पुन्हा एलकुंचवार !

ज्येष्ठ प्रतिभावंत नाटककार, ललित लेखक महेश एलकुंचवार यांनी  ९ ऑक्टोबर(२०१४)ला वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली . त्यांनी वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केला तेव्हा लिहिलेला त्यांच्या विविधांगी व्यक्तीमत्वाचा वेध घेणारा हा लेख-

पुन्हा एलकुंचवार !

//१//

१९७० ते ८० चा तो काळ देशात आणि वैयक्तिक आयुष्यात विलक्षण घडामोडीचा होता. युद्ध नुकतेच संपलेले होते, त्याचा ताण म्हणून महागाईचा तडाखा बसलेला होता, त्यातच दुष्काळ आणि भ्रष्टाचारविरोधी उभे राहिलेले आंदोलन, त्यातून आलेली अस्थिरता. पोट भरायचे म्हटले तरी नोक-या नाहीत, जिकडे तिकडे ‘नो व्हेकन्सी’च्या पाट्या. एकत्रित कुटुंब व्यवस्था मोडकळीस येत होती. कर्ता मुलगा वेगळा झाला की होणारे आक्रोश पावलो-पावली ऐकू येत.

थोडक्यात अतिप्रतिकूल वैयक्तिक, कौंटुबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा सर्वच पातळ्यावर तेव्हाचे वातावरण आमच्या पिढीची विलक्षण घुसमट करणारे होते. प्रतिकार करावा, एल्गार पुकारावा तर कसा आणि कोणाविरुद्ध हेही न कळण्याचे ते वय होते. मनात खूप मोठी ठसठस दाटून आलेली असायची. त्या काळात नाटक आणि सिनेमा पाहण्याची दृष्टीही मनोरंजनापेक्षा या वातावरणाशी ‘को-रिलेट’ करत पाहण्याची होती. गुलझार यांचा ‘मेरे अपने’ सारखा चित्रपट आमच्या पिढीचा नायक वाटायचा. याच काळात केव्हा तरी ‘होळी’ आणि पाठोपाठ ‘सुलतान’ या एकांकिका वाचण्यात आल्या.. झपाटून टाकणारा आणि अस्वस्थ करणारा तो प्रत्यय होता. औरंगाबादसारख्या न धड शहरी ना धड ग्रामीण गावात प्रयोग पाहायला मिळणं शक्यच नव्हतं पण, एकांकिका वाचल्यावर आपलं म्हणणं कोणी तरी मांडलंय असं वाटलं. आमच्या पिढीची घुसमट कोणी तरी व्यक्त केली अशी आपुलकीचीही भावना निर्माण झाली. महेश एलकुंचवार यांची ती पहिली ओळख होती. ही ओळख पुढे आपल्या जगण्यावर दाटपणे पसरून राहणार आहे हे माहीत नव्हतं.

//२//

Mahesh-Elkunchwarपुढे पत्रकारितेत आल्यावर भान विस्तारलं, आकलनाच्या कक्षा व्यापक झाल्या. जे वाचलं-पाहिलं होतं ते नेमकं नव्याने कळू लागलं. मग आयुष्यात आली ती एलकुंचवार यांची नाटकं. विशेषतः ‘वाडा चिरेबंदी’ची त्रयी. कुटुंब तुटतं म्हणजे काय होतं आणि त्याचे चरे कसे उमटत जातात  हे अनुभवलं असल्यानं त्यातील अर्थ मनाला भिडत गेला.. काळीज पोखरत राहिला. नाटककार म्हणून ते केवळ मराठीच नाही तर देशाच्या पातळीवर महत्वाचे ठरले, त्यांच्या प्रतिभेचा आवाका विस्तारत गेला आणि त्या बहराने त्यांची प्रतिमा अधिकाधिक उजळत गेली, त्यांचे अभिजात प्रकटीकरण आणि त्यातील भाव-भावनांचा गुंता एकूण समाज जीवनाचा प्रातिनिधिक ठरला त्यांचा गवगवा भाषा आणि प्रादेशिक सीमा ओलांडून वैपुल्याने विस्तारत गेला. पाहता पाहता एलकुंचवार स्वत:च एक मापदंड झाले.

