अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा त्याग करुन भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याच्या घटनेचा धुरळा आता खाली बसण्यास सुरुवात झाली आहे . चारपेक्षा जास्त दशकं अशोकराव काँग्रेसच्या राजकारणात दिल्लीपासून नांदेडपर्यंत वावरले . दोनवेळा लोकसभा आणि पाचवेळा विधानसभेवर काँग्रेसचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली , ते दोनवेळा मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष होते म्हणजे पक्षानं त्यांना भरपूर कांही दिलं आहे तरी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला . स्वत:चा आब राखून राजकारण करण्याची अशोकराव यांची शैली आहे , वचावचा बोलण्याचा त्यांचा स्वभाव नाही त्यामुळे कोणतीही आगपाखड न करता , काँग्रेसवर टीकेचे विखारी बाण सोडत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही . केंद्रीय तपास यंत्रणांना घाबरुन काँग्रेसचा त्याग करावा लागणार असेल तर , त्यांनी याआधीच तो निर्णय घेतला असता . शिवाय आता राजकारणात फार कांही त्यांना मिळवायचं बाकी राहिले आहे असंही नाही . काँग्रेस पक्षाचा त्याग केल्यावर काँग्रेस नेते , माध्यमे आणि राजकीय विश्लेषकांनी केलेल्या क्वचित विखारी टीकेलाही अद्याप अशोकराव यांनी उत्तर दिलेलं नाही , ते जेव्हा बोलतील तेव्हाच त्यांच्या पक्ष सोडण्याचं नेमकं कारण समजेल .
पण , मुळात मुद्दा अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करण्याचा नाही तर राज्यातील काँग्रेसच्या होणाऱ्या संकोचाचा आहे . पक्षांतरे , फूट पडण्याची देशाच्या राजकारणातील ही कांही पहिली घटना नाही . खुद्द काँग्रेसमध्येच आजवर अनेकदा फूट पडलेली आहे ; अनेकांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि ते परत काँग्रेस पक्षात परतले आहेत . महाराष्ट्रा पुरतं बोलायचं तर यशवंतराव चव्हाण ते शरद पवार असं हा काँग्रेस पक्ष सोडण्याचा आणि पुन्हा काँग्रेस पक्षात परतण्याचा व्यापक इतिहास आहे . या व्यापक पटावर वावरलेल्यांनी पक्षत्याग तसंच पुनः पक्ष प्रवेशाची स्पष्टीकरणंही दिलेली आहेत आणि ती सर्व पटणारी आहेतच असं नाही .
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षानं फुटीचे अनेक आघात पचवलेले आहेत . इंदिरा काँग्रेस आणि संघटना कॉंग्रेस ते राष्ट्रावादी काँग्रेस मार्गे ‘पुलोद ’ सरकारसाठीचा खंजीर प्रयोग असे अनेक दाखले या संदर्भात देता येतील . या काळात नरेंद्र तिडके ( १९७८ ) ते आता नाना पटोले असं नेतृत्व राज्यात काँग्रेस पक्षाला लाभलं . अत्यंत कठीण काळात प्रमिलाकाकी चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांना दिलेली साथ या महाराष्ट्रानं पाहिलेली आहे . त्यानंतर एकही बलदंड प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला लाभला नाही आणि राज्यात काँग्रेसचा संकोच होत गेला हे विसरता येणार नाही . त्याच म्हणजे इंदिराजी गांधी यांच्या काळापासून साध्या तालुका अध्यक्ष नेमण्याचेही अधिकार प्रदेशाध्यक्षांना राहिले नाहीत इतका हा पक्ष दिल्लीच्या किचन कॅबिनेटच्या ताब्यात गेला . पक्षाची संघटनात्मक बांधणी करणारं नेतृत्व अस्तास गेलं आणि राज्यातले नेते दिल्लीच्या कृपेवर अवलंबून राहू लागले . पक्षाची संघटनात्मक वीण विसविशीत होत जाण्याचा हा काळ होता आणि त्याचा कधी विचारच फारशा गांभीर्यानं झाला नाही ; अजूनही होत नाही . १९९५नंतर तर काँग्रेस पक्षाला राज्यात विधानसभा निवडणुकीत कधीच १०० जागांचा आकडा गाठता आला नाही . लक्षात घ्या , नेमका हाच काळ भारतीय जनता पक्ष हळूहळू राज्यात आणि देशातही विस्तारण्याचा आहे . असं असलं तरी काँग्रेसचा मताधार मात्र जागांच्या प्रमाणात घटला नाही .
राज्यात काँग्रेस विधानसभेत शंभर जागांच्या खाली आली ती १९९५मध्ये आणि नंतर या जागा कमी कमीच होत गेल्या . राज्यात काँग्रेस पक्षाचा मोठा संकोच होण्याची सुरुवात २००९च्या विधानसभा निवडणुकीपासून झाली . पक्षाच्या जागा ८२ इतक्या कमी झाल्या आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तर जागांमधे ४२ इतकी घट झाली . २००९मध्ये काँग्रेस पक्षाचे राज्यात लोकसभेवर १७ उमेदवार विजयी झाले होते हा आकडा २०१४मध्ये २ वर आणि २०१९च्या निवडणुकीत तर १ वर आला ! मात्र असं असलं तरी २००९च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ७२ लाख ५३ हजार ६३४ मतं होती आणि २०१४ च्या निवडणुकीत हा आकडा ८८ लाख ३०हजार १९० होता .
मताधार कायम असूनही जागा कमी होत गेल्या कारण विलासराव देशमुख यांच्यानंतर सर्वार्थानं राज्यभर संपर्क असणारा एकमुखी नेताच काँग्रेसकडे उरला नाही . राज्याचं मुख्यमंत्रीपद १९९नंतर काँग्रेसकडे आलं पण , ते राष्ट्रवादीच्या कुबडीवर आणि नेमक्या याच काळात प्रदेशाध्यक्षही दुबळे लाभले . राज्यात संघटनेत चैतन्य निर्माण करणारा प्रदेशाध्यक्ष काँग्रेस पक्षाला लाभला नाही . माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्ष म्हणून विक्रमी काळ राहिले पण , पक्षाला राज्यव्यापी नेतृत्व देण्यात ते साफ अयशस्वी ठरले आणि दिल्लीतल्या ‘हाय कमांड’नेही त्याकडे लक्ष दिलं नाही . प्रदेशाध्यक्ष किती दुबळा झाला तर पक्षाध्यक्षाच्या संमतीचा एकही उमेदवार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हाय कमांडनं दिला नाही . अखेर आक्रमक भूमिका घेतल्यावर प्रदेशाध्यक्षांच्या शिफारशीनुसार केवळ एकाला चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली . तो उमेदवारही शिवसेनेतून आयात करण्यात आलेला होता आणि तोच एकमेव उमेदवार राज्यातून विजयी होणारा ठरला . तेव्हा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण होते ! त्यांच्यातल्या काँग्रेस नाराजीची बीजं तेव्हापासून अंकुरायला सुरुवात झाली असं म्हणायला भरपूर वाव आहे .
विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल तर बोलावं तितकं कमीच आहे . खरं तर , उद्धव ठाकरे यांनी भाजपशी केलेली निवडणूकपूर्व युती तोडली म्हणून काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेत येता आलं . पण , ही सत्ता घालवण्याचं मुख्य श्रेय नाना पटोले यांचं आहे . त्यांनी तडकाफडकी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं तेही सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेला न सांगता . नंतर भविष्यात काय घडू शकेल यांचा अंदाज न घेता विधानसभा अध्यक्षपदी वेगवेगळ्या कारणांनी सत्ताधारी आघाडीतील कुणाचीच निवड करता आली नाही आणि आधी शिवसेनेत व नंतर राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची कधीच न सुटू शकणारी राजकीय कोंडी झाली ; शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना तर केविलवाण्या पद्धतीनं बॅकफूटवर जावं लागलं आहे . अध्यक्षपद जर रिक्त नसतं तर या राज्यात काँग्रेस , आधी उद्धव ठाकरे आणि नंतर शरद पवार यांना राजकीय अरण्यरुदन करण्याची वेळच आली नसती .
