दर्डांच्या पराभवाचा (वेगळा) लेखाजोखा!

गेल्या डिसेंबर महिन्यातील घटना- काही कामांसाठी औरंगाबादला आलो होतो. दुपारी सिडको परिसरातील एक रेस्तराँत काही डॉक्टर मित्रांसोबत जेवायला गेलो असताना राजकीय गप्पा सुरु झाल्या. आगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदार संघातून दर्डा यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा होती. तेव्हा मी ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाचा राजकीय संपादक म्हणून दिल्लीत पत्रकारिता करत होतो. अचानक तो संदर्भ पकडून एक मित्र म्हणाला ‘तुझे राजेंद्र दर्डा यावेळी नक्की पडणार बरं का!’. त्या मित्राला हे ठाऊक नव्हते की ‘लोकमत’ची नोकरी सोडण्याचा माझा विचार तोपर्यंत पक्का झालेला होता आणि तसे समूह संपादक दिनकर रायकर यांना मी सांगितलेही होते. त्यामुळे त्या मालकीहक्काचा संदर्भ असलेल्या भाकितामध्ये रस नसला तरी त्या राजकीय चर्चेविषयी मात्र मला उत्सुकता होती. कारण एक तर राजेंद्र दर्डा माझे तीसेक वर्षांचे स्नेही, माझ्या लेखनाची अत्यंत गंभीरपणे दखल घेणारे वाचक शिवाय, त्यांचा आणि आमच्या कन्येचा वाढदिवस एकाच तारखेला आणि त्यांचे आत्मविश्वासी वर्तन मला आवडत असे. नंतर लोकमतच्या एका बैठकीसाठी मी आणि हरीश गुप्ता औरंगाबादला आलो पण, ती बैठक ऐनवेळी रद्द झाली. मग मी आणि हरिश गुप्ता यांच्यासोबत औरंगाबादच्या संपादकीय विभागातील सहकाऱ्यांचा संवाद झाला. संवाद अर्थातच निवडणूक आणि मोदी लाटेबद्दल रंगला. सहकारी खुलेपणाने नाही पण, राजेंद्र दर्डा लोकसभा लढोत की विधानसभा, त्यांना विजय अवघड आहे; असे सूचकपणे सांगत होते. परतीच्या विमान प्रवासात गुप्ता आणि माझ्यात याच मुद्दयावर चर्चा झाली. विजय आणि राजेंद्र दर्डा हे दोघेही बंधू काहीसे अडचणीत आलेले दिसताहेत पण, राजकारणात असे चढ-उतार असतातच असे म्हणून मी विषय संपवला. कोणाला अनाहूत फुकटचे सल्ले देणे किंवा ‘फीडबॅक’ नावाचा मस्का मारण्याचा स्वभाव नसल्याने नंतर पुण्याच्या बैठकीत भेट झाली तरी राजेंद्र दर्डा यांच्याशी मी या विषयावर काहीच बोललो नाही.

दरम्यान मी ‘लोकमत’चा राजीनामा दिला. आम्ही औरंगाबादला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सुमारे बारा वर्षानंतर २७ मे रोजी आम्ही पुन्हा औरंगाबादला डेरेदाखल झालो. दरम्यान लोकसभा निवडणुका संपलेल्या होत्या, काँग्रेसचे पानिपत झालेले होते. विधानसभा निवडणुकीची हवा महाराष्ट्रात तापायला लागलेली होती. याच दरम्यान औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र दर्डा यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय मराठवाडा कृती समितीच्या आंदोलनाच्या काळापासून मित्र असलेल्या डॉ. भालचंद्र कांगो याने घेतलेला होता. त्याला जमेल तशी आणि जमेल तेव्हढी मदत करण्याच्या घेतल्या गेलेल्या निर्णयात अन्य मित्रांसोबत मीही होतो.

गेल्या साडेतीन दशकापेक्षा जास्त काळ पत्रकारितेच्या निमित्ताने राज्य, देश आणि परदेशात भटकून आल्याने औरंगाबादचे रुपडे बकाल असल्याचा अनुभव पदोपदी घेत होतो आणि त्यामुळे विषण्णही होत होतो. यामागे राजकीय नेतृत्वात असलेल्या विकासाच्या खुज्या इच्छाशक्तीचा अभाव हेच कारण आहे हे मला कळत होते. महापालिकेत सेना-भाजपची सत्ता. सेना-भाजप दोष आणि जबाबदारी ढकलणार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी राज्य सरकारवर तर आघाडी सरकार ढकलणार सेना-भाजपवर, असा ढकला-ढकलीचा हा खेळ. एकाच्याही अखत्यारीतील काहीच नीट नाही. खड्ड्यात गेलेले रस्ते, पाण्याची टंचाई, अतिक्रमणे, (रोड डिव्हायडरवर भाजी आणि अन्य पदार्थ खरेदी-विक्री करणारे जगातील हे एकमेव शहर आहे!) वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा असे हे बकालपण गंभीर होते मात्र, त्याबाबत राजकीय नेतृत्वाला काहीच देणे-घेणे नव्हते. राजकीय पातळीवर ‘एमआयएम’ संघटीत होत असल्याचे स्पष्ट दिसत होते आणि हा सरळ काँग्रेसला धोका होता पण, नेते पंचतारांकीत संस्कृतीत आत्ममग्न होते. त्यातच युती तुटली आणि औरंगाबादची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत हे जाणवत गेले. दरम्यान दर्डा यांच्या पूर्व औरंगाबाद मतदार संघात फिरण्याचा निर्णय मी घेतला. या मतदार संघात डॉ. गफ्फार कादरी या ‘एमआयएम’ या अल्पाक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या हैद्राबादच्या ‘मजलिसे इत्तिहादुल मुसलमिन’ पक्षाच्या उमेदवाराचे नाव अनेकाकडून ऐकायला मिळायचे. त्यांच्याबाबत माझी उत्सुकता बरीच चाळवली पण डॉ. कांगो वगळता उमेदवाराला नाही तर फक्त मतदाराना भेटायचे असे ठरवून टाकलेले होते. मला फारसे कोणीच ओळखणारे नव्हते त्यामुळे अनेकदा दोन–तीन तास मतदार संघात भटकत अस, लोकांशी बोलत अस. ‘दर्डा हरू शकतात’ असे अनेक लोक बोलू लागलेले होते. त्यात ऑटोरिक्षा वाल्यापासून ते शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांचा समावेश होता. डॉ. कांगो बहुसंख्य लोकांना माहिती नव्हते, महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडून काही ‘मिळण्या’ची शक्यता नाही असा बहुसंख्य लोकांचा सूर असायचा. दरम्यान दर्डा यांनी केलेल्या कामांच्या उद्घाटनाच्या बातम्या सुरु झाल्या, त्यांच्या पद्यात्रांच्या बातम्या दररोज त्यांच्या वृत्तपत्रात दिसू लागल्या. त्या बातम्या वाचून दुसऱ्या दिवशी तेथे जाऊन मी ती कामे बघत असे आणि लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असे. कामांचा दर्जा वाईट होता आणि काल दर्डा यांच्या कार्यक्रमाला कसेबसे शंभरएक लोक होते पण फोटो तसेच बातमीत एव्हढी गर्दी कशी अशी चर्चा लोकांत असे आणि ‘च्युत्या बनाते हमकू’ अशी तिखट प्रतिक्रिया ऐकू यायची.

राजेंद्र दर्डा यांच्यासाठी (एक) अच्छा आदमी अशी जाहिरातीची मोहीम हाती घेण्यात आली. शहरात सर्वत्र दर्डा कसे विविध क्षेत्रातील ‘अच्छे आदमी’ आहेत हे सांगणारी पोस्टर्स रस्त्यावर झळकू लागली, त्यांच्या वृत्तपत्रात तशा जाहिराती येऊ लागल्या. दर्डा यांच्या मतदार संघातील राज्य सरकारच्या अख्त्यारीतीलही खड्ड्यांत आकंठ बुडलेल्या रस्त्यावरून प्रवास करणारे लोक ती होर्डिंग्स पाहून दर्डा यांना दुषणे (खरे तर शिव्या!) दे. शिवाय भाषाशैली आणि व्याकरण या निकषावर या जाहिरातीची कॉपी सदोष होती आणि त्याचीही अभिजनात चर्चा होती. एक दिवस नागपूरहून मोरेश्वर बडगे याचा फोन आला आणि त्याने ‘बाबुजी के हाल कैसे है?’ असे विचारले तेव्हा ‘ बच्चू, तुम्हारे बाबुजी हार सकते है, ऐसी चर्चा जोर पकड रही है!’ असे सांगितले. त्यावर त्याने ‘आपने विजय बाबुजीसे बात की क्या?’ असा प्रश्न विचारला तेव्हा मी विचारले, ‘बडगे आपण तीस-बत्तीस वर्ष सोबत आहोत असे उद्योग मी कधी केल्याचे तुला आठवते का?’. मग इकडच्या तिकडच्या गप्पा करत त्याने फोन बंद केला.

याच दरम्यान मी, एमजीएमच्या विद्यार्थ्यांसाठी एका दिवशी दोन अशी आठवड्यातून चार लेक्चर्स घ्यायला सुरुवात केली. तिथे मुलांशी राजकारणावर बोलणे होई तेव्हा, काम न करणारे आणि शहर बकाल करणारे लोकप्रतिनिधी नकोत अशी स्पष्ट भूमिका घेताना ते दिसत. राजेंद्र दर्डा यांच्या जाहिरातीचा दुसरा टप्पा नागरिकांच्या स्वप्नातले औरंगाबाद कसे असावे आणि त्यासाठीचा जाहीरनामा तयार करण्याचा होता. खरे तर कल्पना छान होती पण, त्यावर सॉलिड विपरीत प्रतिक्रिया दर्डा निवडणूक लढवत असलेल्या मतदार संघात उमटली… मग गेली पंधरा वर्ष सत्तेत राहून तुम्ही काय केले, अशी प्रतिक्रिया त्यावर हे विद्यार्थीच ते पान-बिडी विकणाराही व्यक्त करू लागले . खरे तर, राजेंद्र दर्डा यांच्याकडे मोठी यंत्रणा आहे आणि महत्वाचे म्हणजे एका माध्यम साम्राज्याचे ते ‘राजे’ आहेत, तरीही त्यांना हा फीडबॅक कोणी कसा काय देत नाही की; सर्वच ‘रुल नंबर वन – बॉस इज ऑल्वेज राईट. रुल नंबर टू-इफ बॉस इज राँग, रेफर रुल नंबर वन’ अशा तऱ्हेने वागत आहेत का, असा प्रश्न मला पडला.

परिस्थिती अशी विपरित असली तरी मतदार संघात फिरताना लढत भारतीय जनता पक्षाचे अतुल सावे आणि नंबर दोनवर अनेक ठिकाणी राजेंद्र दर्डा तर अनेक ठिकाणी डॉ. गफ्फार कादरी दिसत असत. पण, शेवटच्या टप्प्यात दर्डा कुटुंबियांच्या मालकीच्या ‘लोकमत’ दैनिकात ‘पूर्व औरंगाबाद मतदारसंघात लढत राजेंद्र दर्डा आणि कला ओझा यांच्यात’ अशी मोहीम सुरु झाली. कला ओझा या शिवसेनेच्या उमेदवार आणि त्या खरे तर लढतीतही नव्हत्या, मुळात त्यांना निवडणूकच लढवायची नव्हती अशी चर्चा होती पण, ते असो. राजेंद्र दर्डा यांची बाजू कमकुवत असल्यानेच अतुल सावे यांचा विजयाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी डॉ. कादरी स्पर्धेत नसल्याची मोहीम काँग्रेसच चालवत आहे असा संदेश या मोहिमेतून गेला. परिणामी मुस्लिम आणि दलित मतदार ‘एमआयएम’च्या डॉ. गफ्फार कादरी यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात संघटीत होण्यास प्रारंभ झाला. या मतांचे इतके ध्रुवीकरण झाले की काँग्रेसची पारंपारिकही मते फिरली आणि डॉ. गफ्फार दुसऱ्या क्रमांकांचे उमेदवार ठरले… त्यांचा विजय थोडक्यात हुकला. एवढ्या वर्षांच्या पत्रकारितेत इतक्या निवडणुकांचे वृत्तसंकलन केल्यावर, ‘एकगठ्ठा मते’ मिळवताना इतकी व्यापक दिवाळखोर आणि आत्मघातकी मोहीम एखाद्या उमेदवाराकडूनच राबवली जाते हे प्रथमच अनुभवले आणि स्तंभित झालो. याचा परिणाम निकालात दिसला… राजेंद्र दर्डा चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आणि हे कमी की काय म्हणून त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली!!

हा काही माझा शास्त्रशुद्ध अभ्यास नव्हता आणि तो तसा करण्यासाठी वेळही मिळाला नव्हता पण, अगदी ग्राउंड-लेव्हलवर जाऊन काही बाबी जवळून बघता आल्या, निरीक्षणे करता आली. निवडणुकीच्या काळात धार्मिक आणि जातीय समीकरणे कशी बदलत गेली हे पाहता आले आणि त्याआधारे मांडलेला हा जरा वेगळा लेखाजोखा आहे. नेमक्या ज्या ‘एमआयएम’ चा इतका धसका राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि जातीय पातळीवर घेतला गेला आहे, त्या ‘एमआयएम’ला संघटीत होण्यासाठी उत्तेजन आणि बळ कसे मिळाले हे जे ‘याची देही, याची डोळा’ अनुभवता आले, हा या निरीक्षणासाठी घालवलेल्या वेळेवर मिळालेला बोनस आहे. तोच बोनस आता वाचकांशी शेअर करत आहे!
=प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट