गांधी @ वसंत गुर्जर.कॉम

वसंत दत्तात्रेय गुर्जर यांची  गांधी ही कविता सर्वात प्रथम ऐकली ती अंबाजोगाई साहित्य संमेलनात. पत्रकारितेत येऊन तेव्हा जेमतेम पाच-सहा वर्ष झालेली होती. प्रकाशित काही कथांना मान्यवरांची दाद(?) मिळाल्याने कथालेखनाची उर्मी जास्तच बळावलेली असल्याने लेखक होण्याचे स्वप्न होते. त्यातच नागपूर पत्रिका या दैनिकाच्या ‘साकव’ या रविवार पुरवणीचे संपादन मंगला विंचुरणेसोबत करत होतो (पत्रकारितेचे साध्य म्हणजे नंतर हीच मंगल आणि मी विवाहबद्ध झालो!) नागपुरात पत्रकारिता करण्यासाठी गेल्यापासून विदर्भ साहित्य संघ आणि विशेषत: मनोहर म्हैसाळकर यांच्या गोटात असल्याने ‘साहित्यातल्या राजकारणा’चे अबकडई जवळून कळू लागले होते, त्यामुळे प्रत्येक साहित्य संमेलनाला हजेरी लावणे हे ‘राष्ट्रीय कर्तव्य’ असल्याची भावना बळावलेली होती. त्याही काळात संमेलने ‘अ’साहित्यिक कारणासाठी गाजत असल्याने बातम्या भरपूर असत. विदर्भात पत्रकारिता करत असलो तरी उर्वरीत महाराष्ट्रातल्या सामाजिक-साहित्य जगताशी जवळून संपर्क असल्याने मलाही मुंबई-पुण्यातल्या पत्रकारांप्रमाणेच गोटातल्या बातम्या मिळत, हा मला साहित्य संमेलनाचे वृत्तसंकलन करण्याची संधी मिळण्यामागचा महत्वाचा निकष होता. अंबाजोगाईत तर कोलकात्याच्या वीणा आलासे, पुण्याचे ह.मो.मराठे, नागपूरचे प्रकाश देशपांडे आणि मी असा ग्रुप जमला, आम्ही तेव्हा खूपच धमाल केली. आम्ही केलेली धमाल तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. याच संमेलनात वाचन संस्कृतीच्या प्रचाराच्या वेडाने झपाटलेला आणि आता राजहंसचा औरंगाबाद प्रतिनिधी असलेला श्याम देशपांडे, निखिल वागळे अशा आणखी ‘काहीं’ची भेट झाली. हे ‘काही’ आजच्या मोबाईलच्या परिभाषेत बोलायचे तर नंतर संपर्ककक्षेच्या बाहेर गेले आणि श्याम तसेच निखिल यांच्याशी मात्र संपर्क राहिला. (संपर्ककक्षेच्या बाहेर गेलेल्या सोलापूरच्या शिरीष घाटे हा प्रतिभावान चित्रकार अगदी अशात पुन्हा संपर्ककक्षेत आलाय!)

या संमेलनात भेटलेल्या ‘गांधी मला भेटला..’ने झपाटून टाकले. तेव्हा भेटेल त्याला भित्तीपत्रकावरील ही कविता वाचून दाखविण्याची क्रेझ होती. अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या नंतर काही महिन्यांनी माधवराव गडकरी यांनी मला राजकीय वृत्त्संकलनात ओढले आणि दोनेक वर्षात साहित्य जगतात असलेला वावर कमी होत गेला. नंतर राजकीय वृत्त्संकलनाची नशा अशी चढली की, साहित्यिक कार्यक्रम कव्हर करणे, साहित्य संमेलनाला जाणे मला नीरस, खरे सांगायचे तर मिळमिळीतपणाचे वाटू लागले! मग काळाच्या ओघात साहित्य बाजूला पडले, कथालेखक तर संपूनच गेला, वसंत दत्तात्रेय गुर्जर यांना गांधी भेटल्याची कविताच नाही तर अशा अनेक अस्सल साहित्यिक कलाकृतीही मनाच्या समृद्ध अडगळीत गेल्या. मे १९९८ ते मार्च २००३ हा औरंगाबादला पत्रकारिता करतानाचा काळ मुंबई-नागपूर-दिल्लीच्या तुलनेत संथ होता. वीस वर्ष बाजूला पडलेले वाचन सुरु झाले, लेखनाकडे वळलो आणि अचानक वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा गांधी मला भेटला, तो बँक कर्मचाऱ्यांचा नेता असलेल्या मित्रवर्य देवीदास तुळजापूरकर याच्यामुळे. गांधी मला भेटला ही कविता लख्ख समोर उभी राहिली, ते पोस्टर काढून दाखवत गुर्जर यांच्या गांधीने घातलेली मोहिनी कशी कायम आहे हे सांगितल्यावर देवीदास तुळजापूरकरने या कवितेवर झालेल्या खटल्याची कर्मकथा सांगितली. या कवितेत अश्लील काय आहे याचा साक्षात्कार ती कविता प्रकाशित झाल्यावर दहा-बारा वर्षांनी कसा होतो हे कोडे तर मला अद्यापही सुटलेले नाही…

