जांबुवंतराव नावाचं एकाकी वादळ!

तेव्हा; आमच्या लहानपणी शाळेला सुट्या लागल्या की मामाच्या गावाला जाण्याची प्रथा होती. मला तर चार मामा होते. पण, मला उमरखेडच्या अशोकमामाकडे जायला आवडायचं कारण आजी-तिला आम्ही अक्का म्हणत असू, फार लाड करत असे. अशोक खोडवे हा मामा आणि मामी दोघीही शासकीय नोकरीत होते. उमरखेडच्या आठवडी बाजाराला लागून असलेल्या एका भल्यामोठ्या वाड्यात ते राहात असत. मी सातवीत होतो आणि प्रसंग आहे १९६७च्या उन्हाळ्यातला. एक दिवस अशोकमामा म्हणाला, ‘चल तुला भाऊंच्या सभेला घेऊन जातो’. पर्यायच नव्हता. गेलो-उमरखेडच्या मुख्य चौकात एक व्यासपीठ उभारलेले होतं, लाउडस्पीकरवर जोरजोरात देशभक्तीपर गाणी वाजत होती. मध्यभागी मोकळी जागा आणि चोहोबाजूनं दुकान अशी ती रचना होती. चौक माणसांनी तुडुंब भरलेला होता. मामाच्या ओळखीच्या एका दुकानदाराच्या दुकानात आम्ही विसावलो. ते दोघं बोलत असतांना मी चौकातलं वातावरण उत्सुकतेनं बघत होतो. थोड्याच वेळाने भला मोठा गलका झाला. ‘वारे शेर, आया शेर’, ‘विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणांनी तो परिसर दुमदुमून गेला. हा असा नजारा पहिल्यांदाच पाहत होतो. थोड्या वेळानं व्यासपीठावर मोठी लगबग उडाली. एकाच वेळी अनेक आवाज वातावरणात घुमू लागले. युध्दाच्या समयी रणदुंदुभी कशा वाजत असतील याचा अंदाज त्यामुळे आला. थोड्या वेळानं सर्व आवाज थांबले आणि आणि धिप्पाड शरीरयष्टी असलेला, दाढीधारी माणूस बोलायला उभा राहिला. त्याचं बोलणं ऐकण्यासाठी जमाव उत्सुक झाला. पिनड्रॉप शांतता पसरली. एखादा प्रपात कोसळावा तसं ते वक्तृत्व सुरु झालं. श्वास रोखून-नजर खिळवून जमाव ऐकत होता.

वेगळा विदर्भ, अन्याय असं काही त्या भाषणात होतं आणि ते माझ्या आवाक्याच्या बाहेरचं होतं. पण, एवढा मोठा जमाव त्या दाढीधारी माणसाच्या बोलण्यानं गुंगावलाय हे बघणं मोठं रम्य होतं. त्यात तंद्री लागली आणि अचानक वीज प्रवाह खंडीत झाला. काही दुकानात सुरु असलेल्या पेट्रोमॅक्सचा उजेड त्या चौकासाठी पुरेसा नव्हता. अचानक तोच आवाज करडेपणानं वातावरणात कडाडला, ‘कोणीही जागून उठायचं नाही आणि आया-बहिणीला जर कोणी हात लावला तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे’. नंतर सभेत मेणबत्त्या वाटल्या गेल्या, त्या पेटवून, हातात घेऊन लोक उभे राहिले. त्या प्रकाशात भाषण सुरु झालं…रात्री झोपेतही मेणबत्त्यांचा प्रकाश आणि तो वक्तृत्वाचा प्रपात दिसत राहिला. तो प्रसंग आजही मनात जसाच्या तशा आहे. जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाची बातमी आल्यावर तोच प्रसंग पुन्हा आठवला.

पुढे पत्रकारितेत आल्यावर जांबुवंतराव धोटे नावाच्या नेत्याची आभा आणि महती कळली. चिपळूणला सागर या दैनिकात पत्रकारिता करत असतांना त्यांचं विधानसभेत पेपरवेट भिरकावणं आणि आकाशाला साक्षी ठेऊन समुद्रकिनारी केलेला विवाह गाजला. (त्यावेळी माझा सहकारी भालचंद्र दिवाडकर यानं फारच मस्त अग्रलेख लिहिल्याचं स्मरणात आहे). जांबुवंतरावांचा कॉंग्रेसप्रवेश आणि राजकारणातल्या कोलांटउड्या बघायला मिळाल्या. १९८१च्या जानेवारी महिन्यात पत्रकारिता करण्यासाठी मी नागपूरला पडाव टाकला. आमचे बॉस आणि नागपूर पत्रिकेचे मुख्य वार्ताहर दिनकर देशपांडे यांची जांबुवंतराव यांच्याशी चांगली जान-पहेचान होती. त्यांच्यासोबत जांबुवंतराव धोटे यांची ‘याचि देही याचि डोळा’ भेट झाली.

धुम्रपान आणि तंबाखू खाणारांचा जांबुवंतरावांना टोकाचा तिटकारा. पत्रकार भवनात ते आले आणि कोणी पत्रकार जरी धुम्रपान करत असला तर सरळ ते त्याला बाहेर जायला सांगत. हा फटका एकदा मलाही बसलेला आहे! जांबुवंतराव धोटे यांची लोकप्रियता अफाट होती आणि त्याला धाडसाची जोड होती. महिलांची झालेली छेडछाड किंवा महिलांवर होणारी शेरेबाजीची त्यांना नफरत होती. असं काही त्यांच्या आसपास घडल्याचं लक्षात आलं तर ते करणाराची गय नसे; जांबुवंतरावांचा दणकट पंजा त्याच्या गालावर मस्त आवाज करतांना अनेकांनी ऐकला आहे. महिलांचा आदर करण्याच्या याच भूमिकेतून बहुदा त्यांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या नागपूरच्या महिलांकडून राखी पौर्णिमेला राखी बांधून घेण्याचा उपक्रम सुरु केला आणि तो अनेक वर्ष पाळला; त्यांच्या या उपक्रमात तेव्हा शेकडो लोक सहभागी होत असत. उपेक्षेच्या खाईत जगणाऱ्या या वर्गातील स्त्रियांना त्यामुळे मिळालेला आत्मविश्वास आणि झालेलं आनंद शब्दात सांगणं कठीण आहे. ज्या नेत्यासाठी हजारो लोक जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरत, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खात, बंदुकीच्या गोळ्या झेलत ते जांबुवंतराव धोटे वागायला-बोलायला एकदम ‘डाऊन टू अर्थ’ होते. दर्शन आणि वर्तन उग्र-काहीसं रासवट पण, मनानं मात्र खूपच हळवं, हे त्यांचं वैशिष्ट्य लवकरच लक्षात आलं. कवितेत रस असणारं, गाणं आणि संगीताची मर्मज्ञ जान असणारं, अभिनयात रुची असणारं, वाचक असं त्यांचं लोभस व्यक्तिमत्व आहे, हे हळूहळू उलगडत गेलं. पांढरे स्वच्छ कपडे, हातात जाडजूड कडं, छातीपर्यंत वाढलेली दाढी, डोईवरच्या केसांचा बुचडा बांधलेला. झपझप पायी चालणं, एसटी बसनं प्रवास करणं आणि समोर दिसेल त्याला नमस्कार करणारा हा एकमेव नेता मी विदर्भात बघितला. हळूहळू संपर्क वाढला आणि भीड चेपून मग मीही त्यांना ‘भाऊ’ म्हणायला सुरुवात केली. तोवर राजकीय पटलावरचं जांबुवंतराव यांचं प्रस्थ कमी झालेलं होतं मात्र, सुंभ कायम होता. अंगार थंडावला असला तरी धग कायम होती; नुसतीच कायम नाही तर त्यातली ऐट मुळीच कमी झालेली नव्हती. ते रस्त्यानं चालले तरी, कौतुकाच्या अगणित नजरा त्यांचा पाठलाग करायच्या आणि ते कळून जांबुवंतराव खूष होत असल्याचं अनुभवायला मिळायचं. मग माझ्या बालमनाच्या कुपीत ठेवलेलं उमरखेडच्या सभेचं स्मरण जांबुवंतराव यांना एकदा करुन दिलं; ती सभा त्यांना काही आठवली नाही पण, माझं ऐकल्यावर खूप हंसले आणि त्यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीच्या आठवणीत रमले.

आता पत्रकारांशी बोलतांना राज ठाकरे यांना बघितलं की मला जांबुवंतराव यांची आठवण होते. पत्रकार परिषद सुरु असताना धुम्रपान नाही, तंबाखू नाही हे त्यांचं कडक फर्मान पाळावंच लागे. शिवाय पत्रकार परिषद ते बोलवत पण, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं त्यांच्यावर बंधनकारक नसे. राज ठाकरे जसा ‘पुढे’ असा (दमवजा?) सल्ला देतात तसंच नाही; जरा वेगळं वागणं जांबुवंतराव यांचं असे. काहीच न बोलता तो प्रश्न उडवून लावल्याची कृती ते एका हातानं करत आणि दुसरा हात कुणाकडे तरी करत पुढचा प्रश्न विचारावा असं सुचवत; तुम्ही ‘किंचित आहात माझ्यासमोर’ हा त्यातून प्रकट होणारा भाव फारच बेडरपणाचा आणि अपमानास्पदही असे पण, कोणी पत्रकार त्याविरुध्द प्रतिकाराचा शब्दही उच्चारण्याचं धाडस करत नसे. कधी तर ते सरळ पत्रकार परिषदच गुंडाळून ताडताड पाऊले टाकत पत्रकार भवनाच्या बाहेर पडत! एकदा, ‘वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते असूनही तुम्ही शिवसेनेत कसे गेलात’ हा प्रश्न लाऊन धरल्यावर मलाही त्यांनी असंच उडवून लावलं. मग आम्हाला बोलावताच कशाला, वगैरे वाद मी घातला. अर्थात त्याचा जांबुवंतराव यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही.

जांबुवंतराव यांचा मी भक्त नव्हतो, समर्थक तर मुळीच नव्हतो; परस्परांत घनिष्ट सलगीही नव्हती. स्वतंत्र विदर्भाच्या विषयावर आमच्यात मतभेद होते आणि ते अनेकदा ठिकठिकाणी व्यक्तही झालेले आहेत. नियमित नसलं तरी आम्ही अधूनमधून भेटत असू. २/३ वेळा मी त्यांना यवतमाळच्या घरी भेटलो आहे. हे घर बड्या नेत्याचं असं कधीच वाटलं नाही. भेट झाल्यावर वडिलधाऱ्या आत्मीयतेनं ते विचारपूस करत. ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचा मी आधी निवासी संपादक आणि मग संपादक झाल्यावर आमच्या भेटीचं स्थान, नागपूरलगत असलेल्या दाभा या गावी असलेल्या डॉ. झिटे यांचा निसर्गोपचारासाठी परिचित असलेल्या आंतरभारती आश्रमतली एक साधीशी, भरपूर नैसर्गिक हवा खेळत असणारी झोपडी असे. त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेल्या सर्वच बातम्यात कट्टर विदर्भवादी असा उल्लेख आलेला आहे. एकदा त्यांनी बोलतांना सांगितलं होतं की, सुरुवातीच्या काळात ते संयुक्त महाराष्ट्रवादी होते पण, वसंतराव नाईक मुख्यमंत्री असूनही विदर्भाच्या अगदी साध्यासाध्या वाजवी मागण्या संमत होण्यासाठी सभागृहात संघर्ष करावा लागे. विदर्भात कृषी विद्यापीठ स्थापन व्हावं ही मागणी वसंतराव नाईक यांनी फेटाळल्याचा इतका संताप जांबुवंतराव यांना आला की, ते तसेच विधानसभेतून बाहेर पडले आणि त्यांनी एक मोठं जनआंदोलन उभं केलं. हे आंदोलन बराच काळ चाललं. राज्याच्या पश्चिम महाराष्ट्रीय नेतृत्वाकडून विदर्भाला डावललं जाण्याच्या सलग स्वानुभवातून ते विदर्भाच्या मागणीचे कट्टर पुरस्कर्ते होत गेले. नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेकडे ते का आकर्षित झाले असावेत याचं उत्तर, मला वाटतं इथं असावं.

याच गप्पांतून अनेक राजकीय किस्से ते सांगत. कुमार केतकर, अरुण साधू, विद्याधर दाते या आमच्यासाठी आयडॉल असणारांचा तसंच अनेक बड्या राजकीय नेत्यांचा उल्लेख ते अविश्वसनीय वाटावं अशा ‘अरेतुरे’नं करत. इंदिरा गांधी यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता आणि त्यांच्याही आठवणी ते सांगत. एकदा मी या संदर्भात कुमार केतकरांना विचारलं तेव्हा केतकर म्हणाले, ‘जांबुवंतराव एकही शब्द अतिशयोक्तीचं बोलत नसणार, याची खात्री बाळग!’ राजकारण स्वच्छ असावं, जनताभिमुख असावं ही जांबुवंतराव यांची निष्ठा अतितीव्र होती आणि त्याबाबतीत प्रत्येक राजकीय पक्षाकडून त्यांच्या पदरी अपेक्षाभंग आला. त्यामुळेच सतत पक्ष बदलून ते योग्य पर्याय शोधत राहिले असावेत तरीही किनारा न मिळाल्यानं राजकीय पटलावर जांबुवंतराव नावाचं वादळ कायम एकटंच घोंगावत राहिलं. अगदी कॉंग्रेस सकट सर्वच प्रत्येक पक्षांनी त्यांचा केवळ वापर करुन घेतला. स्थानिक राजकारणात वसंतराव नाईक आणि जवाहरलाल दर्डा (जांबुवंतराव यांनी पहिली निवडणूक नगर परिषदेची लढवली आणि त्यात जवाहरलाल दर्डा यांचा पराभव केला होता!) यांच्याशी संघर्ष करण्यात त्यांचा उमेदीचा फार मोठा काळ गेला. ‘इलेक्टिव्ह मेरीट’ घेऊन सांसदीय राजकारणात उतरलेल्या जांबुवंतराव यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून जरा लवकर बाहेर पडावं लागलं; कारण तडजोडी हा त्यांचा स्वभावच नव्हता. इतका प्रचंड अनुयायी वर्ग असूनही त्यांच्यासोबत कायम मोजकेच लोक राहिले तरी, ते निष्ठांबाबत अविचल राहिले…एकटेच घोंगावत राहिले. विदर्भाच्या प्रश्नावर ते आणि बनवारीलाल पुरोहित या दोघांच्याच निष्ठा अविचल, अव्यभिचारी, पारदर्शी, निस्वार्थ होत्या आणि अनामत रक्कम जप्त झाली तरी याच एका मुद्द्यावर हे दोघे निवडणुका लढवत राहिले… लवचिकता नसल्यानं राजकारणात कोंडी झाली असं नाही का वाटत असं, एकदा मी त्यांना विचारलं तेव्हा ते ज्या पध्दतीनं हंसले आणि हातानं ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ ही कृती केली आणि ते गप्प झाले. त्यावरून हे त्यांनी उत्तरायुष्यात ओळखलेलं होतं पण, त्यांना त्यावर काहीच बोलायचं नाहीये हेच जाणवलं. त्यांच्या या मौनातून जाणवला तो त्यांचा अपेक्षाभंगाचं दु:ख व्यक्त न करण्याचा उमदेपणा!

हट्टीपणासदृश्य वाटणाऱ्या टोकाच्या तीव्र निष्ठा, तळहातावर कायम तेवत्या ठेवणारांची होणारी कोंडी सत्ताधुंद राजकारणात नवीन नाही; त्याचे अनेक दाखले देता येतील. सत्ताधुंदता, निष्ठाप्रतारणा हेच गुणवैशिष्ट्य झालेल्या वर्तमान राजकारणात जांबुवंतराव धोटे एखाद्या वाघासारखे वावरले आणि वादळासारखे घोंगावत राहिले. हा वाघ कोणत्याच राजकीय पक्षाच्या संधीसाधू मतलबाच्या पिंजऱ्यात अडकला नाही-अडकणं शक्यही नव्हतं. माणसांच्या ओंजळीत न मावणारा, झंझावाती वादळासारखा माणूस दहा हजार वर्षात एकदाच जन्माला येतो. जांबुवंतराव धोटे त्यापैकी एक.

(सर्व छायाचित्रे’गुगल’च्या सौजन्याने)

= प्रवीण बर्दापूरकर
(भ्रमणध्वनी- ९८२२०५५७९९)
praveen.bardapurkar@gmail.com
www.praveenbardapurkar.com

संबंधित पोस्ट