निवडणूक निकाल : कांही निरीक्षणं

||१||

‘काँग्रेसमुक्त भारत’ ही केवळ वल्गना आहे , भारतातून काँग्रेसचं उच्चाटन कधीच होणार नाही कारण सर्वधर्म समभाव हा विचार घेऊन या देशात वावर आणि विस्तार्‍लेल्या काँग्रेसनं देशातील सर्व जाती-उपजाती-पोटजाती , विविध भाषक , अनेक धर्म , परस्पर भिन्न संस्कृती यांची मोट या देशात सर्वात आधी बांधली , काँग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं , स्वातंत्र्यानंतरही इंदिराजी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी प्राणाहुती दिली , पक्षाची पाळंमुळं देशाच्या कानाकोपर्‍यात वाड्या-तांड्यापर्यन्त पोहोचलेली आहेत ; काही कमी जास्त असलं ; कांही गंभीर चुका झालेल्या असल्या तरी लोकांना हा पक्ष आपला वाटतो , त्यामुळे कोणी कितीही वल्गना केल्या तरी काँग्रेसमुक्त भारत हे स्वप्न कधीही अस्तित्वात येणार नाही , असं मी जे  २०१३पासून सातत्याने लिहितो आहे त्यावर नुकत्याच झालेल्या पांच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानं शिक्कामोर्तब केलेलं आहे .

मंदिरांना भेटी , गोमूत्र आणि शेणापासून गोवर्‍यांचं उत्पादन , गोशाला असा मवाळ हिंदुत्वाचा राहुल गांधी आणि काँग्रेसनं चोखाळलेला मार्ग या देशातील अनेकांना रुचलेला नाही . त्यामुळे काँग्रेसचं भगवीकरण होतं असल्याची चिंता अनेकांना वाटते याची दखल काँग्रेस घेणार , का मतांसाठी असे अनुनय यापुढेही करत राहणार ?

||२||

राहुल गांधी यांनी आज तरी स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान पेललं आहे , हाही या निकलांचा अर्थ आहे . भाजप आणि नरेंद्र मोदी यांचं आव्हान स्वीकारण्यास आपण तय्यार आहोत याचे स्पष्ट संकेत राहुल गांधी गुजरात निकलातून दिलेले होते तरी ते गंभीरपणे न घेण्याचा कोडगेपणा भारतीय जनता पक्षाच्या सर्व पातळीवरील नेत्यांनी अवलंबला आणि काँग्रेसमुक्त भारताच्या वल्गना सुरुच ठेवल्या . कोणाला संपवण्याची संकल्प करुन आपण मोठं होत नसतो हा धडा नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपच्या नेत्यांना या निकालांनी शिकवला , हाही या निकालांचा एक अर्थ आहे आहे .

बुद्धिभ्रम करुन आणि लोकांची भलावण करुन सत्तेत कांही काळ राहता येतं जनतेच्या मनात कायम नाही राहता येत हाही इशारा या निकालातून मतदारांनी भाजपला दिला आहे .

||३||

लोकशाहीत कुणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नसतो शेवटी मतदार ठरवेल त्याच्याच गळ्यात सत्तासुंदरी पडते याची जाणीव या निकालांनी भाजपला करून दिलेली आहे . पराभव झाल्यावर मतदारांचा निर्णय तो स्वीकारण्याचा आणि त्या पराभवाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्याचा जो उमदेपणा रमणसिंह , शिवराज चौहान आणि वसुंधरा शिंदे यांनी दाखवला तो नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दाखवता आलेला नाही ; या देशात रुजलेली ही लोकशाही अजून मोदी-शहा आणि भाजपच्या बहुसंख्य यांच्या रक्तात नाही , हाही या निकालांचा आणखी एक अर्थ आहे .

भारतीय जनता पक्ष हा काही आता आदर्श आणि साधनशुचितेचा जप करणारा राजकीय पक्ष राहिलेला नसून काँग्रेससारखाच तद्दन व्यावसायिक राजकीय पक्ष झालेला आहे . त्यामुळे भाजप या पराभवातून ‘योग्य’ तो धडा शिकून दुप्पट जोमाने कामाला लागेल आणि पराभवाचे उट्टे काढण्याचा प्रयत्न करेल , हा इशारा काँग्रेसनं समजून घ्यायला हवा .

||४|| 

या निकालाचा म्हणजे विशेषत: राजस्थान , मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील मतदारांच्या कौलाचा आगामी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही असं जे म्हटलं जातंय त्यातही तथ्य नाही , असं ठामपणे वाटतं . मला आठवतात ते , २०१३ या वर्षी झालेले याच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल . त्यावेळी मी दिल्लीत होतो आणि त्या निकालांतूनच देशाची काबीज करण्याचं स्वप्न आवाक्यात आल्याचं भाजपला आणि पंतप्रधानपद टप्प्यात आल्याचे संकेत नरेंद्र मोदी यांना स्पष्टपणे मिळालेले होते ( जसे की आता राहुल गांधी आणि काँग्रेसला मिळालेले आहेत ) . नरेंद्र मोदी ही तेव्हा एक व्यक्ती किंवा केवळ नेते राहिलेले नव्हते तर ती एक लाट बनलेली होती . ‘लाट’ हा शब्द काँग्रेस किंवा माझा नाही तर भाजपच्या नेत्यांनी आणि माध्यमांनी वापरलेला आहे . ती लाट २०१४च्या लोकसभा निवडणुकीपर्यन्त कायम राहिली ; राजस्थान , मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात मिळून लोकसभेच्या जागा आहेत ६५ आणि २०१३च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या आधारे मांडलेल्या सूत्राप्रमाणे २०१४च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ६१ जागी भाजपने विजय संपादन केलेला होता . तेव्हा जे सूत्र लागू करण्यात आलेलं होतं तेच याही ( आता लाट ओसरल्यावर ) वेळी लागू केलं तर तर त्याआधारे येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २३ आणि काँग्रेसला ४० जागा मिळतील असा अर्थ होतो . उत्तरप्रदेशात असलेल्या लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागा लाटेच्या याच सूत्रांनुसार भाजपनं जिंकल्या होत्या . या प्रदेशात विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळूनही मोदी/भाजप/योगी यांची लाट ओसरलेली आहे ; त्यानुसार किमान निम्म्या म्हणजे ३५ ते ३८ जागा भाजप गमावणार असे अंदाज आलेले आहेत . गुजरात’गडा’चे चिरे राहुल गांधी यांनी आधीच खिळखिळे केलेले आहेत , शिवसेनेशी युती झाली तरी महाराष्ट्रात ३२ ते ३४च जागा मिळतील , आंध्र आणि तेलंगणातून फार काही आशा बाळगावी अशी स्थिति नाही ,  पश्चिम बंगाल आणि कर्नाटकातून फार फार तर ५/७ जागांची आशा आहे . याचा अर्थ गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा २०१९च्या निवडणुकीत भाजपला ९० ते १०० जागा कमी मिळतील . या जागा भरुन निघाल्या नाहीत तर एकटा भारतीय जनता पक्ष तर सोडाच एनडीए ( भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी ! ) सुद्धा देशाची सत्ता मिळवू शकणार नाही , हाही या निकालांचा आणखी एक अर्थ आहे .

शिवाय लाट आज ना उद्या ओसरणारच आहे तेव्हा किमान पिण्याच्या तरी पाण्याची       ( म्हणजे जनाधार कायम राखण्यासाठी निगुतीनं कारभार करण्याची ) तरतूद वेळीच करुन ठेवायला हवी याचं भान असणारे नेते भाजपमधे नाही असाही या निकलांचा अर्थ आहे !

||५||  

भाजपचा ‘सुपडा साफ झाला’ , ‘भाजपची दारुण पीछेहाट’ हे विश्लेषकांनी मांडलेलं मत म्हणा की निष्कर्ष मान्य होण्यासारखा नाहीच कारण मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला एकूण २३० पैकी १०९ म्हणजे ४७.४ टक्के जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला ११४ म्हणजे ४९.६ टक्के जागा मिळालेल्या आहेत ; एकूण मतांच्या बाबतीत हे प्रमाण भाजपला १ कोटी १६ लाख ५० हजार ७५१ तर काँग्रेसला १ कोटी १६ लाख ६१ लाख ५६१ मते मिळाली आहेत . राजस्थान विधानसभेत भाजपला १९९ पैकी ३६.५ म्हणजे ७३ ( १ कोटी २८ लाख ३४ हजार १९० मते )  तर काँग्रेसला ४९.५ टक्के म्हणजे ९९ ( १ कोटी २९लाख ८९ हजार ५३ मते ) जागा मिळालेल्या आहेत . म्हणजे या दोन मोठ्या राज्यात काँग्रेस आणि भाजप हेच दोन पक्ष प्रामुख्याने अस्तित्वात असून यापुढील देशातील राजकीय लढती ( कांही राज्यात प्रादेशिक पक्ष त्यांचे अस्तित्व काम राखूनही ) या दोन पक्षातच  होतील हे स्पष्ट आहे . दुसर्‍या शब्दात सांगायचं तर राष्ट्रीय राजकारण यापुढे प्रामुख्याने काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षाभोवतीच केन्द्रित राहील . हे समजण्यासाठी या दोन्ही पक्षांची पाळेमुळे अगदी तळागाळापर्यन्त कशी पोहोचलेली आहेत हे नीट उमजून घ्यावं लागेल . ही मुळे पक्की होण्यात कुणाच्या यशापशाचा वांता नाही तर ते नियोजनबद्ध संघटनात्मक काम आहे ,    हे ज्याला नीट उमजेल तो म्हणेल , या पक्षांची सरकारे कशी कामगिरी करतात यावर या दोन्ही पक्षांचं प्रत्येक निवडणुकीतील यशापयश अवलंबून राहील . त्यामुळे काँग्रेसच्या अपयशात भाजपचं यश दडलेलं आहे किंवा भाजपच्या अपयशात काँग्रेसच्या यशाची बीजं आहेत अशी भोंगळ स्टेटमेंट्स तथाकथित राजकीय विश्लेषक आणि विचरवंतांना या पुढे  यापुढे बाद करावी लागतील .

||६||

आणखी एक मुद्दा प्रचाराच्या पातळीचा आहे . प्रचाराच्या घसरलेल्या पातळीसंबधी    विश्लेषक आणि विचारवंताना फारच काळजी वाटत असल्याचं वेगवेगळ्या चर्चातून जाणवलं . यासाठी कोणत्या एका पक्षाला जबाबदार किंवा अपवादही ठरवता येणार नाही . विशेषत: १९८० नंतर गल्ली ते दिल्ली अशा प्रत्येक निवडणुकीतील प्रचाराची पातळी खालीच घसरत चालेली आहे . नथुराम गोडसे याचे पुतळे उभारण्याची भाषा आपल्याच राज्यात झाली होती आणि मनमोहन सिंह हे ‘कमजोर’ पंतप्रधान आहेत हे भाषा करणारे साधनशुचितावाले होते ! फार लांब कशाला नरेंद्र मोदी यांचा भारतीय राजकारणात उदय झाल्यावर गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘मौत का सौदागर’ ही भाषा करणारांनी घसरलेल्या पातळीवर बोलणं हा भोंदूपणा आहे . कुणी कुणाला पप्पू म्हटल्यावर कुणाला वाईट वाटतं पण पंतप्रधानांना चोर म्हटल्याचा आसुरी आनंद होतो , हा दुटप्पीपणा आहे . कुणाची ‘चड्डी’ काढणारे ‘जाणते राजे’ असतात आणि त्यांनी भाषणात तशी भाषा वापरली की टाळ्या वाजवणारे काय साधू संत थोडीच असतात ? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांनी सस्मित अभिवादन केलं नाही असे गळे काढणारे याच काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याच पक्षाचे पी. व्ही. नरसिंहराव समोर आल्यावर नापसंतीनं मन वळवली हे कसं काय विसरता येईल .

सर्व भेद वळचणीला लटकवून  सभ्यता , शिष्टाचार विसरणं ही आपली सर्वपक्षीय राष्ट्रीय संस्कृती झालेली असतांना प्रचाराच्या पातळीची अपेक्षा बाळगणं निर्भेळ बावळटपणा नाही का ?

||७||

ज्या देशाच्या बहुसंख्य समाजाचीच सुसंस्कृतपणाची पातळी खालावलेली आहे ; जो समाज बहुसंख्येनं गडद राजकीय-जातीय-धार्मिक विचाराचे चष्मे घालून एकारला आणि कर्कश्श झालाय त्या समाजाच्या नेत्यांकडून सभ्यतेची अपेक्षा कशी काय बाळगता येईल ; जसा समाज तसे त्या समाजाचे नेतृत्व असणार हे उघडच आहे . देशातील येत्या निवडणुकांत प्रचाराची पातळी आणखी घसरतच जाणार आहे…आई-बहिणीचा असभ्य उच्चार जाहीरपणे होण्याचे दिवस दूर नाहीत हाही या निवडणुकीतील प्रचारानं दिलेला संकेत आहे…

-प्रवीण बर्दापूरकर  

Cellphone  +919822055799

www.praveenbardapurkar.com

=====================

‘डायरी’ , नोंदी डायरीनंतरच्या’ , ‘दिवस असे की…’ , ‘आई’ , ‘क्लोज-अप’ , ‘ग्रेस नावाचं गारुड’ , ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी लिंक-

http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515

=====================

 

संबंधित पोस्ट