( बाय द वे , राष्ट्रवादीचे एक दिग्गज नेते गेल्या आठवड्यात म्हणाले , त्या काळात आमच्या आघाडीत इतकी बेदिली माजलेली होती की पुन्हा निवडणूक झाली असती तर विधानसभा अध्यक्षपदी आमचा उमेदवार निवडून येण्याची कोणतीही शक्यता उरलेली नव्हती आणि हे घडलं ते केवळ नाना पटोले यांच्या एककल्ली वागण्यामुळे ! )
प्रदेशाध्यक्ष म्हणूनही नाना पटोले किमान प्रभावी ठरलेले नाहीत कारण ते चांगले स्ट्रीट फायटर असतीलही पण , राजकारणी म्हणून हवी असणारी दीर्घ दृष्टी त्यांच्याकडे मुळीच नाही ते लघु दृष्टीचे ( Myopic ) आहेत . केवळ अशोक चव्हाणच नाही तर मिलिंद देवरा , बाबा सिद्दकी , आशीष देशमुख हे लोक पक्ष सोडणार आहेत ; पक्षाच्या बैठकीला सहा आमदार अनुपस्थित राहणार आहेत ( म्हणजे राज्यसभेची निवडणूक झाली असती तर मतं फुटून काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला असता ) याचा अंदाज त्यांना येत नाही कारण त्यांचा संपर्क राज्यव्यापी नाही , पक्षातील जुन्या जाणत्या तसंच विद्यमान ज्येष्ठ नेत्यांशी संवाद नाही , नागपूर ते मुंबई ( मार्गे दिल्ली ) एवढाच त्यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून वावर आहे राजकारण करण्याचा समंजसपणाही त्यांच्याकडे नाही आणि आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ‘प्रदेश काँग्रेस’चा त्यांनी ‘विदर्भ काँग्रेस’ असा संकोच केलेला आहे . राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डातील १८ पैकी ८ सदस्य विदर्भातील आहेत , पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासह महिला काँग्रेस , युवक काँग्रेस , सोशल मीडिया , मुख्य प्रवक्ता अशी बहुसंख्य पदे विदर्भाकडे आहेत आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम पक्षात असंतोष होण्यात , कुरबुर वाढण्यात झालेला आहे .
अजून सर्व कांही हातातून निसटलेलं नाहीये हे लक्षात घेऊन नाना पटोले यांनी स्वत:ला सावरावं . अशोकराव पक्षातून गेले , मिलिंद देवरा , बाबा सिद्दकी , आशीष देशमुख गेले , आता त्यांचा काय जो ‘चिवडा’ होईल त्याबद्दलची चिंता राज्यातील नाना पटोले यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांनी सोडावी , गेलेल्यांचं राजकीय भवितव्य काय यांची पतंगबाजीही सोडावी आणि पक्षाचा कोसळणारी तटबंदी सावरावी , ढासळणारे बुरुज भरभक्कम करावेत , त्यातूनच प्रदेश काँग्रेसचं भलं होईल . एकदा का बुरुज पूर्ण ढासळले आणि तटबंदी मोडून पडली तर राज्यात काँग्रेस पक्षाची जीर्ण हवेली होईल याच भान विशेषत: नाना पटोले यांना येणं , हे त्यांच्या पक्षासाठी नितांत गरजेचं आहे .
समकालीन मराठी पत्रकारितेतील एंक आघाडीचे नाव. पत्रकारितेचा सर्वांगिण व दीर्घ अनुभव. परखड, चतुरस्त्र आणि स्वछ पत्रकारिता करणारा संपादक. परखडपणा आणि आक्रमकता म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे याची जाणीव असणारा . माणूस केंद्रस्थानी ठेऊन पत्रकारिता करणारा संवदेनशील पत्रकार. पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा आणि अचूक समाजभान असणारा संपादक.
राजकीय-सामाजिक भाष्य आणि व्यक्तिचित्रण यात हातखंडा असणारा, सामाजिक बांधिलकी स्वीकारलेला, सेक्यूलर विचारांचा पत्रकार.
विविधांगी, स्पर्शी लेखन करणारा लेखक आणि प्रभावी वक्ता…
~
A leading name in contemporary Marathi journalism. A long and all round experience. A blunt, well-informed and clean journalist and editor. Bluntness does not mean obstinacy. A sensitive journalist who always keep the human being at the core of his news. An editor with complete understanding of journalism. An expert journalist in political commentary and pen portrayal, who accepts social commitment and is secular.
A writer who writes on various topics, and an influential orator.
For more info visit www.praveenbardapurkar.com