एलकुंचवार नाटककार म्हणून महत्वाचे आहेत हे निर्विवादच पण, मला ते अधिक भावले ते ललित लेखक म्हणून. त्यांनी काहीही लिहिले नसते आणि केवळ ‘मौनराग’ हा १२० पानांचा गतकातर आठवणीवजा ललित लेखांचा एक संग्रह जरी त्यांच्या नावावर असता तरी एलकुंचवार यांचे मराठी साहित्याला दिलेले योगदान मोलाचे ठरले असते. मौनराग केवळ गतकातर आठवणी आहेत का ते एलकुंचवार यांचे आत्मकथन की आईपासून तुटलेपणातून आलेले रुदन, या वादात न शिरता तो ललित लेखनाचा एक प्रांजळ अस्सल बावनकशी ऐवज आहे असंच मला ठामपणे वाटतं. भाषा, शब्दकळा, प्रतिमा, अस्सल व संपन्न प्रामाणिकपणा, त्यात आलेलं संयत तसंच समंजस कारुण्य-व्याकुळता-प्रेम आणि उत्कटता या कोणत्याही एका किंवा या सगळ्याच निकषावर मौनरागमधील प्रत्येक लेख कांचनाचे बहर काय असतात याची प्रचीती देणारे आहेत. या १२० पानाच्या पुस्तकात वाक्यागणिक अभिजात्यतेची खाण आहे. हे जर एलकुंचवारांनी इंग्रजीत लिहिलं असतं (जे त्यांना सहज शक्य होतं) तर आजचे तथाकथित ‘पॉप्युलर’ भारतीय साहित्यिक इंग्रजीत जे काही दिवे पाजळत आहेत ते किती मिणमिणते आहेत हे वेगळं सांगायची गरजच उरली नसती.

‘मौज’च्या एका दिवाळी अंकात ‘नेक्रोपोलीस’ हा त्यांचा लेख ‘मौनराग’च्या बावनकशी निकषांची पुढची पातळी गाठतो. कांचनाचे बहर उजळतात म्हणजे काय होतं याची साक्ष ‘नेक्रोपोलीस’मधून येते आणि त्या प्रतिभेने आपण स्तिमित होतो. का कोण जाणे पण, ललित लेखनाचा एक नवा मार्ग आणि निकष निर्माण करणा-या एलकुंचवार यांनी ललित लेखन पुरेशा सातत्याने केलं नाही, याची हुरहूर वाटते.

//३//

एलकुंचवार यांचं वक्तृत्व गेल्या तीन दशकात वेगवेगळ्या निमित्ताने अनुभवायला मिळालं. रा.चिं.ढेरे यांना पुण्यभूषण प्रदान केल्यावरचे भाषण असो, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान सन्मान, अनंत भालेराव पुरस्कार, नागभूषण सन्मानपासून ते अनेक प्रकाशन समारंभापर्यंत त्यांची भाषणे, व्याख्याने ऐकली. कधी एक वृत्तसंकलक म्हणून तर कधी श्रोता म्हणून. उपमा-अलंकाराचा लखलखाट, अभिनय किंवा आवाजाच्या वेगळ्या पट्ट्यात वक्तृत्व फिरवत ठेवण्याची कसरत, असे कोणतेही प्रयोग एलकुंचवार यांना करावे लागत नाहीत. जे काही सांगायचं आहे त्याचे मध्यम लयीत केलेलं निवेदन म्हणजे त्याचं भाषण किंवा व्याख्यान असतं. वक्तृत्व गंभीरपणे करायची साधना आहे याची साक्ष त्यांना ऐकलं की मनोमन पटते. प्रभाव पाडण्याच्या कोणत्याही मोहात न पडता त्यांचं सलग दीड-दोन तास खिळवून ठेवणारंही वक्तृत्व असतं. ठाम तसंच व्यासंगी प्रतिपादन म्हणजे आक्रमकता नाही आणि आक्रस्ताळेपणा तर नाहीच नाही हे, एलकुंचवार यांच्या वक्तृत्वातून दिसतं. बरं ते एकतर्फी बोलत नाहीत तर संवाद साधत आहेत अशी त्यांची शैली असते त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वासोबत श्रोते त्यांच्या नादमय लयीत श्रवणाचा आनंद घेतात.

