प्रत्येक पत्रकारांच्या पोतडीत अनुभव , आठवणी , हकीकती आणि (सांगोवांगी असणारे ) किस्से यांचा साठा असतोच . त्या पत्रकारानं केलेल्या पत्रकारितेचा पट जितका व्यापक , तितका हा साठा जास्त आणि विविधांगी असतो . वर्तमानात अनेकदा कांही घटना अशा घटना घडतात की त्या पोतडीत असणारी , एरवी विस्मरणात गेलेली एखादी आठवण जागी होऊन समोर येते . तानाजी सावंत या माजी मंत्र्यांच्या पुत्राच्या अर्ध्यावर राहिलेल्या बँकॉक हवाई सफरीच्या बातम्या वाचताना/ऐकताना माझ्याही अनुभवाच्या पोतडीतली एक ( अराजकीय-राजकीय ! ) आठवण जागी झाली .
नेमकी तारीख आठवत नाही पण , वर्ष २००८ होतं आणि मार्च किंवा एप्रिल महिना होता . तेव्हा मी ‘लोकसत्ता’ या दैनिकाच्या च्या नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या विदर्भ आवृत्तीचा संपादक होतो . तेव्हा मुंबईहून नागपूरकडे उडणारं आमचं विमान औरंगाबाद पर्यन्त आल्यावर पुन्हा मुंबईला कसं माघारी वळवलं गेलं होतं , याची ती आठवण आहे .
त्या काळात मुंबई ते नागपूर आणि परत या प्रवासासाठी सकाळ आणि संध्याकाळ मिळून वेगवेगळ्या हवाई वाहतूक कंपन्यांच्या आठेक फेऱ्या होत असत . कोलकाता , दिल्ली , रायपूर , हैद्राबाद या शहरांसाठीही नागपूर येथून विमान सेवा उपलब्ध होती . या शिवाय नागपूरहून आखाती देशातही प्रवासासाठी नुकत्याच दोन विमान सेवा सुरु झालेल्या होत्या . हवाई प्रवासासाठी त्या काळात जेट एअरवेजच्या सेवेला माझं कायमच प्राधान्य असे . त्याचं कारण या विमान कंपनीची तत्पर सेवा , चवीष्ट खाणं आणि टापटीप हे होतं . त्या काळात जेट एअरवेजचं विमान वेळेवर असणारच , याची खात्री असायची . नंतरच्या काळात हवाई सेवा देणारी ही कंपनीच डब्यात गेली हा भाग वेगळा .
मुंबईतील कामकाज आटोपल्यावर जेट एअरवेजच्या संध्याकाळच्या विमानानं नागपूरला जायला मी निघालो . विमानात प्रवेश केल्यावर बघितलं तर प्रत्येक सीटसमोर स्क्रीन होता . या स्क्रीनवर हवाई सेवेनं उपलब्ध करुन दिलेले हिंदी किंवा इंग्रजी चित्रपट पाहता येत असत किंवा विमानाचा प्रवास कोणत्या मार्गाने होतो आहे ; कोणता देश किंवा कोणत्या महत्वाच्या शहरावरुन विमान उडत जात आहे , हे स्क्रीनवर दिसत असे . तेव्हा विशेषत: प्रदेश प्रवासात असे स्क्रीन विमानात असत . देशांतर्गत हवाई वाहतुकीत फारच क्वचित अशी सेवा विमानात उपलब्ध होत असे . विमान कोणत्या मार्गानं उडत आहे हे पाहायला मला तेव्हा आवडायचं , अजूनही आवडतं .
विमानानं टेक ऑफ केलं आणि मी नेव्हीगेशन चॅनल सुरु केलं . थोड्याच वेळात नाश्ता वगैरे सर्व्ह होऊ लागला . कांही वेळा हेलिकॉप्टरनंही प्रवास केल्यामुळे मुंबई-नागपूर विमानाचं उड्डाण औरंगाबादच्या डोक्यावरुन होत असतं , हे मला ठाऊक होतं . म्हणूनच औरंगाबादहून आपण केव्हा उडत जातो यांची मला नेहेमीप्रमाणं उत्सुकता होती . औरंगाबादवरुन विमान पुढं गेलं , म्हणजे आता ३५/४० मिनिटात नागपूर येणार , असं मनातल्या मनात पुटपुटत मी सुस्कारा टाकतो न टाकतो तोच पुढच्या ४/५ मिनिटांतच विमान पुन्हा माघारी वळल्याचं स्क्रीनवर दिसू लागलं . क्षणभर मी गोंधळलो . मग हवाई सुंदरीला पाचारण केलं आणि विमान माघारी का वळवण्यात आलं आहे , अशी विचारणा केली . तिनं नेमकं उत्तर दिलं नाही . माझ्या पुढच्या प्रश्नांवर तिनं टाळाटाळ सुरु केली पण , माझ्या वरच्या पट्टीतल्या आवाजातील विचारण्यामुळे इतर अनेक प्रवासी सावध झाले . त्यांनीही प्रश्नांची सरबत्ती सुरु केली . विमानात गलका माजला . अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या आणि त्या ते बोलून दाखवू लागले . प्रवाशात गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं स्पष्ट दिसत होतं .
थोड्या वेळानं , विमान मुंबईला लँड होणार असल्याची घोषणा झाली आणि त्याचसोबत कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांनी सीटवरच बसून राहावं , अशीही सूचनावजा ताकीद देण्यात आली . विमान लँड होताच मी सेलफोन सुरु केला आणि पहिला फोन ( एकेकाळचा ‘लोकसत्ता;तील सहकारी आणि ) ‘एबीपी माझा’ ( तेव्हा बहुदा ‘स्टार माझा’ हे नाव होतं ) या प्रकाश वृत्त वहिनीचा संपादक राजीव खांडेकर याला फोन करुन विमान आम्हाला कोणतीही कल्पना न देता अचानक कसं वळवण्यात आलं आहे , ही माहिती दिली . नंतर ‘लोकसत्ता’च्या मुंबई आणि नागपूर कार्यालयात तसंच नागपूरला घरी फोन करुन काय घडलं ते सांगितलं . तर बेगमनं म्हणाली , ‘माझावर विमान माघारी वळवण्यात आल्याची ब्रेकिंग न्यूज सुरु झालेली आहे’ . दरम्यान वृत्त वाहिनीनं माझाही एक ‘बाईट’ घेतला . विमान माघारी का वळवण्यात आलं ही मूळ बातमी एक पत्रकार म्हणून मी दिली होती . त्यापुढची माहिती काढण्याची जबाबदारी आता माझी नव्हती कारण मी विमानातच होतो .
विमान पूर्ण थांबल्यांवर पंधरा-वीस मिनिटात तीन प्रवाशांनी लगबगीनं विमानात प्रवेश केला असल्याचं सर्वांनाच दिसलं . त्यापैकी एक प्रवासी माझ्याच रांगेत पण , पलीकडच्या बाजूला असलेल्या एका रिकाम्या सीटवर बसला . थोड्याच वेळात विमानानं पुन्हा टेक ऑफ घेतला आणि आमचा नागपूरच्या दिशेनं प्रवास सुरु झाला . अनेकांनी विचारणा करुनही ते चढलेले तिन्ही प्रवासी मात्र कांहीही न बोलता गप्प बसून राहिले .
नागपूरला विमान लँड झाल्यावर कांही पत्रकार भेटले . प्रवाशांनी काय घडलं ते सांगितलं . दरम्यान ते तिघे मात्र कुठे आसपास दिसत नव्हते ते मागेच रेंगाळले होते बहुदा .
दुसऱ्या दिवशी नागपूरच्या सर्व वृत्तपत्रात जेट एअरवेजचं विमान मुंबईला माघारी कसं वळवण्यात आलं , याच्या बातम्या होत्या . ‘हितवाद’ या दैनिकात सविस्तर बातमी होती . त्या बातमीप्रमाणं , ‘ते तिघे’ गोंदियाचे प्रवासी होते आणि त्यांचे

नागपूरला जाणारे जेट एअरवेजचे ते विमान चुकले होते . नागपूरहून निघणाऱ्या पहाटेच्या विमानानं त्यांना आखाती देशात जायचं होतं . मात्र त्यांना आखाती देशात घेऊन जाणारं विमान सुटण्याआधी नागपूरला पोहोचणं शक्य नव्हतं . देशाचे नागरी विमान विमान वाहतूक मंत्री ( स्वतंत्र कार्यभार ) तेव्हा प्रफुल्ल पटेल होते . तेही गोंदियाचे आणि सहाजिकच त्या तिघांचे मित्र होते . त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी लग्गेच संपर्क साधला आणि निर्माण झालेली अडचण सांगितली . मित्रांची अडचण मित्र ओळखणार नाही तर कोण ? ‘प्रफुल्ल पटेल बोले आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय हले’ अशी स्थिती तेव्हा होती . त्यामुळे अडचण सोडवण्यात नियमांचा अडसर सहाजिकच येणार नव्हता . अगदी तसंच घडलं . आमचं विमान हवेतूनच माघारी मुंबईला वळवण्यात आलं . ‘मित्र धर्म’ पाळला गेला . अन्य वृत्तपत्रातही कमी अधिक प्रमाणात अशाच आशयाच्या बातम्या होत्या . मात्र या माहितीबाबत नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही , असं सर्वच बातम्यात म्हटलेलं होतं आणि यातून ‘friend in need is friend indeed’ म्हणजे काय , हे सर्वांना अर्थातच कळलं होतं !
हवाई प्रवास सुरु असताना वैद्यकीय किंवा तांत्रिक कारणामुळे किंवा पक्षांनी धडक दिल्यामुळे विमान माघारी वळवण्यात आल्याच्या घटना अधूनमधून घडतच असतात . सहज म्हणून माहितीच्या महाजालावर चाळलं ( सर्फिंग केलं ) तर अशा अनेक घटना घडल्याचं आढळून आलं मात्र , मित्र प्रेमापोटी उडणारं विमान माघारी वळवलं गेल्याची ही एकमेव घटना असणार . प्रफुल्ल पटेल यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणून अनेक ‘खेळ’ केले . विमानांची पळवापळवी हा तर त्यांचा आवडता ‘खेळ’ त्या काळात होता . त्यांचे हे खेळ भरपूर गाजले , कांही वादग्रस्तही ठरले . मात्र , मैत्रीपोटी गाजलेला हा एकमेव असावा .
अर्थात तानाजी सावंत यांच्या पुत्राच्या हवाई कारनाम्याशी आमचं विमान माघारी वळवल्याच्या घटनेची तुलना होऊ शकत नाही कारण तानाजी सावंत पुत्राचे विमान ‘चार्टर्ड’ होतं आणि ते परदेशाकडे उडत चाललं होतं . प्रफुल्ल पटेल यांचं कथित मित्र प्रेम म्हणजे पदाचा गैरवापर होता तर तानाजी सावंत यांचा विमान माघारी वळवून घेण्याचा यशस्वी ( ! ) ‘उद्योग’ म्हणजे ‘मॅन्युपलेशन’ फारच उच्च पातळीवरचं होतं . शिवाय त्यातला पैशांचा ‘स्टेक’ फारच मोठा आणि म्हणूनच सकाळच्या वरणाला संध्याकाळी फोडणी देऊन जेवणाऱ्या मध्यमवर्गीयांचे डोळे विस्फारवणारा होता .
तात्पर्य काय तर , स्व(कु)हेतू साध्य करवून घेण्यासाठी कशीही म्हणजे , हवेत उडणारं विमानही माघारी वळवून घेण्याइतकी सत्ता वाकवता येते , हेच खरं !
( विमानाचे छायाचित्र प्रातिनिधिक आहे )
■ प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९
praveen.bardapurkar@gmail.com