सांगण्याला एक नाद होता , आलेले फोन घेतांना , समोरच्या कुणाशी बोलतांना त्यांची लेखनतंद्री भंग पावत नव्हती ; बोलणं झालं की त्यांचं डिक्टेशन त्याच लयीत पुढे सुरू व्हायचं . ( त्या बाई निशिकांत जोशी यांच्या पत्नी शुभदा असून सुविद्य आहेत आणि सर्व व्यवहार त्याच बघतात , कडक आहेत वगैरे माहिती नंतर मिळाली . त्यांना सर्वजण मॅडम संबोधत ; मी मात्र वहिनी म्हणत असे आणि ते त्यांना फारसं आवडत नसे हे त्यांच्या चेहेर्यावर दिसतही असे पण, त्याबद्दल त्या स्पष्टपणे कधीच बोलल्या नाहीत . त्यांची नाराजी धनंजय यांनी मला सांगितली होती . ) पुढे रुजू झाल्यावर नाना डिक्टेशन देतांनाचा तो नाद अनुभवण्यासाठी मी आसपास रेंगाळत असे . त्या दिवशी डिक्टेशन संपल्यावर निशिकांत जोशी यांच्याशी माझा परिचय धनंजय कुळकर्णी यांनी करुन दिला . त्यांनी विचारलेल्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देतांना मी ‘जोशीसाहेब’ असा उल्लेख करताच त्यांनी सरळ एकेरीवर येत सांगितलं , ‘मला सगळे नाना म्हणतात . तू ही मला नानाच म्हणत जा’ . समोरच्याला गृहीत धरून असं दाबात घेण्याचा त्यांचा हा गुण लगेच लक्षात आला पण , त्या आवाजात हुकूम नाही तर आपलेपणाचा ओलावा होता .
यथावकाश ‘सागर’ या दैनिकात रुजू झालो . बहुदा पहिले पांच-सात दिवस धनंजय कुळकर्णी यांच्याकडेच राहिलो . पाहिल्या दिवशी संध्याकाळी कार्यालयात भालचंद्र दिवाडकर याची ओळख झाली . तो आणि धनंजय हे दोघेही मला वडीलधारे होते . धनंजय बर्यापैकी अबोल तर भालचंद्र म्हणजे बडबड शिवाय , तो तंबाखू खाणारा आणि मी धुम्रपान करणारा ; आमची जोडी लगेच जमली . पाहिल्याच भेटीत आम्ही ‘अरे-तुरे’वर आलो . त्याच्याच पुढाकारानं मग एक खोली मिळाली ; राहण्यासोबतच खाण्याची सोय लागली . सडाफटिंग असल्यानं माझं सर्वच परावलंबी होतं . खोलीपासून कार्यालय १०० मीटर्स आणि क्षुधाशांतीच्या सर्व सोयी २०० मीटर्सच्या आंत होत्या , त्यामुळे सकाळी तयार झालं की मी ‘सागर’च्या कार्यालयात कायम पडीक असे . काही काम नसलं की हाती जे मिळेल ते वाचत बसण्याची संवय मला इथेच लागली . टपाल आलं की , राज्याच्या अनेक गावांतील वृत्तपत्र येत ; ती वाचायला आवडत असे . ते बघून तर नंतर कोणत्या वृत्तपत्रात ( विशेषत: दैनिक मराठवाडा , संचार , गावकरी ) कोणत्या विषयावर अग्रलेख , साईड आर्टिकल काय आलंय ते नाना मला विचारु लागले . त्यामुळे बाहेर गावाहून आलेली वृत्तपत्रं बारकाईनं वाचायची संवय लागली ; महाराष्ट्र समजू लागला .
‘सागर’ या दैनिकातील दिवस जसे नानासाहेब जोशी यांच्यासोबतचेही दिवस आहेत , तसेच ते चिपळूणचे आणि कोकणातलेही दिवस आहेत ; भालचंद्र दिवाडकर सोबतचे दिवस आहेत ; खूप कांही ऐकण्याचे दिवस आहेत ; महत्वाचं म्हणजे पत्रकारिता आणि लेखनाची मुळाक्षरं गिरवण्याचे दिवस आहेत . त्या दिवसात गवसलेलं वळवाच्या अत्तरासारखं मैत्र म्हणजे भालचंद्र दिवाडकर ! बुल्गानिन दाढी , केस मागे वळवलेले , मोठ्या फ्रेमच्या चष्म्याआड डोळे लपवले , माझ्यापेक्षा तीनेक वर्षानी मोठा , अफाट मराठी इंग्रजी वाचन असलेलं , मार्क्स आणि गांधीवाद कोळून प्यायलेलं , कवितेवर अफाट प्रेम असणारं , तुसडेपणाकडे झुकतो आहे असं वाटणारं मनस्वी तरी प्रेमळ , कधी अखंड बडबड तर अधून-मधून पूर्ण मौनव्रत असा टोकाचा मुडी तरी खूप केअरिंग , असे अनेक कांठोकाठ भरलेले पैलू असणारं भालचंद्र दिवाडकरचं व्यक्तिमत्व . त्याच्या बोलण्यात येणारी अनेक नावं माझ्यासाठी अपरिचित असत ; त्यासंदर्भात विचारलं की , ‘अज्ञानी बालका’ अशी सुरुवात करुन भालचंद्र एकदा सुटला की थांबत नसे ; शिवाय दुसर्या दिवशी ती पुस्तकं देत असे . खाण्या-पिण्यातला तो दर्दी ; स्वाभाविकच अस्सल मत्स्यप्रेमी ; खवय्या आणि खिलवय्याही . मत्स्याहार आणि मद्याची दीक्षा देणारा माझा तो गुरु . मात्र एकदा घशात कांटा अडकला ; माझे प्राण कंठाशी गोळा झाले आणि भालचंद्रचे होश उडाले . तेव्हापासून मत्स्य नावाची जमात माझ्या खाण्याच्या नावडत्या यादीत गेली . घड्याळ आणि भालचंद्र यांचा मेळ फारसा जुळत नसे पण , एकदा ‘फक्की’ मारुन कामाला बसला की तहान भूक विसरुन एखाद्या योग्याला लाजवेल अशी त्याची कामाची तंद्री लागत असे . टपोरं , एकात एक गुंफत जाणारं अक्षर आणि अपशकुन म्हणूनही व्याकरणाची चूक काढता येणार नाही अशी त्याची भाषा . वाचन आणि गाणी ऐकण्याच्या धुंदीत ‘दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस’ करणं ही त्याची अपरिहार्य मजबूरी ! ती संवय त्यानं मलाही लावली पण , त्यातून मी स्वत:ची लवकर सुटका करुन घेतली . भालचंद्र दिवाडकर जर चिपळूण सोडून मुंबईच्या मैदानात गेला असता तर शेकडोना भारी पडला असता ; पण ते झालं नाही .
मर्ढेकर , बोरकर , आरती प्रभू , ग्रेस , महानोर यांच्या कविता , गालिब , तलत मेहमूद , मेहंदी हसन , गुलाम अली , नुकतेच गाजू लागलेले जगजितसिंग हे भालचंद्र आणि माझ्या मैत्रीतले कच्चे दुवे ; मला किशोरकुमारही जाम आवडत असे तर भालचंद्रला मात्र किशोरकुमारबद्दल फार प्रेम नव्हतं . त्या काळात भारतीय बनवटीचे टेप रेकॉर्डर नुकतेच आलेले होते आणि त्याच्या किंमती एक टेप रेकॉर्डर खरेदी केला . ( त्या काळी पत्रकारांचे आणि त्यातही लहान वृत्तपत्रांतील पगार इतके कमी असत की ते कर्ज तिप्पट सव्याज फेडायला मला १९८७साल उजाडावं लागलं ! ) रात्रपाळी संपली की त्या टेपरेकॉर्डरवर आम्ही चिपळूण ते गणपती पुळे या टप्प्यात ; कोकणातील भुता-खेतांना न जुमानता ; ठिकठिकाणी ठिय्या मारत सलग गाणी/गझल ऐकत सकाळचा सूर्य बघितलेला आहे . मग कुठे तरी चहा-बिडी मारुन आमची रात्र सुरु होत असे . ( तरुण तलत प्रेमींसाठी एक शिफारस- गणपती पुळ्याच्या किनार्यावर मध्यरात्री नंतर गाज ऐकत तलत ‘प्यावा’ ; अन्य नशेची गरजच राहत नाही . ) भालचंद्र आणि माझा तेव्हाचा आणखी एक फंडा म्हणजे कविवर्य ग्रेस यांच्या कविता तलत मेहमूद यांच्या गाण्याचा चालीवर म्हणणं . ( पुढे एकदा हे मी ग्रेस यांना हे सांगितलं तेव्हा उजव्या तळहातावर चेहेरा रोवत ते म्हणाले , ‘माझ्या कवितेबद्दल एवढंच ऐकायचं बाकी राह्यलं होतं !’ ) रात्रपाळी संपली की चिपळूणच्या परशुराम घाटात व्हयू पॉइंटवर सायकली मारत जाणं आणि रात्रभर किंवा टेप रेकॉर्डरच्या सेल्सची नाडी मंद पडेपर्यन्त एकापाठोपाठ गाणी/गझल ऐकल्याची धुंदी अजूनही मनावर दुलई पांघरुन आहे . तेव्हा कविता करण्याचा कीडा मलाही चावलेला होता . कांही कविता प्रकाशितही झालेल्या होत्या पण , जगण्याचा श्वास झाला तरच कविता उमगते हे भालचंद्रच्या सहवासात लक्षात आलं ; कवितेवरची माझी निष्ठा इतकी कांही अव्यभिचारी नव्हती मग कवितेच्या झाडांनी आलेलं झपाटेलपण ओसरलं . नागपूर , मुंबई , दिल्लीत असतांना आणि आता औरंगाबादला , संवयीप्रमाणं पहाटे लवकर जाग आल्यावर टेरेसचा दरवाजा उघडला की गार वार्यासोबत भालचंद्र दिवाडकर आणि धाकटा भाऊ विनोद याच्यासोबतच्या जागवलेल्या रात्रींच्या कधी सुरेल तर कधी गतकातर आठवणी अनेकदा चाल करुन येतात…अंगावर रोमांच उमटतो .
आताच्या पत्रकारांचा विश्वास बसणार नाही पण , तेव्हा लहान वृत्तपत्राच्या कामाची शैली अविश्वसनीय होती…वृत्त संस्थांची सेवा तेव्हा लहान गावात उपलब्ध नसायची ; एक तर थेट टेलिफोनच कनेक्शन नाही आणि जिल्हा पातळीवरच्या वृत्तपत्रांना वृत्तसंस्थेचं भाडं परवडणारं नसायचं . लहान वृत्तपत्रांचा सगळा भर वार्ताहरांकडून येणार्या बातम्या , इंग्रजी वृत्तपत्रात आलेल्या बातमी-लेखांची करवून घेतलेली भाषांतरं ( त्यामुळे लहान वृत्तपत्रात काम करणार्या आमच्या पिढीचं ‘इंग्रजी इन टू मराठी’ चांगलं घोटून घेतलं गेलं . ) आणि रेडिओवरील बातम्यावर असायचा . महत्वाची असेल तर तारेने आणि अतिच महत्वाची असेल तर…च टेलिफोन एक्स्चेंजमधे ट्रंक कॉल बुक करुन बातमी पाठवावी लागत असे . तेव्हा दूरदर्शन नजरेच्या टप्प्यातही नव्हतं ; आकाशवाणीवरुन दिल्या जाणार्या बातम्या ऐकायच्या ; नोंदी घ्यायच्या आणि मग त्या संदर्भात अधिक माहिती मिळवून बातमी लिहायची असा मामला असायचा . ‘रेडियो मॉनिटरिंग’ असं म्हणायचे त्याला .
विशेषत: संध्याकाळी सात/आठ/नऊच्या आकाशवाणीवरुण प्रक्षेपित होणार्या मराठी प्रादेशिक आणि राष्ट्रीय हिन्दी/इंग्रजी बातम्या ऐकून बातम्या लिहिणार्या उपसंपादकाचा ‘भाव’ जास्त असायचा . हे काम सोपं नसायचं ; त्यासाठी भरपूर वाचन आणि संदर्भ अचूक माहिती असणं शिवाय लक्ष केन्द्रित करण्याची क्षमता आणि नोंदी घेण्याची व काम उरकण्यासाठी गती लागायची . या संध्याकाळच्या बातम्या ऐकून काम करण्यात धनंजय कुळकर्णी पटाईत होते . त्यामुळे त्यांच्यावर पहिल्या पानाची जबाबदारी असे तर भालचंद्र दिवाडकरकडे साधारण संपादकीय पानाची जबाबदारी असे ; नानासाहेब जोशी नसतांना अग्रलेख लिहिण्याचंही काम भालचंद्रकडेच असे . माझी जबाबदारी तशी तुलनेनं दुय्यम ; म्हणजे कोकणच्या सर्व भागातून आलेल्या बातम्यांचं संपादन , पुनर्लेखन इत्यादी . लवकरच माझ्याकडे आणखी एक जबाबदारी आली-तेव्हा आकाशवाणीवरुन दुपारी दोनच्या हिन्दी-इंग्रजील्या राष्ट्रीय बातम्या संपल्या की दोन वाजून वीस मिनिटांनी आधी इंग्रजी आणि नंतर हिंदीत संथ लयीतल्या बातम्या ( त्या बातम्यांना ‘स्लो स्पीड बुलेटीन’ म्हणत ! ) प्रक्षेपित होत असत ; या बातम्या साधारणपणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील असत . प्रत्येकी वीस मिनिटांची ही वार्तापत्र असत ; एका मिनिटात ३५ ते ४० शब्द अशी त्यांची गती असे . त्या बातम्या ऐकता-ऐकता नोट्स घ्यायच्या आणि त्याधारे बातम्या लिहायचं काम माझ्याकडे आलं . या बातम्या लिहिण्यास भरपूर वेळ हाताशी असे . त्यामुळे लक्ष केंद्रीत करणं , नवीन शब्दांचे अर्थ आणि बातमी मोठी होण्यासाठी संदर्भ शोधणं अशी कामाची संवय लागली . नंतरच्या काळात दीड-पावणेदोन तासांचा कार्यक्रम लक्ष केंद्रीत करुन ऐकला की एकही शब्द लिहून न घेण्याची आणि लिहितांना ‘असोसिएट मेमरी’ हात जोडून उभी असण्याची माझी जी खासीयत झाली , त्याची पाळंमुळं अशी सागर या दैनिकात अंकुरलेली आहेत !
मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून आलेल्या माझ्यासारख्यावर पहिल्या आठ दिवसातच कोकणच्या पाऊसाचं अप्रूप दाटून आलं . मराठवाड्यात पूर्ण हंगामात पडतो त्यापेक्षा जास्त पाऊस एका दिवसात कोकणात पडतो हे अनुभवताना मी नंतर हबकूनही गेलो . अशाच धुवांधार पावसात रात्रीच्या अंधारात एक बस महाडजवळ सावित्री नदीत बुडाली आणि ३०का३२ लोक बुडाले . तो अपघात कव्हर करायची संधी मला अनपेक्षितपणे मिळाली . ऊरात धडकी भरवणार्या गतीनं दुथडी भरुन रौद्रपणे वाहणारी नदी , खोल बुडलेली आणि पुढे वाहून जाऊ नये म्हणून जाड दोरखंडांनी बांधून ठेवलेली बस , त्यात दोन दिवसापासून अडकलेले ते मृतदेह ; मृत्युचं ते रुप अजूनही विसरलेलो नाही मी . तिथून परतल्यावर अनावर होऊन इतका भरमसाठ मजकूर लिहिला की विचारता सोय नाही मग , त्याला नीट फॉर्ममधे आणलं ते भालचंद्र दिवाडकरनं ; माझ्या नावानिशी प्रकाशित झालेली ती पहिली बातमी . पहिलं मराठी साहित्य संमेलन मी बार्शीचं कव्हर केलं ते ‘सागर’साठी .. बकुळीचं फूल , फणस , काजूचं झाड , फेणी अशा अनेक ऐकीवांना भेटता आलं ….असं खूप खूप आहे . ‘सागर’च्या या दिवसात माझ्याही जर्नालिस्टिक भावजीवनाचा विस्तार होत गेला , आकलनाच्या कक्षा विस्तारल्या . नाना आणि भालचंद्र दिवाडकर यांच्यामुळे माझं इंग्रजी वाचन वाढलं , त्यात शिस्त आली . महत्वाचं म्हणजे त्याच काळात मला ‘बरं’ लिहिता येऊ लागलं . नानांनी उमदेपणानं परवानगी दिल्यामुळेच ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीसाठी वार्ताहर म्हणून काम करायला मिळालं . म्हणूनच निशिकांत उपाख्य नानासाहेब जोशी आणि ‘सागर’मधले दिवस माझ्या भावजीवनातला एक भरजरी ऐवज आहेत . सागर आणि चिपळूणशी एक पत्रकार म्हणून माझ्या अशा अनेक पहिल्यावाहिल्या केवळ आठवणीच नाहीत , ती तर पत्रकारितेची गिरवलेली मुळाक्षरंच !
आरती प्रभू हे माझे आवडते कवी . त्यांच्या अनेक कविता मला मुखोद्गत होत्या ; अजूनही आहेत . एक दिवस त्यांच्या वेंगुर्ला तालुक्यातील बागलांची राई या गावी भालचंद्र मला घेऊन गेला . ते गाव कसलं , अठरा-वीस उंबरठ्याची ती वस्ती ती . वेंगुर्ल्याची ‘ती’ खानावळीची जागा मोठ्या भक्तीभावानं दाखवली . चिं. त्र्यं. खानोलकर नावाचा प्रतिभावंत कलंदर ज्या भूमीत वावरला , जिथं त्याचं गद्य आणि पद्य बहरलं त्या मातीत चालतांना मी मोहोरुन गेलो . नंतर एकदा साने गुरुजींचं पालगड , विनोबांचं गागोदे , तीन भारतरत्नांची खाण आणि श्री. ना. पेंडसे यांच्या लेखनाची प्रेरणा असलेलं असलेलं दापोली…कोकणात अशा अनेक ठिकाणी कधी भालचंद्र सोबत तर कधी , कधी धाकटा भाऊ विनोद सोबत तर कधी एकटा , मनसोक्त विहरलो . या प्रत्येक गावची अर्धा ओंजळ माती तेव्हा जमा केली होती . फार वर्षानी ; बहुदा २००० साली एक्सप्रेसच्या औरंगाबाद ब्युरोला असतांना एकदा आठवण आली म्हणून ती प्लास्टिकची बॅग शोधली आणि उघडली तर सर्व पुड्या फुटून माती एकत्र झालेली होती…शेवटी मातीच ती ! सतत बदलावी लागलेली घरं आणि नंतर बदल्यामुळे झालेली स्थलांतरं यात ती माती आणि माई-म्हणजे माझ्या आईचा जपून ठेवलेला चष्मा गहाळ झाला . त्या आठवणी सोबतीला आहेत अजून…
त्याच दिवसात मधू दंडवते , जयवंत दळवी यांच्याशी निर्माण झालेली घसट हे आणखी एक गर्भरेशमी संचित . राष्ट्र सेवा दलामुळे मधू दंडवते यांच्याशी आधी परिचय होताच ; चिपळूणच्या दिवसात त्यांना नाना म्हणण्याइतकी सलगी निर्माण झाली ; त्यांच्यामुळे तेव्हा जनता पक्षाचे अध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर यांच्यासोबत एक दिवस घालवत आला . नंतर केंद्रीय अर्थमंत्री असतांना एकदा मधू दंडवते नागपूरला आले . पत्रकार परिषदेच्यावेळी भेट झाली . परिषद संपल्यावर ते म्हणाले , ‘काम संपलं की ये रात्री भेटायला’ . मी गेलो . आधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी ओसरल्यावर नागपूरच्या रवी भवन परिसरात ते उतरलेल्या बंगल्यासमोरच्या एका झाडाभोवती बांधलेल्या पारावर आम्ही गप्पा मारत बसलो ; बंदोबस्तावरचे अधिकारी-कर्मचारी अदबीनं लांब सरकले . समाजवादी चळवळीतील मधू दंडवते यांच्या जुन्या सहकारी लीलाताई चितळे याही बराच वेळ आमच्या गप्पात सहभागी झाल्या होत्या . आम्ही जेवलोही त्याच पारावर . त्यानंतर नागपूरच्या प्रशासकीय सर्कलमधे हा कुणी भारी माणूस आहे अशी भावना निर्माण झाली ; त्याचं श्रेय चिपळूणच्या दिवसांना आहे . जयवंत दळवी यांनी तर जीवच लावला ; इतका की , तडकाफडकी नागपूर पत्रिका या दैनिकाचा मी राजीनामा दिला तेव्हा आम्हाला नुकतंच कन्यारत्न झालेलं होतं . भान आल्यावर राजीनामा देण्याची चूक जाणवली आणि जयवंत दळवी आणि मुकुंदराव किर्लोस्कर यांना कळवलं . मला नोकरी मिळावी म्हणून मुकुंदराव आणि दळवींनी खूप धावाधाव केली . दळवींनी मुंबईत तर मुकुंदराव यांनी पुण्यात ती मिळवूनही दिली पण, कांही कारणास्तव मला नागपूर सोडणं शक्य झालं नाही . नंतर कांही वर्षानी नागपूरला आल्यावर जयवंत दळवी आवर्जून आमच्या घरी आले आणि मंगलाचा स्वैपांक तयार करुन होईपर्यंत त्यांनी आमच्या तेव्हा तान्ह्या असलेल्या रडणार्या कन्येला ममत्वानं सांभाळलं , जोजवून-थोपटून झोपी घातलं .
देवरुखच्या न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक ज. वि. जोशी ; त्यांना आम्ही नाना म्हणत असू ; आणि आठल्ये-सप्रे महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक डॉ. सुरेश जोशी यांच्याकडे माझ्या देवरुखला नियमित चकरा होत . दोघांचीही साहित्याची जाणीव टोकदार आणि जगण्याच्या धारणा समतेच्या , निष्ठा समाजवादावर हे आमच्यातले समान दुवे . वाचनातलं डावं-उजवं या दोघांमुळेही मला उमजलं . तेव्हा माधव कोंडविलकर यांचं ‘मु. पो. देवाचे गोठणे’ हे पुस्तक गाजत होतं आणि ते देवरुखलाच नोकरी करत होते . माधव कोंडविलकर यांची ज. वि. जोशी यांच्यामुळे भेट झाली . मौज प्रकाशनाचे भागवत यांचं घर देवरुखला होतं आणि ते त्यांनी आपल्याला राह्यला दिलं या आभेतच अडकून थोड्या लेखनातच कोंडविलकर संपून गेले . १९८०च्या विधानसभा निवडणुकीत अनिल बर्वे या प्रतिभावान लेखक आणि भन्नाट माणसाची ओळख झाली ; ते काँग्रेसच्या प्रचारासाठी चिपळूणला आले होते आणि पक्षानं त्यांची मोठी बडदास्त राखलेली होती . अनिल बर्वे यांच्या सोबत एक आठवडा बोलता , राहता , खाता , पिता आणि जगता आलं. आता ते आठवलं की स्वप्नवत वाटतं .
निशिकांत जोशी हे ‘गाव नाना’ होते हे हळूहळू लक्षात आलं . ‘सागर’चं कामकाज सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरु होत असलं तरी नाना मात्र आरामात खाली उतरत . ते आले की ‘सागर’च्या कार्यालयात लगबग सुरू होत असे . तोपर्यन्त कुणाला कांही काम सांगायचं असेल तर वरच्या मजल्यावर बोलावलं जाई . अनेकदा हा निरोप जोशी मॅडम खाली येऊन देत किंवा नानांचा आवाज वरच्या मजल्यावरुन खाली आदळे ! मध्यम वरच्या पट्टीतला दणदणीत आवाज हे निशिकांत जोशी यांचं आणखी एक वैशिष्ट्य . राग असो की लोभ , ते त्याच पट्टीत व्यक्त करत . त्यामुळे त्यांचा मूड कसा आहे , हे लगेच लक्षात येत असे आणि तसं कामाचं वळण मग ‘सागर’च्या कार्यालयाला आपसूक लागत असे . अंकात काही गंभीर चूक असेल आणि जास्तच राग आलेला असेल तर नाना खाली आल्यावर संबधितावर बरसतच असत . ते जास्तच क्रुद्ध असले तर त्याची वर्दी शुभदा मॅडम आधीच खाली येऊन देऊन ठेवत त्यामुळे संबंधिताची बोलणं खाऊन घेण्याची मानसिक तयारी नाना खाली उतरण्यापूर्वी झालेली असे . नानांच्या रागाचं वैशिष्ट्य म्हणजे तो दीर्घ काळ मुक्कामाला आलेला नसे . एकदा बरसून आकाश लख्ख मोकळं व्हावं तसं काहींसं असे . राग अल्पावधीतच ओसरला की तेच सांगत , ‘जा , लाग आता कामाला . पुन्हा अशा चुका करु नकोस’ आणि ते डिक्टेशन द्यायला सुरुवात करत किंवा कुणाला तरी कुठे तरी ट्रंककॉल बुक करायला सांगत . तो काळ सेलफोन तर लांबच , एसटीडी म्हणजे थेट डायल करण्याचाही नव्हता ; टेलिफोन एक्स्चेंजला सांगूनच कॉल बुक करावा लागे . फारच कांही खाजगी बोलायचं नसेल तर नाना तिथूनच बोलत असत आणि आवाज तोच वरच्या मध्यम पट्टीतला . त्यामुळे ते बोलणं सर्वांनाच कळे . नानांचं खूपसं वर्तन आणि व्यवहार असा जाहीर आणि व्यवहार सार्वजनिक होता ; चांगल्या अर्थानं ते सार्वजनिक नाना होते ! त्यांचा आवाज अगदी रस्त्यावर पोहोचत असे त्यामुळे जाणार्या-येणार्यापैकी अनेकजण अनेकदा नाना काही काम करत आहेत याची फिकीर ना बाळगता कोकणी निरहेतू वृत्तीनं आंत डोकावत आणि नानांसमोरच्या खुर्चीत टेकत . नानांच्या मोकळ्या-ढाकळ्या वृत्ती व शैलीला असे आगंतुक पाहुणे येणं आवडीचं होतं . आल्या-गेल्याशी दोन-चार शब्द आवर्जून बोलायला नानांनाही आवडेच . त्यांच्या या संवयीनं सर्वांनाच नाना त्यांचे जवळचे वाटत . मध्यंतरी एका कार्यक्रमासाठी मी दापोलीला गेलो होतो . ‘सागर’चा एक वार्ताहर भेटला . माझ्या पत्रकारीतेची सुरुवात ‘सागर’मधून झाल्याचं कळल्यावर तो अगदी सहज म्हणून गेला , ‘नाना कधी बोलले नाही माझ्याकडे तुमच्याविषयी’ . मी मनातल्या मनात म्हटलं नानांची मोहिनी अजून ओसरलेली नाहीये तर !
तेव्हा नानांकडे एक निळ्या रंगाची , जरा जुनाट कार होती . त्या कारनं नाना चिपळूण ते मुंबई आणि उर्वरीत कोंकणात मुक्त संचार करत असत . हा प्रत्येक दौरा ‘सागर’च्या कामासाठीच असला पाहिजे असा नानांचा कटाक्ष नसे . कधी काम तर कधी कोणत्या तरी उपक्रमाला मदत तर कधी काही तरी राजकीय किंवा सांस्कृतिक मोहीम असा कोणताही हेतू त्या प्रवासामागे असे . महिन्यातले किमान दहा-बारा दिवस तरी त्यांचा हा संचार चाले . त्यांच्या अनुपस्थितीत संपादकीय कामाची जबाबदारी धनंजय कुळकर्णी तर अग्रलेखाची आघाडी भालचंद्र दिवाडकर सांभाळत असे . अर्थात कामावर शुभदा वहिनींचा बारकाईनं लक्ष असेच ! नाना आणि ‘सागर’ शुभदा वहिनींचा श्वासच . नानांचा भालचंद्रवर फारच जीव ; त्याच्या बुद्धिमत्तेविषयी नांनाना कौतुक तर भर्राट वागण्याविषयी काळजी होती . नंतरच्या काळात त्यांनी अनेकदा फोनवर माझ्याशी बोलतांना ही भावना व्यक्त केलेली आहे . स्वभावानं शांत आणि खाल मानेनं काम करणारी एक सुरेखा नावाची मुलगी आठवते ; तिनं ‘सागर’मधे अर्धवेळ काम करणार्या राज्य वीज मंडळातल्या एकाशी लग्न करुन धक्का दिला होता . ‘सागर’च्यासमोरच दादा फडके यांचा प्रिंटिग प्रेस होता . दादा वयानं मोठे पण , गोष्टीवेल्हाळ होते ; त्यांचं वाचन जबर होतं . अनेक बड्या साहित्यिकांच्यात त्यांची ऊठबस होती त्यामुळे त्यांच्याकडे हकिकती आणि किश्शांचा साठा होता . भालचंद्र आणि मी दादा फडकेंच्या अड्ड्यावर अनेकदा रमून जात असू . दादा फडके यांच्याकडेच संघाच्या सुरेश केतकर यांच्याशी ओळख झाली . भेटलेले इतर लोक मात्र आता विस्मरणात गेले आहेत .
आधी चिपळुणात आणि मग कोकणात फिरतांना कुठंही गेलं पत्रकार म्हणून ओळख प्रस्थापित होतच नसे ; ‘नानांच्या पेपरातला माणूस’ म्हणूनच प्रत्येकजण ओळखला असे , इतके नाना आणि ‘सागर’ कोकणच्या मातीत , जनमानसात रुजलेले होते ! घनदाट संपर्कामुळे नानांनाही अनेकांच्या ‘कुंडल्या’ पाठ होत्या . मात्र कोणाची मागे निंदा करतांना ‘चोर आहे तो’ किंवा ‘लुच्चाये लेकाचा’ यापलीकडे नाना कधी जात नसत , असा माझा तरी अनुभव आहे . नाना वाचक म्हणून ‘अफाट बापू’ होते आणि त्यांचा वाचनाची गती शीघ्र होती . इंग्रजी , मराठी, हिन्दी असा भाषाभेद त्यांच्या वाचनात नव्हता आणि राजकारणी संपादक असूनही त्यांना साहित्य , कला , संस्कृती अशा विषयात वाचनरुची होती . नाना काँग्रेसी विचाराचे म्हणजे सेक्युलर होते पण , ते जास्त माणूसलोभी होते असं हळूहळू उमजत गेलं . त्यामुळे त्यांचा जनसंपर्क सर्वस्तरीय आणि राजकीय विचारांच्या सीमापार होता . त्यांचा ‘खारे वारे , मतलई वारे’ हा स्तंभ तेव्हा फारच लोकप्रिय होता . मीही त्या स्तंभातील मजकुरावर फिदा होतो . ( कोकणातले दुसरे लोकप्रिय नाना म्हणजे मधू दंडवते हेही या स्तंभाचे फॅन होते , त्यांनीच ते एकदा मला सांगितलं होतं आणि मी ते लगोलाग नाना जोशी यांना कळवलं होतं ! ) ते लेखन फार कांही मोठा आवाका असणारं नसायचं पण , त्यात भाषा , शैली , माहिती आणि उपरोधिकपणे लगावलेले टोले असा झकास मिलाफ असायचा . शैली सुबोध , एकही जड शब्द नाही , विद्वत्तेचा आव नाही आणि लेखनाचा फ्लो छान लयीत ; बोचकारे तर काढायचे पण ओरखडा उमटला नाही पाहिजे , असं ते लेखन असे . सदर असो की लेख की अग्रलेख , नाना थेट डिक्टेशन देत . खाली येण्याआधीच संदर्भासाठी ते कांही वाचत असतील तर माहिती नाही पण , लिहिण्याआधी नोंदी काढल्या आहेत , आसपास संदर्भाची पुस्तकं पहुडलेली आहेत असे कांही चोचले त्यांचे नसत . स्तंभाचं डिक्टेशन नाना देत तेव्हा , असं लिहिता यायला पाहिजे आणि त्या सदराच्या नावानं वाचकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे असं मला तेव्हा नेहेमी वाटायचं . नानांची ‘असोसिएट मेमरी’ खूपच स्ट्रॉंग होती . मोठ्यांचे संस्कार कसे न कळत होतं जातात ते बघा , लेखनाचा तोच संस्कार माझ्यावर झाला ; अजूनही तो कायम आहे . सकाळी फिरतांना तयारी करून एकदा मन एकाग्र केलं की वृत्तपत्रीय काय किंवा आणि अन्य लेखन काय याच शैलीत करायची संवय मला लागली ! ‘डायरी’ या माझ्या सदर लेखनाचं पुस्तक ‘ग्रंथाली’नं प्रकाशित केलं . त्याच्या ‘बिटविन द लाईन्स’ या माझ्या मनोगतात नानांच्या या सदराचा आणि तसं आपल्याला लिहिता यावं याचा उल्लेख आहे . ते पुस्तक भेट म्हणून नानांना पाठवलं . तो उल्लेख वाचल्यावर त्यांचा फोन आला . त्यांनी कौतुक केलं आणि त्या उल्लेखाबद्दल कांहीसं आश्चर्यही व्यक्त केलं . मग मी ‘सागर’मधे गिरवलेल्या मुळाक्षरं आणि त्यांच्या संस्काराबद्दल विस्तारानं कृतज्ञतापूर्ण स्वरात सांगितलं . विस्तृत हंसत ‘चल , भेट कधी तरी’, म्हणून नानांनी बोलणं संपवलं .
नाना जितके राजकारणी होते त्यापेक्षा जास्त सांस्कृतिक होते . किमान मी तरी त्यांना तसं बघत होतो . संपादक केवळ राजकीय भाष्यकार असून चालणार नाही तर तो सांस्कृतिक असेल तरच त्याची समाजमानवर पकड निर्माण होते हाही माझ्यावरचा संस्कार निशिकांत जोशी नावाच्या संपादकाचाच आहे . त्या काळात चिपळूण आणि नंतर कोंकणातल्या सर्व सांस्कृतिक उपक्रमांवर नानांची छत्रछाया असे ; या छत्रछायेत एक संपादक , कार्यकर्ता , आयोजक आणि रसिक अशा विविध भूमिकांत नाना वावरत असत . त्यामुळेच नाना कोंकणाचे सांस्कृतिक दूत न ठरते तर नवलच होतं .
