चितळेंचा चिवचिवाट !

जागतिक किर्तीचे जलतज्ज्ञ, आदरणीय डॉक्टरेट माधवराव चितळे यांनी विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं आहे. माधवराव चितळे यांच्या या विधानाचा आमचे मित्र जल अभ्यासक, समान पाणी वाटपासाठी स्वत:ची नोकरी बाणेदारपणे पणाला लावणारे, त्यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणारे डॉ. प्रदीप पुरंदरे, ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव आणि एस एम देशमुख यांनी सुसंगतवार समाचार घेतलेला आहे; तर यानिमित्ताने विकासाची आत्यंतिक तळमळ असणारे, चळवळे, उच्चविद्याविभूषित श्रीकांत उमरीकर यांनी शेतकरी संघटनेच्या पांच राज्य स्थापन करण्याच्या भूमिकेची पुन्हा री ओढत माधवराव चितळे यांच्या फुटीरतावादी मागणीला व्यापक केलं आहे. (निशिकांत भालेराव आणि श्रीकांत उमरीकर यांच्या पोस्ट या मजकुराच्या शेवटी दिल्या आहेत)

स्पष्टपणे सांगायचं झालं तर; हे ज्यांच्या संदर्भात घडलं त्या दोघांना मिळालेल्या पुरस्कारकर्त्यांच्या तारतम्याबद्दल शंका यावी अशी स्थिती आहे. ज्या वृत्तपत्रात माधवराव चितळे यांचा स्वतंत्र मराठवाडा निर्मितीची मागणी करणारा चिवचिवाट प्रकाशित झालाय त्या वृत्तपत्राच्या संपादकांच्या नावे अग्रलेख मागे घेण्याचा जागतिक किर्तीचा नीचांक आहे तरी त्यांना, स्वतंत्र विदर्भाचं समर्थन करणाऱ्या आयोजक आणि पाहुण्यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो आणि मराठवाडा स्वतंत्र नाही तर विकसित झाला पाहिजे यासाठी ज्यांनी आयुष्यभर अव्यभिचारी व्रत धरलं, त्या गोविंदभाई श्रॉफ यांच्या नावाचा पुरस्कार लहान राज्यांचे समर्थक असणाऱ्या माधवराव चितळे दिला जातो; यावरून पुरस्कारकर्त्यांची निवड करणाऱ्या परीक्षकांचे आणि तो देणाऱ्या आयोजकांचे आकलन किती सुमार आहे हे जसं दिसतं तसंच हा पुरस्कार स्वीकारणारे वैचारिकदृष्ट्या किती कोडगे आहेत याचंही दर्शन घडतं !

माधवराव चितळे हे ज्या विचाराचे आहेत तो विचार (म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ !) छोट्या राज्यांचा समर्थक आहे. याच विचाराच्या वडीलांनी आपल्याला कसं घडवलं हे माधवराव चितळे यांनी महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार १९ जून २०१६च्या अंकात लिहिलेलं आहे. “वडील संघाचे काम करीत होते, तरीही पं. नेहरूंच्या या योजनेत मी योगदान द्यावे व देशाची बांधणी करण्याच्या कामी हातभार लावावा, असा त्यांचा आग्रह होता. राज्यात राहून पाणी क्षेत्रातच काम करावे, हा निर्णय मी वडिलांच्या दिशादर्शनामुळेच घेतला. अभियांत्रिकीनंतर पाणी क्षेत्रातच काम करण्याचे मी ठरविले. मला सर्वार्थाने वडिलांनीच घडविले. ”, असं या मजकुरात माधवराव चितळे यांनी नमूद केलेलं आहे. ज्यांची जडणघडणच छोट्या राज्याच्या समर्थनाची आहे त्यांनी आता उत्तरायुष्यात स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करावी यात आश्चर्य काहीच नाही. विकासासाठी वेगळं राज्य नाही तर राजकीय इच्छाशक्ती महत्वाची असते आणि त्यात मराठवाडा अजूनही मागे पडतो आहे त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती कशी वाढेल यासाठी चार मोलाचे शब्द जर माधवराव चितळे यांनी  सांगितलं असतं , तर ते योग्य मार्गदर्शन ठरलं असतं. पण आजवरच्या आयुष्यात कधीच किमान ठोस भूमिका न घेण्याच्या लौकिकाला जगत आणि जागत माधवराव चितळे यांनी स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीचा व्यर्थ आणि केविलवाणा चिवचिवाट केलेला आहे.

ज्या क्षेत्रात काम आहे त्या सिंचन क्षेत्रातील अनुभवाच्या आधारे काही सांगण्याचं सोडून स्वतंत्र मराठवाडा स्थापनेसाठी माधवराव चितळे यांनी रेल्वे, दुग्धविकास आणि कुरण विकास असे आधार घेतलेले आहेत. इथे एक उल्लेखनीय बाब म्हणजे विदर्भवादी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही गेल्याच पंधरवड्यात स्वतंत्र होण्यासाठी विदर्भ आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम नाही हे प्रतिपादन करतांना दुग्ध विकासाचंच उदाहरण देत स्वतंत्र विदर्भवाद्यांना उचकावलं आहे ! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राज्य सरकारबद्दल तीव्र नाराजी दाटून आलेली असतांना कुणाच्या तरी इशाऱ्यावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वेधण्याचा हा रचलेला डावही असू शकतो आणि त्यात माधवराव चितळे यांनी भाग घेतला असावा, असं म्हणण्यास वाव आहे.

ज्या सिंचन खात्यात इतकी वर्ष नोकरी केली त्या सिंचन खात्यानं राज्यात सिंचनासाठी समान पाणी वाटपाची भूमिका स्वीकारावी यासाठी माधवराव चितळे यांनी कधी आग्रह धरल्याचा दाखला नाही. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यावर सिंचनासाठी जर समन्यायी पाणी वाटप झाले असतं तर आज विदर्भ व मराठवाड्याच्या कृषी क्षेत्राची जी काही ससेहोलपट झालेली दिसते आहे तशी झाली नसती. उलट शेती भरभराटीला आलेली असती आणि बळीराजा ओंजळीत मरण घेऊन जगतांना दिसला नसता. आहे तो जल कायदा कठोरपणे अंमलात आणावा, असाही आग्रह सिंचन खात्यात इतक्या मोठ्ठाल्या पदांवर आणि राज्य व केंद्र सरकारात मोक्याच्या जागांवर काम करतांना माधवराव चितळे यांनी वेळीच धरला असता; त्यांच्या वजनाचा योग्य वापर केला असता तर शेती मातीमोल झाली नसती आणि हे राज्य सुजलाम सुफलाम झालं असतं. माधवराव चितळे यांनी मराठवाड्याचं पाणी अडवणाऱ्या नेत्यांच्या विरोधात शासक म्हणून कणखरपणा दाखवला असता; विदर्भाच्या सिंचनाचा निधी पश्चिम महाराष्ट्रात पळवून नेणाऱ्या पुढाऱ्यांच्या विरोधात जर संघर्षाची भूमिका घेतली असती ते पाणी विदर्भ व मराठवाड्याला मिळून या दोन्ही प्रदेशात कुरणंच कुरणं विकसित झाली असती परिणामी दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात विदर्भ आणि मराठवाड्याने पश्चिम महाराष्ट्रापेक्षा उत्तुंग भरारी घेतलेली असती; विदर्भ आणि मराठवाड्याचे ‘डी. जे. कुरियन’ म्हणून बळीराजाने त्यांना डोक्यावर घेतलेलं असतं; घराघरात त्यांच्या छायाचित्रांची शेतकऱ्यांनी, दुग्ध उत्पादकांनी पूजा बांधली असती.

जलक्षेत्रातील माधवराव चितळे यांच्या तज्ज्ञतेचा आणि प्रतिमेचा उपमर्द करण्याचा कोणताही हेतू मनी नाही पण, हे सर्व बाजूला ठेवत कुणीतरी एकदा स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुसंस्काराचा दाखला देणाऱ्या माधवराव चितळे यांची कार्यशैली सत्ताधाऱ्यांना योग्य जागी विरोध करण्याची बाणेदार कधीच नव्हती तर ‘येस सर’ची होती. राज्याच्या समतोल विकासासाठी आपल्या हाती असलेल्या चाव्या एक शासक म्हणून जर नीट उपयोगात आणण्याची ठाम भूमिका घेतली असती तर आजच्यासारखा केविलवाणा चिवचिवाट करण्याची वेळ माधवराव चितळे यांच्यावर आली नसती. आपण अशा ठामपणे वागू शकलो नाही याची सल बहुदा माधवराव चितळे यांना खात असावी म्हणूनच आता स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करुन शहीद होण्याची हुक्की त्यांना आली असावी.

माधवराव चितळे यांच्या वक्तव्यातील आणखी विसंगती अशी- अहमदनगर आणि नासिक जिल्ह्यातील ज्या नेत्यांनी मराठवाड्याचं पाणी रोखून धरण्यात मोलाची कामगिरी बजावली त्याच नेत्यांचा ‘विकासाचा आदर्श’ म्हणून माधवराव चितळे यांनी उल्लेख केलेला आहे. एका प्रदेशाच्या वाट्याचे पाणी अडवून आपल्या भागातील विकास योजना राबवण्यासाठी प्रादेशिक अस्मिता जपणारे असे नेते राज्यात होते…अजूनही आहेत तसंच पाण्याच्या असमान वाटपाचा प्रश्न निर्माण आणि माधवराव चितळे यांच्यासारखे ‘होयबा’ अधिकारी प्रशासनात बहुसंख्येने असल्याने हा प्रश्न आक्राळविक्राळ झालेला आहे. कायम ‘होयबा’ राहून विकासाचा असमतोल वाढवण्यात झालेल्या आपल्या चुकांची कबुली देण्याऐवजी स्वतंत्र राज्याची मागणी करणे म्हणजे विकासाच्या भळभळत्या जखमां करणारांनीच त्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

माधवराव चितळे मान्यवर आहेत तरी त्यांच्यात नसलेल्या धारीष्ट्याबद्दल आणखी एक बाब नमूद करायला हवी, जल नीती आणि सार्वजनिक हितांबद्दल त्यांची सचोटी बड्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर कायम खालमान्या चाकराची होती; त्यांना स्पष्टपणे सत्य सांगण्याच्या अभावाची होती; अन्यथा (लांच लुचपत खात्याला नंतर आढळले तसे गैरप्रकार तज्ज्ञ म्हणून दिसल्यावरही) सिंचन घोटाळ्याच्या चौकशीत माधवराव चितळे यांनी काही ठोस अभिप्राय दिला नाही की कोणावर ठपका ठेवण्याचं धारिष्ट्य दाखवलेलं नाही. आता या प्रकरणात जी शपथपत्रे न्यायालयात दाखल झालेली आहेत त्यातून तर माधवराव चितळे यांच्यासारख्या अधिकारी-अभियंत्यांचा ‘बिनकणा’च दिसतो. खरं तर, कोणा वार्ताहराने या संदर्भात नीट माहिती घेऊन लिहिण्याचं आव्हान पेलायला हवं; त्यातून त्या मंत्र्यांचे कारनामे, अधिकारी-अभियंत्यांची खालमानी बिनकण्याची भूमिका आणि माधवराव चितळे यांचे अनाकलनीय मौन जगासमोर येईल ! दोषींना दोषी असल्याचं सांगण्याचं धाडस जे करु शकत नाहीत त्या माधवराव चितळे यांच्यासारख्यांनी विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्याचे आणि संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे उद्योग करू नयेत. हिंदी चित्रपटातील एक लोकप्रिय नट राजकुमार यांचा वक्त या चित्रपटातील एक डायलॉग आहे, “जिनके घर शीशे के होते हैं, वो दुसरों पें पत्थर नही उठा करते…”

“मा. माधवराव चितळे, माफ करा लहान तोंडी मोठा घास घेतोय, आपल्याला वाईट वाटेल, वेगळं राज्य मागण्याचा चिवचिवाट करण्यापेक्षा ‘सिंचन क्षेत्रात जनहिताची अपेक्षित भूमिका बजावण्यात मी कमी पडलो. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या न झालेल्या विकासाच्या पापात माझाही सहभाग आहे’, अशी कबुली देणारा कावळे करतात तसा कलकलाट जरी तुम्ही (पक्षी : माधवराव चितळे) केला असता तर गोविंदभाई श्रॉफ यांच्या आत्म्याला किंचित का असेना समाधान वाटलं असतं. शिवाय तुमची ज्या विचाराची बांधिलकी आहे त्या विचाराच्या पदरी, आणखी एक स्वयंसेवक नापास झाल्याचं अपरंपार दु:ख पडलं नसतं..”

(छायाचित्रे गुगल’च्या सौजन्याने)


-प्रवीण बर्दापूरकर
संपर्क +९१९८२२०५५७९९ | praveen.bardapurkar@gmail.com


ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांची पोस्ट—

चितळे यांचे….. काहीही……
माधवराव चितळे यांच्या विद्वतेविषयी आदर असून पाणी क्षेत्रात त्यांनी जे सर्वोच्च स्थान मिळवले ते नक्कीच अभिनंदनीय आहे. त्यांना गेल्या आठवड्यात आदरणीय गोविंदभाई यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला तो चितळे यांच्या पाणी प्रश्नांच्या जाणीवाबद्दल. अन्यथा गोविंदभाई यांनी १९३५ पासून सातत्याने मराठवाड्याचे प्रश्न आणि त्यात पाणी मह्व्ताचे धरून जी मांडणी केली त्या विरुद्धच आजवर चितळे यांची पाणी वाटपाबद्दल विशेषतः समन्यायी पाणी वाटप, लोकसंख्येनुसार पाणी याबद्दल चितळे यांची मांडणी गोविंदभाई यांच्या अनुकूल कधीच नव्हती. शिवाय चितळे हे पर्यावरणवादी यांना नेहमीच विकासाचे मारेकरी मानत असतात; भाई यांचे तसे नव्हतेच. मुख्य म्हणजे भाई यांनी मराठवाड्याच्या स्थापने पूर्वीपासून मराठवाड्याच्या पाण्याबद्दल ‘ठोस’ भूमिका घेतली होती आणि त्याचा पाठपुरावा ते करत राहिले. दुष्काळी परिषदांतून भाई यांनी जी भूमिका घेतली तशी चितळे सरांनी त्यांच्या निवृत्तीनंतर सुद्धा कधी घेतली नाही. खरे म्हणजे ‘नरो वा कुंजरोवा’ हाच चितळे यांचा स्थायीभाव आहे. त्यांचे सारे करियर सिंचन आणि पाणी या क्षेत्रातील पण अलिकडे ते सोडून सर्व विषयावर ते बोलत असतात; त्यांनी जरूर बोलावे काही बिघडत नाही. त्यांनी सिंचन घोटाळा अहवाल सादर केला पण त्यात ठोस भूमिका नाहीच. कॉंग्रेस राष्ट्रवादी नेत्यांनी इतके भ्रष्ट प्रकार केलेत तर अहवालात म्हणायला पाहिजे होते ना की, कठोर कारवाई करा आणि पवार तटकरे आदी मंडळीना जलसंधारण खात्यापासून कायमचे दूर ठेवा म्हणून…पण सारे मोघम. बरे आतासुद्धा खरे तर पुरस्कार स्वीकारतानाच त्यांनी माझ्या अहवालावर काय करता महाजन, फडणवीस साहब असे म्हणायला हवे होते, ‘नमामि गंगे’संबंधी चितळे यांनी दिलेल्या महत्वाच्या अहवालावर केन्द्र सरकार काहीच करत नाहीये असे म्हणून तरी राजीनामा दिला असता तर गोष्ट वेगळी. तिथेसुद्धा चितळे सरांचे असेच; भूमिकाच नाही… राज्य आणि केन्द्र सरकारात अनेक वर्षे पाण्यासंबंधी महत्वाचे पद भूषवताना चुकुनही एकदाही माधवराव चितळे यांनी मराठवाड्याच्या न्याय पाणी हक्काबद्दल साधा उल्लेख केलेला नाही… भूमिका तर दूरच. ना डावे समाजवादी ना रा स्व संघ यांना कधी त्यांनी मदत केल्याचे ऐकिवात नाहीच. स्वतंत्र मराठवाड्याची हांक चितळे यांनी देणे हा तर विनोदच. त्यांच्या या मागणीने अकारण संभ्रम वाढून मराठवाड्याची जी मूळ लढाई; शेती ग्राम विकास आणि पाणी या प्रश्ना विरुद्धची आहे त्या पासून विचलित करण्याचा डाव चितळे यांचा असावा. खरे म्हणजे अंगाला काहीच लावून न घेणाऱ्यापैकी ते असल्याने एकदम स्वतंत्रवादी भूमिका त्यांनी ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून घ्यावी आणि ज्यांना कोणाला अशी भूमिका हवीय त्यांच्या राजकारणाला मम म्हणावे हे वाईट. ‘लोकसत्ता’नेसुद्धा संयुक्त महाराष्ट्रवादी भुमिकेविरुद्ध अशा फुटकळ उद्योगांना महत्व न देता चितळे सरांच्या सिंचन घोटाळ्यातील अहवालावर जागा खर्च केली पाहिजे”.

श्रीकांत उमरीकर यांची पोस्ट—

“चितळेंच्या मुखातून वेगळ्या मराठवाडा राज्याची मागणी बाहेर आली आणि ‘लोकसत्ता’ला अग्रलेख लिहावा वाटला. आजपर्यंत ह्यासाठी सतत मागणी होत आलेली आहे. शेतकरी संघटनेने २० वर्षापूर्वी वेगळ्या विदर्भ सोबत वेगळा मराठवाडा मागितला होता. इतकेच नाही तर ही मागणी भावनिक न करता विदर्भ – मराठवाडा- उत्तर महाराष्ट्र- पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई सह कोकण अश्या ५ राज्याची मागणी केली होती. जेव्हा जेव्हा ही मागणी केली जाते तेव्हा तेव्हा ह्यामागे किती लोक आहेत अशीच टिपणी उपहासातून केली जायची. आता चितळे यांच्या मागे किती लोक आहेत हे न तपासता, त्यांच्या मूळ भाषणात नसलेला विषय मुलाखतीतून पुढे आणून पहिल्या पानावर बातमी केली जात आहे. बरोबर नेमक्या दुसऱ्या दिवशी त्यावर अग्रलेख येतो आहे. हे नेमके काय आहे ? १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन होता तेव्हा नाही हा विषय पुढे आणला गेला…४ नोव्हेंबर ला मराठवाड्यातील सगळ्यात उंच ध्वज राज्यपालांच्या हस्ते फडकला तेव्हा नाही विषय पुढे आला… आणि आता काहीच कारण नसताना चितळे ह्यांच्या तोंडून हा विषय वदवून घेतून त्याची बातमी करून त्यावर अग्रलेख लिहिला जातो आहे. ह्याच्या काही दिवस आधीच ‘लोकसत्ता’कार नागपूरला होते. प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार विदर्भावाद्याच्या हस्ते स्वीकारत होते. तेव्हा ह्यामागची”सांघिक कवायत”सहज लक्षात येऊ शकते. काहीही असो, वेगळ्या मराठवाड्याचा विषय ऐरणीवर आणलात धन्यवाद. फक्त एकच विनंती आहे; उद्या हा अग्रलेख मागे घेऊ नका. चितळे ह्यांना पण विनंती आहे की, मी असे बोललोच नव्हतो किंवा माझ्या बोलण्याचा रोख तसा नव्हता असे काही म्हणून नका. आम्ही वेगळ्या मराठवाड्याच्या बाजूने आहोत. केवळ मराठवाडाच नव्हे तर भारतात आता जी २६ राज्ये आहे ती किमान ५० तरी झाली पाहिजेत. जय मराठवाडा !

============================
​‘डायरी’, नोंदी डायरीनंतरच्या’, ‘दिवस असे की…’, ‘आई’, ‘क्लोज-अप’, ‘ग्रेस नावाचं गारुड’, ‘समकाल’ या माझ्या पुस्तकांसाठी

लिंक – http://www.bookganga.com/ebooks/books/Bookapplet?AID=4736828222950359515
============================

संबंधित पोस्ट