एक आंतरराष्ट्रीय , एक राष्ट्रीय आणि दोन राज्यस्तरीय ‘न्यूज अलर्ट’ माझ्याकडे आहेत . शिवाय व्हॉटसअप विद्यापीठ आहेच . त्यामुळे दिवसाचे चोवीस तास बातम्यांचा रतीब सुरुच असतो . गेल्या आठवड्यात एका आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त वृत्तवाहिनीकडून एक ‘ब्रेकिंग अलर्ट’ मिळाला की , अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या कुटुंबियाच्या लाडक्या असलेल्या ‘चॅम्प’ या जर्मन शेफर्ड श्वानाचे निधन झाले असून त्यामुळे बायडेन कुटुंबियांना दु:ख झालेलं आहे . त्याचवेळी विशेषत: महाराष्ट्रात आणि काही प्रमाणात राष्ट्रीय पातळीवरच्या प्रकाश वृत्त वाहिन्यांवरही (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विरोधात तिसरी आघाडी कशी स्थापन करत आहेत , या बातम्यांचा रतीब घातला जात होता . दोन्ही घटना अतिशय वेगळ्या आहेत , राजकीय-सांस्कृतिक-आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या परस्परभिन्न असलेल्या दोन टोकावरच्या दोन देशात घडलेल्या आहेत , यात काहीच शंकाच नाही . तरी , भारतातील असोत की अमेरिकेतील , माध्यमांचा तोल ढळलेला आहे हेच अंतर्सूत्र या पत्रकारितेच्या आड लपलेलं आहे , असं म्हणावं लागेल .
तिसऱ्या आघाडीचा पर्याय उभा करण्यासाठी शरद पवार यांनी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एक बैठक आयोजित केल्याच्या वृत्तात तथ्य किती आहे , हे कोणत्याही भारतीय माध्यमानं ; विशेषत: प्रकाश वृत्त वाहिन्यांनी लक्षात घेतलंच नाही ; नुसताच तथ्यहिनतेचा काथ्याकूट सुरु केला . प्रत्यक्षात ती बैठक माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे असंतुष्ट नेते यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची होती . माध्यमांनी मात्र ती बैठक म्हणजे राष्ट्रीय पातळीवर तिसरी आघाडी कशी स्थापन होत आहे ,याचं दळलेलं दळण होतं . शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या त्या बैठकीत आठ विरोधी पक्षांचे नेते आणि काही मान्यवर उपस्थित होते . त्या आठपैकी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे दोन वगळता उर्वरित सहा प्रादेशिक पक्ष होते . शिवाय देशाचे एक निवृत्त सरन्यायाधीश , एक माजी राजदूत , एक माजी निवडणूक आयुक्त , तीन ज्येष्ठ वकील आणि एक लेखक, कवी उपस्थित होते . ( अशा कथित महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी एका कवीलाही देशाच्या राजकारणातील ज्येष्ठतम नेते शरद पवार सहभागी करुन घेतात , हे सर्व कवींनी लक्षात घ्यावं घ्यावं ! ) लोकसभेत जवळ-जवळ तीनशेपेक्षा जास्त बहुमत असणाऱ्या भाजपला आव्हान देण्यासाठी ही जी कथित तिसरी आघाडी म्हणून जुळवाजुळव सुरु होती त्यांचे जेमतेम साठही खासदार नाहीत ! अशी ही सुमारे ३०० विरुद्ध ६० अशी लढाई म्हणजे कुणा रिकामटेकड्या गारुड्यानं वाजवून बघितलेली गाजराची पुंगीही म्हणजे , वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली , अशीही कशी नाही , हेही माध्यमांच्या लक्षात आलं नाही .