नाना माझ्यावर नाराज होण्याची वेळ आलीच . मी सागर आणि पर्यायानं चिपळूण सोडायचं ठरवलं . त्याची कारणं चार होती . एक- ‘सागर अँड चिपळूण इज नॉट कप ऑफ माय टी फॉर एव्हर’ हे मला पक्कं ठाऊक होतं . दोन- प्राथमिक शिक्षण संपलेलं असतांना पत्रकारीतेच्या पुढच्या शिक्षणासाठी आसमंतात झेप घ्यायला हवीच होती . तीन- कोल्हापूर आणि नागपूरहुन ऑफर आलेल्या होत्या . त्यातील नागपूरच्या ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाची निवड मी केलेली होती ; नागपूरचं विस्तीर्ण क्षितीज झेपावण्यासाठी मला तेव्हा खुणावत होतं . ( आता जगण्याच्या संध्याकाळी सांगायला हरकत नाही , चौथं कारण फारच व्यक्तीगत होतं आणि त्याबाबत आजवर मी फक्त मंगलाशी-माझ्या पत्नीशी बोललो आहे . ते म्हणजे तेव्हा माझं ब्रेक-अप झालेलं होतं आणि ‘जिस गली में तेरा घर हो बालमा , उस गली में पांव रखना नही’ अशी माझी मानसिकता झालेली होती . ) ‘सागर’ सोडण्याबद्दल मी एकदा नानांशी बोललो पण, त्यांना ती कल्पना काही पसंत पडली नाही . मी सागर सोडू नये असा त्यांचा स्वाभाविक आग्रह होता आणि तो मान्य न करणं हा माझा नाईलाज होता . डिसेंबर महिन्याचा पगार झाल्यावर रात्री कार्यालय सोडतांना माझी भूमिका सांगणारं एक पत्र लिहून नानांच्या टेबलवर ठेवलं आणि नागपूरला जाण्यासाठी पहाटेची पुणे बस पकडली…इकडे तिकडे भटकंती करुन २६ जून १९८१च्या संध्याकाळी मी नागपूरला पोहोचलो ! माझ्या आयुष्यात आणखी एक वेगळं वळण आलेलं होतं .
नंतरही मी नानांना दोन-तीन पत्र पाठवली पण, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही . अशीच काही वर्ष गेली . या काळात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक बड्या असाईनमेंट माझ्या पदरात पडल्या . नागपूरहून मी लोकसत्ता आणि सकाळ या दैनिकांसाठी काम करु लागलो . नांव होत होतं ; समज वाढू लागलेली होती . ‘हुज हू’ कळायला लागलेलं होतं . आपल्याला भेटलेल्या एखाद्या माणसाची ऊंची कळायची असेल तर त्यासाठी आपण डोहखोल होण्याची गरज असते हे उमगलं होतं . राज्याच्या राजकारण , प्रशासन , साहित्य , समाजकारण या क्षेत्रात वावरतांना ‘मराठवाडा’ म्हणजे अनंतराव भालेराव , सोलापूर म्हणजे रंगा वैद्य म्हणजे संचार आणि कोकण म्हणजे नाना जोशी म्हणजे सागर हे प्रमाण समीकरण तेव्हा लक्षात आलं ; हे संपादक काय लिहितात , त्यांचा कल काय आहे हे जाणून घेण्याचा सर्वच क्षेत्रातील शीर्षस्थांचा कल असे . त्यातून या सर्व संपादकांची ऊंची समजली ; त्यांच्या शब्दांचं वजन समजलं . आपण कोणा दिग्गजांच्या हाताखाली पत्रकारितेची मुळाक्षरं गिरवली आहेत हे लक्षात आलं की ऊर भरुन येत असे ; अजूनही येतो . ( अति अवमूल्यन झाल्यानं या संपादकांसाठी पत्रकारीतेची शाळा किंवा विद्यापीठ हे शब्द मुद्दाम टाळले आहेत .) याच दरम्यान नाना विधानसभेवर निवडून आले . नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमची भेट झाली . नाना विधिमंडळाच्या परिसरात भेटले ; सोबत शुभदा वाहिनीही होत्या . मी वाकून नमस्कार केला . ‘मोठा झाला रे तू’, असं म्हणत नानांनी मला वर उचललं आणि त्यांचा रुसवा कायमचा संपला . आमच्यात पुन्हा कायम संपर्क निर्माण झाला . आम्ही अधून-मधून बोलू लागलो . पूलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं होतं ; आता आमच्या बोलण्यात एक मोकळेपणा आलेला होता . ‘लोकसत्ता’ सोडल्यावर ‘सागर’साठी मी लिहूही लागलो .
अनीष पटवर्धन यानं मध्यंतरी दापोलीला माझ्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता . त्याला अध्यक्ष म्हणून नाना येणार होते पण , प्रकृती ठीक नाही म्हणून ते आले नाहीत . ‘काही गंभीर नाही रे ’, असं ते फोनवर बोलतांना म्हणाले ; त्यांच्या आवाजात काही वेगळा कंपही जाणवला नाही . ते गंभीर आजारी आहेत असं कुणीच सांगितलं नाही . त्यांच्या मृत्युची बातमी आल्यावर डोळ्यांच्या कडा ओलावल्या . ‘भेट रे , कधी तरी’ असं हक्कानं सांगणारं वडीलधारं व्यक्तीमत्व मृत्यू नावाच्या प्रदेशात नाहीसं झालं होतं .
पहाटे लवकर जाग आली आणि त्या शांततेत लिहित किंवा वाचत बसलो की कधी कधी नाना जोशी , भालचंद्र दिवाडकर आणि ‘सागर’ची गाज ऐकू येते…चिपळूणचे दिवस आठवतात…अनेक गतकातर आठवणी उजळतात…
( ‘दिवस असे की…’ या देशमुख आणि कंपनीच्यावतीने प्रकाशित होणार्या आगामी पुस्तकातील ‘चिपळूण’ या प्रकरणाचा संपादित मजकूर )
-प्रवीण बर्दापूरकर
( +919822055799 )