गांधी, अभिव्यक्ती आणि बेगडी भाजप!

जुलै २०१७

स्थळ- नर्मदेचा तीर, बडवानी (बरवानी), मध्य प्रदेश.
मध्य प्रदेशच्या प्रशासनानं बुडीत क्षेत्रात येत असल्याचं कारण देत २७ जुलैच्या मध्यरात्री कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी आणि त्यांचे खासगी सचिव महादेवभाई देसाई यांच्या समाधी जेसीबी यंत्राने उध्वस्त केल्या. महात्मा गांधी यांचा अस्थी कलश अज्ञात स्थळी नेऊन ठेवला.

महात्मा गांधी हे भारताच्या दीर्घकाळ चाललेल्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा आहेत, महात्मा गांधी यांनी मांडलेला अहिंसा आणि समतेचा विचार जगासाठी प्रेरक ठरलेला आहे, वैयक्तीक मानवी मूल्यांना गांधीवाद समर्पित आहे, महात्मा गांधी नावाचा विचार जगातल्या असंख्यांचा श्वास आणि नि:श्वासही आहे, या विचारानं अनेकांना विधायक कामाची अव्यभिचारी उर्मी दिलेली आहे. म्हणूनच महात्मा गांधी कोट्यवधी लोकांचं श्रध्दास्थान आहे.
प्रश्न राष्ट्रपित्याच्या समाधीचा असल्यानं ही कारवाई सरकारला न सांगता काही प्रशासनांनं केलेली नसणारच.

समजा, प्रशासनानं असा तालिबानी उद्दामपणा केला असेल तर सरकारनं प्रशासनावर कारवाईचं कठोर हत्यार उपसायला हवं होतं.
पण, मध्यप्रदेश सरकारनं प्रशासनाच्या कारवाईबद्दल ‘ब्र’ही उच्चारलेला नाहीये; याचा अर्थ मध्यप्रदेश सरकारचं प्रशासनाच्या या कृतीला समर्थन आहे, असाच निघतो.

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या जहरी हिंदुत्ववादाच्या डबक्यातून भारतीय जनता पक्ष व मध्य प्रदेशातील त्या पक्षाचं सरकार बाहेर आलेलं नाहीये; या पक्ष व सरकारनं भंजनाची आणि गांधी द्वेषाची परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे, असाही याचा स्पष्ट अर्थ आहे.

महात्मा गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा आणि त्यांना पुत्रसमान असलेल्या सचिव महादेवभाई देसाई यांच्या समाधी मध्यरात्री उध्वस्त करण्याऐवजी त्यांची प्रतिष्ठापणा मध्यप्रदेशातील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारला सन्मानानं अन्यत्र करता आली असती. पण त्यातून परिवारात जाणाऱ्या संदेशाची भीती या सरकारला वाटली असावी.

महात्मा गांधी यांची हीच ती ‘हे राम!’ लिहिलेली अत्यंत साधी समाधी. जेसीबी यंत्राने महात्मा गांधी यांची ती समाधी उध्वस्त केली जात असतांना.

खंत अशी की, कस्तुरबा व महात्मा गांधी आणि महादेवभाई देसाई यांच्या समाधी अशा तालिबानी पध्दतीनं उध्वस्त झाल्याबद्दल महाराष्ट्राच्या मिडीयातही फार काही प्रकाशित झालेलं नाहीये आणि समाजातही नागपूर वगळता कुठेच काही प्रतिक्रिया किंवा निषेधाचा सूर उमटलेला वाचनात नाहीये…
‘लोकमत’ या दैनिकात एक अग्रलेख प्रकाशित झाला; गणेश देवी यांच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या दक्षिणायन या संस्थेच्या डॉ. प्रमोद मुनघाटे आणि पुढाकार घेतल्यावर नागपुरात मूक निदर्शनं झाली.

एक सभाही झाली. त्या सभेत विचारवंत-साहित्यिक-संपादक सुरेश द्वादशीवार, माजी कुलगुरु हरिभाऊ केदार, कवी आणि समीक्षक डॉ. यशवंत मनोहर, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी आक्रोश मांडला.

पण, त्याचा आवाज ना महाराष्ट्रभर घुमला ना, त्याचे काही पडसाद उमटले.
महात्मा गांधी यांच्या नावानं आणि त्यांच्या विचाराच्या प्रेरणेनं सुरु झालेल्या महाराष्ट्रातील संस्था गप्प आहेत.
उठसूठ गांधी नावाचा जप करणारे सगळे समाजवादी आणि गांधीवादी विचारवंत, लेखक, कलावंत मूग गिळून बसले आहेत; महात्मा गांधी यांच्याबद्दल या सर्वांच्या संवेदना बधीर का झालेल्या आहेत, हे कळण्यास मार्ग नाही…

महात्मा गांधी यांच्याशी नाळ असल्याचं सांगणाऱ्या काँग्रेस पक्षाचंही या संदर्भातलं राष्ट्रीय पातळीवरील मौन खटकणारं आहे; महात्मा गांधी यांची समाधी उध्वस्त होण्यापेक्षा ‘जुगाड’ हेच आयुष्याचे सर्वकाळ ध्येय मानणाऱ्या अहमद पटेल यांचा राज्यसभेवर झालेला विजय काँग्रेसला जास्त महत्वाचा वाटत असावा…

समाधी उध्वस्त केल्यानं महात्मा गांधी नावाचा विचार, प्रेरणा काही नाश पावणार नाही कारण, मोहन करमचंद नावाचा हा फाटका गांधी महात्मा आहे, कोट्यवधी लोकांच्या मनात कायम विराजमान आहे आणि महत्वाचं म्हणजे अविनाशी आहे!

ऑगस्ट २०१७

अनुभव तसा जुना आहे.
स्थळ- नवी दिल्ली.


अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत माणिक सरकार आणि त्यांच्या पत्नी पांचाली

पत्रकारितेसाठी डेरेदाखल झाल्यावर, दिल्लीत नवीन असतांना दिल्लीचं दरबारी आणि दिल्लीतून चालणारं देशाचं राजकारण समजून घ्यावं यासाठी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यालयात एक दिवसाआड तर आठवड्यातून किमान एकदा अन्य पक्षांच्या कार्यालयात मी नियमित जात असे.
वेळ दुपारी सुमारे साडेतीनची.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयासमोर आम्ही पत्रकार उभे, कारण पोलिट ब्युरोची बैठक होणार होती.
अचानक एक बऱ्यापैकी जुनी, नॉन एसी अँबेसडर कार गेटसमोर आली आणि सुरक्षा रक्षकांत धावपळ उडाली; सगळे अदबीने उभे झाले.
आत जाऊन कार पार्क झाली; साधासा कुडता घातलेला आणि धोतर परिधान केलेला एक माणूस हातात ​बॅग घेऊन खाली उतरला.
स्वत:ची बॅग स्वत:च वागवत आणि सस्मित अभिवादन करत तो माणूस आत गेला.

‘कौन है भाई ये आदमी ?’ एका सहकारी पत्रकाराला विचारलं; मी दिल्लीत नवीन आहे हे तोपर्यंत बहुतेकांना ठाऊक झालेलं होतं, त्यामुळे सहकाऱ्याला त्या प्रश्नाचं आश्चर्य वाटलं नाही.
‘ये त्रिपुरा के सी. एम. है’, त्यानं सांगितलं.
‘कौन ? माणिक सरकार ?’ विश्वास न बसून मी विचारलं कारण महाराष्ट्रात टिनपाट नगरसेवकसुध्दा ‘असा’ फिरत/वागत नसल्याचा अनुभव पोतडीत होता.
हेच ते माणिक सरकार. नेहेमीच असेच कायम जमिनीवर असतात, साधे वागतात. कधी ड्रायव्हरला उशीर झाला तर चक्क ऑटोरिक्षाने प्रवास करतात. बाजारातून भाजी वगैरे आणायला त्यांच्या पत्नी श्रीमती पांचाली स्वत:च जातात कारण त्यांच्या निवास्थानी नोकर नाही. केंद्रीय समाज कल्याण मंडळात नोकरी करुन श्रीमती पांचाली सरकार आता निवृत्त झाल्या आहेत. माणिक सरकार मुख्यमंत्री म्हणून मिळणारे दरमहा वेतन पक्षाकडे दरमहा जमा करतात; मग पक्षाकडून त्यांना दरमहा पांच हजार रुपये खर्चासाठी मिळतात… अशी बरीच माहिती नंतर मिळाली.

तेव्हा महाराष्ट्रात आदर्श आणि सिंचन घोटाळ्यांचा डंका जोरजोरात वाजत होता या पार्श्वभूमीवर माणिक सरकार नावाच्या मुख्यमंत्र्यांची एकूण मालमत्ता केवळ अडीच-तीन लाखांची आहे, असं जेव्हा समजलं तेव्हा हजार व्होल्टसचा धक्का बसला कारण हे कळण्याच्या दोन-तीनच दिवस आधी देशातल्या काही मुख्यमंत्र्याकडे किती संपत्ती आहे याची आकडेवारी मुद्रित माध्यमात प्रकाशित झालेली होती आणि ती डायरीत टिपून ठेवली होती. २०१३ मधली ती नोंद शोधून काढली तर देशातील काही तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचे आंकडे असे होते – प्रकाशसिंह बादल (पंजाब) ६.७५ कोटी रुपये, विजय बहुगुणा (उत्तराखंड) २.८६ कोटी रुपये, ओमार अब्दुल्ला (जम्मू आणि काश्मीर) ३.५१ कोटी रुपये, नवीन पटनायक (ओरिसा) १२.०६ कोटी रुपये, ‘अम्मा’ नावाने परिचित जयललिता (तामीळनाडू) ५१.४० कोटी रुपये आणि हेमंत सोरेन (झारखंड) ७३.५७ लाख रुपये.

राजकारणात एक टर्ममध्ये गबर हा शब्द थिटा पडावा अशी श्रीमंती गच्च बहरून आणण्याची किमया साधणारे महाराष्ट्रातले गावगन्ना शेकडो पुढारी माहिती असतांना १९९८ पासून मुख्यमंत्रीपदी आरुढ असलेला एक नेता मात्र इतका स्वच्छ आणि साधा असतो की; स्वच्छ व साधेपणाचे सर्व निकष त्याच्यापुढे कायम नतमस्तक आहेत, असं वाटून गेलं!

हे सगळं आठवण्याचं निमित्त आहे याच मुख्यमंत्री माणिक सरकार यांना गेल्या पंधरवड्यात साजऱ्या झालेल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन भाषण करू देण्यास नकार देण्यात आला. कारण काय तर म्हणे माणिक सरकार यांच्या भाषणात सरकारच्या विरोधात टिप्पणी आहे.
आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्र सरकारच्या म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षप्रणीत सरकारच्या अखत्यारीत आहे.
श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारनं लादलेल्या आणीबाणीविरुध्द न चुकता उमाळे आणि तेव्हा गळा गोठवला गेलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरुध्द आवंढे गिळण्याचा जून महिन्यात वार्षिक ‘व्रत’ भारतीय जनता पक्षाचे नेते अजूनही न चुकता पाळतात.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत माणिक सरकार

प्रत्यक्षात मात्र, भाजपचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचं प्रेम किती बेगडी आहे, हेच माणिक सरकार यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावर घातलेल्या निर्बंधातून सिध्द झालंय; या देशात नागरिकांच्या मुक्त अभिव्यक्तिवर नरेंद्र मोदी सरकारच्या काळात अघोषित निर्बंध येताहेत असा जो दावा केला जातोय त्यावरही यामुळे शिक्कामोर्तब झालंय; ही एक प्रकारची हुकुमशाहीच आहे.

भाषणात माणिक सरकार यांनी “देशातलं धर्मनिरपेक्षतेचं सत्त्वच धोक्यात आलेलं आहे. कारस्थानं रचून, प्रयत्नपूर्वक आपल्यात गुंते निर्माण केले जात आहेत, दुफळी निर्माण केली जात आहे, आपल्या राष्ट्रीयत्वाच्या जाणीवेवर जात-धर्म-जमातीच्या नावावर धार्मिक भावना भड़कावून आघात केले जात आहेत…” असं काही प्रतिपादन केलेलं होतं. (त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या या ‘​बॅन’ घालण्यात आलेल्या छोटेखानी पूर्ण भाषणाचा नागपूरच्या श्रीमती प्रज्ज्वला तट्टे यांनी केलेला मराठी अनुवाद अक्षरनामा या पोर्टलवर उपलब्ध आहे. इच्छुकांसाठी त्याची लिंक अशी- http://www.aksharnama.com/client/article_detail/1161)

खरं तर, या प्रतिपादनात नवीन असं काहीच नाही.
देशात ही स्थिती कायमच होती आणि ती तशी असण्यातच सर्वधर्म समभावाचा टेंभा मिरवणाऱ्यात काँग्रेससकट सर्वच अगदी डावे म्हणवून घेणारे पक्षसुध्दा आहेत कारण त्यातच या राजकीय पक्षांचं ‘मतहित’ होतं/आहे.
याच वातावरणात आणखी मोठी भर घालण्याची, समाजातील तेढ वाढवण्याची कामगिरी नव्वदीच्या दशकात बजावत भाजपनं सत्ता संपादन केलेली आहे, हे विसरु म्हटलं तरी विसरता येणार नाही.

खरं तर, स्वातंत्र्य दिनी होणाऱ्या माणिक सरकार यांच्या भाषणाचा वाद कळल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमदेपणा दाखवत ते भाषण प्रक्षेपित होऊ द्यायला हवं होतं.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरु झाल्याची जी चर्चा देशात सध्या जोरात सुरु झालेली आहे त्यातील हवाच माणिक सरकार यांचं भाषण प्रक्षेपित झाल्यानं गेली असती; भारतीय जनता पक्षात सहिष्णुता आणि सामुदायिक शहाणपण थोडं तरी शिल्लक आहे असं वाटलं असतं.

शिवराजसिंह चौहान यांनी स्वत: पुढाकार घेत कस्तुरबा, महात्मा गांधी आणि महादेवभाई देसाई यांच्या समाधींची अन्यत्र सन्मानानं प्रतिष्ठापना करण्यास पुढाकार घेतला असता तर भाजपच्या स्थापनेच्या वेळी केला गेलेला गांधीवादी समाजवादाचा गजर किमान तेव्हा तरी खरा होता, हाच संदेश समाजात गेला असता.
====
मात्र तसं घडलं नाही; त्यामुळे महात्मा गांधी द्वेषाची परंपरा जोमाने पुढे नेली जात आहे आणि भाजपचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं तुणतुणं बेगडी आहे हा समज वरील दोन्ही घटनांतून दृढ झालाय.
७१ वा स्वातंत्र्य दिन साजरा केल्यावर हेही कळलंय की, आता स्वातंत्र्य या शब्दाची व्युत्पत्ती, अर्थ आणि संदर्भ बदलण्यास सुरुवात झालेली आहे…

(संदर्भ सहाय्य- प्रमोद मुनघाटे / छायाचित्रे सौजन्य – गुगल)

-प्रवीण बर्दापूरकर
संपर्क +९१९८२२०५५७९९
[email protected]
============================
​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी

लिंक – http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515
============================

संबंधित पोस्ट

 • Sameer Gaikwad

  हा भाजपवाल्यांचा छंद आहे …परदेशात जाऊन पंतप्रधान गांधीच्या पुतळ्यास हार घालतात अन इथे त्यांचे समर्थक हाराकिरी करतात ! …. यामुळेच इतरांच्या तुलनेत या पक्षात वचन आणि वर्तन यातला सर्वाधिक विरोधाभास पाहायला मिळतो … लेख मर्मभेदी झालाय सर …

 • Vinayak Savane ….
  मुळात जवळ जवळ सगळेच विश्लेषक हे विसरतात कि मानवी सहसंबंध , व्यक्ती,समूह, तत्त्वज्ञान इ. हे “भांडवल” असते ज्याची उपयुक्त उपयोगिता हि वापरणारे ठरवितात

 • Ramakant Patil

  je kahi chalalay te aswastha karnare aahe….

 • Suniti Deo….
  आणखी जहाल लेखणी चालली असती
  छान, मती काम करेनासी होतेय, सुन्न झाला माणूस, त्यात ताज्या प्रकरणाची भर

 • Raj Kulkarni ….
  अगदी जबरदस्त लेख! सर्वपक्षातील दांभिकांची शिकवणी घेणारा! कॉग्रेस निव्वळ भाजपाला नावे ठेऊन विश्वसार्हता कमवू शकत नाही, स्वतंत्रपणे विश्वासार्हता संपादन करावी लागेल. कॉग्रेस सध्या सत्ताविहीन आहे म्हणून मी त्यांच्याबाबत सॉफ्ट असतो! पण म्हणून कोणी कानउघाडणी करायची नाही, असे मत आजीबात नाही. मुलगा चुकत असेल तर त्याला शिस्त आणि वऴण लावायलाच हवं! कान पिरगाळणंही गरजेचं असतं. म्हणूनच आपल्या सारख्या
  ख-याखु-या तटस्थ विचारवंताचा लेख मला आवर्जून स्विकारार्ह वाटतो. लिहते रहा! म्हणजे आम्हालाही सतत शिकायला मिळेल.

 • आपला लेख अत्यंत परखड आहे. अभिनन्दन आणि धन्यवाद.
  नर्मदा बचाव आंदोलन ने गांधी समाधी उध्वस्त करण्याचा निषेध पहिल्या दिवसापासून केला. मुंबईच्या वृत्तपत्रानी त्याची दखल घेणे टाळले।
  गेल्या तीन वर्षाच्या अनुभवानंतर मोदींकडून उमदे पणाची अपेक्षा ठेवणे हे योग्य वाटत नाही. आज पर्यन्त संघ/ भाजप यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे होते. भरघोस मतदान मिळत असल्यामुळे भाजप ची हिम्मत वाढली असून खरा चेहरा पुढे येऊ लागला आहे. माझ्या परिचयाचे सर्व संघ समर्थक कायम गांधीजींना शिव्या देत असतात। माणिक सरकार हे एक आश्चर्य कारक व्यक्तिमत्व आहे. त्याना हरवण्याचा विडा अमित शहा यानी उचलला आहे. सरकार यांची बदनामी करण्यासारखे संघाला काही सापडलेले नाही. खोटे नाटे आरोप करण्यात संघाचा हात कोणी धरु शकत नाही.
  तुमच्या उत्तम लेखाला प्रतिक्रिया देईपर्यंत फड़णवीसानी न्यायमूर्ति ओक यांचा केलेला अपमान व हरयाणाचे खट्टर यांचा पराक्रम पाहिल्यानंतर पुढे काय वाढून ठेवले आहे हे कळते.

  आपला
  उमाकांत पावसकर
  ठाणे
  ८४५२९०९०१८

 • Madan Shivam
  Dear Praveen ,
  My friend’s reaction …I also think same way….
  “Very disturbing trend. Is the balance between freedom and (so far unrealized) development tilting on the wrong side? Time to think, perhaps. “

 • Rajesh Kulkarni ….
  ‘With the gates of Sardar Sarovar Dam in Gujarat closed last month, there are concerns that many areas in four Madhya Pradesh districts — Barwani, Khargone, Dhar and Alirajpur — will be submerged under Narmada waters.’
  हिंदुस्तान टाइम्समधील बातमी.
  पुढे काय झाले हे कळले नाही.

