नांदेडच्या निकालाचा व्यापक अर्थ

नांदेड महापलिकेच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाला धूळ चारली आणि कॉंग्रेसला संजीवनी दिली; एवढ्यापुरता हा मुद्दा नाही तर त्यापलिकडे या निवडणुकीच्या निकालाचं महत्व आहे. भाजपची जबरदस्त हवा असल्याची जी काही चर्चा मिडियात होती ती वाचनात असतानाच निवडणूक सुरु झाल्यावर नांदेडात दोन दिवस होतो; त्याचवेळी मिडियाच्या त्या चर्चेत तथ्य नसल्याचं जाणवलेलं होतं. त्यामुळे अशोक चव्हाण आणि पर्यायानं कॉंग्रेसच्या विजयानं अजिब्बात आश्चर्य वाटलेलं नाही. नांदेड जिल्हा आणि या शहराचं चव्हाण कुटुंबीयावर प्रेम आहे. अगदी पोरसवदा असलेल्या अशोक चव्हाण यांना लोकसभेवर पाठवण्याइतकं ते प्रेम आंधळंही आहे; शिवाय या शहराचा जो कायापालट अलिकडच्या काळात झालेला दिसतो आहे त्यात अशोक चव्हाण यांचा वाटा मोठा आहे; वायफळ न बोलता, शांतपणे एकेक कार्यकर्ता जोडत जाण्याची, काम करण्याची अशोकरावांच्या कामाची शैली आहे. म्हणूनच २०१४च्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या नरेंद्र मोदी लाटेतही कॉंग्रेसच्या ज्या दोन जागा महाराष्ट्रात तरल्या त्यात एक अशोक चव्हाण यांची होती आणि दुसरी जागा काढण्यात अशोक चव्हाण यांचा वाटा होताच. ही निवडणूक सुरु असतांना स्वत:चा बालेकिल्ला म्हणवून घेणाऱ्या कोकणात, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सलग पराभव पदरी पडलेल्या नारायण राणे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर यथेच्छ ‘गाली प्रदाना’चा कार्यक्रम केलेला होता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडला येवून जी पातळी सोडून टीका अशोकरावांवर केलेली होती ती नांदेडकरांना मुळीच रुचलेली नव्हती; त्या ‘गाली प्रदान’ संस्कृतीला हा विजय म्हणजे नांदेडकरांनी दिलेलं उत्तर आहे, हाही अशोक चव्हाण यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाचा एक अर्थ आहे.

तरीही नांदेड महापालिकेच्या निकालाने भाजपचा परतीचा प्रवास सुरु झालेला आहे किंवा आगामी निवडणुकीतील भाजपच्या पराभवाचे हे शुभ संकेत आहेत असा राजकीय आत्मविश्वास व्यक्त करणं भोंगळपणाचं ठरेल. कारण गेली चाळीस वर्ष कणाकणानं आणि अलिकडच्या सात-आठ वर्षात वेगानं हात-पाय पसरलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाची घसरण होते आहे, याचं ठोस प्रमाण म्हणजे नांदेडचा निकाल नाही; भाजपच्या मतांत घसघशीत वाढ झालेली आहे, शिवसेनेची मते भाजपकडे वळली आहेत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कॉंग्रेस पक्षाच्या आजवरच्या राजवटीतही असे काही अपेक्षित तर काही अनपेक्षित निकाल लागलेले आहेत आणि त्यामुळे लगेच झालेल्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकात कॉंग्रेसला दारुण पराभवाची चव चाखावी लागलेली आहे असं घडलेलं नाहीये. तरीही हा निकाल एक इशारा आहे हे ओळखण्या इतके देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते भानावर असतील असं समजू यात. कारण देवेंद्र फडणवीस आणि भाजपने अलिकडच्या काळात आयारामांचे जे विधिनिषेधशून्य प्रयोग केलेले आहेत त्याला नांदेडचा निकाल ही थप्पड आहे. त्यातही नांदेडला तर भाजपकडून वस्तुस्थितीचं भान विसरलं गेलेलं होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. अलिकडच्या कोणत्याही निवडणुकीत हे गाव भाजपच्या बाजूने झुकलेलं नव्हतं; जनमताच्या या कौलाची जाणीव न ठेवता निवडणुकीतला विजय आणि अशोक चव्हाण यांना ‘चिरडून’ टाकण्याची मनीषा भाजपकडून बाळगली गेली होती. आयात केलेला एकही नेता, कार्यकर्ता स्वबळावर विजयी होण्याच्या क्षमतेचा नव्हता म्हणजेच, बुणग्यांच्या बळावर युध्द जिंकता येत नाही याची जाणीव भाजपच्या राज्य नेतृत्वाला नव्हती. शिवाय याआधी राज्याच्या अन्य भागात भरवशाची असलेली स्वत:ची संघटनात्मक शक्ती अधिक आयात केलेल्यांची ताकद अशी भाजपच्या विजयाची पायाभरणी अन्यत्र झालेली होती. नांदेडला मात्र भाजपच्या तिजोरीत याबाबतीत ठणठणाट होता. त्यामुळे या निवडणुकीत विजयाचे मनसुबे भाजप पाहत होता आणि प्रत्यक्षात ते ‘मुंगेरीलाल के हसींन सपने’ ठरणं स्वाभाविकच होतं! साम-दाम-दंड-भेदाचा उपयोग येन केन प्रकारे करुन निवडणुका जिंकण्याच्या ‘या’ धोरणाबद्दल भाजपला फेरविचार करावा लागणार आहे, हा या निवडणुकीचा एक अर्थ आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं केलेल्या घोषणांची अंमलबजावणी लवकर होतच नाही; सरकारच्या निर्णयांचे फायदे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्यास अति हा शब्द थिटा पडावा असा विलंब होतोय. नांदेड जरी शहरी मतदार संघ असला तरी येथील बहुसंख्य लोकांची नाळ ग्रामीण भागाशी जुळलेली आहे. कर्जमाफी ते आधी शेतकऱ्यांची प्रत्येक आघाडीवर जी काही परवड झाली आणि ज्या ज्या शहराच्या निवडणुकीत त्या शहरासाठी ‘दत्तक योजना’ देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्या त्या दत्तक योजना म्हणजे बुडबुडे ठरल्या, त्याचे पडसाद आज न उद्या उमटणार होतेच; हे सरकार नुसत्या घोषणा करतं, ही वस्तुस्थिती लोकांसमोर मांडण्यात अशोक चव्हाण यांचा शांत प्रचार यशस्वी ठरला. एमआयएमला आपण पाठिंबा दिला की, हिंदू मते संघटीत होतात आणि त्याचा भाजपला फायदा व फटका कॉंग्रेसला बसतो हे एव्हाना हळूहळू का होईना मुस्लीम मतदारांच्या लक्षात येऊ लागलं आहे, असा निष्कर्ष ढोबळमानाने काढता येण्यासारखी परिस्थिती नांदेडला निर्माण झालीये, ही देखील या निकालाची एक बाजू आहे. धार्मिक आणि जातीय वातावरण भाजपच्या राजवटीत जे काही प्रदूषित झालेलं आहे आणि अल्पसंख्याकामध्ये जी अस्वस्थता निर्माण झालेली आहे त्याचा फटका या निवडणुकीत भाजपला बसला हाही असाच आणखी एक अर्थ आहे. कारण नांदेड हे काही कोणत्या एका जाती धर्माचे प्राबल्य असणारे शहर नाही त्यामुळे एका धर्माचे मतदार एकगठ्ठा वळले आणि भाजपचा पराभव झाला किंवा कॉंग्रेसचा विजय झाला असं म्हणता येणार नाही. केवळ मुंबईचाच विचार करायचा असेल तर शिवसनेने ग्रामीण महाराष्ट्रात निवडणुका लढवू नयेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे एखाद-दुसऱ्या सभेने वातावरण बदलवण्याचा करिष्मा आपल्याकडे नाहीये, हे उध्दव ठाकरे यांनी समजून घेण्याची नितांत गरज आहे, हाही या निकालाचा एक अर्थ आहे.

नांदेडला फिरतांना जाणवलेली आणखी एक बाब तशी शुल्लक होती (पण ती शांतपणे काम करत होती) आणि ती म्हणजे लोकांचा विरोधी आवाज दडपण्याचे जे काही प्रयत्न अलिकडच्या काळात फडणवीस सरकारच्या अधिपत्त्याखालील प्रशासनाने केले त्याचा परिणाम. सरकार आणि भाजपच्या विरोधात असे जे काही अनेक मुद्दे एकत्रित आले, त्याचा परिणाम कॉंग्रेसच्या विजयात झालेला आहे. भले क्वचित पातळी सोडून किंवा सभ्यपणाच्या मर्यादा ओलांडणारी टीका समाज माध्यमे आणि मिडियातून भाजप आणि सरकारवर झाली असेलही; अर्थात हाच प्रयोग भाजपने लोकसभा निवडणुकीत आधी केलेला होता! कॉंग्रेसच्या आजवरच्या सरकारांवर यापेक्षा खालच्या पातळीवरची टीका काही कमी प्रमाणात झालेली होती असं मुळीच नव्हे. काही प्रसंगी अतिनिष्ठा दाखवत म्हणजे ‘बाटगे जास्त कडवे असतात’ या चालीवर सरकार किंवा सत्ताधारी पक्षावर कडवी टीका करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे प्रयत्न प्रशासनाने केलेले नव्हते असं काही नाहीच. काही प्रसंगी तर प्रशासनाकडून तर स्वप्रतिष्ठा म्हणून कॉंग्रेस सरकारला धाब्यावर बसवून पत्रकार किंवा टीकाकारांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न झालेले आहेत. मात्र अशा वेळी कॉंग्रेसचे सत्ताधारी ‘जरा दम द्या आणि ताणू नका’ अशी भूमिका कशी घेत असत याची असंख्य उदाहरणे अनेकांना माहिती आहेत.

या संदर्भातला एक स्वानुभव सांगतो- तेव्हा लोकसत्ताच्या विदर्भ आवृत्तीचा मी निवासी संपादक होतो. आमच्या वार्ताहराने ‘यादव’ आडनाव असलेल्या दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या हेव्यादाव्याची बातमी ‘नागपूर पोलीस दलातील ‘यादवी’ ” अशा शीर्षकाखाली प्रकाशित केली. ही बातमी म्हणजे जणू पोलीस दलात यादवी माजवण्यास प्रोत्साहन देणारी आहे पूर्ण चुकीचा अर्थ काढून पोलिसी दंडुका उगारण्यात आला; आमच्याविरुध्द राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा ही अतिशय गंभीर बाब असते आणि सरकारला विश्वासात घेऊन किंवा सरकारच्या संमतीनेच ही कृती व्हायला हवी होती. प्रत्यक्षात मात्र ती एका यादवाची दंडेली होती आणि त्याबद्दल तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तसंच गृहमंत्री आर. आर. पाटील यांना अंधारात ठेवण्यात आलेलं होतं, असं ही कारवाई झाल्यावर लक्षात आलं. ‘तो अधिकारी अति मुजोर आहे. सरकारचं म्हणणं जुमानत नाही’ अशी खंत दस्तुरखुद्द विलासराव आणि आर आर यांनी व्यक्त केली. या दोघांनीही सांगूनही तो आमच्याविरुध्दचा राजद्रोहाचा गुन्हा त्या यादवाने रद्द केला नाही पण, त्यावर पुढील कारवाई न करण्याबाबत आणि केल्यास काय गंभीर परिणाम होतील याची तंबी देण्यास विलासराव आणि आरआर विसरले नाहीत. पुढे अरविंद इनामदार यांच्या मध्यस्थीने ते प्रकरण सी समरी करण्यात आले, पण ते असो!

सरकारविरोधी मतप्रदर्शन केल्याबद्दल अशात काही युवकांवर( यातील मानस पगार, हर्षल लोहकरे हे युवक माझ्या संपर्कात आहेत) पोलिसांनी कारवाईचा बडगा अकारण उगारला; समाजमाध्यमांवर त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यात मुख्यमंत्री कार्यालयाचा हात होता अशी चर्चा रंगली. त्याच इन्कार झाला नाही. ही चर्चा काही देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर गेली नाही असे नव्हे पण, त्यांनी राज्यकर्त्याला शोभेसा मोठेपणा दाखवत हे प्रकरण निवळून टाकण्याची भूमिका घ्यायला हवी होती ती घेतली नाही. ‘अफवां पसरवण्याची अफाट क्षमता रा. स्व. संघासारखी अन्य कुणातही नाही’ असं शरद पवार यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं त्या रा. स्व. संघाशी निकटचं नातं असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईमागे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा हात ही अफवा असल्याचं कधी सांगितलं नाही की पोलिसांना आवर घालण्याचा समंजसपणा दाखवला नाही; त्याआधी भाजपचे प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर ठिय्या देणाऱ्या युवकांना ‘उचलण्यात’ अशीच दंडेलशाही झालेली होती. या घटनांची चर्चा नांदेडला विशेषत: मराठा आणि बहुजन युवकात होती, हे महत्वाचं आहे आणि हा युवक मतदार कॉंग्रेसकडे वळला असावा असं म्हणायला वाव आहे; हेही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचा चेहेरा म्हणून नीट समजून घ्यायला हवं.