अर्थात हे काही सहज घडत नाही. महत्वाचा कार्यक्रम असला की बरेच दिवस आधी त्यांच्या मनात विषय घोळत राहतो आणि ‘काय रे भाषण सुचतच नाहीये काही’ असं ते म्हणायला लागले की समजायचं काही तरी कसदार ऐकायला मिळणार आहे म्हणून. एखादा गवयी जसा रियाज करून राग पक्का करतो तसं एलकुंचवार एखाद्या विषयाच्या मांडणीची मनातल्या मनात तयारी करत असतात. एक तर ते खूप कार्यक्रम घेतच नाहीत पण कार्यक्रम मोठा असो की छोटा भाषणाची तयारी गंभीरपणे, हे एलकुंचवार यांचं वैशिष्ट्य.

कवी ग्रेस यांना विदर्भ भूषण सन्मान दिला गेला तेव्हा एलकुंचवार केवळ तेरा ते चौदा मिनिटे ग्रेस यांच्यावर बोलले. एका प्रतिभावंतांने दुस-या प्रतिभावंताला केलेला तो कुर्निसात होता. एक प्रतिभावंत दुस-याच्या प्रातिभ कवतुकाचे दीप उजळवत आहे आणि दुसरा त्या आभेत गुंगून डोलतेय असा तो एक विलक्षण अनुभव होता. या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तर आयोजक राजकारणी त्यामुळे, एलकुंचवारांचे भाषण पूर्ण रेकॉर्ड झालेच नाही, असा तो करंटेपणाचा ‘आनंदी आनंद’ आहे.

//४//

एलकुंचवारांविषयी नागपुरात काय किंवा महाराष्ट्रात काय ते शिष्ट आणि अशा आख्यायिकाच जास्त. त्यातून प्रतिमा माणूस एकदम फटकळ आणि तुसडा अशी तयार झालेली. प्रत्यक्ष अनुभव मात्र वेगळा. एलकुंचवार वृत्तीने चोखंदळ, शिष्टाचार, राहणी, वर्तन याबाबत एकदम इंग्रजी शिस्तीतले. याबाहेर जाऊन कोणी वागलं की त्याला फटकारणार. असं वर्तन आणि व्यवहार पुन्हा घडला की ते करणारा कोणीही असो त्याला दूर ठेवणार. स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात कोणाला डोकावू न देणारा एक सहृदयी माणूस अशी त्यांची आमच्यासारख्यांच्या मनातली प्रतिमा आहे. स्वत:चं मोठं आजारपण बाजूला ठेवून माझ्या पत्नीच्या हृदयाच्या बायपास सर्जरीनंतर काळजी घेणारा आणि दिल्लीसारख्या अनोळखी शहरात आजारी पडला तर आमची काळजी कोण घेणार याची चिंता वाहणारा अस्सल सहृदयी माणूस म्हणजे एलकुंचवार आहेत. (त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू प्रस्तुत लेखकाच्या लेखनात पूर्वीच आलेले आहेत.) भास्कर लक्ष्मण भोळेसारखा सख्खा मित्र अकाली आणि तेही भेट न होता गेल्यावर सैरभैर होणारा हळवा मित्र हेही एलकुंचवार यांचं रुप आहे. दुर्गाबाई भागवत ते दुर्गाबाई खोटे आणि अमरीश पुरी ते ग्रेस असा स्वानुभवातून आलेला किश्श्यांचा खूप मोठा साठा त्यांच्याकडे आहे आणि तो रंगवून सांगण्याची हातोटी आहे. हे अनुभव आणि किस्से पूर्ण वेगळे आहेत. हे किस्से ते लिहीत का नाहीत हा नेहेमीचा प्रश्न असतो आमचा आणि त्यांचे उत्तर असतं, ‘हे सर्टिफाय कोण करणार ?’ हे असं जबाबदार भान एलकुंचवार यांना आहे. अफाट वाचन आणि असंख्य विषयांचं ज्ञान असणारं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांना भेटून बाहेर पडलं की काही न काही नवीन आपल्या तिजोरीत जमा झालेलं असतं. त्यांची स्वत:ची मतं आहेत आणि त्यावर कोणतीही तडजोड ते करायला तयार नसतात. स्वत:च्या शिस्तीत आणि मस्तीत जगण्याची शैली त्यांना सापडलेली आहे आणि म्हणून त्यांच्यात एक ऐसपैस असा समंजसपणा आणि त्यातून अपरिहार्यपणे आलेला लोभस मोठेपणा आहे, तो पेलण्याची ताकद अनेकात नाही, नक्कीच नाही.

नागपूरला होणा-या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एलकुंचवार असावेत अशी अनेकांची तीव्र इच्छा होती पण, ‘आपण यजमान. पाहुण्यांचा आदर करायचा, सन्मान करायचा सोडून यजमानाने मिरवत राहणं मला आवडणार नाही. एक कार्यकर्ता म्हणून मी या संमेलनात सहभागी होईन’, अशी भूमिका एलकुंचवार यांनी घेतली, एलकुंचवार यांचं मोठेपण असं अनेक टप्प्यांवर आहे. इतकं ठाम आणि स्पष्ट जगणं शिकवणारे एलकुंचवार वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करत आहेत. आमच्यासारख्यांच्या जगण्यावर पसरलेली एलकुंचवारांची स्निग्धाळ सावली यापुढेही अशीच निरोगी आणि गर्द राहो.

ताजा कलम/ ८ ऑक्टोबर २०१४  —एलकुंचवारांच्या व्याख्यानांचं ‘सप्तक’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. ते आम्हा उभयतांना पाठवतांना एलकुंचवारांनी लिहिलंय – “मंगल व प्रवीण, फार आठवण येते… महेशदादा.”. यावर आम्ही पामरांनी काय म्हणावे बरे?

-प्रवीण बर्दापूरकर

संबंधित पोस्ट

 • Uday Kulkarni

  तुम्ही भाग्यवान!

  लोकसत्तामध्ये रविवारी दोन लेख आले, तेही छान होते.

 • Anil Mukund Govilkar … फारच सुंदर लेख, विशेषत: “मौनराग” हे तर माझे विशेष आवडीचे पुस्तक आणि त्यावरील तुमची समीक्षा अधिक सुंदर. एलकुंचवार यांच्यावर तसे फारसे लेख प्रसिद्ध नाहीत आणि त्यामुळे हा लेख अधिक लक्षणीय!!

 • Subhash Naik… महेश एलकुंचवार सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 • Shrikant Nakade …एलकुंचवार महेश यांना वाढदिवसाबद्दल मनापासून हार्दिक शुभेच्छा, या निमित्त वाड्याची आठवण झाली ़

 • Vinayak Rao

 • ​PRAVEEN KULKARANI, AHAMADNAGAR …​
  प्रविणजी, पुन्हा एलकुंचवार लेख वाचला…. ! अप्रतिम….!
  नाट्य लेखनाच्या बदलेल्या कक्षा अधिक व्यापक करण्याचं संपुर्ण श्रेय एलकुंचवारसरांनांच जाते….! खुप दिवसांनी वेगळं असं चांगलं वाचायला मिळालं….! धन्यवाद…..!!

 • ​NARENDRA GANGAKHEDKAR…​
  I have seen his plays in Mumbai. He was with us during China – Japan trip. We had good time during travel. He is a different writer. After Vijay Tendulkar, he made real impact in the field and became national figure.

 • dr.anil pimplapure

  Aprateem

 • Vandana Pathak, aurangabad…. Manaswi shubheccha Sir Aaj hya nimittane Nagpur che Dharampeth college athavale ani tithe Eng shikavnare Apan… Tumache student asanyacha bhagya milalele amhi sarvajan..

 • Shreeram Kekre… It seems BJP has got inherent benefit of winning election at national level. BJP + allied parties CAN cross the magic figure of 144.