काळीज कुरतडवणा-यांचा महाराष्ट्र…

* पालन-पोषण करणं अशक्यच झालं म्हणून अगतिक झालेल्या परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं त्याची बैलजोडी एकही छदाम न घेता समोरच्याच्या हवाली केली – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून ही माहिती दिली आहे.

* पाणी नाही, चारा नाही म्हणून गेल्या दोन वर्षात खंगलेल्या जर्सी गायींनी शेवटचा श्वास घेतल्याचं सहन न झाल्यानं बीड जिल्ह्यातील राहुल आणि काकासाहेब पवार या दोन वेगवेगळ्या गावातील शेतकऱ्यांनी गळ्याला फास लावून घेत आत्महत्या केल्या.

* सर्जन मित्र आणि सुमनांजली हॉस्पिटलचा डॉ. मिलिंद देशपांडे याने सांगितलं- “शेजारच्या गावातील एक शेतकरी गेल्या सतरा-अठरा वर्षापासूनचा पेशंट आहे. त्याच्या पत्नीच्या गर्भाशयाचे ऑपरेशन करावे लागण्याची वेळ आली आहे.
तो म्हणतो, ‘पैसेच नाहीयेत डॉक्टरसाहेब’.
मी म्हटलं, ‘इमर्जन्सी आहे’.
तर तो म्हणाला, ‘गेल्या तीन वर्षात एक दाणा नाही पिकला शेतात ऑपरेशचं पैसे देऊ कुठून ?’.
मी म्हणालो, ‘ऑपरेशन करून टाकू. तुम्ही घरचेच आहात.
तर तो अगतिक स्वरात म्हणाला, ‘डॉक्टर तुम्ही कराल हो ऑपरेशन पण नंतर औषध कुठून आणू ?’

मिलिंद म्हणाला, ‘त्याच्या या म्हणण्यावर मी गप्पच झालो!’.

* निष्णात फिजिशियन असलेला डॉ. प्रदीप मुळे हा मित्र सांगत होता, ‘खेड्यातला माणूस डॉक्टरचे पैसे नाही बुडवत. लगेच हातात नसले तर सांगतो आणि नंतर नक्की आणून देतो. पण यावर्षी गावाकडचे पेशंट कमी झालेत हे मात्र खरं. याचा अर्थ त्या सर्वांचे आजार बरे झाले असा नाहीये’.

* लातूरचे एक अधिकारी सांगत होते- ‘परिस्थिती फारच गंभीर आहे. प्यायला पाणी नाही’.
मी म्हटलं, ‘खाजगी विहिरी का नाही अक़्वायर करून घेत पाण्यासाठी ?’
तर ते म्हणाले, ‘विहिरीचं सोडा, पाण्याचे बहुतेक सर्वच स्त्रोत आटले आहेत.. आभाळच फाटलंय, कसं आणि कुठं-कुठं शिवणार ?’

* गेल्या आठवड्यात बालपणीचा मित्र असलेल्या डॉ. रवींद्र जोशीकडे नासिकला गेलो होतो. सारा रस्ता शुष्क. वैजापूरचे धरण इतके कोरडे ठाक पडलेले की तिथे धरण आहे की नाही अशी शंका यावी. कारमधून खाली उतरलो तर वस्सकन उन्हाची झळ अंगावर आली. एरवी वैजापूर सोडलं की अंदरसूलपासून पुढे शेतीकामाची लगबग आणि डोळ्याला गारवा देणारा आपल्यासोबत धावणारा दोन्ही बाजूचा परिसर हिरवा गर्द प्रवासात सोबत करतो ; हा वर्ष-नु-वर्ष अंगवळणी पडलेला अनुभव यंदा आलाच नाही. येवल्याचा तलावही कोरडा पडलेला. शेतीवर दाटून आलेलं एक विचित्र औदासिन्य प्रवासभर सोबतीला होतं. असा, या प्रवासातला गेल्या साडेचार-पाच दशकाचा अनुभव नाही… १९७१२च्या दुष्काळातलाही नाही. एरव्ही या दिवसात नासिकला पंखाही नकोसा असतो, या मुक्कामात पंखा गरागरा फिरत हवा टाकत होता पण, गारवा नावालाही नव्हताच.

* हे हालहवाल आहेत ऑगस्ट महिन्यातले. श्रावण अर्धा सरलाय असं कालनिर्णयचं कॅलेन्डर सांगतंय पण, पावसाचा टिपूस नाही; मग उन्हां-पावसाचा खेळ कसा असणार आणि ‘श्रावणमासी…’ सारख्या श्रावणाची आठवण काढणाऱ्या कवितेच्या ओळी ओठी येणार कशा? सोशल मिडियावरच्या श्रावणावरच्या कविता आठवल्या… रापलेल्या चेहऱ्याचे… न बरसलेल्या पावसाने व्याकूळ झालेल्या शेतकऱ्यांचे चेहेरे समोर आले आणि मनात कानकोंडलेपणाची सर आली.

* पाऊस नसण्याचे तृषार्त मराठवाड्याच्या वाट्याला आलेले हे सलग दुसरे वर्ष. त्याआधीची दोन वर्ष पुरेसा पाऊसच मराठवाड्यात झाला नाही. म्हणजे चार वर्ष पाऊस नाही. जमिनीतलं पाणी किती दिवस पुरणार ? यावर्षी कृत्रिम पावसासाठी विमान फिरतंय पण हे विमान यायला इतका उशीर झालाय की आकाशात ढगच उरलेले नाहीत.

* शरद पवारांनी दुष्काळी उस्मानाबादला मोर्चा काढला आणि लातुरात दुष्काळी परिषद घेतली. (त्याआधी उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह आणि राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची दीर्घ भेट औरंगाबादला झाली. नंतर महाराष्ट्र भूषण वाद वगैरे पण, असो. आपण ती भेट आणि राज ठाकरे यांनी ‘भूषण’वादाला काही मंत्र्यांचा पाठींबा असल्याचा केलेला आरोप हा योगायोग समजू यात!) मग माजी मुख्यमंत्री नारायण राणे लातूर भागाकडे येऊन गेले. अशोक चव्हाण यांनी जालन्यात दुष्काळी परिषद घेतली. या नेत्यांच्या बोलण्यात दुष्काळग्रस्तांबद्दल आंच कमी आणि राजकीय गलकाच मोठा होता. मुख्यमंत्र्यानी अनेक मंत्री आणि महसूल अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. सप्टेबर महिन्यात औरंगाबादला होणाऱ्या बैठकीत दुष्काळग्रस्तांसाठी काही तरी मिळेल या चर्चेचे ढग आता दाटून आले आहेत. एकूण काय, दुष्काळाचे राजकारण आणि पर्यटन सुरु झालेलं आहे.

* खरीपाचा हंगाम पूर्ण हातचा गेलाय आणि रब्बी पिकांचेही अशुभ संकेत स्पष्टपणे जाणवू लागले आहे… ऐन पावसाळ्यात कळशीभर पाण्यासाठी पायपीट सुरु झाली आहे. परभणीकडचे एक आप्त सांगत होते, ‘मयतीला आलेल्या सर्वांना देता येण्याइतकं पाणी नाहीये घर आणि शेजाऱ्या-पाजारी मिळून’… प्यायला पाणी नाही… जनावरांना चारा नाही…जनावरं मरताहेत त्यामुळे शोकाकुल झालेला बळीराजा आत्महत्या करतोय…आणि जगणाऱ्या माणसांना शुष्क गळ्याने मरणाच्या वाटेवर चालण्याचे भय वाटत असताना सोलापूर कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणतात, ‘रक्त देऊ (म्हणजे प्रसंगी सांडू पण) सोलापूरचे पाणी लातूरला देणार नाही’. दुष्काळग्रस्तांना घोटभर तरी पाणी मिळावे म्हणून कामगिरी बजावण्याऐवजी धनगर-मुस्लीम-मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही तर गुजरातसारखे आंदोलन पेटवण्याचे इशारे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील देत आहेत… लोकप्रतिनिधींची लोकांशी असलेली नाळ कशी तुटलेली आहे याचं हे उदाहरण आहे. एकवेळ मुंगीला लिपस्टिक लावता येईल पण, आपल्या लोकप्रतिनिधींच्या संवेदना जागृत करता येणार नाही, असा हा न सुटणारा गुंता आहे…

dushkal-1

राज्यातलं राजकारण किती बदललं बघा, संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न उराशी बाळगून एकत्र आलेला मराठी माणूस एकमेकाच्या तहानेचा विचार माणुसकीच्या पातळीवर करायला तयार नाही; एकमेकाच्या उरावर बसण्याची अशी भाषा तो करतोय की पाण्यासाठी तळमळणारा दुसऱ्या जिल्ह्यातला माणूस म्हणजे काही साताजन्माचा वैरीच आहे. खरं तर, कट्टर वैरीही एकमेकाशी असं पाषाणहृदयी वागत असल्याचे दाखले इतिहासात फारसे मिळत नाही. महाराष्ट्रात मराठवाड्यात अति-अति तीव्र तर अन्य भागात कमी तीव्र का असेना दुष्काळ आहे पण, त्याची फिकीर राजकारण्यांना नाही. अहमदनगरचे राजकारणी औरंगाबादला पाणी द्यायला विरोध करतात, नासिकचे राजकारणी अहमदनगरला पाणी देण्यास नकार देतात आणि सोलापूरला पाणी देण्यासाठी पुण्याचे राज्यकर्ते नाहीत. तानसाचे पाणी मुंबईकर पितात पण तानसेकर मात्र पाण्यासाठी वणवण फिरतात… प्यायला पाणी मिळावं यासाठी न्यायालयाला द्यावा लागतो तो आदेश न पाळण्यासाठी काही राजकीय मंडळी वरच्या न्यायालयात जातात… संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी जीवाचे रान करून आंदोलन उभारलेल्यांनी, पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाल्लेल्यांनी, तुरुंगवास भोगलेल्यांनी, प्राणाचं मोल देणा-यांनी, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणा-यांनी हा महाराष्ट्र भविष्यात एकमेकाची तहान भागवण्यासाठी अशी काही भांडा-भांडी करेल असं स्वप्न तरी पहिलं होतं का?

खरं तर, या राज्याचा समतोल विकास केला जाईल अशी नि:संदिग्ध ग्वाही सर्वार्थाने दृष्टे लोकनेते असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न (स्वप्नच शब्द बरा. ‘मंगल-कलश’ नको, नाहक वाद व्हायचा!) साकार होताना दिली होती; हे राज्य मराठी माणसांचंच आहे, असा निर्वाळा ग.त्र्यं. माडखोलकर यांच्या अग्रलेखाला उत्तर देताना यशवंतरावांनी ठामपणे दिला होता. असं असतानांही तहान भागवण्याचीही माणुसकी विसरल्याचं क्लेशदायक चित्र वारंवार समोर येतंय. यशवंतराव चव्हाण यांच्या शब्दावर विसंबून मराठवाडा विनाअट तर वैदर्भीय रितसर करार करून संयुक्त महाराष्ट्रात आला. मात्र यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरच्या आणि त्यांचा वसा चालवण्याचा दावा करणा-या अशा दोन्ही गटाच्या राज्यकर्त्यांनी समतोल विकासाचा शब्द पाळला नाही त्यामुळेच हे असे एक ना अनेक प्रश्न आक्राळ-विक्राळ झाले आहेत आणि त्यातच या राज्यात अंकुरलेल्या फुटीची बीजं आहेत. राज्यकर्त्यानी जबाबदारीचं भान राखून वेळीच पाण्याचं समन्यायी नियोजन आणि वाटप करून समतोल विकासाचं आश्वासन पाळलं असत तर हे भीषण चित्र निर्माणच झालं नसतं.

राजकारण म्हटल्यावर कट-कारस्थान, शह-प्रतिशह, कुरघोडी चालणार हे गृहीतच आहे किंबहुना तो राजकारणाचा धर्म आहे, अविभाज्य भाग आहे तो राजकारणाचा. आपल्या राज्यात घडलं ते मात्र विपरीत आणि त्यामुळे परस्पराबाबत अविश्वासाची भावना निर्माण झाली. आधी विकासाचा असमतोल निर्माण केला गेला, त्यातून अनुशेषाचा प्रश्न समोर आला. त्यातून अनुशेष दूर करण्यासाठी जे काही गंभीर प्रयत्न सुरु झाले त्यातही राजकारण आणलं गेलं. अनुशेषाचाही अनुशेष निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली! मराठवाड्यात गोविंदभाई श्रॉफ आणि विदर्भात श्री.वा.धाबे यांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी आंदोलन उभे राहिलं. त्यातूनच वैधानिक विकास मंडळाचा अंकुश आला. हा अंकुश बोथट करण्याची ‘बेरकी’ कामगिरी राज्यकर्त्यांनी बजावली आणि त्यातूनच आता पाण्याचा प्रश्न पेटला आहे.

‘महाराष्ट्राचं राजकारण पुढच्या काळात पाण्याच्या मुद्द्याभोवती फिरेल आणि ते करताना राजकारणी सर्व मर्यादा विसरतील’, असं पाण्याच्या प्रश्नाचा अभ्यास असणारे आता दिवंगत असलेले तत्कालिन आमदार रायभान जाधव नेहेमी म्हणत असत. तहान भागवण्यासाठी गर्धभामागे पाणी घेऊन धावणा-या एकनाथ महाराज यांचा माणुसकीचा इतिहास आणि संस्कार महाराष्ट्राचे राजकारणी विसरतील असं तेव्हा मुळीच वाटलं नव्हतं; आता राजकारणाने तीही खालची पातळी गाठली आहे. महाराष्ट्र संयुक्त आहे पण, एकसंध नाही यापेक्षाही हा महाराष्ट्र माणुसकी विसरतोय हे शल्य कोणाही संवदेनशील माणसाचं काळीज कुरतडवणारं आहे… समतेची स्वप्न पाहणाऱ्या सर्वांसाठी हे वातावरण भयकंपित करणारं आहे.
(श्री हाफिज पठाण यांनी ‘दिव्य मराठी’साठी काढलेले हे छायाचित्र ३१ जानेवारी २०१५ला प्रकाशित झालेल्या माझ्या ब्लॉगमध्ये याआधी वापरलेले आहे )

-प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
[email protected]

संबंधित पोस्ट

 • awdhoot parelkar…
  अहो, ते बैलजोडीचे वगैरे जाऊ द्या; शीनाची हत्या इंद्राणीने केली की संजीव खन्नाने ते सांगा !

 • Prafulla P Pathak , New Delhi….
  कोणाही संवदेनशील माणसाचं काळीज कुरतडवणारं………………… हे वातावरण भयकंपित करणारं आहे.

 • Shruti Vinchurney…
  Kharach bhishan aahe. Rajkarni ekmekavar aarop karnyat magna.

 • Gayatri Chandavarkar …
  पिळवटुन टाकणारे। भयानक वास्तव

 • Vinay Ganesh Newalkar….
  Faar bhayaan paristiti aahe,Mumbaitlya vihiri sarv bujavlyaaata panni panni karat phirto aahot, pudhe kaay honar kalat naahi,,,,

 • Uday Deshpande …
  Pravinji Khupch sunder vastabadi chitran.

 • Bhanudas More…
  परिस्थिती फार गंभीर नक्कीच आहे. सध्याचे महाराष्ट्र शासन व केंद्र शासन संपुर्ण जनावरांची वाताहत व माणसे मरण्याची वाट पाहतेय काय? लिखाणास शरद पवार तसेच काँग्रेस द्वेषाचा छुपा वास येतोय. पावसाल्याचे तीन महिने संपलेत, काॅंग्रेसच्या कालात किमान जनावरांना वाचविण्यासाठी छावण्या तरी सुरू झाल्या असत्या

 • Anil Naik ….
  Congress gift Solapur congress persons are objecting to release water to Latur town.

 • Mahesh Elkunchwar…

  कालच गिरीश कुबेर येउन गेला तेंव्हा ह्याच विषयावर आम्ही बोलत होतो.
  पाण्याचा प्रश्न अजूनही आपण गंभीरपणे घेत नाही . काय करावे?
  मी युगांत लिहिले ते खरेच खरे करणार काय आपण?
  मुंगीला लिपस्टिक फारच बेफाम!
  गर्धभ शब्द चुकून गदर्भ असा आला आहे.

  • गर्धभ , अशी दृष्टी केली आहे . सॉरी .

 • Kamlakar Sontakke….
  अतिशय समर्पक.

 • SHRIKANT JOSHI… Excellent

 • Varsha Joshi…. khup chhan

 • unmesh amrute….

  नमस्कार,
  संवेदनशील, संमजस, विवेकवादी, सुसंस्कृत माणसाचं मन विषण्ण होईल अशी स्थिती खरंच आहे का?
  तशी असती तर मराठा महासंघ आणि संभाजी ब्रिगेडने काढलेल्या पत्रकावर नेमाडे, कोतापल्ले, विद्या बाळ, मेघा पानसरे, मुक्ता दाभोळकर यांनी सह्या केल्या असत्या का?
  (मुक्ता दाभोलकरांनी दुसऱ्या दिवशी पत्र लिहून आपली चूक मान्य केली असं म्हणतात.)
  असो लेख खूप चांगला आहे.
  धन्यवाद…

 • Narendra Khot….
  जरूर वाचावा असा ब्लॉग…

 • Sadanand Bhave ….
  One should be happy that number of maharashtrians are settling in Delhi which is growing as a microcosm of Indan Culture

 • Vishwas Ranade …
  प्रवीणजी मुंगी लिपस्टीक लावेल,आयस्क्रीम खाईल…पण.आपल्या लोकप्रतिनिधींच्या संवेदना जागृत करता येणार नाही, हा गुंता सोडवायला मार्ग तुमच्यासारखे निर्भीड पत्रकार,विचारवंत व मिडीयावालेच करू शकतील. .

 • Sunil Deshmukh ·…
  सत्तेत आल्यावर सत्तारूढ पक्षांची संवेदनशीलता आटू लागते आणी विरोधी पक्षांची वाढते.

 • Gayatri Chandavarkar ..
  Apathy and callousness is on the rise. Politicians are the most thick skinned people. Their apathy and callosness disappears when they ask for votes and promise the moon. Not a single poliician is excluded.

 • Rashmi Paraskar…
  Many a times I get scared about where we would end up….

 • Arshad Munshi….
  Really it’s very bad to see this. Local People don’t have a drinking water. What our government is doing…………?

 • Mugdha Karnik…
  शेअर केलंय. शिवाय मुंबईतून पाण्याच्या रिकाम्या बाटल्या साध्या पाण्याने भरून एसटीवर, गाड्यांवर पाठवण्याचं आाहन केलंय. विद्यापीठाच्या एनएसएसमधून जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी पाठवता येईल असा प्रयत्न करायचा. मटाचे धनंजय लांबे संपर्कात आहेत.
  तुला काही सुचलं तर सांग.
  अगदी विकल माणसांपर्यंत पाणी पोहोचावं यादृष्टीने तिथे काय करता येईल पहा.

 • Bhagyashree Bapat Banhatti …
  नदी जोडो अभियान – अशी परिस्थती निर्माण न होण्यासाठी किती सुयोग्य उत्तर आहे, पण कुठल्याही पक्षाचे सरकार येवो नुसत्या घोषणा केल्या जातात, कृती शून्य. इतर राज्यातील सोडाच पण महाराष्ट्रात उगम पावणार्या नद्या जोडल्या गेल्यातरी काही अंशी का होईना भीषणता नक्कीच कमी होईल.

 • Sanjay Gaat ….
  I have seen this picture live in Jalna! Really heart wrenching! In this age and at this stage women in our towns (not villages) have to exert so much for a vessel full of water. Tragic indeed!

 • Ramesh Zawar ….
  महाराष्ट्रातलं भीषण वास्तव तुम्ही मांडलंय. वैधिनक विकास मंडळाच्या मागणीला शंकरराव चव्हाणांचा विरोध होता तो विधानसभेचे अधिकार खच्ची होतात म्हणून. पर्ययाने आमदारांचे अधिकार खच्ची होतात, असे त्ायंचे मत होते. वैधानिक विकास मंडळांचे उद्दिष्ट्य राज्यकर्त्यांनी विफल करून टाकले. तुमचा रिपोर्ट वाचून असं वाटतं की मराठवाडा पूर्वी जिथे होता तिथेच तो आजही असावा. फक्त काय बदललं असेल तर औरंगाबाद. नांदेड आणि लातूर थोडंफार बदललं असेल. बाकी खेडीपाडी आणखी वाईट झाली आहेत.

 • Dr Arun Gadre….
  महाराष्ट्र आता फक्त लांडग्यांचा – बिल्डरांचा अन स्वमग्न मध्यम्वर्गाचा झाला आहे. विषण्ण व्हायला होते

 • Subhash Bhor …
  About Bhagyashree’s joining rivers Veteran leader Balasaheb Vikhe Patil just yesterday put before CM fadnvis in Pravaranagar and CM assured to gave thought

 • Anupama Gunde
  … सर खरंच खूप भीषण वास्तव आहे