कॉंग्रेसची पाळंमुळं अजूनही महाराष्ट्रात रुजलेली आहेत आणि भाजपच्या निवडणूक जिंकण्याच्या ‘प्रयोगां’ना आवर घालता येतो हे नांदेडच्या निकालानं दाखवून दिलेलं आहे. पण, त्यामुळे हुरळून जाण्याचं कारण नाही; ही केवळ सुरुवात आहे. कॉंग्रेसमध्ये चांदा ते बांदा असं गावोवाव फोफावलेलं मतभेदांची विषवल्ली कापून टाकत, मरगळ झटकून, शांतपणे एकेक वीट रचत काम करण्याची आणि भाजपच्या विरोधात जनमत संघटीत गरज आहे.

-आणि हो, नारायण राणे यांना अशोक चव्हाण यांची ताकद आणि महाराष्ट्र समजलेला नाही हेही या निकालानं समोर आणलं आहे; आता तरी इतरांना तुच्छ लेखण्याची सवय नारायण राणे सोडतील अशी अपेक्षा बाळगणं व्यर्थ आहे.

(छायाचित्रे सौजन्य- गुगल)


-प्रवीण बर्दापूरकर
संपर्क +९१९८२२०५५७९९ | [email protected]
============================
​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी

लिंक – http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515
============================

संबंधित पोस्ट

 • Naresh Acharya ….
  LoL

 • Dheeraj Veer ….
  वास्तव चित्रण..

 • Sharad Deshpande ….
  शंकररावांचा उल्लेख आवडला. माझे गुरु सुरेंद्र बारलिंगे यांचे ते घनिष्ठ मित्र होते.बारलिंगे सत्कार समिती मध्ये शंकरराव चव्हाण आणि पी. व्ही. नरसिंह राव हे दोघेही होते.मी समितीचा सचिव होतो. त्यामुळे ह्या दोघांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. ज्या दिवशी व ज्या वेळी संजय गांधी यांच्या विमानाला अपघात झाला त्यावेळी मी शंकररावांच्या दिल्लीतल्या घरी होतो. ती आठवण अजूनही ताजी आहे.

 • Milind Wadmare ….
  एकुणच अन्वयार्थ अतिशय योग्य आणि समयोचित आहे. सध्याच्या वृत्तांत देण्याची जी पध्दत पत्रकारितेत अनुसरली जाते आहे त्या पार्श्वभूमीवर हा वस्तूपाठ ठरावा

 • Chandrashekhar Kulkarni ….
  Why cultured people like Devendra use foul language .It’s not necessary rather it is counterproductive

 • Nishikant Anant Bhalerao ….
  मुस्लिम आणि दलित हा नांदेड मधील 18 टक्के त्यांनी यावेळी चांगला manage केला बाकी अशोक चव्हाण यांचा आदर्श नाही विसरता येत त्यात पोकळ पणा आहेच निकालांनी या नेतृत्वाला फार मोठे बनवले त्यात उपकृत माध्यम वर्तन जास्त वाटते

 • Prasad Jog ….
  अशोकरावांनी एमआय एम चे बरेच नगरसेवक आपल्याकडे घेऊन निवडून आणले असेही वाचले. त्याबद्दल काय सांगाल?

  • Sudarshan Awatade ….
   Prsadji changle diesel aase vath nahi mim 12 gelay veli hothi 72-12baki kiti

 • Sainath Rajadhyaksha ….
  भाजपला जनमताचा अंदाज येइल अशी आशा बाळगुया.

 • Madhav Bhokarikar ….
  सुंदर !

  ग्रामपंचायत, नगरपालिका वा महानगरपालिका येथील प्रश्न हे नेहमीच स्थानिक असतात, त्यांत पक्षीय बलाबलाचा फार उपयोग होत नाही.

  शिवीगाळ सर्वसाधारणपणे सर्वसामान्य जनतेला मनातून आवडत नाही, ऐकल्यावर क्षणभर हसू येत असेल किंवा बरं वाटत असेल पण त्यामुळे विपरीत परिणाम होतो. पक्ष कोणाचाही असो व कोणताही असो.

  निवडून आलेले उमेदवार जर पाहिले तर देशविघातक विचारांच्या माणसांना उमेदवारी देणे हे कॉंग्रेसला घातक आहे. याच कारणांमुळे भारतातून कॉंग्रेस व त्या विचाराचे पक्ष संपत आहेत.

  सरते शेवटी नांदेड म्हणजे संपूर्ण भारत अजिबात नाही.

  • Purushottam Kulkarni ….
   काँग्रेस हिरव्या सापांना पुन्हा जवळ करण्याचा प्रयत्न करीत आहे कारण MIM ने मागच्या वेळी चव्हाण यांची झोप उडवली होती.

   • Machu Sonwane ….
    ते काश्मीर मध्ये काय केले हो भाजपाने?

    • Madhav Bhokarikar Machu Sonwane ….
     मी शिवसेनेचे मोकळेपणाने कौतुक केले आहे. तुम्ही लिहीलेला शब्द तरी माझ्या लिखाणात आहे का ?

     • Machu Sonwane ….
      Madhav Bhokarikar सर, वरील रिप्लाय, आपल्या पोस्ट ला उद्देशाने नाही. तर श्री कुलकर्णी साहेब, यांच्या कमेंटला उद्देशून आहे.

     • Machu Sonwane ….
      श्री कुलकर्णी साहेब, भाजपाला लोकं, फक्त शिव्या-शापचं देताय.

     • Madhav Bhokarikar ….
      तुम्ही देवू नका, लोकांकडे आपण लक्ष देवू नये.

     • Prakash Paranjape ….
      हिरवे साप आणि भगवे साप , काही फरक

     • Machu Sonwane ….
      श्री बर्दापूरकर सरांच्या लेखाचा मी पण चाहता आहे.

     • Milind Wadmare ….
      एका पत्रकाराचे विश्लेषण आहे

     • विजय तरवडे ….
      सगळे स्थानिक असेल तर मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी यांनी एवढा आटापिटा का केला?

     • विजय तरवडे ….
      निवडून आलेले उमेदवार जर पाहिले तर देशविघातक विचारांच्या माणसांना उमेदवारी देणे हे कॉंग्रेसला घातक आहे. याच कारणांमुळे भारतातून कॉंग्रेस व त्या विचाराचे पक्ष संपत आहेत.> देशविघातक म्हणजे काय? तुमची व्याख्या सांगाल का?

     • Madhav Bhokarikar ….
      शब्द पुरेसा बोलका आहे.

 • Chandravadan Kudalkar ….
  Mhanje AADARSHALA samarthan ahe…lokani nivadun dile ki sagale gunhe maf hach nikash ata lavava lagel….

 • Shekhar Brahme ·,….
  Bjp hoshme ya

 • विजय तरवडे ….
  विश्लेषण आवडले. आणखीन एक मुद्दा हवा होता.
  राहुल गांधी यांनी अशोक चव्हाणांचे थेट अभिनंदन केले नाही. यूपीएच्या काळातले अध्यादेश फाडणे असो की अहमद पटेल आणि अशोक चव्हाण यांना अनुल्लेखाने मारणे, राहुल गांधी नेहमीच असे का वागतात हे कोडेच आहे.

  • Milind Wadmare ….
   हीच तर कॉंग्रेसी निती आहे आणि तीच अंतर्गत गटातटास आणि पर्यायाने स्वतःच्या अधःपतनास कारणीभूत आहे.

   • Sanjay Wawale · ….
    आपणा खोट्या पोस्ट लिहून जनते ची दिशाभूल करत आहात.. नांदेड निवडणुकांचा संपूर्ण निकाल रात्री उशीरा हाती आला.. त्यानंतर सकाळी राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले व ट्विटरवर प्रतिक्रिया सुध्दा दिली… टट आपण अर्धवट माहीती च्या आधारे चुकीच्या पोस्ट्स लिहीत आहात.. मा.अशोक चव्हाण यांनी दुस-या दिवशी चॅनेलवर मुलाखत देताना ही गोष्ट सविस्तर सांगितली होती.

    • विजय तरवडे ….
     Sanjay Wawale कृपया संदर्भ द्याल तर आनंद होईल. माझी कमेंट वृत्तपत्रातील बातमीवर आधारित आहे.

     • Sanjay Wawale · ….
      संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर.. दुस-या दिवशी या. अशोक चव्हाण यांची मुलाखत सर्व महत्वाच्या मराठी चॅनेल्स वर दाखवण्यात आली होती. 10 मिनीटांच्या या मुलाखतीत श्री अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्याशी झालेल्या संभाषणा बद्दल आणि ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल सविस्तर माहीती दिली होती..

     • Milind Wadmare ….
      अगदी बरोबर बोललात… वाईट वाटते की कॉंग्रेसला नांवे ठेवणारे सगळेच पक्ष त्याच वाटेने जात असुन आणि गटातटात विभागलेले दिसत आहेत.

     • विजय तरवडे….
      Sanjay Wawale मीही हितचिंतक आहे. वेळ काढून माझी भिंत पहा. पक्षाच्या मुळावर येणाऱ्या गोष्टी व्यथित करतात.

 • Pushkaraj Deshpande ….
  अशोक चव्हाण आता महानगरपालिकेचे मोठे नेते झाले आहेत. ते महापौर पण होउ शकतात. फक्त राहूल गांधी पर्यंत त्यांच नाव गेल पाहिजे.

 • Shashank Inamdar ….
  Udya Baramati madhe BJP kinva Shivsena Harali ki he asach ek lihinaar…
  Secular Patraakar mhanun Award dya hyana…mhanje parat wapas karta yeyil…
  Evadha poor quality lekh mi mazya ayushyat kadhi vachala navata…
  Kamkuvat Buddhi che sabut mhanje ha lekh…aajkal ase lok Ssmpadak mhanun Kam kartat…hech tar hya Deshache durdeva aahe…

 • Milind Digrajkar ….
  जमिनीवरील परिस्थितीला धरून अतिशय योग्य साधक बाधक परीक्षण , अपेक्षा आहे सुजाण भाजप नेते ह्या वरून बोध घेतील .

 • Adv. Uday Bopshetty
  As usual a well articulated,researched-outwardly & inwardly-and balanced article written in ‘provocatively restrained’ manner with ‘Praveen’ punches…hope those concerned would rightly read into it(meaning wise) to decode the reasons of debacle and success, as well…incidentally the law of nature says a meteoric rise has potentialities of meteoric fall if the object crosses the orbit & if BJP’s recent trends noted by you are any indicators, the ‘Party with a difference’ is denting it’s own orbit with exponential grade of ambitions and craze of ‘power at any cost’ and ‘whatever it takes’ !! And lastly the difference in Congress and BJP is that Congress has routes in Earth whereas Lotus has floating routes in water ! Congrats once again for wonderful writing.. Have a nice day!
  Uday Bopshetty…

 • dattaatray

  अशोक चव्हाणांच्या राजकारणाला संजिवनी देणारा, कॉँग्रेसमध्ये जीव ओतणारा हा निकाल नक्कीच आहे. खूप सविस्तर, अचूक आणि परिस्थितीला धरून केलेले विश्लेषण आहे…भाजपला जमिनीवर आणणारा असा एखादा निकाल हवा होताच..

 • Prakash Paranjape ….
  अत्यंत संतुलित लेख . नांदेडवरुन तपमान मोजता येणार नाही हे खरेच . गुजरात मात्र २०१९ चे तापमान सांगेल

 • Raj Kulkarni ….
  अतिशय योग्य असं विश्लेषण केलं आहे. केवळ नांदेड च्या निकालावरून लगेच हवा पालटली असल्याचा अंदाज बांधणे योग्य नव्हे. अजून खूप कालावधी आहे.
  अशोकराव चव्हाण यांनी तळगाळातील नवीन लोकांना दिलेली उमेदवारी जमेची बाजू ठरली. कट्टर विचारधारा सर्वच नागरीकांनी नाकारली असे म्हणूया! राज्य सरकारच्या व मुख्यमंत्र्याच्या धोरणावरही अचूप टिप्पणी केली आहे. सर्वांनी वाचावा असा लेख!

 • Hrishikesh Dunakhe ·….
  I bet if you ask any other district support Ashok Chavan. He is extremely corrupt politician. Don’t worry people know what is for nation.