आईला मी माई , तिच्या आईला अक्का आणि माझ्या वडिलांना अण्णा म्हणत असे .
आई , पत्नी आणि कन्या वगळता कौटुंबिक नातेसंबंधाचे गुंते उलगडत बसणं किंवा त्यांची मुळं कुठे , कशी लांब पसरली आहेत यांचा शोध घेण्याची वृत्ती माझ्या रक्तात नाहीच मुळी . सख्खी बहीण आम्हाला नाही , आहोत ती भावंडं . आप्त म्हणून त्यांची सगळी खबरबात मला नसते आणि त्यांच्या कुटुंबात म्हणूनच माझीही ख्याली-खुशाली माहिती नसते . मात्र , दोन प्रश्न मला कायम पडत असत . पहिला म्हणजे बीड ते खामगाव हे अंतर कापत माई आणि अण्णा यांचं लग्न कोणी जुळवलं असेल आणि दुसरा प्रश्न म्हणजे माझा जन्म गुलबर्गा इथं का झाला , हा लेख लिहिण्याच्या निमित्तानं जी कांही शोधाशोध झाली त्यानिमित्तानं पहिल्या प्रश्नाचं उत्तर जुळवता आलं तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ठोस मिळालं .
■■
माझा जन्म कर्नाटकातील गुलबर्गा या गावचा . तिथे म्हणे त्यावेळी अण्णा नोकरी करत होते . पहाटे-पहाटे माझा जन्म झाला , असं माई सांगत असे आणि ‘मेल्यानं झोपही नीट होऊ दिली नाही’, लटकी तक्रार करत असे . माझा जन्म झाल्यावर कांहीच दिवसात अण्णांना महाराष्ट्राच्या उद्योग खात्यात समाविष्ट करुन घेण्यात आलं तर माईला आरोग्य खात्यात एएनएम (ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ) म्हणून एकाच वेळी नियुक्तीचे आदेश मिळाले . मग माझी रवानगी बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथे माईच्या माहेरी झाली . माझ्या आयुष्यात अक्काचा प्रवेश झाला तो असा . माझं शैशव आणि बालपण अक्काच्या कुशीत गेलं . तिचं उबदार ममत्व इतकं वैपुल्यानं मिळालं की त्या काळात मी तिलाच माझी आई समजत असे .
दत्तात्रेय खोडवे हे माझे आजोबा ; त्यांच्या पत्नीचं नाव गया . तीच आमची अक्का . पण , गया या नावानं तिला संबोधणारं माझ्या तरी पाहण्यात कधीच आलं नाही . आजोबांना आम्ही सर्वच भाऊ म्हणत असू . खोडवे कुटुंब मुळचं मराठवड्यातील हिंगोली या गावचं . तिथल्या मारवाड्याच्या एका पेढीवर भाऊंचे वडील मुनीम होते . त्या मालकांच्या मुलानं खामगावला पेढी काढायची ठरवली आणि त्याचा विश्वासू साथीदार म्हणून भाऊ म्हणजे , दत्तात्रेय खोडवे यांची रवानगी खामगावला झाली . खामगावच्या फरशीच्या पुलावर ती पेढी होती . तिथे एका बसक्या मेजावरच्या लाल कव्हर असलेल्या लांब चोपडीत कांही तरी लिहित असतानाचे धोतर , सदरा आणि काळी टोपी घातलेले गोऱ्या वर्णाचे भाऊ अजूनही आठवतात . मध्यम उंची आणि बऱ्यापैकी स्थूल अशी त्यांची शरीरयष्टी होती . आम्हाला बघितलं की ते उठत आणि शेजारच्या दुकानातून लिमलेटच्या मूठभर रंगीत गोळ्या आणून आमच्यात वाटत ; त्या आंबट-गोड गोळ्या चघळण्यात तेव्हा विलक्षण मजा आणि ऐटही वाटत असे . ती चव अजूनही जीभेवर कधीमधी रेंगाळते . अशात एकदा मित्रवर्य शाहू पाटोळे याच्या हातात त्याच रंगाच्या लिमलेटच्या गोळ्यांचं पाकीट दिसलं आणि मी ते असोशीनं ओढून घेतलं…शाहू पाटोळेला माझी असोशी कळण्याचं कांही कारणच नव्हतं…
■■
अक्का आणि भाऊ खामगावच्या पूरवार गल्लीत एका वाड्यात राहात . अक्का आणि भाऊंचा निम्न कनिष्ठ मध्यमवर्गीय संसार कुणी निंभोरकर म्हणून होते त्यांच्या याच वाड्यात फुलला . वाड्याच्या मागे हिरवीगार बारमाही शेती होती आणि ती घरच्या खिडकीतून दिसे . शेतात बोराची खूप झाडं होती . जाड गजांच्या खिडकीतून दिसणारी ती टप्पोरी बोरं पाहून तोंडाला पाणी सुटत असे . कधीतरी दादामामा शेतात जाऊन खूपशी बोरं तोडून खिडकीतून आत टाकत असे . आमच्या अगदी घराशेजारी आणखी एक वाडा होता आणि त्यात कायम कोरडी वैरण साठवून ठेवलेली असे . याच वाड्यात संडास होता . तो आम्ही वापरत असू . वैरण आणि मागे बारमाही शेती यामुळे घरात कायमच विंचू व जनावराचं दर्शन होत असे . साप आणि विंचू मारण्यासाठी आमच्या घरच्या दरवाजाआड एक जाड सोटा ठेवलेला असे . रात्री -बेरात्री संडासला जायचं असेल तर भाऊ किंवा एखादा मामा तो सोटा आणि कंदील घेऊन सोबत येत .
घरासमोर चांगली अठरा-वीस खणाची लांबुळकी ओसरी . घरात प्रवेश करावयाच्या ओसरीतल्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला असलेल्या देवडीत दिवेलागणी नंतर उजेडासाठी चिमण्या ठेवलेल्या असत . आमचा मुक्काम या ओसरीतच असे . भाऊही पेढीवरुन आले की त्यांचा बहुतांश ठिय्या याच ओसरीवर असे कारण घरात चुलीतल्या लाकडांचा एक विशिष्ट वास असलेला धूर पसरलेला असे . अक्काचा स्वयंपाक होईपर्यंत सतत सुपारी कातरत भाऊ शांतपणे बसून असत आणि अक्कानं आवाज दिला की लगबगीनं उठत जेवायसाठी आत जात . घरातल्या जुजबी चौकशांनंतर भाऊ फार कांही बोलत नसत . संध्याकाळी ओसरीवरच्या त्या चिमण्यांच्या प्रकाशात सावल्यांचा खेळ सुरु होत असे आणि एकट्यानं तिथं बसण्याची मग जाम भीती वाटत असे . त्यातच पावसाळ्यात ढग गडगडत असले की ही भीती फारच तीव्र होई आणि धुराची पर्वा न करता मी अक्काच्या मागे मागे फिरे किंवा तिच्या कुशीत लपत असे .
वाड्याला असलेली ओसरी ओलांडली की पाच-सहा पाऊलांचं जोतं , पुढे पायऱ्या , त्या उतरल्या की खुली नाली , त्याआधी एक नळ आणि मग रस्ता . गल्लीतले सगळ्यांचे नळ असेच रस्ता आणि नालीलगत होते . या नळांना दररोज संध्याकाळी दोन-अडीच तास पाणी येत असे तेव्हा , गल्लीची लगबग उडे . उन्हाळ्यात घरासमोर नळाचं पाणी शिंपडल्यावर मृदगंध पसरत असे . घरचं पाणी भरुन होईपर्यंत पाण्याच्या बादलीत बुचक बुचक हात घालत मी खेळत बसलेला असे . मामांना ते आवडत नसे पण , अक्काची जरब अशी की ती समोर असेपर्यंत मला कुणी बोलत नसे आणि ती घरात गेली की मामा मला टप्पू मारल्याशिवाय सोडत नसत .
या गल्लीत राहणारी फैजपूरकर , गोळे , भाले , गोळीवाले अशी कांही आडनावंच आता आठवतात . नोकरदार फैजपूरकर बहुदा वरच्या पदावर असावेत . त्यांची मुलं नीट-नेटकी , स्नो-पावडर , गंध लावून आणि ऊंची झुळझुळीत कपडे ल्यायलेली , पायात चपला वगैरे घातलेली असत . त्यांच्या घराला छानसा रंग दिलेला आणि रंगी बेरंगी पडदे लावलेले असत . आमचं घर असं सजलेलं नव्हतं शिवाय आमचे कपडे हरक प्रकारातले ( स्वस्त दर्जाचं कापड ) आणि तेही वर्षातून दसऱ्याच्या वेळी दोन जोड्या मिळत .
पुरवार गल्लीत मी खूप खेळलो आणि धडपडलोही . जखम झाली माझ्या रडण्यापेक्षा त्या जखमेला हलक्या हातानं हळद लावून देणाऱ्या अक्काचाच चेहेरा रडवेला होत असे . या गल्लीच्या एका कोपऱ्यावर गालफाडे यांचं घर होतं ; ते माझी सख्खी मावशी मालती हिचं सासर . आम्ही तिला ‘मालू मावशी’ म्हणत असू . सायकलच्या टायरचं रिंगण किंवा लोखंडी गजाची चाकोरी खेळताना त्या घराच्या पुढे न जाण्याची सक्त ताकीद मला होती . चक्कर मारुन येताना ठरल्यापेक्षा जास्त वेळ लागला तर लगेच अक्का मला शोधायला निघत असे . गल्लीत खेळात भैय्यामामा बराच द्वाड होता . तोच खेळात आमचा हिरो आणि गल्लीतल्या आम्हा मुलांचा ‘दादा’ही होता . त्यामुळे आम्हाला कुणी फार कांही छळत नसे . भैय्या मामा नंतर नागपूरला गेला . त्याच्या जगण्यात संघर्ष फारच आला पण तो कधी डगमगला नाही हे मात्र खरंच .
■■
अक्काला दोन मुली आणि पांच मुलगे . थोरली शोभा , मग मालती आणि त्या नंतर श्रीकृष्ण ( त्याला आम्ही दादामामा म्हणत असू ) , अनिल , अशोक , बाळ आणि अभय उर्फ भैय्या . यातल्या शोभा म्हणजे माईचा मी तिसरा मुलगा . शिवाय मी आणि माझा आणखी एक भाऊ विकास , असा हा सगळा कुटुंबकाबिला अक्का एकहाती सांभाळत असे . सगळ्यांचं संगोपन , खाणं-पिणं , आजार , त्यासाठीची रात्रीची जागरणं , औषधं , सकाळी लवकर उठून शाळेत जाणाऱ्यांची तयारी , भाऊंना डबा करुन देणं , दिवसभराची उस्तरवारी , पाणी आणून भरणं , चुलीवरचं स्वयंपाकपाणी , आले-गेले , सणवार अशी ती कामात सतत आकंठ बुडालेली असे पण , कुठून जरी माझा तिला रडका स्वर ऐकायला आला की ती पटकन लगबगीनं येत उचलून घेत असे आणि समजूत घालत असे , लाड करत असे . जाता-येता माझ्या तोंडात गूळ-खोबरं किंवा खडीसाखर सरकवत असे , खिशात लाह्या-फुटाणे टाकत असे , मायेनं जवळ घेऊन कुरवाळत असे , मला आलेला घाम पदरानं टिपत असे . ‘लेकरांची आई नाही इथं’ हे स्पर्शातून जाणवणारं तिचं वात्सल्य आठवून अजूनही कधी कधी माझा गहिवर उष्ण होतो .
गयाबाई म्हणजे अक्काचं माहेर बीड . तिथल्या कुण्या एका जोशी कुटुंबातील गया ही मुलगी . तिला दोन भावंडं . काशीनाथ आणि वसंतराव . बीडची गया हिंगोलीच्या खोडवे कुटुंबातल्या दत्तात्रेयशी विवाहबद्ध झाली आणि वऱ्हाडातल्या खामगावी पोहोचली . तिथंच तिच्या संसाराचा विस्तार झाला . बीडशी नाळ असल्यानंच अक्काची पहिली मुलगी शोभा हिचा विवाह बीडच्या बर्दापूरकर कुटुंबातल्या गोविंदशी झाला असावा , असा तर्क आता काढता येतो .
अक्का शिकलेली होती की नाही माहिती नाही पण , तिला अक्षर ओळख नक्कीच असावी कारण मुलांची शाळेची पुस्तक चाळताना ती अनेकदा दिसे . मात्र , तिच्या बोलण्यात म्हणी आणि पुराणातले दाखले भरपूर येत . नऊवारी पातळ नेसणारी अक्का मध्यम उंचीची , काटक बांध्याची , टपोऱ्या काळ्याशार डोळ्यांची आणि लख्ख सावळी होती . कपाळावर ठसठशीत कुंकू , डोईवरचे केस तेल लावून चिपडून बांधलेले असायचे . सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्का हसरी होती . एका मुनीमाचा पगार काय तो असणार ? त्यात पदरी एवढा मोठा कुटुंबकाबिला ओढून नेण्याची पडलेली जबाबदारी , मग तिला स्वतंत्र अस्तित्व असणार कसं ? या अपरिहार्य परिस्थितीमुळे दाग-दागिने , हौस-मौजेला थाराच नव्हता म्हणून तिनं हा हसरेपणा स्वीकारला असणार तत्कालीन बहुसंख्य स्त्रियांची ही , खरं तर वाचा न फुटलेली अपरिहार्य आगतिकता होती . अक्काही त्याच अगतिकतेच्या प्रवाहातील एक थेंब बनून गेली असणार .
■■
माईचं जगणं अनुभवताना आणि वयानं प्रौढ झाल्यावर तिच्या त्या जगण्याकडे समंजसपणे बघताना जाणवलेली एक बाब म्हणजे स्त्रियांची दु:ख हा बहुसंख्य वेळा निमूटपणे वाहणारा एक मौन प्रवाह असतो , अशी माझी पक्की धारणा झालेली आहे . त्यातच अक्का आणि माई या माय-लेकीही एका समान दु:ख आणि कधीही न भरुन आलेल्या सूत्रात समांतरपणे जगल्या ; हे एक क्रूरच साधर्म्य म्हणायला हवं .
अक्काचा एक मुलगा म्हणजे माझा मामा , अनिल एक दिवस अचानक खामगावच्या घरातून , तारुण्यात प्रवेश करण्याच्या वयात निघून गेला . अनिल मामा मुंबईला गेला आणि खोडवे कुटुंबापासून तुटला तो तुटलाच . तपशील आणि
कारण आठवण्याचं माझ वय नव्हतं पण , मला आठवतो तो केवळ आणि केवळ त्यावेळचा आकांत तसंच पदराचा बोळा तोंडात कोंबून अस्फुट हुंदके देत दैनंदिन काम उरकणारी अक्का…स्त्रीला मुक्तपणे दु:ख व्यक्त करु देण्याचा तो काळ नव्हता आणि त्यात फार कांही फरक अजूनही पडलेला नाही . एरवी मी कधी अक्काला फार ‘देव देव’ करताना बघितलं नव्हतं पण , त्या काळात ती दिवसातून वेळ मिळेल तेव्हा देवासमोर हात जोडून कांही तरी पुटपुटत असे . पुत्र वियोगाचं सावट बराच काळ अक्का आणि घरावर होतं . त्या काळात अक्का मला फारच जपायची . अगदी डोळ्याआडही होऊ द्यायची नाही . माझ्यात ती अनिल मामाला शोधत असेल का , असं आता राहून राहून वाटतं .
अनिल मामानं घर सोडलं . तो मुंबईला गेला . त्यानं त्या काळात काय केलं , काय भोगलं ते माहिती नाही पण , एक दिवस अचानक त्याचं कार्ड आलं आणि समजलं की तो मर्चन्ट नेव्हीत गेला आहे मग आमचं घर पुन्हा अक्काच्या अस्फुट हुंदक्यात वाहून गेलं . पुढे एकदा अचानक अनिल मामा घरी आला . तो एकदम टिपटॉप स्वच्छ पॅन्ट-शर्ट मध्ये होता . त्यानं सर्वांना दोन ट्रंक भरुन अप्रुप वाटणारं कांही ना कांही आणलेलं होतं . त्यात चावी दिल्यावर टाळ्या वाजवणारी बाहुली अजूनही मला आठवते . ती बाहुली पाह्यला पुरवार गल्ली लोटली होती . अनिल मामा चार-पांच दिवस होता पण , ना तो कोणाशी धड बोलला न वागला . तो जसा अचानक आला तसाच निघून गेला . पुढं त्यानं परधर्मीय मुलीशी प्रेमविवाह केल्याचं समजलं . त्याला मुलगी झाली वगैरे तुटक तुटक असं कांही आम्हाला समजत असे . अनिल मामाच्या संदर्भात कुणीही उघडपणे कांहीही न बोलण्याचा जणू खोडवे यांच्या घरातला संकेतच होता .
इथं एक उपकथा सांगायला हवी- मी पुढे पत्रकारितेत आलो . नाव होऊ लागलं आणि एक दिवस अनिल मामाचा फोन आला . मी माईचा मुलगा ही खात्री त्यानं करुन घेतली . मर्चन्ट नेव्हीतला करार संपवून एव्हाना तो भारतीय हवामान खात्यात नोकरीत स्थिरावला होता . मुंबई विमानतळावर त्याचं पोस्टिंग होतं . मग तो साधारण महिन्यातून एकदा तरी रविवारी सकाळी फोन करत असे आणि खूप चौकशा करत असे . ( नागपूर पत्रिका या दैनिकाचा मुख्य वार्ताहर असल्यानं माझ्या घरी तेव्हा म्हणजे १९८२ पासून फोन होता ! ) त्याच्या बोलण्यातून अक्काविषयी असणारी अटॅचमेंट लपत नसे . अनिल मामाला देण्यासाठी नागपूरला असलेल्या भैय्या मामाकडून मी सर्व माहिती जमा करत असे . अनिल मामाच्या कल्याणमधल्या घरी मी आणि बेगम मंगला एकदा जाऊन आलो . घर सामानानं गच्च भरलेलं होतं . त्याच्या घरी कासव असण्याचं कौतुक मला वाटलं . नंतर एकदा त्याची मुलगी म्हणजे , माझी मामे बहीण ( तिचं नाव विसरलो आता . ) आमच्या नागपूरच्या घरी येऊन राहून गेली .
हे अक्काला कळल्यावर उमरखेडच्या माझ्या चकरेत ती , अनिल मामाच्या खूप चौकशा करत असे . ‘’मामा तुझ्या आठवणीनं रडला चक्क’ , असं एकदा मी खोटंच अक्काला सांगितलं अन अक्काचं वात्सल्य डोळ्यावाटे वाहू लागलं . मधल्या काळात बाळ मामाचं आकस्मिक निधन झालेलं होतं . पुत्र वियोगाचं अक्काचं दु:ख अपार होतं…
चार मुलगे पदरी असलेल्या माईला वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्य पत्करावं लागलं . माईलाही पुत्र वियोगाचं दु:ख सहन करावं लागलं . तिचा नंबर दोनचा मुलगा विकास ( त्याला आम्ही चंदू म्हणून संबोधत असूत ) त्याच्या वयाच्या १६/१७ व्या वर्षी तडकाफडकी घर सोडून गेला . आठ दिवसांनी हे माईला अंधानेरला कळल्यावर तिचा फुटलेला बांध आठवला की मी अजूनही अस्वस्थ होतो . नंतर कुठंही गेलं की गर्दीत माईचे डोळे विकासला शोधत असल्याच लक्षात आल्यावर माझ्या हृदयात कालवाकालव होत असे . तिच्यासोबत राहिलो असतो तर तिची ती घुसमट मी सहनच करु शकलो नसतो…मॅड झालो असतो नक्की . त्यातच मीही लवकरच घर सोडून पंख पसरुन उडालो आणि माईला त्याचा फार त्रास झाला असणारच…
अक्का आणि माई या मायलेकीतलं , पालवीही न फुटलेल्या संचितांच्या शुष्क ऋतुसारखं पुत्र वियोगाचं दु:खसूत्र असं एकाच नाळेचं का , हे कोडं मला आजपर्यंत उलगडलेलं नाही .
■■
माईची बीड जिल्ह्यातल्या नेकनूर या गावी बदली झाली . नेकनूरला रुजू झाल्यावर खामगावला येऊन माई मला आणि विकासला घेऊन नेकनूरला परतली तेव्हा मी इयत्ता तिसरीत होतो . खामगाव सोडताना अक्कानं खूप वेळ मला घट्ट आवळून धरलं . तिचे डोळे थांबायलाच तयार नव्हते . ‘बसची वेळ झाली’ अशी घाई टांगेवाल्यानं सुरु केल्यावर अक्कानं तिच्या कवेतून मला माईकडे सोपवलं .
नंतर माईच्या बदल्या झाल्या तसे बीड जिल्ह्यात पाटोदा , डोंगरकिन्ही , धोंडराई , तलवाडा आणि मग औरंगाबाद जिल्ह्यात अडुळ , लोणी , खंडाळा , अंधानेर असे आमचे मुक्काम बदलत गेले . अक्काचाही प्रवास खामगाव , दिग्रस , उमरखेड असा झाला . दिग्रसला असतानाच आमचा बाळमामा अचानक गेला आणि पाठोपाठ भाऊही गेले . मलेरिया निरीक्षक असलेल्या लाघवी अशोक मामा आणि शिक्षक असलेल्या उज्ज्वला मामीकडे खचलेली अक्का मग उमरखेडला कायमची राह्यला आली . त्यांच्या संसारात अक्कानं स्वत:ला गुंतवून घेतलं . मी बहुदा एक-दोन वर्ष आड तरी उन्हाळ्यात उमरखेडला जात असे . नंतर पत्रकारितेच्या निमित्तानं माझा पडाव नागपूरला पडला पण , धबडग्यात अडकलो आणि चकरा कमी झाल्या .
■■
अक्काला मी शेवटचा भेटलो ते १९८९ च्या एका उन्हाळ्यात . तारीख नाही आठवत पण वार आठवतो ; बुधवार होता तो . उमरखेडच्या आठवडी बाजाराचा दिवस . कुठल्या तरी वृत्त संकलनासाठी नांदेडला गेलो होतो . नागपूरला परतताना दुपारी उमरखेड गाव लागलं . अक्काची खूप आठवण झाली आणि भूकही लागलेली होती . कंडक्टरला सांगून उतरलो आणि पायीच चालत घरी गेलो . दार वाजवलं तर दरवाजा अक्कानंच उघडला . तिनं मायेनं जवळ घेतलं .
अक्का थकली होती . कांहीशी वाकलीही होती . पती , एक मुलगा आणि दोन्ही मुलींच्या मृत्यूच्या तसंच एका पुत्र वियोगाच्या खुणा तिच्या चेहेऱ्यावर जागा मिळेल तशा पसरलेल्या होत्या . तिचं दु:ख अथांग होतं . समाधानाचे फारच कमी पाझर त्या अथांगतेत असल्याचं तिचा चेहेरा सांगत होता .
‘अण्णांच्या वळणावर गेलास वाटतं ?’ तिनं विचारलं .
कांही कळलं नाही म्हणून , ‘म्हणजे काय’, मी विचारलं .
‘सिगारेटी पितोस ना ?’ तिनं विचारलं . मी ओशाळलो .
थोडा वेळ असाच गेला . ‘भूक लागलीये . जेवायला वाढ कांही तरी’, म्हणत मी आत गेलो . हातपाय धुवून कपडे बदलून आलो तर ती स्वयंपाक घरात होती . तिकडे गेलो आणि पाट ओढून बसलो . तेवढ्या दुपारी चूल पेटवून माझ्यासाठी ती भाकरी थापत होती . मग तव्यावरचं मला आवडणारं खरपूस पिठलं तिनं केलं . जेवायला वाढलं . दही-भात कालवून दिला . शक्य असतं तर लहानपणी भरवायची तसं तिनं भरवलंही असतं…
जेवण झाल्यावर सतरंजी अंथरुण अक्काच्या मांडीवर डोकं ठेवून मी पडलो . मागच्या दरवाजाला लागूनच बाजार भरलेला होता . तो कलकलाट ऐकू येत होता तरी आमच्या गप्पा सुरु होत्या . अनिल मामाचा विषय झाल्यावर तिनं माझ्या चौकशा केल्या . माझ्या लेकीची विचारपूस केली . ‘तिला सोबत आणणार की नाही आणखी एक तू आणि मंगल ?’ असं विचारल्यावर मी म्हणालो , ‘आम्ही एकावरच थांबायचं ठरवलं आहे’ .
ती क्षणभर गप्प झाली आणि सुस्कारा टाकत म्हणाली , ‘बरं केलंत तुम्ही . माझा तर मेलीचा सगळा जन्म तर मुल-बाळं आणि स्वयंपाकातच गेला . जगणं कसलं ते बायकांचे भोगच….मग कांही वेळ शांत राहून अक्का म्हणाली , ‘मंगलच्या श्रुतिका ऐकते मी , सांग तिला . अजून खूप लिहायला सांग तिला ’. एक पॉज घेऊन मोठ्या उत्सुकतेनं अक्कानं विचारलं , ‘ती तुझ्यापेक्षा वयानं मोठीये का रे खरंच ?’
‘वयानंच नाही तर शिकलेलीही जास्त आहे , अन माझ्यापेक्षा हुशार आहे मंगला’ हे मी सांगितल्यावर तर वाटलेलं अप्रुप तिच्या चेहेऱ्यावर प्रसन्नपणे विसावलं .
अशा गप्पा सुरु असतानाच वारे जोरात वाहू लागले .
ढगही गडगडू लागले .
वळवाच्या पावसाची जोरदार सर आली .
गाराही पडल्या .
हा पाऊस शुभ समजला जात नाही .
आजकाल या पावसाला अवकाळीही म्हणतात .
असा पाऊस सुरु झाला की , बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या-
वळवाचा पाऊस पडून ओसरला
भावाला झाल्या लेकी बहीण ईसरला
या ओळी कातर आवाजात म्हणत डोळे पुसणारी माई मला आठवली .
मी विचारलं, ‘माईची आठवण येते का गं कधी तुला ?’ तोवर माईचा मृत्यू होऊन दहा-एक वर्ष उलटलेली असावीत .
काहीच न बोलता तिनं मान डोलावली .
तिच्या डोळ्यात आठवणींचे ओले ढग दाटून आल्याचं दिसलं .
काही वेळ अक्का स्तब्ध बसली आणि मग म्हणाली , ‘अरे माझ्या गर्भातनं आलेली नं ती . कशी विसरेन तिला…शेवटची भेटही झाली नाही…खूप खस्ता खाव्या लागल्या तिला जगताना…’असं बरंच काही ती बोलत राहिली .
मग मी अक्काला वळवाच्या पावसाची आठवण सांगितल्यावर तिचे डोळे घळाघळा वाहू लागले .
ते अश्रू माझ्या आजीचे नव्हते तर माईच्या आईचे होते .
दोन दशकं वैधव्याचं ओझं वागवत वयाच्या ४७व्या वर्षी मृत्युच्या अधीन झालेल्या लेकीशी असलेल्या अक्काच्या मातृत्वाशी असलेली अश्रुंची ती नाळ होती .
त्या अश्रूंच्या स्पर्शानं स्त्रीत्वाचा आणखी एक अर्थ मला उमगला .
नकळत माझेही डोळे वाहू लागले…लहानपणी थोपटायची तसं अक्का मला तिच्या कृश हातांनी थोपटू लागली . माईचं वात्सल्य अगदी सेम टु सेम अक्काच्या स्पर्शातून जाणवू लागलं . एका विलक्षण अनुभूतीच्या जगात प्रवेश केल्या सारखं वाटत होतं . त्या स्पर्शानं मी गुंगावलो . डोळा केव्हा लागला हे समजलं नाही .
■■
जाग आली तर अशोकमामा आणि उज्ज्वलामामी आलेले होते .
अक्का चहा करत होती .
दुसऱ्या दिवशी निघताना मामा , मामी आणि अक्काच्या पाया पडलो . अक्कानं शंभर रुपयांची एक नोट सायलीसाठी आणि एक पांच रुपयाचं नाणं माझ्या हातात सरकवलं .
नागपूरला परतताच शंभराची नोट सायलीसाठी बेगमकडे दिली आणि अक्काचा निरोप सांगितला .
पांच रुपयाचं ते नाणं माझ्या पैशाच्या पाकिटाच्या एका कप्प्यात अजूनही जपून ठेवलेलं आहे…अधूनमधून मी ते चाचपडून पाहतो तेव्हा अक्का आणि माईची याद गडद होते , त्या दोघींचाही स्पर्श झाल्याचा भास होतो…अजूनही…
■■
अक्का या जगातून निघून गेली तेव्हा मी भारतात नव्हतो . मॉरिशसला होतो . नागपूरला परतल्यावर बेगमनं निरोप दिला .
कांही वेळ सुन्न होऊन बसून राहिलो . साडेसातपेक्षा जास्त दशकं बीड ते उमरखेड असा आयुष्याचा प्रवास केलेली अक्का उमरखेडच्या अनंतात कधीच विलीन झालेली होती .
त्या नंतर कधीही उमरखेडला जायची इच्छा झाली नाही .
पत्रकारांच्या राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीसाठी जाताना एकदा त्या रस्त्यावर चालकानं कार घातली पण , वाशिम , हिंगोली मार्गे नांदेडला जाऊ यात असं मी सांगितलं . लांबच्या रस्त्यानं जाणं आवडलेलं नसल्याचं त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसलं .
अक्का नसलेल्या गावात जायचं कशाला ?
( ■‘वाघुर’दिवाळी अंकात प्रकाशित लेख )
■■
( ■संदर्भ सहाय्य- अशोक खोडवे , नागपूर आणि अवधूत प्रभाकर गालफाडे , खामगाव . )
■प्रवीण बर्दापूरकर
Cellphone +919822055799