अज्ञानाचे दीप उजळवण्याचा माध्यमांच्या प्रयोग आणखीही पुढे आहे . ही जी कथित तिसरी आघाडी होती त्यात तेलगू देसम , बसपा आणि काँग्रेस हे देशातील प्रमुख पक्ष नव्हते . महाराष्ट्रात पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेली आणि लोकसभेत संख्याबळाच्या आधारे तिसऱ्या क्रमांकावर असलेली शिवसेनाही नव्हती . विद्यमान राजकीय परिस्थिती लक्षात घेता आपल्या देशात काँग्रेसला वगळून कोणताही राजकीय पर्याय भाजपाच्या विरोधात उभा करता येऊ शकत नाही ; या कथित आघाडीचे जितके सदस्य संसदेत आहेत त्यापेक्षा जास्त सदस्य एकट्या काँग्रेसचे आहेत आणि राहुल गांधी वगळता अन्य कोणताही नेता नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पर्याय म्हणून उभा राहू शकत नाही , ही वस्तुस्थिती शरद पवार यांची तळी उचलणाऱ्या माध्यमातील पत्रकार/संपादकांना भानावर येऊन केव्हा तरी लक्षात घ्यावीच लागणार आहे ; ते लक्षात घेतलं नाही तर माध्यमांच्या विश्वासाहर्तेचा मुद्दा अधिक गंभीर होत जाणार आहे . थोडसं विषयांतर होईल तरी सांगतो , गेल्या आठवड्यात अचानक बहुसंख्य मराठी आणि इंग्रजी मुद्रीत माध्यमांनी दिल्लीतील वादग्रस्त सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची तळी उचलली . असा ‘यू टर्न’ घेण्यामागची कारणं म्हणा की मजबुरी वाचकांना समजत नाहीत अशा भ्रमात तर ही माध्यमे वावरत नाहीत ना ? असो .
( तिसऱ्या आघाडीचा फुसका बार ठरलेल्या ) या राष्ट्रमंचच्या बैठकीबद्दल स्वत: शरद पवार अद्यापही काही बोललेच नाही . त्यांच्या वतीनं बोलण्यासाठी जे पोपट त्यांनी पाळलेले आहेत , त्या पोपटांच्या म्हणण्यातही कोणतीही सुसूत्रता नाही . (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी कथित तिसऱ्या आघाडीची बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी होत असल्याचं सांगितलं तर , या पक्षाचे खासदार माजिद मेमन यांनी मात्र बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्रमंच या अराजकीय व्यासपीठाची ही बैठक होती असं स्पष्ट केलं . त्यावर ही बैठक शरद पवार यांच्याच निवासस्थानी का असा प्रश्न कुणा पत्रकाराला विचारवसा वाटलेला नाही , हेही लक्षात घेण्यासारखं आहे . ( पत्रकारितेतील आमचे एकेकाळचे सहकारी आणि शरद पवार यांचे शिवसेनेतले प्रवक्ते ) खासदार संजय राऊत यांनी या बैठकीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना , काँग्रेस आणि शिवसेनेला वगळून तिसरी आघाडी निर्माण होऊच शकत नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली . निवडणूक तज्ज्ञ ( खरं तर ‘मॅनेजर’ म्हणायला हवं ! ) प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यातील अशात झालेल्या भेटी गाजत आहेत आणि त्यावरही बऱ्याच उलटसुलट बातम्या माध्यमांतून येत आहेत . प्रशांत किशोर म्हणाले की , “आपल्या देशात आता तिसऱ्या म्हणा की चौथ्या राजकीय आघाडीचे मॉडेल गैरलागू आहे .” असा हा ‘बैठकीचं रामायण’ खूप रंगलं तरी शेवटी रामाची सीता कोण म्हणजे , त्या कथित तिसर्या आघाडीच्या चाचपणीचं काय झालं , हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला .
या संदर्भात नेहमीप्रमाणे राजकीय मौन बाळगून माध्यमांनी त्यांच्या संदर्भात उडवलेल्या गोंधळाची मजा शरद पवार चाखत होते , असंच म्हणायला हवं . अशा ऐन कळीच्या प्रसंगी नेमकी कोणतीही प्रतिक्रिया न व्यक्त करणं आणि जी काही प्रतिक्रिया चुकून व्यक्त केली त्याच्या नेमकं विरुद्ध वागणं हे वैशिष्ट्य राजकीय शरद पवार यांनी याही वेळी कायम राखलं आणि माध्यमांना पतंगबाजी करण्यासाठी आकाश मोकळं सोडलं . त्यामुळे आज नाही तर उद्या ही आघाडी अस्तित्वात येईल अशी भाबडी आशा माध्यमांनी बाळगली की काय , हे कळण्यास मार्ग नाही .
‘शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील चर्चा गुप्त आहे , त्यामुळे नेमकी कशाबद्दल चर्चा झाली याबद्दल काही सांगता येणार नाही ,’ असं म्हणत माध्यमांनी सर्व प्रकारच्या शक्यता/स्वप्नरंजन/अकलेचे तारे पाजळून घेतले . समाजमाध्यम आणि व्हॉटसअप विद्यापीठात तर तथाकथित राजकीय विश्लेषकांच्या विश्लेषणाचा महापूर आलेला होता . त्यातली एक शक्यता तर फारच ‘भीषण सुंदर’ होती आणि ती वाचून जर कुणाला गडाबडा लोळावसं वाटलं नाही तर तो माणूसचं नव्हे-तर ती शक्यता अशी , एक ज्येष्ठ पत्रकार म्हणाले , “देशाचा पंतप्रधान होण्यासाठी म्हणजे केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी किमान २७२ लोकसभा सदस्यांचा पाठिंबा हवा . २७२ सदस्य निवडून आणण्यासाठी किमान ३७२ जागा लढवायला हव्यात . ती चर्चा शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या झाली असल्याची पक्की माहिती मला मिळालेली आहे ” .
इथे मेख अशी आहे की , देशातल्या ३७२ लोकसभा मतदारसंघात शरद पवार म्हणजे (महा)राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे कथित तिसऱ्या आघाडीला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार मिळतील का ? त्यातील २७२ निवडून येण्याइतके सर्वार्थाने ‘लायक’ असतील का ? आणि हे २७२ सदस्य पवारांशी एकनिष्ठ राहतील का ? त्या ज्येष्ठ पत्रकाराच्या या माहितीचा पुढचा उपभाग असा की , “एका उमेदवाराचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा खर्च किमान ४० कोटी रुपये या हिशेबानं , ३७२ उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी १४ हजार ८८० कोटी रुपये लागतील .” ( गेल्या ४५ वर्षांत विधानसभा आणि निवडणुकांचं वृत्तसंकलन केल्याच्या अनुभवाच्या आधारे सांगतो , हा आकडा निम्माही नाही . ) तर , शरद पवार सुमारे पंधरा हजार कोटी रुपये पंतप्रधान होण्यासाठी खर्च करण्याइतके सक्षम , तुल्यबळ आणि राष्ट्रीय स्तरावर सर्वमान्य उमेदवार आहेत का ? समकालात भारतीय जनता पक्ष वगळता अन्य कोणताही पक्ष असा सधन आहे का , असे अनेक प्रश्न कुणाही सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होतील पण , त्यापैकी एकही प्रश्न माध्यमातल्या कुणाच्याही मनात डोकावलाही नाही . हे लक्षण माध्यमांचा तोल ढळल्याचं आहे की , बौद्धीक खुजेपणाचं , हे ज्याच्या त्याच्या आकलनावर सोडायला हवं .
तिसऱ्या आघाडीच्या संदर्भामध्ये स्वप्नरंजनीय पंतगबाजी करणं ही जशी भारतीय माध्यमांची अगतिकता आहे तशीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या श्वानाची मृत्यूची बातमी देणं ही अमेरिकन माध्यमांचीही अपरिहार्य अगतिकता आहे . थोडक्यात काय तर , भारतातील असो की अमेरिकेतील असोत बहुसंख्य माध्यमं बेताल झालेली आहेत म्हणून म्हणायचं , ओरडत रहा , असंच फक्त ओरडतच रहा !
■प्रवीण बर्दापूरकर
Cellphone- 9822055799