विखारी हत्त्यांचे असहिष्णु सोहोळे…

बंगळुरूच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची झालेली हत्त्या जेवढी मानवतेला काळीमा फासणारी आहे त्यापेक्षा जास्त काळीमा फासणारं वर्तन त्या हत्येनंतर बहुसंख्य भारतीय समाजाकडून घडलेलं आहे . गौरी यांच्या रक्ताचे डाग सुकण्याआधीच ज्या टोकाच्या विखारी आणि धर्मांध प्रतिक्रिया दोन्ही बाजुंनी उमटल्या आहेत ; त्यातून या समाजात सामुदायिक शहाणपण, सहिष्णुता आणि विवेक शिल्लक उरलेला आहे किंवा नाही , असा प्रश्न कुणाही संवेदनशील माणसाला पडावा अशी ही स्थिती आहे.

या हत्त्येच्या निमित्ताने माध्यमं, समाज माध्यमं आणि त्यावर व्यक्त होणारे बहुसंख्य कथित बुध्दीवंत  तसंच राजकीय नेत्यांचं वर्तन हे एकारल्या आणि विखारी कर्कश्शपणाचं उदाहरण आहे . ज्यांना (स्वघोषित) उजवे म्हणून संबोधले जातं त्यांच्यातील अनेकांनी गौरी यांच्या हत्त्येचं प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे समर्थन केलं; गौरी यांची जात काढली , त्यांचा विवाह कोणत्या धर्माच्या पुरुषाशी झालेला होता आणि तो त्यांनी कसा लपवून ठेवला याचा गौप्यस्फोट करण्यात आला , गौरी यांचा उल्लेख ‘कुत्री’ आणि आणखी बऱ्याच अश्लाघ्य अशा शब्दात करण्यात आला . ही हत्त्या आणि नंतर हे जे काही घडत होतं किंवा घडवून आणलं होतं , त्यातून एकदा सुसंस्कृत समाजावर पडलेला डाग म्हणून ज्याची लाज वाटायला हवी अशा हत्त्येचा तो मांडलेला किळसवाणा उत्सव भासत होता . अशा नृशंस हत्येचं समर्थन करणारा आणि कोणतीही चौकशी होण्याआधीच बेजबाबदारपणाची सीमा गाठत त्या हत्त्येची जबाबदारी परस्पर कुणावर तरी ढकलून देणारा हा बहुसंख्य समाज सामुदायिक शहाणपणा, सहिष्णुता आणि विवेक याबाबतीत अश्मयुगापेक्षाही जास्त अप्रगत , असंस्कृत आणि महत्वाचं म्हणजे अमानवी असल्याचं मन विदीर्ण करणारं चित्र समोर आलेलं आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या विरोधात उभे टाकलेले बहुसंख्य (स्वघोषित) पुरोगामी आणि डावे , किमान सुसंस्कृतपणानं व्यक्त झालेले नाहीत हेही स्पष्टपणे सांगायला हवं. हत्त्येचा गुन्हा नोंदवला जाण्याआधीच ही हत्या करणारे कोण आहेत हे त्यांनी जाहीर करुन टाकलं ! याचा अर्थ गौरी लंकेश यांची हत्या करणारे कोण आहेत, हे या बहुसंख्यांना माहिती होतं. मग प्रश्न उरतो की , तर मग या लोकांनी लोकांनी गौरी यांना संरक्षण पुरवण्याची संवेदनशीलता का दाखवली नाही ? या डाव्या आणि पुरोगामी असलेल्या बहुसंख्य बुध्दीवाद्यांना कोणाची तरी हत्त्या झाल्यावरच जाग का येते . अशी हत्या झाल्यावर लगेच ते न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरुन आरोपी जाहीर करण्याचा आक्रोश मांडतात . पण , ज्यांना त्यांनी आरोपी ठरवलेलं आहे त्यांच्याविरुध्द कोणतेही पुरावे आजवर असे आरोप करणारांनी दिलेले नाहीत . संकेत आणि तर्क म्हणजे एखाद्याला गुन्हेगार म्हणून सिध्द करण्याचे पुरावे नव्हेत, हे नीट उमजून घेण्याइतकंही भान त्यांना आलेलं नाहीये असाच याचा अर्थ आहे . नरेंद्र दाभोलकर , कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या नंतर नेमकं असंच घडलेलं आहे, हे विसरता येणार नाही .

समाजात झालेल्या अशा सर्वच हत्यांच्या बाबतीत ‘सिलेक्टिव्ह’ राहण्याचा संधीसाधूपणा आपण दाखवतो आहोत हेही लक्षात घेतलं पाहिजे . एखाद्या कथित पुरोगामी किंवा डाव्याची कथित हिंस्र उजव्यानी केलेली हत्याच केवळ मानवतेला काळीमा फासणारी असते आणि आयुष्यभर सेवाभावाने काम करणाऱ्या कथित उजव्या आणि प्रतिगामी स्वयंसेवकाची डाव्यांकडून झालेल्या हत्या मात्र मानवतेला काळीमा फासणाऱ्या नसतात किंवा त्या हत्या झाल्याने कुणाला दु:ख होत नाही ; ही भूमिका संधीसाधुपणाची , दुटप्पीपणाची आहे . एकीकडे ‘ऑल आर इक्वल’ असा घोष करणाऱ्यांनीच ‘…बट ओन्ली वुई आर सेल्फ डिसायडेडली मोअर इक्वल’ असं वागणं कोणत्याही मानवतेत बसणारं नाहीच .

अशा काही घटना घडल्या की , एक मेणबत्ती पेटवून आणि/किंवा समाज माध्यमांवर एखादी (आक्रस्ताळी) प्रतिक्रिया टाकून मोकळं होण्याची वृत्ती बोकाळली आहे ; सारासार विवेकाने मुळातून त्याकडे बघण्याची दृष्टी आपण अशा वेळी हरवून बसतो , हे चित्र जास्त चिंताजनक आहे. आज महाराष्ट्र आणि केंद्रात भाजप म्हणजे हिंदुत्ववाद्याचं सरकार आहे पण , नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचं सरकार होतं ; तर केंद्रातही कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील मनमोहनसिंग पंतप्रधान असलेलं आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते . पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री तर आर. आर. पाटील गृहमंत्री होते . हत्त्या होताच जी काही प्रारंभिक माहिती मिळाली असणार त्याआधारे पृथ्वीराज चव्हाण यांनी हत्या करणारे कोण असावेत यासंबधी काही स्फोटक संकेत स्पष्टपणे दिलेले होते होते . त्या दिशेने तपास का झाला नाही , तसा तपास करून ‘त्यांच्या’ मुसक्या आवळण्याची कामगिरी का बजावली गेली नाही , ‘त्यांच्या’ तशा मुसक्या आवळण्यात कुणी आडकाठी आणली , का ते दिले गेलेले संकेत तपासांती साफ चुकीचे ठरले ; या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कधीतरी राज्यकर्त्यांकडून मिळायला हवीत.

कलबुर्गी यांची हत्त्या झाली तेव्हा सिध्दरामय मुख्यमंत्री होते आणि आताही तेच मुख्यमंत्री आहेत . गौरी लंकेश यांचे मारेकरी कोण आहेत ते जाहीर करणाऱ्या राहुल गांधी यांच्याच कॉंग्रेसचे सिध्दरामय आहेत ; भाजपचे नाहीत . कलबुर्गी यांच्या हत्येचे मारेकरी अजूनही सापडलेले नाहीत. अगदी दर दिवसाला तपासाचा काटेकोरपणे आढावा घेत ते मारेकरी शोधून काढण्याची तसदी सिध्दरामय यांनी का घेतली नाही , हे कोडं कुणाच डाव्या आणि पुरोगाम्यांना पडत नाही . सिध्दरामय यांच्याही काही व्यवहारांची चौकशी गौरी लंकेश करत असल्याच्या वृत्तांकडे कानाडोळा करत सिध्दरामय यांनी गौरी लंकेश यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला , याचं अप्रस्तुत कौतुक केलं जातंय . डाव्यांचं सरकार राज्यात असतांनाच केरळात रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्या झालेल्या आहेत . याचा अर्थ कट्टरपंथीयांकडून कोणाचीही हत्या होते तेव्हा सरकार कोणत्या पक्षाचं याच्याशी काहीही संबध नसतो . मात्र अशा हत्त्या झाल्या की माणुसकीचा गळा घोटला गेल्याच्या आरोपांची राळ उडवण्याएकजातहे सर्व राजकीय पक्ष स्वत:ला ‘धन्य’ मानण्याचा ढोंगीपणा करण्यात आघाडीवर असतात . अशा हत्त्यांची पुनरावृत्ती घडली की समाजातीलही अनेकांना खडबडून तात्पुरती जाग येते ; मेणबत्त्या पेटवल्या जातात , परस्परांवर एकतर्फी दोषारोपण केलं जातं आणि खरं-खोटं यातील सीमारेषा पुसट करण्याची अहमिका दोन्ही बाजूंनी सुरु होते !

आपल्या देशात बाबा-महाराज यांची चलती असून त्यांच्यामार्फत हिंदुत्वाचं संघटन केलं जातंय आणि या बाबा-महाराजांना सरकारचं संरक्षण आहे, असा एक लोकप्रिय आरोप २०१४ नंतर कायमच बहरून आलेला आहे . सकृतदर्शनी त्यात तथ्य दिसतंही . पण , ही वस्तुस्थिती नाही हे आपण कधी तरी लक्षात घेणार आहे की नाही ? हे बाबा, महाराज, त्यांचे मठ, पंथ काही २०१४ नंतर निर्माण झालेले नाहीत. हे सर्व ‘थोर’ महापुरुष आणि त्यांचे अड्डे २५-३० किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष जुने आहेत ; ते सुरु झाले तेव्हा देश व बहुसंख्य राज्यांत कॉंग्रेसची सरकारे होती . हे महापुरुष आणि त्यांचे अड्डे हे जर समाजाला लागलेली विषवल्ली आहे तर ती उखडून फेकण्याचा कणखरपणा तेव्हाच्या सरकारांनी दाखवला  नाही ; उलट बाबा आणि महाराजांच्या कच्छपी लागण्याची स्पर्धाच कॉंग्रेस नेत्यांत होती ; धीरेंद्र ब्रम्हचारी, चंद्रास्वामी, भोंडशीबाबा ते अलिकडचे युवा राष्ट्रसंत, राष्ट्रसंत यांचं पीक काढणारांत कॉंग्रेस नेत्यांचाच कायम पुढाकार राहिलेला आहे . या बाबा-महाराजांची बीजं कॉंग्रेस नेत्यांनीच रोवली आणि त्यांच्या सरकारांचंच कृपाछत्र या बाबा-महाराजांवर होतं कारण त्यांच्या मठ आणि डेऱ्यानी दिलेल्या ‘मताशीर्वादावर’ कॉंग्रेस पक्षांच्या उमेदवारांचा निवडणुकांत विजय होत होता ; हे मुलभूत वास्तव शहाणपण गहाण न टाकता समाजानं नीट समजून घेतलं पाहिजे . आता हे बहुसंख्य बाबा, महाराज आणि त्यांचे अड्डे-त्यांचे मठ भाजपच्या आश्रयाला गेलेले आहेत , ही अन्य राजकीय पक्षांची खरी पोटदुखी आहे हे ओळखता न येण्याईतपत विवेकी माणूस भाबडा नाही पाहिजे !

जे झालं, ते पुरे झालं . कोणाच्याही होवोत , या अशा हत्त्या कलंक आहेत . त्याकडे एकांगी विखारी राजकीय विचारातून , हिंस्र जात्यंध व धर्मांध नजरेतून न बघता हे करणारी विषवल्ली मुळापासून उखडून टाकणारा विवेक समाजात निर्माण व्हायला हवा आहे . तरच अशा मानवतेला काळीमा फासणाऱ्या हिंस्रतेवर नियंत्रण मिळवता येईल ; अन्यथा विखारी हत्यांचे असहिष्णु सोहोळे असेच होत राहतील.

(संदर्भ- विधिज्ञ स्नेही- उदय बोपशेट्टी / असीम सरोदे. छायाचित्रे- गुगल)


-प्रवीण बर्दापूरकर
संपर्क +९१९८२२०५५७९९ | praveen.bardapurkar@gmail.com
============================
​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी

लिंक – http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515
============================

संबंधित पोस्ट