नितीन गडकरींची चुकलेली वाट!

भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून अखेर शपथ घेतली आणि स्वत:ची वाट स्वत:च चुकवून घेतली. मुळात नितीन गडकरी काही दिल्लीच्या दरबारात जन्मलेले आणि मग राष्ट्रीय नेते झालेले नव्हते. त्यांची राजकीय कारकीर्द महाराष्ट्रात एक आमदार म्हणून सुरु झाली. राज्यात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार सत्तारूढ झाल्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कर्तृत्वाची अशी काही उत्तुंग झेप त्यांनी घेतली की त्यांच्या धवल प्रतिमेसमोर मुख्यमंत्रीपदही खुजे ठरले. गडचिरोलीपासून मुंबईपर्यंत रस्ते आणि उड्डाण पुलांचे जे काही जाळे गडकरी यांच्या नेतृत्वाखाली खाजगी गुंतवणूक तसेच सार्वजनिक खात्याची फेररचना करून उभारले गेले; त्यामुळे या खात्याला सेना-भाजप युतीचे सरकार गेल्यावर ‘सोन्या’चा भाव आला. लालफितीत अडकलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याला पारदर्शीपणा आणि धडाडीसह कार्पोरेट लुक देत डोळे विस्फरवणारी कामगिरी बजावत नितीन गडकरी कर्तृत्ववान मंत्री म्हणून राष्ट्रीय पातळीवर पोहोचले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत की तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी की गडकरी यांच्या नेतृत्वाखाली बांधल्या गेलेल्या रस्ता म्हणा की पुलावरून प्रवास करणारे, अशा सर्वांचे नितीन गडकरी लाडके ‘पूलकरी’ ठरले. कार्यक्षम मंत्री कसा असावा याचा निकष म्हणून गडकरी यांची धडाडी आणि त्यांच्या कामगिरीची फुटपट्टीच तयार झाली! याच काळात विदर्भात सहकार आणि खाजगी गुंतवणुकीतून अनेकांना रोजगार देणा-या विविध उपक्रमांची पायाभरणी नितीन गडकरी यांनी केली. त्यात डिपार्टमेंटल स्टोअर, साखर कारखाना, वीज निर्मिती असे अनेक प्रकल्प होते. स्थानिक मग तो शेतकरी असो की शेतमजूर की मध्यमवर्गीय अशा सर्वाना गडकरी बांधून ठेवत होते ते रोजगाराची संधी देऊन. हे प्रयत्न म्हणजे पुढे वादग्रस्त ठरवला गेलेला पूर्ती उद्योग समूह होय.

याच दरम्यानच्या काळात पक्ष पातळीवर ज्या काही हालचाली महाराष्ट्रात सुरु होत्या त्यात नितीन गडकरी एक शक्ती म्हणून उदयाला आले. सेना-भाजप युतीची सत्ता गेल्यावर गडकरी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांचे एक वेगळे अभ्यासू तसेच आक्रमक रूप समोर आले. बी.टी. देशमुख यांच्यासोबत विकासाच्या अनुशेषाची लढाई सभागृहात आणि सभागृहाबाहेर सुरु केल्याने त्यांच्याकडे विदर्भाचे नेतृत्व आपसूक चालत आले आणि ‘विकासाचे राजकारण’ ही भूमिका ते मांडू लागल्याने राज्यात सर्वत्र त्यांचा संचार सुरु झाला. राज्यातील एक महत्वाचे नेते म्हणून गडकरी यांचा जम बसला. पक्षाच्या महाराष्ट्र पातळीवर तोपर्यंत मुंडे म्हणतील ती पूर्व दिशा आणि मुंडे यांच्या म्हणण्याला दिल्लीतून प्रमोद महाजन यांचा पूर्ण पाठिंबा अशी परिस्थिती होती. मुंडे-महाजन (प्रामुख्याने महाजन) यांना शह म्हणून लालकृष्ण अडवाणी यांनी नितीन गडकरी यांना राज्याचे पक्षाध्यक्ष केले आणि गडकरी यांच्या शब्दाला पक्षात वजन प्राप्त झाले. याच दरम्यान दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पक्षावरील पकड मजबूत होत गेली. केंद्रात शत-प्रतिशत भाजप योजनेने आकार घेतला. वाजपेयी-अडवानी युगाचा अस्त दिसू लागला. प्रादेशिक पातळीवरील नरेंद्र मोदी यांच्या सोबतीला नितीन गडकरी यांच्या नावाचा राष्ट्रीय पातळीवर उदय झाला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ‘बनेल’ दिल्लीत गडकरी दाखल झाले. २०१४ची निवडणूक मोदी-गडकरी या दुक्कलीच्या नेतृत्वाखाली लढवली जाण्याची योजना संघाच्या राबवली जाऊ लागली.. त्यासाठी गडकरी यांना अध्यक्षपदाची दुसरी टर्म देण्यासाठी पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली पण, पंतप्रधानपदावरचा दावा सोडण्यास लालकृष्ण अडवाणी तयार नव्हते आणि त्यांना पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा पूर्ण होण्यात पक्षाध्यक्ष म्हणून गडकरी हा अडथळा समोर दिसत होता.

तोंडात खडीसाखर, डोक्यावर बर्फ ठेऊन आणि चेहे-यावरची सुरकुती हलू न देता दिल्लीतले राजकारण खेळले जाते. समोरचा माणूस तोंडावर जितका गोड बोलतो त्याच्या दुप्पट माघारी कडू तसेच निर्दय वागतो, प्रसंगी पाठीत वार करतो. आपण ज्यावर बसलो आहोत ती खुर्ची कशी आणि केव्हा काढून घेतो याचा पत्ताच लागत नाही! अशा कुटील, षडयंत्री राजकारणाचा गडकरी यांचा स्वभाव नाही.. सरळ दोन घ्यावे आणि दोन द्यावे असा त्यांचा खाक्या.. अडवाणी गटाकडून म्हणजे पक्षातूनच गडकरी यांना सुरुंग लावण्याचे काम सुरु झाले. पूर्ती उद्योग समुहाचे कथित गैरव्यवहार सत्ताधा-यांच्या हाती देण्यात आले. आयकर चौकशीचा ससेमिरा सुरु झाला, ‘मिडिया ट्रायल’ हत्यार वापरून गडकरींना आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात आले, महत्वाचे म्हणजे अत्यंत व्यापक बदनामी झाली. गडकरी म्हणजे कोणी खलपुरुष असे चित्र निर्माण झाले आणि गडकरींचे म्हणणे कोणी ऐकून घेईना. ऐन अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु होण्याच्या मुहूर्तावर पूर्ती समुहावर धाडी टाकल्या गेल्या… कंटाळून गडकरी यांनी अध्यक्षपदावरचा दावा सोडला आणि नागपूरचा रस्ता धरला!

भारतीय जनता पक्षाचे सरकार स्वबळावर सत्तेत आणण्याचे आव्हान पेलून दाखवण्याच्या उंचीवर पोहोचल्यावर एक दारुण राजकीय पराभव उमद्या मनाच्या नितीन गडकरी यांच्या पदरी अनपेक्षितपणे पडला. एखादा लेचा-पेचा माणूस असता तर खचून गेला असता, असे राजकारण भारतीय जनता पक्षातूनच गडकरी यांच्या विरोधात खेळले गेले होते. कधीही न बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरावे आणि ते वास्तवात मात्र दु:स्वप्न ठरावे असे राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत घडले होते. पक्षातल्या विरोधकांना वाटले गडकरी संपले पण तसे काही घडणार नव्हते. पुन्हा प्रथमपासून सुरुवात करून दिल्लीच्या राजकारणात भक्कमपणे पाय रोवण्याचे गडकरी यांनी ठरवले. मोकळ्या-ढाकळ्या स्वभावाला मुरड घालत शांत चित्ताने आणि थंड डोक्याने गडकरी यांनी दिल्लीच्या राजकरणात लक्ष घातले. सलग तीन विधानसभा निवडणुकात दिल्लीतील सत्तेपासून वंचित राहिलेल्या भारतीय जनता पक्षाला पहिला क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आणण्याचे आव्हान नितीन गडकरी यांनी स्वीकारले. अगदी वॉर्ड पातळीपासून पक्ष सफाई आणि बांधणीस सुरुवात केली. आम आदमी पार्टी नावाचे वादळ घोंगावत असतानाही दिल्ली विधान सभेत ७० पैकी सर्वाधिक म्हणजे ३२ जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आणि पक्षाच्या सर्वोच्च पातळीवर गडकरी यांचे स्थान दिल्लीत पक्के झाले. दिल्ली निवडणुकीआधी नरेंद्र मोदी यांना पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. लालकृष्ण अडवाणी रुसले, त्यांनी आदळआपट केली, थयथयाटही केला पण राष्ट्रीय संघ आणि भाजपचे कोणी बधले नाहीत. अडवाणी यांची समजूत घालण्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे सोपविण्यात आली. अडवाणी आणि संघ, अडवाणी आणि भाजप यांच्यात संवादसेतू म्हणून गडकरी यांनी कामगिरी बजावली. लालकृष्ण अडवाणींना शांत केले, त्यांच्याकडून होणारा ‘ब्लॉग ब्लास्ट’ फुस्स केला. ज्या अडवाणी आणि त्यांच्या गोतावळ्याने बे-अब्रू करून बाहेर काढले त्यांच्यासाठी त्या काळात गडकरी आधार बनले… काळाने दिलेली ही शिक्षा होती! (नेमक्या याच काळात प्रस्तुत पत्रकार दिल्लीत होता आणि या घडामोडी त्याला जवळून पाहता आल्या हे उल्लेखनीय आहे!)

सांसदीय लोकशाहीत सरकारचा प्रमुख आणि पक्षाचा प्रमुख अशी दोन सत्ताकेंद्रे असतात. सरकारच्या प्रमुखपदी नरेंद मोदी येणार याची वाच्यता आठेक महिने आधीच झालेली होती. त्यांच्या पंतप्रधानपदावर येण्यास मतदारांनी नंतर निवडणुकीत बहुमताने मान्यता दिली. पक्षाध्यक्ष असणारे राजनाथसिंह केंद्रात मंत्री होणार आणि भाजपचे अध्यक्षपद रिक्त होणार हे स्पष्ट होते. पक्षांतर्गत विरोधकांनी गडकरींवर लावलेले किटाळही दूर झालेले होते. गडकरी यांनी दोन वर्षापूर्वी गमावलेले अध्यक्षपद स्वीकारावे आणि सत्तेचे दुसरे केंद्र व्हावे असे वाटणारा एक मोठा वर्ग होता आणि अजूनही आहे. गमावलेल्या त्या पदावर पुन्हा येणे हा एक ‘राजकीय काव्यात्म न्याय’ ठरला असता. (काहीजण त्याला सूड किंवा बदला असेही म्हणाले असते!) गडकरी यांनी एका सत्ता केंद्राच्या हाताखाली काम करण्यापेक्षा दुस-या सत्ताकेंद्राचे प्रमुखपद स्वीकारून त्याच्या मांडीला मांडी लाऊन बसावे आणि अख्ख्या देशभर संघटनेच्या पातळीवर स्वत:ची पाळेमुळे रुजवावी, जेणेकरून ते भविष्यात सरकार प्रमुखपदासाठी पर्याय म्हणून समोर येऊ शकतील असे वाटणा-या वर्गाचा मीही आहे. हे म्हणणे मी गडकरी यांच्याशी बोलताना स्पष्टपणे व्यक्तही केले होते. मात्र ‘मी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे’, असे गडकरी यांनी १९ मे रोजी फोनवर बोलताना सांगितले आणि खात्री पटली की, ते वेगळ्या वाटेने निघाले आहेत. अर्थात ती वाटही कर्तृत्व फुलवणारीच आहे. त्यासाठी नितीन गडकरींना शुभेच्छा. मला मात्र अजूनही वाटते, राजकीय मतभेदापलीकडच्या आणि जीवाभावाच्या माझ्या या मित्राची वाट चुकली आहे! तुम्हाला काय वाटते?

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट