//१//
आसाराम लोमटे, अक्षयकुमार काळे, अनिल पिंपळापुरे या यार-दोस्तांना वर्ष सरता सरता मोठे सन्मान मिळाले; आनंद विश्वव्यापी झाला. २०१६नं भरल्या मनानं निरोप घेतांना येणारं नवीन वर्ष अशा अनेक आनंददायी बातम्यांचं असेल अशा जणू शुभ संकेताच्या ओल्या रेषाच आखल्यासारखं वाटलं.
१९९८च्या मी महिन्यात माझी महिन्यात ‘लोकसत्ता’च्या औरंगाबाद कार्यालयात बदली झाली तेव्हा मराठवाड्याच्या ८ जिल्ह्यात आणि सुमारे ९० तालुक्यात मिळून लोकसत्ताचे जेमतेम तेरा वार्ताहर होते. त्यापैकी बहुतेकांनी आचार्य अत्रे यांची पत्रकारिता पाहिलेली होती आणि लोकसत्तातला द्वा. भ. कर्णिक, ह. रा. महाजनी यांचा जमाना पाहिलेला होता! थोडक्यात हे सर्व वयाने किमान साठी तरी पार केलेले होते. त्यांनी पत्रकारिता सुरु केली तेव्हा आणि १९९८च्या पत्रकारितेत यंत्र-तंत्र तसंच मानसिकता अशा सर्वच पातळ्यांवर मोठे परिवर्तन झालेलं होतं. पत्रकारितेला वृत्तवाहिन्या, माहितीच्या महाजालाचं ( इंटरनेट! ) भुरळ पडलेली होती. लोकसत्ताचं मराठवाड्यातील हे नेटवर्क काही भावी योजनांचा विचार करता, टेक्नोसॅव्ही, तरुण आणि काळाला साजेसं बदलण्याची गरज होती. तत्कालिन संपादक अरुण टिकेकर यांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकलेली होती. सोबतीला वितरण विभागाचा अधिकारी मुकुंद कानेटकर होता. मग सुरु झालेल्या त्या शोध मोहिमेत आसाराम लोमटे याची भेट झाली.
आसारामच्या अत्यंत देखण्या अक्षराचा प्रभाव लगेच पडला. त्याच्या बातमी लेखनाची शैली ठाशीव. कोणताही फाफटपसारा नाही की अनावश्यक तपशील नाहीत; सहाजिकच आसाराम आवडता वार्ताहर झाला. प्रथमदर्शनी लक्षात आला तो त्याचा बुजरा स्वभाव. त्याही काळात तो मोजकं पण ठाम बोलायचा आणि तेही टणटणीत आवाजात. ते बोलणं त्याच्यातील वाचन आणि त्यातून आलेली समज याचं नितळ ‘पाणी’ किती डोहखोल आणि निर्भेळ चविष्ट आहे, याची ठोस जाणीव करुन देणारं असायचं, अजूनही आहे. तेव्हा तो शिकत होता, एका स्थानिक वृत्तपत्रात बातमीदारी करत होता; उदरनिर्वाहासाठी त्याची धडपड सुरु होती. महत्वाचं म्हणजे तो कथालेखन करत होता. ओळख झाली तेव्हा आसाराम लेखणीच्या टोकावर वसलेला होता; अजूनही आहे. त्या लेखणीचा ब्लडग्रुप रानवेडा, नातं गावच्या मातीशी आणि लेखणीतली भावना मातृहृदयी; हे सगळं लखलखीत अस्सल होतं. हळूहळू एकेक चिरा ढासळत भग्न होत जाणाऱ्या कृषी व्यवस्थेतील माणसाचं दररोजचं कोसळणं, खंगणं आणि त्यामुळे मनाची कालवाकालव करणारी शैली, हे त्याचं कथालेखन वैशिष्टय वाचकाला अंतर्बाह्य सुन्न करणारं, स्वतंत्र बाजाचं आणि म्हणूनच स्तिमित करणारं होतं.
ते कथालेखन आसाराम आणि आम्हा उभयतांतलं नातं आणखी घट्ट करणारं ठरलं. तसा तो वयानं माझ्यापेक्षा खूपच लहान; त्यामुळे असावं बहुदा, माझ्या मनात त्याच्याविषयी ममत्वच असायचं, आजही आहे. ते दिवस; त्याचं लेखन वयात आणि बहरात येण्याचे होते. तो तेव्हाही त्याच्या व्यक्तीगत आयुष्याविषयी फारच कमी बोलायचा पण, जे जे काही बोलला त्यातून त्याची जडण घडण समजत गेली. आईनं उपसलेल्या घोर कष्टांचा त्याच्यावर झालेला खोलवर संस्कार आणि अभावग्रस्त जगण्याचा उमटलेला कधीही न पुसला जाणारा ओरखडा जसजसा समजत गेला; तसतसं आमच्यातली ममत्वाची वीण आणखी घट्ट होत गेली. महत्वाचं म्हणजे ही प्रक्रिया अतिशय शांतपणे आणि नैसर्गिक सहजपणे घडत गेली. ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता’ या समजाला छेद देणारा स्मिता स्मृती वार्षिक अंक मी संपादित केला तेव्हा त्याला त्याच्या आई(बाई)वर लिहायला सांगितलं. आवर्जून वाचावं असं ते लेखन आहे. आसाराममध्ये आई किती खोलवर झिरपलेली आहे हे त्या लेखातून व्यक्त झालंय. तो लेख वाचल्यावर त्या घनगर्द अवकाळी पावसाळी सायंकाळी माझ्याही मनात आईच्या आठवणीचे कातर दीप उजळले…मी निशब्द झालो काही वेळ. (आता ते लेखन साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘आई’ या पुस्तकरूपाने उपलब्ध आहे.) असं हे आमचं आजवर कधीच उघड न झालेलं नातं; त्यामुळेच आसारामला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याची बातमी कळली तेव्हा मला भरजरी आनंद झाला.
आसारामच्या ‘इडापीडा…’चं प्रकाशन अरुण साधू आणि माझ्या प्रमुख उपस्थितीत व्हायचं ठरलं. पण, अचानक बर्मिंगहॅमला जावं लागल्यानं मी त्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो नाही. आसारामच्या ‘अलोक’ या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा सन्मान प्राप्त झाला म्हणून नव्हे पण, त्याच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाची ती एक फार महत्वाची संधी गमावली याची कांटेरी रुखरुख आजही माझ्या मनात आहे. साहित्य अकादमीचा हा सन्मान ही आसारामची सुरुवात आहे. त्याच्यातली लेखनक्षमता बहुपेडी व्यापक आहे; म्हणूनच आणखी मोठ्या उंचीच्या लेखनाची त्याच्याकडून अपेक्षा कायम राहणार आहे. अशा सन्मानामुळे सभोवताली गोळा होणाऱ्या खुज्या उंचीच्या आणि किरट्या वृत्तीच्या जमावात आसारामचं मन रमणार नाही, मानवी मनाच्या तळाचा वेध घेणाऱ्या पुढच्या लेखनात तो मग्न होईल याची खात्री मला आहे.
//२//
डोंबिवलीत भरणाऱ्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांची निवड झाल्यानं आणखी एका मित्राचा मोठा सन्मान झाल्याचा निस्वार्थ आनंद झालाय. १९८१च्या जानेवारी महिन्यात पत्रकारिता करण्यासाठी मी नागपुरात पाय टाकला आणि पहिल्याचं काही महिन्यात ज्या अक्षय ओळखी झाल्या त्यात तेव्हा लक्ष्मी नगरात पहिल्या मजल्यावर राहाणारा अक्षयकुमार काळे आहे; म्हणजे आमच्या स्नेहाला आता तीन तपं उलटली आहेत. या तीन तपात अक्षयची समीक्षा आणि कवितेवरची निष्ठा तसूभरही ढळलेली नाही. मराठी साहित्यात ‘काव्य समीक्षा’ हा एक गंभीर पैलू त्यानं रुढ केला. एरवी दुर्बोध समजले जाणारे कविवर्य ग्रेस आणि त्यांची कविता अक्षयने समजावून सांगितली. त्या दुर्बोध समजल्या समजल्या कवितेची समीक्षाही मांडली आणि ग्रंथबध्द केली.
मितभाषी अक्षयकुमार काळे याचं बहुसंख्य लेखन समीक्षा आणि त्यातही काव्यसमीक्षा या प्रकारात मोडणारं आहे. ‘सूक्तसंदर्भ’, ‘कविता कुसुमाग्रजांची’, ‘अर्वाचीन मराठी काव्यदर्शन’, ‘मर्ढेकरांची कविता – आकलन आस्वाद आणि चिकित्सा’, ‘ग्रेसविषयी’, ‘प्रतितिविभ्रम’, ‘गालिबचे उर्दू काव्यविश्व अर्थ आणि भाष्य’, ‘गोविंदाग्रज समीक्षा’ ही अक्षयची ग्रंथसंपदा. शिवाय अनेक पुस्तकांचं संपादन अक्षयच्या खाती जमा आहे. त्याचं ‘गालिब’प्रेम छंदातून आणि व्यासंगात बदललं आणि त्यातून मोठं लेखन झालं. समीक्षक हा काही फार वाचकांना माहिती असणारा नसतो आणि लोकप्रिय तर नसतोच नसतो अक्षयकुमार काळे यांनी केलेल्या समीक्षेचा दर्जा काय, ती समीक्षा योग्य आहे किंवा नाही हा चर्चेचा आणि प्रतिवादाचा मुद्दा नक्कीच आहे. पण काळे यांचं लेखन माहिती नसताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर विशेषत: मुंबई-पुण्यातील माध्यमात अक्षय काळेवर टीका झाली; कोण हे काळे, अशीही पृच्छा झाली. अर्थातच, हे सगळं अज्ञानमूलक आणि फारच उथळ होतं.
प्रकाशित झालेलं प्रत्येक बरं-वाईट अक्षर आणि त्याचा लेखक समाजातल्या प्रत्येकाला माहिती असणं शक्यच नसतं पण, माध्यमातील लोकांनी ते माहिती घेऊन जबाबदारीच्या भावनेनं लिहिणं अपेक्षित असतं. मात्र; आपल्याला जे माहिती नाही ते अन्य कोणालाच माहिती नाही किंवा टोकाला जात ते तसं काही अस्तित्वातच नाही अशी तुच्छतावादी मानसिकता असणारा एक कंपू सध्या माध्यमं आणि समाज माध्यमांत उदयाला आलाय. प्रत्येक घटना/निर्णय म्हणा की वक्तव्यावर, कोणताही सारासार विवेक न बाळगता हा घटक कायम तुच्छ प्रतिक्रिया व्यक्त करत असतो आणि तीही अतिशय घाईत. अशा तुच्छतावादी तसंच नकारात्मक वृत्तीच्या लोकांकडे आणि त्यांच्या अज्ञानमूलक प्रतिक्रियांकडे फार लक्ष न देण्याची अक्षय काळेची कृती अनेकांना खटकली असली तरी ती त्याच्या परिचित प्रवृत्तीला साजेशीच आहे. प्रतिवाद म्हणा की खंडन मृदूपणे करावं, आक्रस्ताळेपणानं आणि अज्ञानातून नाही; हा अक्षयचा स्वभावच आहे. नागपूरच्या मित्रवर्तुळातला आधी श्रीपाद भालचंद्र जोशी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान झाला आणि आता अक्षयकुमार काळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विजयी झाला. दोस्तयारांचे असे सन आपल्या जगण्यावर आनंदाची शीतल सावली धरत असतात.
//३//
डॉ. अनिल पिंपळापुरे लिखित ‘खगायन’च्या प्रकाशनप्रसंगी डावीकडून वनमहर्षि मारुती चितमपल्ली , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी , प्रवीण बर्दापूरकर आणि डॉ. अनिल पिंपळापुरे
डॉ. अनिल पिंपळापुरे याला वनराईचा पुरस्कार मिळाल्यानं स्वत:लाच पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्हावा, अशी आमची गर्भरेशमी दोस्ती आहे. अनिलच्या भाषेत सांगायचं तर आमची यारी चाळीस वर्ष ‘मुरलेली’ आहे! आम्ही शिकलो एकाच काळात, तारुण्यातील फंडे करण्याचा, कडकीचा आणि खिशात चार पैसे खुळखुळण्याच्या ‘श्रीमंती’चे आमचा जगण्यातले असे सर्व दिवस एकमेकाच्या सोबतीचे आहेत; एवढंच कशाला आम्ही प्रेम आणि प्रेमविवाह करण्याच्या दिवसातलेही एकमेकाशी गुजगोष्टी करणारे यार आहोत. डॉक्टर म्हणून अनिल हा व्यवसायानं यशस्वी व कुशल डेंटीस्ट आहे; पक्षी निरीक्षण हा त्याचा श्वास आहे; लेखन वाचन त्याची आवड आहे पण, एक मित्र म्हणून तो एक चैतन्यदायी अबोल प्रेरणा आहे हे अनेकांना ठाऊक नसेल; नाहीच.
इतक्या मुरलेल्या मैत्रीच्या स्मरणरंजनाचे कढ कातर व भावनाप्रधान असणं स्वाभाविक असतं पण, त्यापलीकडे जाऊन सांगतो, जगण्याला प्रत्यक्ष भिडण्याच्या अनिलच्या चैतन्यदायी सकारात्मकतेचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मित्र म्हणून अनिल अतिशय उमदा या सदरात मोडणारा आहे. त्याच्या तब्येतीच्या कुरबुरी १९८५-साली सुरु झाल्या; त्या कुरबुरी साध्यासुध्या नव्हत्या.(त्या कुरबुरींना ‘बारीकसारीक’ म्हणणं हा अनिलचा उमदेपणा आणि त्याचा जगण्याचा दृष्टीकोन त्यात आहे.) घडलेल्या त्या घटनेचं स्मरण नको. पण, अनिल त्या संकटाला त्या वयाला न साजेशा विलक्षण धीटपणे सामोरा गेला. जगण्याची अथांग इच्छाशक्ती आणि सकारात्मक वृत्ती हेच त्याचं त्यामागचं भांडवल असावं. अनिलनंआजारालाही सहकार्य केलं आणि उपचारालाही प्रतिसाद चांगला दिला. महत्वाचं म्हणजे आजारातून उठल्यावर खचून न जाता-निराश न होता, दैनंदिन चर्येतून इतरांसमोर एक जगण्याचं मॉडेल उभं केलं आणि तेही कोणताच गाजावाजा न करता. जगण्याचे स्वत:चे मापदंड त्याने ठरवून घेतले मात्र; त्याचा जाच अन्य कुणालाही होऊ दिला नाही. ते कारण समोर करुन त्यानं क्लिनिकला एकही दिवस दांडी मारली नाही.
जगण्याच्या त्या अनपेक्षित वळणावर पुन्हा वैद्यक व्यवसाय करतानाच तो निसर्गाकडे वळला आणि तो पक्षी निरिक्षणाच्या क्षेत्रात स्थिरावला. तिकडे त्यानं काही महत्वाचे टप्पे गाठले आणि पुन्हा एकदा हृदय विकाराचा तोच अनुभव अनिलला सामोरा आला. दरम्यानच्या काळात ह्र्द्यावरील उपचाराच्या क्षेत्रात वैद्यकशास्त्राने अचंबा वाटावा अशी प्रगती केलेली होती तरी वेदना रुग्णाला सहन कराव्या लागतातच नं. पुन्हा त्या वेदनाचक्राला भेदून अनिल उभा राहिलाय. त्यानंतरच त्याचं स्तंभलेखन झालं, ‘खगायन’ हे पुस्तक आलं. कोणतीही कुरकुर न करता इतरांना प्रेरणादायी ठरणाऱ्या सकारात्मकतेनं व चैतन्यानं जगण्याला भिडणाऱ्या अनिलला मिळालेला पुरस्कार आपल्यालाही मिळालेला आहे असं आम्हा अनेक मित्रांना म्हणूनच वाटतं! नवीन वर्षाचं स्वागत करतांना अनिल पिंपळापुरेसारखी सकारात्मकता, चैतन्य सर्वांमध्ये निर्माण व्हावं आणि सर्वांना नवीन वर्ष आनंद तसंच उत्तम आरोग्याचं जावो, या मन:पूर्वक शुभेच्छा.
//४//
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासोबत राजकारणापलीकडच्या गप्पा !
सरत्या वर्षातल्या दोस्तयारांचा विषय निघालेला असतांना एका राजकारणी स्नेह्याची झालेली भेट आठवली – माजी आमदार आणि मित्रवर्य श्रीकांत जोशी यांची कन्या नीलम हिच्या विवाहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादला आले होते. त्या वेळी अर्थातच हजर राहण्याचं आवर्जून आमंत्रण होतं.
मुख्यमंत्री येण्याआधी आलेल्या मान्यवरांपैकी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची सुमारे एका तपानंतर म्हणजे, तब्बल बारा वर्षानी भेट झाली. ‘काय बर्दापूरकर…’ अशी पूर्वपरिचित हाळी देत अतिशय अकृत्रिम अगत्यानं हरिभाऊ बागडे भेटले.
मुख्यमंत्री येण्याआधी आणि मुख्यमंत्री व-हाडींसोबत चहापानात रमले आणि परतीच्या मार्गावर लागले त्या टप्प्यात हरिभाऊ बागडे यांच्याशी गप्पा झाल्या. हरिभाऊ बागडे यांना परिवारात नानासाहेब म्हणतात. ते सर्वप्रथम विधानसभेवर विजयी झाले ते १९८५ मध्ये. आम्हा पत्रकारांच्या पिढीची मंत्रालय आणि विधिमंडळ वृत्तसंकलनाची ती जेमतेम सुरुवात होती. सहाजिकच त्या काळातील आठवणींच्या हिंदोळ्यावर गप्पा सुरु झाल्या त्या गंगाधरराव फडणवीस यांच्यापासून.
सेना-भाजप युती सरकारच्या काळात हरिभाऊ बागडे रोजगार हमी योजना मंत्री होते. तेव्हा मी मुंबईत होतो. या खात्यातील गैरव्यवहाराच्या अनेक सुरस कथा, अहवाल माझ्याकडे स्त्रोताकडून बिनबोभाट नियमित पोहोचत आणि हरिभाऊ बागडे यांना मनस्ताप देणाऱ्या बातम्या मी तितक्याच नियमितपणे देत असे. त्यातच जालना भूखंड घोटाळ्यातील एका सूत्रधारानं हरिभाऊ बागडे यांच्या नावाचा गैरवापर केला आणि माझं टीकास्त्र धारदार झालं. गैरव्यवहार काही मंत्री हरिभाऊ बागडे यांनी केलेला नव्हता किंवा करायला सांगितलेला नव्हता पण, ते त्या खात्याचे मंत्री होते नं! या बातम्या, टीका आली की तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि तेव्हा पक्षाचे संघटन सचिव असलेले श्रीकांत जोशी जाम वैतागत पण, स्वच्छ आणि सालस हरिभाऊ बागडे यांनी मात्र त्या काळात कधीही त्रागा केला नाही.
आमच्या या, परवाच्या भेटीत गडद राजकीय रंगाचा चष्मा बाजूला ठेऊन हरिभाऊ बागडे अकृत्रिम सलगीनं वागले. ‘त्या’ कोणत्याही कटू आठवणींना त्यांनी स्पर्श केला नाही. एखाद्या वडीलधाऱ्याप्रमाणं आस्थेवाईकपणे पत्नी, मुलगी अशा कौटुंबिक चौकशा केल्या. माणसं माणसाशी राजकारणाबाहेर येऊन वागतात हे अनुभवतांना छान वाटलं.
मी नेहेमीच म्हणतो, राजकीय विचाराच्या पलीकडे जाऊन राजकारण्यात एक माणूस दडलेला असतो; त्याचा प्रत्यय हरिभाऊंच्याही या भेटीत आला. मग मी म्हटलं. ‘नाना आपण एक फोटो काढू या सोबत’, तर ‘खरंच आपण कधी फोटोच नाही काढला’, असं उत्साहानं म्हणत नाना फोटोला तयार झाले. समोरच्या कार्यकर्त्याला विनंती केली आणि हे छायाचित्र शूट झालं.
सर्वच ठिकाणी आणि बाबतीत आपण नको तितके राजकारणी झालोय आणि समाजाच्या तारतम्याचा तोल ढळला आहे. खाजगी जीवनात नवीन वर्ष राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूसपण जपणारं येवो!
– प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या – www.praveenbardapurkar.com