 • Mahesh Limaye ….
  आपला लेख वाचून काही प्रश्न मनात येतात
  1. आपण उल्लेख केल्याप्रमाणे ही समाधीस्थळे नदीपात्रात अथवा संभाव्य पूरप्रवण क्षेत्रात येतात का? असल्यास त्यांना तसेच बूडून द्यावे असे म्हणणे आहे का?
  2. आपल्या लेखाचा उद्देश गांधीजींच्या समाधीबाबत चिंता असा आहे की भाजप सरकार कशी विचारांची गळचेपी करतय हे दाखविण आहे कारण आपण ओढूनताणून माणिक सरकार यांचा विषय घुसवल्यासारखा वाटतो. विचारांच्या गळचेपीबद्दल म्हणण असेल तर ममता बँनर्जी, केरळमधील कम्युनिस्ट राजवटी याबाबतही चिंता आपल्याला वाटते का? असल्यास त्याबाबतही लिहीलेले लेख इथे शेअर करावेत म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ निष्पक्षपातीपणे काम करतोय अस आमच्या सारख्या सर्वसामान्यांना वाटू शकेल
  3. या समाधीस्थळांबाबत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आमच्यासारख्यांना नवीन माहिती मिळाली

  • प्रतिसादाबद्द्ल आभार .
   १) समाधी पूर प्रवण क्षेत्रात येत होत्या तर त्यांची अन्यत्र सन्मानाने प्रतिष्ठापणा करता आली असती ; तसा उल्लेख लेखातही आहे . मी ‘बुडीत क्षेत्र’ असा उल्लेख केला आहे .
   २) चिंता दोन्ही बद्दल आहे . अभिव्यक्ती स्वतंत्र्याची गळचेपी कुणाकडूनही होवो ; चिंता करावीच लागणार . अलिकडे कॉंग्रेसच्या अनुषंगाने लिहिलेल्या दोन्ही ब्लॉगमध्ये आणीबाणीबद्दल कॉंग्रेसवर टीका केली आहे .त्या ब्लॉगच्या लिंक अशा-
   ​==१==​
   ‘बालवादी’- राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसही !
   वाचा- https://goo.gl/aY2f64
   ==२==
   राहुल गांधी आणि बिलंदर काँग्रेसजन !
   वाचा- https://goo.gl/ACX8eX

   याही मजकुरात “खरं तर , या प्रतिपादनात नवीन असं काहीच नाही .
   देशात ही स्थिती कायमच होती आणि ती तशी असण्यातच सर्वधर्म समभावाचा टेंभा मिरवणाऱ्यात काँग्रेससकट सर्वच अगदी डावे म्हणवून घेणारे पक्षसुध्दा आहेत कारण त्यातच या राजकीय पक्षांचं ‘मतहित’ होतं/आहे .”
   ​असा उल्लेख स्पष्टपणे आहे .​
   ३) दोन विषय जाणीवपूर्वकच एकत्र घेतलेले आहेत .
   आपल्या शंकांचे निरसन झाले असेल असा विश्वास वाटतो .
   हवं तर बोला- ९८२२०५५७९९

   • Mahesh Limaye ….
    किमान तुमच्याबाबत पक्षपातीपणाचा आरोप करू शकत नाही असा आत्मविश्वास वाटला. धन्यवाद. खरतर अस वाटण्याच कारण हे आहे की मराठीतील अग्रगण्य मानली जाणारी वर्तमानपत्र आज चौथा स्तंभ म्हणून काम करायच विसरत चालली आहेत अस रोजच वर्तमानपत्र वाचताना वाटत राहत.

 • Ajay Telang …
  आले भाजपद्वेशी. स्वागत आहे…

 • Jay Rane ….
  A must read blog

 • Deepak Karanjikar….

  हे भयंकर आहे गुरुजी।
  असे करण्याचे कारण कसले तरी भय आहे ।
  आणि ते भय पुन्हा जिंकण्याचे आहे

 • DrSubodh Naik अपुऱ्या माहितीवर आधारित लेख वाटतो .
  अपुरी म्हणजे एकच बाजू लक्षात घेऊन !
  असो .
  बाबाराव सावरकर ह्यांची सांगली येथील समाधी व ग्रंथालय उध्वस्त केले तेव्हा असा काही लेख लिहिला होतात का ?
  आणीबाणीचा उल्लेख आहे , पण दुर्गाबाई भागवत , गोरवाला , यदुनाथ थत्ते आणि दादूमिया सोडून कोणत्याही पत्रकाराने किंवा साहित्यिकाने आणीबाणी विरोधात आवाज उठवला नव्हता .
  मग आता पत्रकारांना आणीबाणीवरून भाजपला किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळचेपीवरून बोलायचा नैतिक अधिकार आहे काय ?
  माणिक सरकार ह्यांच्या बाकीच्या गमती जमातींबद्दल एक शब्दही लिहिला नाहीये तुम्ही !
  बापू प्रकाश देणारे आणि बाकीचे कोण होते ?
  लोकमान्यांच्या समाधीसाठी मुंबईच्या एका व्यावसायिकाने पैसे दिल्यावर ती धड उभी राहिली . तोपर्यंत का नाही ?
  हे जसे वागले तसे भाजपने वागलेच पाहिजे असे नाही , पण वागले त्यात गैर नाही .
  शेवटी नियतीचा नियम आहे ” करावे तसे भरावे “

  • समोरच्यालाही मत असण्याचा आणि त्याचा प्रतिवादाचा हक्क मान्य असणारा संपादक मी आहे ; त्यामुळे तुम्हाला उडवून लावण्याचा आततायीपणा होणार नाही माझ्याकडून .
   १)दर शंभर किलोमीटर्सवर न्हाणीगृह नाहीयेत का आपल्याकडे तशी अस्थींच्या समाधी विविध ठिकाणी उभारण्याची प्रथा आहेच आपल्याकडे .
   ​२)​असंख्य पत्रकारांनी विरोध केलेला आहे आणीबाणीला ; अनंतराव भालेराव , मा. गो. वैद्य ….असो .
   तेव्हा माझी पिढी पत्रकारितेत नव्हती किंवा नुकतीच पदार्पण करती झालेली होती म्हणून काय त्या आणीबाणीला आता विरोध करायचा नाही ? पत्रकार आणि संपादकाला एक भूमिका असायलाच पाहिजे त्याशिवाय तो संपादक कसा राहील ?
   ​३) माणिक सरकार यांच्या गंमती-जमती / लोकमान्यांची समाधी कशी उभी राहिली हा या मजकुराचा विषयच नाही !​
   ४) गेली चाळीस वर्ष पत्रकारिता करतांना ‘पार्टी वुईथ’ असा दावा याच(च) एका(च) पक्षाने केलेला होता अन्य कोणत्याही पक्षाने नाही(च) ; म्हणून यांच्याकडून नीतीमत्तापूर्ण , सहिष्णूवादी , समोरच्याचं कर्तृत्व आणि विद्वत्ता मान्य करणारं , सच्छील वर्तन अपेक्षित आहे !
   असो ,

   • DrSubodh Naik….
    मुळात ह्या समाध्या नाहीत .
    कस्तुरबा आणि देसाई हे वारलेत पुण्यात आगाखान पॅलेस मध्ये ! त्यांच्या समाध्या तिथे मध्य प्रदेशात कुठून येणार ?
    बापूंची समाधी आहे दिल्लीला !
    ही ठिकाणे म्हणजे त्यांच्या अस्थी विसर्जनाची जागा !
    आता तीही जपून ठेवायची का अजून ! तिचेही पुनर्वसन करायचे ?
    अशा भरपूर जागा आहेत मग !
    जस्ट एक गमतीची गोष्ट सांगतो .
    नाशिकला रामघाटावर गांधी ज्योती आहे . अगदी अशीच जागा .
    पण मुळात ती जागा बांधली अहिल्याबाई होळकर ह्यांनी ! पण त्याची माहितीही आता नाही , नाही त्यांचे तिथे नाव !
    आता नेहरू सरकारने अहिल्याबाईंना विसरून तिचा सात बारा गांधींच्या नावे केला .
    म्हणजे अहिल्याबाईंचे नाही झाले तरी चालेल , पण बापूंचे सगळे जपायला हवे ! का हो ?

    • DrSubodh Naik …
     न्हाणीगृह आणि अस्थीविसर्जनाच्या जागा ह्यात फरक आहे असे मी मानतो
     अस्थींच्या समाध्या नाहीत त्या अस्थी विसर्जनाच्या जागा आहेत त्या ! तिथे रिकामे कुंड ठेवले होते
     अस्थी समाध्या आणि तत्सम जर परंपरा आहे तर ठराविक नेत्यांबद्दलच त्या का पाळल्या गेल्या ?
     दुर्गाबाई भागवत ह्यांनीच लिहिले आहे ते ! ज्याला काही ठोस विरोध म्हणता येईल तसा विरोध असे त्यांना म्हणायचे असावे .
     अनंतरावांनी नक्कीच केला असेल , ते वेगळेच होते .
     मा गो वैद्य मला वाटते तेव्हा संघातच होते .
     ह्या दोघांचा अपमान करत नाहीये . असो .
     माणिक सरकार ह्यांचा विषय का होऊ शकत नाही ते कळत नाहीये . जर एखादे उदाहरण त्यांचे दिले जातेय तर ह्याही गोष्टींचा विचार व्हायला हवा . मी तरी त्याला कम्युनिष्ठांचा बुद्धिभेद म्हणतो ज्यात ते पटाईत आहेत
     जर गांधींची समाधी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तर त्याहून मोठ्या लोकमान्यांची समाधी झाली नाही हा ही जिव्हाळ्याचा विषय होऊ शकतो
     समाध्या जपाव्यात पण अस्थी विसर्जन स्थल का ?
     गांधींचे असे सर्व जपणे ही भारतीय जनतेला उल्लू बनवण्यासाठीची काँग्रेसची गरज होती , ती पुढच्या पिढीने , सरकारने का पाळावी ?
     अहिल्याबाईंची स्मृती जिथे जपली जात नाही त्याबद्दल कोणालाच माहिती नाही .
     मी भाजपचा नाही , भक्त तर त्याहून नाही .
     पण पार्टी विथ डीफ्रान्स ला दुसऱयांनी सुरू केलेली सर्व गोष्टी तशाच डोक्यावरन नेल्या पाहिजेत तरच ती पार्टी विथ डीफ्रान्स होणार काय ?
     सर्व लोकांचा योग्य सन्मान राखला , ठराविक नेत्यांबद्दल होणारा अतिरेकी सन्मान थांबवला तरी ती पार्टी विथ डीफ्रान्स होईल .
     असो .

     • ​असो .
      आपलं म्हणणं जसंच्या तसं ब्लॉगवर पोस्ट केलंय ; इतकंच !

 • Sahadeo Warik ….
  मनाची पाटी कोरी ठेवून लिहिणारे खूप कमी पत्रकार आपल्या कडे आहेत .पुर्वग्रहांचं बद्दकोष्टच फार .

 • Ravi Waghmare ….
  It was reported Medha Patkar madam was on indifinite hunger strike. Her health was very critical. It was must to take ger to hodpital to save her life.
  T
  She was seating on the backside of this Smarak. In emergency the Smarak was removed and took Medha Patkar to hospital and her life was saved.

 • Mahajan Milind ….
  सर हे मुद्दाम केलय अस वाटतय का
  की अकारण झोडपायच