शहजाद्याची घरवापसी !

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात गायब असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठे वाजत गाजत आगमन झाले आहे. परदेशी शिकून एखादा राजपुत्र राज्य करण्यासाठी देशाच्या राजधानीत परतल्यावर लोकात जसा उत्साह शिगेला पोहोचतो तसे कॉंग्रेसजणांचे सध्या झाले आहे. ते स्वाभाविकही आहे कारण, एक- कॉंग्रेसला गांधी नेतृत्वाशिवाय पर्याय नाही आणि दोन- गांधी नावाचे नेतृत्व लाभल्याशिवाय आपल्याला राजकारणात बरे दिवस येणार नाहीत याची खात्री असल्याने राहुल गांधी यांची ‘घरवापसी’ सत्तेच्या सोपानाकडे नेण्याची अंधुक का होईना आशा पल्लवित करणारी आहे. त्यातच ‘घरवापसी’नंतर राहुल गांधी लोकसभेत बरेच आक्रमक झाल्याचे आणि त्यांना बऱ्यापैकी कंठही फुटलेला दिसतो आहे. ‘आपला पोपट मुका नाही’ याचा आनंद मालकाला होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते. इथे भूमिकात बदल आहे म्हणजे, पोपट मालक आहे तर मालक प्रत्यक्षात कॉंग्रेस कार्यकर्ते आहेत, एवढाच काय तो फरक! शिवाय लवकरच राहुल गांधी यांच्याकडे कॉंग्रेसची सर्व सूत्रे येणार असल्याने त्यांचे सक्रीय आणि बोलके होणे कार्यकर्त्याना सुखावणारे आहे. राहुल गांधी देशात परतले याचा इतका आनंद कॉंग्रेस नेते-कार्यकर्ते आणि मिडियाला झाला आहे की ते (पक्षी: राहुल गांधी) सुमारे दोन महिने कोठे ‘गायब’ होते याची विचारपूस करण्याचेही भान आता यापैकी कोणाला उरलेले नाही. पण, ज्या सहजपणे शहजादे लोकसभेत सक्रीय झाले आहेत, बोलू लागले आहेत यावरून ते ‘सार्वजनिक जीवनात बोलावे कसे’ या विषयावरील एखादा ‘शॉर्ट कोर्स’ करू आले असावेत असे म्हणायला जागा आहे!

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांचे दिलेले राजीनामे अपेक्षेप्रमाणे स्वीकारले गेले नाहीत तेव्हा गांधी घराणे वगळता अन्य कोणीही काँग्रेसचे नेतृत्व करण्यास लायक नाही हा संदेश पुन्हा एकदा जनतेत गेला होता. मावळत्या लोकसभेत काँग्रेसचे २०६ सदस्य होते ती संख्या ४४ वर येण्याची नामुष्की आल्यावरही सामुदायिक नेतृत्वाची कास न धरता नेते स्वत:च घराणेशाहीच्या जोखडातून मुक्त व्हायला तयार नाहीत, झालेल्या पराभवाचे परखड आत्मचिंतन करण्याचीही या पक्षातील ‘गांधी’ आडनाव नसलेल्या कोणाही नेत्याची तयारी नाही असाही याचा एक अर्थ आहेच. राजकीय विचार, कार्यक्रम, संघटनात्मक बांधणी आणि सामुदायिक नेतृत्व यातून एखादा राजकीय पक्ष आपले स्थान बळकट करत असतो असे मानले जाते. पहिले तीन निकष जर कमकुवत ठरत असतील तर एखाद्या प्रभावी नेतृत्वाच्या करिष्म्यामुळे पक्ष प्रभावी होतो आणि अन्य निकष कमी पडत असल्याचे लक्षात येत नाही. पहिले तीन निकष लागू करायचे झाले तर राजकीय पक्ष म्हणून विद्यमान काँग्रेस पक्ष कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. इंदिरा ते सोनिया हा या पक्षाच्या प्रभावी नेतृत्वाचा एकखांबी तंबू राहुल यांच्या उदयानंतर खरे तर लोकसभा निवडणुकीत कोसळून पडला तरी गांधी नावाचे नेतृत्व असणे ही कॉंग्रेसची मजबुरी आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रारंभीची काही वर्ष देशाच्या राजकीय क्षितिजावर शास्त्रशुद्ध राजकीय पर्यायच उपलब्ध नव्हता . कारण, तेव्हा राजकीय जागृती तसेच शास्त्रशुद्ध पर्याय नव्हता, होता तो बहुप्रयत्ने स्वातंत्र्य मिळवल्याचा आनंद आणि सुखी-समृद्ध भारताचे स्वप्न. सुरुवातीच्या काळात अस्तित्वात असलेल्या काँग्रेसची एकपक्षीय राजवट हा अपरिहार्य आणि अगतिकही अपवाद होता. त्यामुळे काँग्रेस हा एकसंध राजकीय पक्ष वाटला आणि तीच राजकीय वस्तुस्थिती म्हणून आपण स्वीकारली. आपल्या देशात एकसंध एकपक्षीय सरकारही कधीच नव्हते. अगदी १९५२पासून काँग्रेसची जी राजवट आपण एकपक्षीय समजतो ती देशातील विविध धर्म, जाती, विचार, समाज रचना आणि कार्यक्रम याची मोटच म्हणजे एक प्रकारचे गाठोडेच होते. ते स्वाभाविकही होते कारण, भारताची सामाजिक रचनाच केवळ विशाल आणि वैविध्यपूर्णच आहे असे नव्हे तर या रचनेचे सामाजिक स्वरूप जटील आहे, सांस्कृतिक वीण गुंतागुंतीची आहे आणि हीच परिस्थिती म्हणजे कमी-अधिक प्रमाणात जात-धर्म आपल्या राजकीय व्यवस्थेत दिसणार हे स्पष्ट होते.. ते तसे दिसलेही आणि तेच एक ‘राजकीय मॉडेल’ समजले गेले. त्या मॉडेलच्या गोडगैरसमजातच आधी काँग्रेस आणि नंतर अन्य राजकीय पक्षही (एकमेकाला विरोध करत) देशाच्या राजकारणात स्थिरावले.

धर्म, जाती, विचार आणि कार्यक्रम एक गाठोडं असल्याने कालौघात प्रबळ झालेल्या काँग्रेस पक्षात राजकारण म्हणजे सत्ताप्राप्ती आणि सत्ता म्हणजे केवळ आणि केवळ धनसंचय हा विचार प्रबळ झाला परिणामी, पक्षात संधीसाधूंची संख्या दिवसे-न-दिवस वाढतच गेली. अगदी तालुका पातळीवर संपन्न आर्थिक घराणेशाहीची बेटे निर्माण झाली, वर्ष-नु-वर्षे एकाच कुटुंबात सत्ता एकवटली. खराखुरा सामान्य कार्यकर्ता जमिनीवरच राहिला आणि तेच ते चेहेरे सत्तेत दिसू लागले. नेहेरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा करिष्मा असणा-या नेतृत्वाखाली पक्षाची सत्तेच्या दिशेने वाटचाल होत राहिली आणि लोकशाहीवादी राजकीय पक्षासाठी आवश्यक असणारे अन्य निकष आणखी दुबळे होत गेले. अगदी काही मोजके अपवाद वगळता गांधी घराण्याचे नेतृत्व काँग्रेससाठी अपरिहार्यता ठरली. ‘गांधी’ नाव नेतृत्वात नसेल तर आपण यशस्वीच होऊ शकत नाही हा पक्षाचा मूळआधार आणि मानसिकताही बनली. त्यातून नेतृत्वासमोर गुलाम म्हणून राहण्याची ‘बनेल’ वृत्ती काँग्रेसमध्ये फोफावली साहजिकच राजकीय विचार, कार्यक्रम, संघटनात्मक बांधणी आणि सामुहिक नेतृत्व यांचा विसरच पडला. चिंतन, परखड विश्लेषण न होता नेतृत्वाचा उदोउदो म्हणजे ‘राजकीय व्यवहार’ असा समज दृढ झाला. आदर्श लोकशाहीवादी तत्वे कागदावरच राहिली आणि नेतृत्वाचा शब्द सांसदीय प्रणालीत लोकशाही म्हणून ‘बसवला’ जाऊ लागला. काँग्रेस विधी मंडळ पक्षाचा नेता किंवा प्रदेशाध्यक्ष निवडणूक घेऊन निवडण्याऐवजी त्याच्या निवडीचे अधिकार पक्षाध्यक्ष म्हणजे कोणा तरी ‘गांधी’ला देणे हे या हांजी-हांजीची उदाहरणे आहेत! अलीकडच्या साडेतीन-चार दशकात इंदिरा गांधी ते राहुल गांधी (आणि नरसिंहराव) कॉंग्रेस नेतृत्वाचा प्रवास आहे. बाकी नेते म्हणजे बहुसंख्येने स्वत:हून गुलामी स्वीकारलेल्या संधीसाधू खुज्यांचा कळप आहे.

आणीबाणीनंतर, गेल्या ३५-४० वर्षात काँग्रेसचे नेतृत्व श्रीमती इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी केले. प्रत्येकाची कामाची शैली अर्थातच वेगळी मात्र गांधी नावाचे वलय कायम आणि त्याचे फायदे कॉंग्रेसला सदैव मिळत राहिले. ‘गांधी’ ब्रांडमुळेच काँग्रेसला केंद्रात तसेच अनेक राज्यात प्रदीर्घ काळ सत्ताधारी रहाता आले. राजकारणात सक्रीय असतानाच संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू झाला तर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना प्राणाचे मोल द्यावे लागले. राजीव गांधी यांच्या नंतर ते सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे घेण्याचा कालखंड हा कॉंग्रेससाठी विना ‘गांधी’ नेतृत्वाचा राहिला. (या काळात नरसिंहराव आणि सीताराम केसरी काँग्रेसचे नेतृत्व केले.) पक्षाची होणारी खस्ता हालत तसेच संकोच लक्षात घेऊन आणि खरे म्हणजे त्यामुळे सत्तेपासून वंचित राहावे लागत असल्याचे दु:ख जास्त तीव्र, टोकदार आणि सहन करण्यापलीकडचे असल्याने अनेक तथाकथित ‘धुरंधर’ नेत्यांनी नेतृत्वासाठी गळ घातल्याने सोनिया गांधी पक्षाध्यक्षपद स्वीकारले. राजीव गांधी आणि सोनिया गांधी या दोघांनीही राजकारणाची हौस म्हणून नव्हे तर पक्षाची तसेच पक्षातल्या नेत्यांची अपरिहार्यता आणि अगतिकता म्हणून नेतृत्व स्वीकारले होते हेही विसरता येणार नाही. राजीव यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी प्रदीर्घ काळ राजकारणापासून दूर होत्या. सत्तेविना अगतिक झालेल्या या बहुसंख्य खुज्यांच्या कळपातील नेत्यांनी गळ घालून , गांधी घराण्याने केलेल्या त्यागाची आणि बलिदानाची शपथ घालून पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांना विराजमान व्हायला लावले. भारतीय संस्कृती, संचित, परंपरा, रिती-रिवाज वगैरेची ओळख तर सोडाच एकही भारतीय भाषा येत नसताना ‘गांधी’ आडनाव असलेल्या सोनिया गांधी देशभर वणवण फिरल्या आणि अखेर काँग्रेसचे सरकार पुन्हा केंद्रात सत्तेत (वर्ष – २००४) आले. संभाव्य राजकीय विरोध वेळीच ओळखून पंतप्रधानपद मनमोहनसिंग यांना देऊन सोनिया गांधी यांनी जनमानसातील स्वत:चे आणि काँग्रेसचेही स्थान बळकट केले. सोनिया गांधी यांच्या त्यागाचे कौतुक करत सत्तेची फळे चाखण्यात उर्वरित काँग्रेस नेते मश्गुल झाले. इतके मश्गुल झाले की ते बेपर्वा बनले, जनतेप्रती असंवेदनशील झाले आणि हेही कमी की काय अफाट धनप्राप्ती करून मग्रूर बनले. जनतेत त्याबद्दल आधी नाराजी उमटू लागली. ही नाराजी नंतर उद्वेगात आणि नंतर विरोधी मतदानात बदलली.आधी चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला, सत्ता हातची निसटल्याने ह नेते सैरभैर झाले.

दरम्यान प्रकृर्ती अस्वास्थामुळे सोनिया गांधी यांच्या फिरण्यावर मर्यादा आलेल्या होत्या. विधानसभा निवडणुकांतील हवालदिल झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना राजकारणाच्या आखाड्यात थेट उतरवले, निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून राहुल नावाचा गणपती ‘बसवला’ गेला. निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसला त्यामुळे पुन्हा ‘गांधी’ हे नाव मिळाले. त्यासाठी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर एक जंगी शो झाला. कॉंग्रेसला सत्ताप्राप्तीसाठी राहुल गांधी यांचे केवळ नाव हवे होते, त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामात म्हणजे, पक्षाचे दैनंदिन काम, उमेदवार निवड वगैरे बाबीत लक्ष घालू नये अशी अपेक्षा होती. पण, तोपर्यंत केलेल्या देशाच्या विविध भागातील दौ-यात; “नेते मग्रूर झालेले आहेत आणि पक्षाचा मूळ आधार असलेला कार्यकर्ता दुरावला तसेच दुखावलाही आहे” हे वयाची चाळीशी पार केल्यावर राजकारणाबाबत गंभीर झालेल्या राहुल गांधी यांच्या लक्षात आलेले होते. त्यामुळे त्यांनी प्रस्थापित नेत्यांना म्हणजे मनमोहनसिंग, अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, जॉर्ज, सुशीलकुमार शिंदे, चिदंबरम आदिना बाजूला ठेऊन स्वत:ची स्वतंत्र टीम तयार केली. अननुभवी राहुल यांच्या नवीन आणि अपरिपक्व राजकारणाचे नवे पर्व काँग्रेसमध्ये सुरु झाले..पाहता पाहता ते दरबारीही बनले! कार्यकर्त्याला प्रतिष्ठा देण्याची भाषा राहुल गांधी यांनी सुरु केल्यावर काँग्रेसमधील बुजुर्ग सावध झाले. राहुल यांना तोंडघशी कसे पाडता येईल याकडे लक्ष दिले जाऊ लागले. चुकीचे सल्ले देणे हा त्यातील एक हमखास उद्योग होता. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निर्णयाचा ‘नॉनसेन्स’ असा जाहीर उपमर्द करण्याच्या राहुल यांच्या कृतीचे समर्थन करून राहूल यांच्यातील अहंकार आणि बालीशपणाला खतपाणी घालण्यात आले. नरेंद्र मोदी यांचा प्रतिवाद करण्यासाठी थिल्लर मुद्दे पुरवले जाऊ लागले. कार्यकर्त्याना प्राधान्य देणा-या ‘प्रायमरी’ योजनेचा बेरक्या तसेच बनेल नेत्यांच्या मुलांनीच पैसे ओतून असा गैरफायदा उचलला की राहुल गांधी यांना कळलेच नाही. या सर्वाच्या परिणामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचे नेतृत्व साफ अयशस्वी ठरले असल्याचे चित्र निर्माण झाले.

मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामे देत असताना ही आपली सामुहिक जबाबदारी आहे असे म्हणण्याचा बाणेदारपणा कोणत्याही काँग्रेस नेत्यांनी दाखवला नाही कारण, स्वबळावर ताठ मानेने उभे राहण्याची त्यांची सवयच मोडलेली आहे, गुलामी त्यांच्या रक्तात पूर्णपणे भिनलेली आहे. ‘यश तुमच्या(गांधी) मुळे पण, सत्तेची फळे केवळ आमची’ अशी वृत्ती असणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी पराभवाच्या जबाबदारीचा क्रूस खांद्यावर घेण्यास नकार दिला तो याच संधीसाधू, स्वार्थी आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून. अशा बहुसंख्येने असणाऱ्या लोकांच्या विळख्यातून मुक्तता मिळाली तरच येत्या काही वर्षात या पक्षाला पूर्वीची झळाळी आणि वैभव प्राप्त होण्याची संधी असेल. पुढची दहा वर्षे सत्ता मिळाली नाही तरी हरकत नाही पण केवळ सत्तेच्या फळावर डोळे ठेवलेल्या या सर्वाना बाजूला सारून, खऱ्याखुऱ्या, जमिनीवरच्या कार्यकर्त्याला संधी देत पक्षाची नव्याने उभारणी करण्यावर राहुल गांधी यांनी आता भर द्यायला हवा.

‘घरवापसी’ झालेल्या शहजाद्यासमोरचे हे आव्हान एकंदरीत कठीण आहे!

-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट