वन ​​मॅन आर्मी !

(३ डिसेंबर हा आंबेडकरी विचारवंत, ज्येष्ठ कवी, समीक्षक, वक्ते, पत्रकार, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते वामन निंबाळकर यांचा स्मृतिदिन दिन.
त्यानिमित्त नागपूरला होणाऱ्या एका कार्यक्रमात वामन निंबाळकर यांच्या स्मृत्यर्थ प्रकाशित झालेल्या ‘चळवळीचे दिवस ‘ या विशेषांकासाठी लिहिलेला लेख-)

​// १ //

वामन निंबाळकर नावाच्या माणसाची ओळख आम्ही दोघंही विद्यार्थी दशेत असतांना झाली.
अर्थात वामनराव मला ज्येष्ठ; म्हणजे ते तेव्हा एमएला, मिलिंदला आणि मी बीकॉमच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला सरस्वती भुवनमधे असणार.

औरंगाबादचं मुख्य बसस्टँड तेव्हा नुकतंच शहागंज भागातून, आत्ता जिथे आहे तिथे शिफ्ट झालेलं होतं.

त्यामुळे मिल कॉर्नरच्या हॉटेलात एरव्ही भरणारा मिलिंदच्या काही मुलांचा अड्डाही बसस्टँड समोरच्या ​मॉडर्न आणि ​पॅराडाईज हॉटेलात हललेला होता.
औरंगाबादच्या तेव्हाच्या तरुणाईचं ‘रान्देव्हज’ असलेली ही दोन्ही हॉटेल्स तसंच त्यांच्या बाजूची पान-सिगारेटची दुकानं रात्रभर सुरु राहत आणि महत्वाचं म्हणजे रात्रभर हिंदी चित्रपटातील अवीट गोडीची गाणी, गझल ऐकवत तरुणांना कितीही वेळ बसण्याची परवानगी होती.

मॉडर्न आणि पॅराडाईज असे दोन मठच होते म्हणाना ते आणि तिथे रात्र रात्र ठिय्या मारणारे त्या मठाचे भक्त. त्यातही ​मॉडर्न हा मठ जास्त जुना आणि जास्त ‘फॉलोअर्स’ असणारा !

त्या रात्रीच्या अड्ड्यावर केव्हा तरी वामन निंबाळकर यांची भेट झाली.
कवितेपासून अनेक विषय कॉमन होते त्यामुळे सूर जुळायला फार काही वेळ लागला नाही; लवकरच आम्ही कधी ‘अरे-तुरे’ तर कधी ‘अहो-जाहो’ अशा सीमारेषांवर विसावलो.

ज्याला आता पंचेचाळीस-सत्तेचाळीस तरी वर्ष उलटली, त्या काळात लक्षात आलेली ठळक बाब म्हणजे वामनराव कधी एकटे नसत; कायम तरुणांच्या घोळक्यात ते असत.

दुसरं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने आणि त्यांच्या विचाराने गारुड केलेल्या, आंबेडकर हाच श्वास झालेल्या या तरुणाचा विवेक विलक्षण जागृत असायचा; म्हणजे कोणताही मुद्दा कोणीही मांडला तरी, त्याची दुसरी बाजू वामनराव लक्षात घेणार आणि इतरांनाही ती समजावून सांगणार.
या गुण वैशिष्ट्यांमुळे वामन निंबाळकर कधी कुणाच्या आहारी गेले नाहीत; ‘वन ​​मॅन इंडिपेंडंट आर्मी’ असा खाक्या वामनरावांचा असायचा आणि तोच खाक्या पुढे त्यांनी ओंजळीत कायम जपला !

विद्रोही कवितेच्या उदयाचा तो काळ होता आणि शब्दबंबाळ विद्रोहाला मोठी लोकप्रियता मिळण्याचे ते दिवस होते मात्र; वामन निंबाळकर मात्र त्याही तरुण दिवसात अशा कोणत्याही वाटांवर न जाता सामुहिक वेदना आणि अस्मितेचा हुंकार देणारी स्वत:ची वेगळी वाट निर्माण करण्याच्या ठाम निर्धाराने चालत होते.

// २ //

‘शिका आणि संघटीत व्हा,’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश शिरोधार्ह मानून तो प्रत्यक्षात आणणाऱ्या पहिल्या पिढीला विद्रोहाचा हुंकार देण्यासाठी एकोणिसाव्या शकतातील साठोत्तरी दशक उजाडलं.
या पिढीने विद्रोहाचा हुंकार दिला आणि साहित्य-समाजकारण–राजकारण अशा विविध क्षेत्रात मानवतावादी परिवर्तनाच्याही मशाली पेटल्या.
विद्रोहाचे धुमारे प्रज्वलित करणाऱ्या आघाडीवरील गटात वामन निंबाळकर यांचं नाव अग्रकमानं घ्यावं लागेल.
बुलढाणा जिल्ह्यातील लांजुळ येथे १३ मार्च १९४३ रोजी जन्मलेल्या वामन निंबाळकर नावाची मशाल आंबेडकरी प्रेरणांच्या अदृश्य इंधनावर अखेरच्या क्षणापर्यत कोणतीही तडजोड न स्वीकारता तेवत राहिली.

औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात पदव्युत्तर शिक्षण घेता घेताच त्यांच्या गावकुसाबाहेरच्या कवितांनी वेदनेचा आणि विद्रोहाचाही एक वेगळा हुंकार मराठी साहित्यात उमटवला.

गावकुसाबाहेरची ती वेदना हा काही व्यक्तिगत अनुभव नव्हता तर ते एक विद्रोहाचं समूहगान होतं.
जाणिवा परिपक्व होण्याच्या त्या काळापासून ते अखेरचा श्वास घेईपर्यंत वामन निंबाळकर तीच वेदना, तोच हुंकार आणि तोच विद्रोह समंजस एकनिष्ठेने व्यक्त करत राहिले.

वामन निंबाळकर यांनी इतिहास आणि हिंदी या दोन विषयात एम. ए.ची आणि मराठी कवितेतून घडणाऱ्या आंबेडकर दर्शनावर संशोधन करून पीएच. डी.ची सन्माननीय पदवी संपादन केली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात आंबेडकर विचारधारा विभागात १३ वर्ष अध्यापन केल्यावर आंबेडकर विचारांचा पूर्णवेळ प्रचारक होण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि अखेरच्या श्वासापर्यत प्रचारकाची ही भूमिका अविरतपणे निभावलीही.

प्रचारकाची भूमिका स्वीकारल्यावर त्यांनी कविता अधिक टोकदार झाली; याच काळात त्यांनी स्वतःतला समीक्षकही जोपासला.
त्यांच्यातल्या समीक्षकाने हातात कटुतेची छडी न घेता नवोन्मेषाचे अंकुर जोपासण्याची सर्जनशील आणि संवेदनशील भूमिका स्वीकारली.
त्यामुळे मराठीत नवे कवी –लेखक मिळाले तसेच, मराठी साहित्यात तोवर अव्यक्त राहिलेल्या वेदनेची असंख्य वेगवेगळी रुपेही उमटली.

“ भारतात प्रत्येक माणसाची
एक जात असते
येथे आग लावणारी
ती हमखास वाट असते ”

सामुहिक स्वप्नभंगाचे असे विशाल दुःखही वामन निंबाळकर अशा संयत शब्दात नेमकेपणानं व्यक्त करत होते.
दिवसेंदिवस आणि वर्षोगणती त्यांच्या कवितेला अनुभव विराट आणि सामुहिक होत होता.
मराठी साहित्यातली मनस्वी विद्रोहाची एक मशाल म्हणून वामन निंबाळकर आकाराला आले.
निंबाळकरांचे ‘गावकुसाबाहेरच्या कविता’ नंतर ‘धर्मयुद्ध’ आणि ‘वाहत्या जखमांचा प्रदेश’ असे आणखी दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले.
समीक्षकाच्या भूमिकेतून ते प्रकाशकाच्याही भूमिकेत शिरले आणि त्यांच्या प्रबोधन प्रकाशनाने अनेकांना प्रसिध्दीचा मार्ग दाखवला.
साप्ताहिक ‘आजचे प्रबोधन’ आणि ‘परिचारक’ यातून संपादक म्हणून वामन निंबाळकरांनी पत्रकाराचाही रोल निभावला.
कवितेसोबतच अन्य ठाशीव लेखनही ते अनेक वर्ष सातत्याने करत होते.

हे नुसतंच लेखन नव्हतं तर त्यातून नवी माहिती देण्याची निंबाळकरांची ओढ कशी तीव्र होती; यासाठी ‘सामाजिक लोकशाहीचे प्रणेते डॉ. आंबेडकर’ आणि प्रा. म. भि. चिटणीस समग्र वाड्मयाचा आढावा घेणारा ‘सामाजिक क्रांतीची दिशा’ या दोन ग्रंथांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
अशा विविधांगी भूमिका एकाच वेळी बजावता बजावता वामन निंबाळकर व्यक्ती न राहता ते एक संस्था झाले होते.

मात्र, या संस्थेचे आपण सर्वेसर्वा आहोत, याचा भ्रम न बाळगता मनस्वीपणे वामन निंबाळकर संचार करत राहिले; असं वागता येणं तळहातावर पेटती ज्योत सांभाळता येण्याइतकं कठीण आव्हान असतं मात्र, ते आव्हान वामन निंबाळकर यांनी पेललं.

// ३ //

प्रत्येक माणसात अपरिहार्यपणे असणारा अधिक-उणेपणा असूनही माणूस म्हणून वामन निंबाळकर जिंदा दिल होते.
आपल्या धारणेशी तडजोड न करता कोणतीही मतभेदांची अढी आड न येऊ देता मैत्री निभावण्याचा वामन निंबाळकर यांचा स्वभाव होता; कोणाच्या माघारी त्याच्याविषयी सतत टिप्पणी करत राहावं असा चिवट आणि व्यापक कद्रूपणाही त्यांच्या स्वभावात मला तरी जाणवला नाही.
औरंगाबादच्या दिवसात आमच्या वाटा वेगळ्या झाल्या.

वामनराव नागपूरकडे गेले तर माझी पत्रकारितेच्या निमिताने भटकंती सुरु झाली.
१९८१ साली जानेवारी महिन्यात माझा पडाव नागपूर पत्रिका या दैनिकात नागपूरला पडला आणि आम्ही पुन्हा भेटलो; असे की जणू मधल्या काळात काही विसरच पडलेला नव्हता.

मग भेटींचा हा सिलसिला सुरूच राहिला, कधी एकमेकाच्या घरी जाणं-येणं झालं; मैत्रीचा-गप्पांचा एक निखळ, संथ पण अव्याहत प्रवाह सुरु राहिला.
एक प्रसंग सांगण्यासारखा आहे- काही वर्ष मुंबई आणि औरंगाबादेत घालवल्यावर मी पुन्हा नागपूरला ‘लोकसत्ता’चा निवासी संपादक म्हणून परतलो.
एक दिवस, दररोजची संपादकीय बैठक संपल्यावर संपादकीय सहाय्यक नामदेव पराडकर यांनी सूचना दिली की, वामन निंबाळकर भेटायला आले आहेत.
मी लगबगीनं उठून बाहेर गेलो आणि वामनरावांना आत घेऊन येत म्हणालो, ‘सरळ आत नाही यायचं का ?’
तर वामनराव म्हणाले, ‘तुमची बैठक सुरु होती म्हणून थांबायला सांगितलं. थांबलो मग मी’.
मी म्हटलं, ‘वामनराव आपण जुने मित्र आहोत. ही बैठक आजची आणि मी संपादक आहे म्हणून आहे. आपले जुने ऋणानुबंध जास्त महत्वाचे आहेत’.

‘अरे, आता तू संपादक झालायेस, तुझा मान ठेवायला हवा. मी ज्येष्ठ असल्यानं तर माझी जबाबदारी जास्त आहे’, वामनराव म्हणाले.
‘संपादक नाही, निवासी संपादक आहे…’ या माझ्या म्हणण्यावर वामनराव म्हणाले, ‘होशील मित्रा एक दिवस संपादक तू, मला खात्री आहे !’
मग मी वामन निंबाळकर यांना थेट आत पाठवण्याच्या सूचना दिल्या; दरम्यान आमचं कार्यालय ग्रेट नाग रोडला शिफ्ट झालं आणि जाता-येता त्यांच्या भेटी वाढल्या पण, बैठक सुरु असेल तर थेट आंत न येता वामनराव बाहेरच थांबायचे; असा उमदेपणा.

याच काळात वामन निंबाळकर यांनी खूप आग्रहानंतर ‘लोकसत्ता’साठी कोणतीही अढी मनात न ठेवता ‘चळवळीचे दिवस’ हे स्तंभ लेखन केलं ! आंबेडकरी चळवळीचा दस्तावेज ठरणारं हे लेखन पूर्णत्वास गेलं नाही याची खंत माझ्या मनात आजही आहे.

आणखी एक अनुभव विलक्षणच आहे –

नागपूरला होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची कुणकुण लागताच मी (एकेकाळी या निवडणुकांत माझा फारच सक्रीय सहभाग असे !) भास्कर लक्ष्मण भोळेंनी मिळून अरुण साधू यांच्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली तेव्हा वामन निंबाळकर यांना ही निवडणूक लढवायची आहे याची किमान मला तरी कोणतीही कल्पना नव्हती.

निवडणुकीचा कर्यक्रम जाहीर झाल्यावर एक दिवस अरुण साधू यांच्या उमेदवारी अर्जावर भोळे सरांची स्वाक्षरी घेऊन मी त्यांच्या घरातून बाहेर पडलो.
थोडंस अंतर ड्राईव्ह केलं आणि वामनरावांचा फोन आला.
कार बाजूला घेऊन मी फोन घेतला; बोलतांना वामनराव म्हणाले, ‘प्रवीण या निवडणुकीसाठी मी उभा राहतोय. तू जुना दोस्त आहेस. माझ्या नावाचा सूचक हो तू’.
काय प्रतिक्रिया द्यावी हे सुचेनासे झाल्यानं मी एकदम गप्पच झालो.

काही वेळानं मी सांगितलं, ‘मित्रा, तुला खूप उशीर झालाय. मी अरुण साधू यांना पाठिंबाच दिला नाहीये तर त्यांच्यासाठी निवडणूक जाहीर होण्याआधीच अरुण साधूंसाठी भरपूर लॉबिंगही केलाय आणि अगदी आत्ताच भोळेसर आणि माझी सही असलेला साधू यांचा उमेदवारी अर्ज घेऊन निघालोय…’
काही वेळ आमच्यात शांतता होती; मग वामनराव म्हणाले, ‘साधूंच्या विजयासाठी तुला शुभेच्छा’ आणि त्यांनी फोन बंद केला.
निवडणूक झाली. साधू निवडून आले. येणारच होते.

नंतर वामनराव आणि माझ्या बऱ्याच भेटी झाल्या. आमच्यातले जणू काहीच घडलं नाही असे संबंध पूर्ववत राहिले.
आता औरंगाबादला स्थायिक झाल्यावर बसस्टँडसमोरुन जाता-येताना वामन निंबाळकर यांची आठवण हमखास येते.
स्वत:च्या टर्मवर जगलेला हा मित्र म्हणजे खरोखर वन ​​मॅन आर्मी होता…


-प्रवीण बर्दापूरकर
संपर्क +९१९८२२०५५७९९ | [email protected]
============================
​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी

लिंक – http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515
============================

संबंधित पोस्ट

 • Sariputra Tupere ….
  लेख वाचताना चळवळीचे दिवस आठवले.

 • Nishikant Anant Bhalerao ….
  वामन मला चांगला आठवतो मिलिंद कॅम्पस मध्ये प्रवीण वाघ बरोबर अनेकदा त्याच्याशी चर्चा झडायच्या

 • Vijaykumar Kale ….
  Vinamra Abhivadan

 • Suryakanta Patil ….
  वामन आणि स्नेहा दोघेही माझे जिवलग माझी कन्या नागपूर मेडिकल ला असतांना त्याचे घर हे माझ्या मुली साठी तिचे आजोळ होते खूप लाड केले दोघांनीही तिचे।आज नाहीत खूप आठवण येते भावा ,तुझ्या आठवणीस विनम्र अभिवादन।

 • Milind Wadmare….
  छान…

 • Sushila Pi ….
  वामन निंबाळकरांच्या घरी नागपूरात प्रा.बा.ह.कल्याणकर,माझे सहचर डॉ.अशोक नारनवरे, नागेश चौधरी,प्रा.प्रभाकर पावडे यांनी जेवण घेतले हाेते.त्यांच्या कवितांबरोबरच खूप आठवणी आहेत.विनम्र अभिवादन!

 • Prakash Paranjape ….
  अत्यंत नेमकं शब्दचित्र .71 ,72 मधे मिल कॉर्नरवर खोली घेऊन रहात असतांना स्टँडसमोरच्या हॉटेलमधे मी रात्री बेरात्री अड्डेबाजी केली होती पण कधी ओळख झाली नाही याची चुटपुट लागली .असो .यथा काष्टंच काष्टंच (दोन ओंडक्यांची भेट झाली नाही हे खर)