मला पहिल्यांदा ही कविता भेटल्यानंतर या खटल्याची हकिकत कळण्याच्या काळात अनेक हिवाळे-पावसाळे आयुष्यात येऊन गेलेले होते. त्यामुळे पुन्हा भेटल्यावर ही कविता नव्याने आकळली. पत्रकारिता करताना कायम सत्तेच्या दालनात वावरत असल्याने या कवितेतून वर्तमान परिस्थितीविषयी नेमके काय भाष्य भेदकपणे करण्यात आलेले आहे याची जाणीव कविता पुन्हा वाचल्यावर झाली, वसंत दत्तात्रेय गुर्जरांचा गांधी म्हणजे; समाज बघत असलेले दु;स्वप्न म्हणजे, ही कविता असल्याचा प्रत्यय नव्याने आला. भारताचे रामराज्य करण्याच्या महात्मा गांधी यांच्या स्वप्नाचा राजकारणी आणि प्रशासनाने कसा फज्जा उडवला याची प्रचीती पत्रकारितेत असल्याने पावलोपावली आली होती.. येत होती.. त्यामुळे गांधी मला भेटला ही केवळ कविता नाही तर ते एक जळजळीत सत्य आहे याबद्दल मनात कोणतीही शंका उरली नाही. त्या कवितेवरच्या खटल्याची एक बातमी केली. गुर्जरांचा गांधी पुन्हा एकदा चर्चेत आला आणि पुन्हा तो खटला विस्मरणात गेला.. गुर्जर, प्रकाशक, मुद्रक आणि तक्रारकर्ता एवढ्यापुरता तो मर्यादित झाला.

अशात पुन्हा गांधी नावाच्या कवितेचे भूत जिवंत झाले आहे आणि अनेकांना अनेक उमाळे त्यानिमित्ताने फुटत आहेत! प्रकाशक आणि मुद्रक यांनी माफी मागितल्याने ही कविता अश्लील नाही हे स्पष्ट करण्याची म्हणा की सिद्ध करण्याची म्हणा, जबाबदारी कवी गुर्जर यांच्यावरच टाकत याबाबत जिल्हा न्यायालयाने निर्णय घ्यावा असे सांगत निश्चित भूमिका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने टाळले आहे. खरे तर अश्लीलता म्हणजे नेमके काय याची व्याख्या करत त्या व्याख्येत ही कविता बसते का नाही याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन करायला हवे होते किमान ही व्याख्या करून त्या व्याख्येत ही कविता बसते किंवा नाही याबाबत निर्णय घेण्याचे कनिष्ठ न्यायालयाला सांगायला हवे होते. आपल्याकडे कणखर भूमिका घेण्याचे टाळले कसे जाते याचे हा निर्णय म्हणजे उत्तम उदाहरण आहे. खरे तर अश्लीलता काय किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय हे मुद्दे यापूर्वी अनेकदा न्यायालय आणि विधिमंडळात चर्चिले गेले आहेत. पण, त्याबाबत निश्चित व्याख्या करण्याचे टाळलेच गेलेले आहे कारण कोणालाच जबाबदारी घ्यायची नाहीये! माझ्या एका दोस्ताला वांगी खूप आवडतात आणि वांग्यापासून केलेली स्वादिष्ट भाजी (किंवा अन्य काही) खाल्ल्यावर त्याची पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते, ‘काय सेक्सी झालीये भाजी, मस्तच हं!’ कोणाला कशात कसा सेक्स दिसावा आणि कोणाला कशात अश्लीलता दिसावी हे कसे ठरवता येणार, ती तर सापेक्ष बाब आहे.

खरे तर अश्लीलताच नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय याबाबत संसद-विधिमंडळे आणि न्यायपालिका निश्चित भूमिका घेत नाही, ह्क्कभंगाबद्दल संसद कोणतीही निश्चित मार्गदर्शक तत्वे ठरवत नाही, अवमानाबद्दल न्यायपालिका ठोस दिशादिग्दर्शन करत नाही आणि मिडियाच्या भूमिका बहुसंख्येने धंदेवाईक तर बहुसंख्य पत्रकारांच्या मूल्यविषयक धारणा लाचार झालेल्या आहेत- लोकमान्य टिळकांच्या नावे जीवन गौरव मिळवणाऱ्या संपादकांनीही त्यांच्या नातवाच्या वयाच्या असलेल्या मालकाच्या पायाशी बसण्याइतकी हुजरेगिरीची हद्द गाठली आहे, काही अपवाद वगळता या चारही स्तंभात असेच स्वाभिमान गहाण टाकलेले वातावरण आहे आणि परिणामी समाज बहुसंख्येने आत्ममग्न, आत्ममश्गुल होण्यात झालेले आहेत. समाज बहुसंख्येने असा असल्याने स्वाभिमान, विवेक, तारतम्य, मूल्यांसाठी संघर्ष करण्याची किंवा अशा लढाईत सहभागी होण्याची सार्वत्रिक आशा बाळगणे व्यर्थ आहे. त्यामुळे गांधी भेटल्याची कविता अश्लील नाही हे सिद्ध करण्याची लढाई गुर्जर आणि त्यांच्या मोजक्या शिलेदारांनाच लढायची आहे, समाज बहुसंख्येने ती लढाई ‘मला काय त्याच्याशी देणे-घेणे’ या नजरेतूनच बघणार आहे!. आज जर सन्मित्र कवी ग्रेस हयात असते तर ते नक्कीच म्हणाले असते, ‘मी कविता का लिहिली आणि त्यातून काय अर्थ काढायचा हे स्पष्टीकरण द्यायला मी कविता लिहून गुन्हा थोडीच केला आहे?’.. पण, ते असो.

गुर्जर यांच्या गांधी कवितेवरील खटल्याचा प्रवास लातूर जिल्हा ते सर्वोच्च न्यायालय असा झाला आहे. त्यातून न्यायालयाच्या जिल्हा ते सर्वोच्च स्तरीय मर्यादा समोर जशा समोर आल्या आहेत तसेच हा समाज लेखक कलावंतांच्या बाबतीत किती मुर्दाड आहे हेही स्पष्ट झाले आहे. गुर्जर यांच्या कवितेतून महात्मा गांधी यांची बदनामी झाली असे या निकालात अप्रत्यक्षपणे सुचविण्यात आले आहे. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाचे एक सेवानिवृत्त न्यायमूर्ती महात्मा गांधी यांच्याविषयी जी बेताल बडबड करतात त्यातून महात्मा गांधी यांचा गौरव होतो असे समजायचे का, भारतीय कागदी चलनावर महात्मा गांधी याचे छायाचित्र आहे म्हणून देशात होणारा सर्व भ्रष्टाचार महात्मा गांधी यांच्या मूक साक्षीने होतो आणि त्या भ्रष्टाचाराला महात्मा गांधी यांची संमती आहे असा त्याचा अर्थ समजायचा का, असे प्रश्न आता सर्वसामान्य माणसाला पडले तर त्यात गैर आहे असे कसे काय म्हणता येईल?

प्रथम प्रकाशित झाल्यावर पुन्हा सुमारे एका तपाने ती कविता पुनर्प्रकाशित होते काय आणि आणि त्यातून महात्मा गांधी यांचा अवमान होतो काय.. हे कमी की काय म्हणून कविता अश्लील आहे याचाही साक्षात्कार होतो यामागे कोणती मानसिकता लपलेली आहे हे याचा शोध तूर्तास बाजूला ठेऊ यात. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणारे बहुसंख्येने मुर्दाड तरी आहेत किंवा काठावरून लढाई बघणारे आहेत हे यानिमित्ताने समोर आले याकडे डोळेझाक करता येणार नाही. गेल्या वीस वर्षात बहुसंख्य पुरोगामी/प्रतिगामी, महात्मा गांधी समर्थक/विरोधक कार्यकर्ता, निखळ/प्रचारकी/प्रतिभावान/सुमार साहित्यिक-बुद्धिवंत-पत्रकार यापैकी कोणाला गुर्जर यांच्या पाठीशी उभे राहावे वाटले नाही हे याच मुर्दाडपणाचे लक्षण आहे. वर्षा-नु-वर्षे साहित्य संस्थातील खुर्च्या उबवणार्‍या मार्तंडरावांना या कवितेवरील हा खटला हा अभिव्यक्ती स्वतंत्र्याचा गळा घोटणारा आहे असे वाटले नाही आणि गुर्जर यांच्या बाजून किमान ‘ब्र’ काढावा वाटला नाही यातून हे तथाकथित ‘संस्थाधिपती’ मार्तंड किती ठेंगण्या मनाचे आणि किरट्या विचाराचे आहेत तसेच त्यांचे साहित्यिक भान कसे खुजे आहे हेही समोर आलेले आहे. महात्मा गांधी यांच्या नावाने सत्ताकारण करणाऱ्या (आणि न करणाऱ्याही) सत्ताधाऱ्यांनाही गुर्जर यांच्या समर्थनार्थ पुढे यावेसे वाटले नाही. (ज्याला पुढे यावेसे वाटले त्यांचे या संदर्भात एक साहित्यिकानेच मनपरिवर्तन केले अशी माहिती आहे.) यातून सत्ताधारी वर्गाची सांस्कृतिक अनास्था आणि अज्ञानच प्रकट होते .

मला गांधी प्रत्यक्ष भेटले नाहीत. त्यांनी उभारलेल्या/त्यांच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या संस्था, त्यांनी आखून दिलेल्या वाटेवरुन चालणारी निष्ठेने चालणारे जी माणसे भेटली त्यांच्या बोलण्यातून, अनेकांच्या लेखनातून महात्मा गांधी तुकड्या-तुकड्यातून समजले. वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या कवितेतूनही गांधी एक भेदक वर्तमान सत्य मांडत सामोरे आले. या कवितेचे नव्याने झालेले आकळण हे असे आहे. हे पूर्ण नाही याची कल्पना आहे. महात्मा गांधी हे देशातील आजवरचे सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे तसेच त्यांचे टीकाकारही मोठ्ठ्या संख्येने आहेत. जिवंत गांधी आम्ही पूर्ण स्वीकारू शकलो नाही, हत्या झाल्यावरही महात्मा गांधी यांना आम्ही स्वीकारले नाही, एव्हढेच कशाला त्या महात्म्याला रूपक मानत आजच्या भारतीय समाजाचे भेदक चित्रण करणारी कविताही स्वीकारण्याची आमची तयारी नाही. ‘नोटे’वरचा सोडला तर महात्मा गांधी आम्हाला नकोच आहेत असाच याचा अर्थ आहे!

जाता जाता- वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या समर्थनार्थ अनेक व्यक्ती/संस्था आता पुढे येत आहेत. ज्यांना कोणाला त्यात सहभागी व्हायचे त्यांनी -आपले प्रयत्न-आपला पाठिंबा samyaksanvad@gmail.com वरही मेलने कळवावा. ही माहिती ‘सम्यक संवाद’ची website (www.samyaksanvad.com) व Facebook page वरुन प्रसिद्ध करण्यात येईल. आपल्याही काही सूचना, कल्पना असतील. त्या जरुर कळवाव्या. संपर्कात राहू यात असे श्री सुरेश सावंत यांनी म्हटले आहे.

=प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट