सुधीर रसाळ – वाङ्मयाभ्यासाच्या वाटेवरचा व्रतस्थ

नुकताच रसाळ सरांना भेटून आलो . ( सोबतचं छायाचित्र याच भेटीत ‘शूट’लं आहे . ) रसाळ सर म्हणजे डॉ . सुधीर नरहर रसाळ . मराठीतले विद्यमान ज्येष्ठतम समीक्षक . वाङ्मय संस्कृतीचे चिंतक . निगर्वी आणि सालस विद्वत्ता हे रसाळ सरांच्या व्यक्तिमत्त्वाचं लेणं आहे . बेट मारुन सांगतो , ‘डोकं ठेवावं असे पाय असणारी माणसं आता उरलेली नाहीत ,’ असं सभेतलं हमखास टाळ्या घेणारं विधान करणाऱ्यानी एकदा रसाळ सरांना भेटावं . ते नक्कीच नकळतपणे रसाळ सरांसमोर नतमस्तक होतील .  रसाळ सरांच्या भेटीनंतर आपल्या आकलनाच्या कक्षा उजळलेल्या असतात हा अनुभव नेहमीचाच असतो
तब्बल ३७ वर्ष मराठी साहित्य आणि भाषेचं अध्यापन केलेल्या डॉ . सुधीर रसाळ यांचा मी विद्यार्थी नव्हतो ; त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी संशोधनही केलेलं नाही . संशोधन करण्याचा मुद्दाच माझ्या पत्रकारिता या व्यवसायानं उपस्थित होऊ दिला नाही कारण शास्त्रीय संशोधनाला लागणारी चिकाटी आणि गांभीर्य पत्रकारितेत नसतं ; या निकषांवर पत्रकारिता ‘ऊठवळ’ या सदरात मोडणारी असते . थोडक्यात त्यांचा विद्यार्थी किंवा संशोधक व्हावं असा एकही गुण माझ्यात नव्हता . तरी मला सुमती वहिनी आणि सुधीर रसाळ या दांपत्त्याचा लोभ , ममत्व गेली चार दशकं मिळालं आहे . माझ्या बेगमच्या मृत्यूनंतर त्या ममत्वात वाढच झाली आहे  . त्यांच्या घरी गेलं की अजूनही वाटीत कांही तरी खाऊ आणि चहा दिल्याशिवाय सुमती वहिनी सोडत नाहीत . असे अनेकजण भेटल्यामुळेच ‘डोकं ठेवावं असे पाय असणारी माणसं आता उरलेली नाहीत’ , अशी भ्रांत मला आजवर कधी पडलेली नाही . न बोलता आपल्या पाठीवर कायम हात ठेवत धीर देणारी एक थोरली पाती घरात असते , तशी रसाळ सरांबाबत माझी भावना आहे अर्थात , तशी भावना तर त्यांच्या सहवासात येणाऱ्या अनेकांची असणार . आप्त आणि मित्रजन  सुधीर रसाळ यांना  ‘बापूसाहेब’ म्हणतात पण , मी मात्र ती सलगी कधीच साधू शकलो नाही त्याचं कारण   निगर्वी विद्वत तेज आणि त्यांच्या स्वभावातलं सालसपण असणार .
रसाळ सर सर्व वाचतात . खरं तर त्याला वाचन यज्ञ म्हणायला हवं . वाचन तुच्छता त्यांच्यात नाही . त्यांच्यात वाचन सहिष्णुता इतकी वैपुल्यानं आहे की , माझंही लेखन ते वाचतात . माझं प्रत्येक पुस्तक मी त्यांना दिलेलं आहे आणि त्यांनी त्यावर पुढच्या भेटीत अभिप्रायही  दिलेला आहे . म्हणूनच मी नेहमी म्हणतो , एखादा प्रज्ञावंत किती सोशीक , निगर्वी असतो , याचं  माझ्या तरी पाहण्यातलं सुधीर रसाळ सर हे एक उदाहरण आहे .
सुधीर रसाळ यांचा जन्म वैजापूरचा पण , त्यांचं मूळ गाव औरंगाबादच्या आता कवेत आलेलं गांधेली . ‘गांधेलीला कांही असेल नं ?’ ( इथे ‘कांही’ मध्ये मला मालमत्ता अपेक्षित होतं ) या प्रश्नाला उत्तर देताना रसाळ सर म्हणाले , ‘गांधेली मी सोडलं १९५२ साली . तेव्हा शेती , वाडा होता . गेलं ते सगळं तेव्हाच . आता हेच १९७९ साली बांधलेलं घर आमचं आहे .’ रसाळ सर येत्या १० ऑगस्टला वयाची नव्वदी पार करत आहेत पण, त्यांची स्मरणशक्ती एकदम ठणठणीत आहे . ते कुठलाही संदर्भ  वर्ष , महिना , वार यासकट देतात  .
सुधीर रसाळ यांचे वडील नरहरराव रसाळ हे महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव असणारे  शिक्षक . रसाळ सर  म्हणाले , ‘घरी दोन चरखे होते . त्यापैकी एक पेटीवाला होता ; प्रवासात तो त्यांच्या सोबत असे . आम्हाला सर्वांनाच दररोज सूत कातावं लागे .’ तोच गांधीवादी शिक्षकी वारसा सुधीर रसाळ यांच्याकडे आला आणि अत्यंत निष्ठेनं त्यांनी तो ३७ वर्ष निभावला . खूप वर्ष ते औरंगपुऱ्यातील घरुन सिटी बसनं विद्यापीठात जात आणि याही प्रवासात त्यांचं वाचन    सुरु असे . मध्यम आणि किंचित स्थूल शरीरयष्टी , पूर्ण बाह्याचा बुशशर्ट , पॅन्ट , पायात चपला आणि हातात पुस्तकं     असं कुणी दिसलं तर ते सुधीर रसाळ , असं समीकरण त्या काळात होतं . नंतर पुढच्या काळात स्कूटर आली एवढंच काय तो बदल .
शिकवण्यासोबत सुधीर रसाळ सर रमले ते समीक्षा आणि साहित्य संस्थात्मक कामात . मराठवाडा साहित्य परिषद , अखिल भारतीय महामंडळ , साहित्य संमेलनात ते वावरले . अनंतराव भालेराव , भगवंतराव देशमुख , पाध्ये , नानासाहेब चपळगावकर यांच्यात रसाळ सर रमले . मराठी साहित्य प्रांतीचा १९६० नंतरच्या पडद्याआडही घडलेल्या घटनांचा बिनचूक संदर्भ म्हणजे सुधीर रसाळ आहेत . ‘हा  किस्सा नाही , आठवण आहे’  किंवा  ‘ ही हकीकत आहे बरं का’ असं म्हणत रसाळ सर मग त्यात रमून जातात . सुधीर रसाळ आणि नरेंद्र चपळगावकर यांच्या मैत्रीनं वयाची साठी पार कधीच केली आहे .  ते दोघं साहित्य क्षेत्रात अनेकदा वावरलेलही जोडीनंच . एकदा का त्या दोघांच्या गप्पा सुरु झाल्या की , खूप कांही नवी माहिती मिळते , आठवणींचा पाऊस येतो . त्यात कधी गप्पांची खुमारी वाढवणारा खट्याळपणा असतो , एखादी वाङ्मयेतर रंगिली आठवण असते ; आपल्यासाठी अज्ञात असणारे अनेक सामाजिक संदर्भ त्या बोलण्यात येतात पण , एक मात्र शंभर टक्के खरं , त्यात कुणाची बदनामी नसते आणि त्या वावड्या तर मुळीच नसतात . आपलं काम केवळ त्या मनमुराद गप्पात भिजून जाणं आणि आपल्याला पाहिजे तेवढं ‘मेमरी’त टाकत जाणं एवढंच उरतं .
एकदा मी रसाळ सरांना विचारलं , ‘मराठी कवितेची तुम्ही इतकी मोठी मूलगामी समीक्षा लिहिली पण , आपण कविता लिहावी , कथा लिहावी असं कधी वाटलं नाही का ?’ त्यावर शांतपणे रसाळ सर म्हणाले , ‘कविता नाही लिहिली . लिहावीशीही  वाटली नाही कधीच . मात्र, फार पूर्वी चार-पांच कथा लिहिल्या आणि त्या तेव्हा प्रकाशितही झाल्या . मग समीक्षेच्या वाटेकडे वळलो आणि त्याच वाटेवर चालत राहिलो .’
रसाळ सर बोलताना आणि लिहिताना आक्रमक होत नाहीत पण , जे सांगायचं ते थेट आणि स्पष्टपणे सांगायला मुळीच कचरत नाहीत ; त्याअर्थानं ते निर्भय आहेत . त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या  ‘या स्पष्ट समीक्षेमुळे  कुणी कवी-लेखक नाराज नाही झाला का ?’ या प्रश्नाला उत्तर देताना रसाळ म्हणाले , ‘नाराज झाले की कांही कवी आणि लेखक . पण , अपवाद म्हणूनही माझ्याकडे कुणी बोलले नाही . त्यांची नाराजी मात्र नक्कीच माझ्यापर्यंत आली . एक मोठे कवी समोर आल्यावर न बोलता मान वळवून चालते  झाले पण , हे चालणारच .’
‘समकालातील बहुसंख्य समीक्षा बरीच आत्मस्तुतीपर आणि अनेकदा तर उथळही भासते असं मला वाटतं , ते बरोबर आहे का ?’ या प्रश्नाला उत्तर देताना रसाळ सर म्हणाले , ‘गटबाजी जास्त आली आहे समीक्षेत . कुणाला तरी खूष करण्याकडे कल वाढला आहे .’
‘सर , तुम्हाला कधी औरंगाबाद ( आता छत्रपती संभाजीनगर ) सोडून  मुंबई-पुण्याला जावंसं वाटलं नाही का ?’ या प्रश्नाच्या  उत्तरात एक पॉज घेऊन रसाळ सर म्हणाले , ‘वाटलं होतं की . मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुखपदासाठी मी अर्ज केला होता . मुलाखतीसाठी बोलावणंही आलं होतं . मुलाखतकर्त्यांनी माझी अर्धा तास वाट पाहिली पण मी नाही गेलो .’
‘का नाही गेलात ?’
रसाळ सर म्हणाले , ‘एक तर अनंतरावांनी ( अनंतराव भालेराव ) मोडता घातला . अनंतराव म्हणाले कशाला जातोस मुंबई-पुण्याला ? हे गांव काय चांगलं नाही ? दुसरं म्हणजे या शहराचा मला लळा लागला होता . मग नाही गेलो हे शहर सोडून .’
नव्वदीतही रसाळ सर व्यासंगमग्न आहेत . सकाळी साडेआठ ते साडेबारा , दुपारी दोन ते साडेचार आणि संध्याकाळी

वयाच्या नव्वदीतले कार्यरत सुधीर रसाळ . ( छायाचित्र- राधाकृष्ण मुळी )

साडेसहा ते रात्री साडेआठ ही त्यांची साधारणपणे दररोजची लेखनाची वेळ असते . लेखन सर स्वत: ‘टाईप’तात . ( त्यांचा की बोर्ड ‘मतनक’ आहे  आणि ते श्रीलिपीत ‘टाईप’तात ) त्यासाठी रसाळ सर संगणकावर लेखन करण्याची कला वयाच्या साठीत शिकले .  त्यांची कॉपी एकदम नेटकी . मुद्रणासाठी अंतिम कॉपी कशी बिनचूक असावी , याचा आदर्श म्हणजे रसाळ सरांची कॉपी . लेखनासोबत वाचनही सुरु असतंच . वयाची , वयोमानपरत्वे आलेल्या व्याधींबद्दल कुरकुर करतांना आजवर तरी  सरांना मी कधी पहिलं नाही . एवढ्या लांब जगण्यात कांही वाईट अनुभव आले असणार , कांही खुज्या उंचीची आणि किरट्या वृत्तीची माणसं भेटली असणारच पण , कधी त्याविषयी उणा शब्द रसाळ सरांच्या तोंडून ऐकायला मिळालेला नाही .
वयाची नव्वदी पार करणाऱ्या रसाळ सरांना अजूनही खूप लिहायचं आहे  . कांही व्यक्तिचित्र त्यांच्या मनात आहेत . अध्यापनाच्या काळातील अनुभव सांगायचे आहेत . कांही आठवणीही लिहायच्या आहेत . ‘बघू यात , वय कसं साथ देतं ते,’ असं रसाळ सर त्यावर म्हणतात .
सुधीर रसाळ यांचं आयुष्य म्हणजे अविरत वाङ्मयाभ्यासाची एक सरळ , विस्तीर्ण न संपणारी वाट आहे . वाङ्मय संस्कृतीबद्दल चिंतन करत त्या वाटेवर व्रतस्थपणे सुधीर रसाळ सर चालत आहेत . ते चालणं डौलदार , ऐटबाज आहे आणि म्हणूनच आपल्याला स्तिमित करणारं आहे .
रसाळ सरांना मी काय वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार ? त्यांच्यापेक्षा वयानं तब्बल २१  वर्षांनी आणि कर्तृत्वानं तर २१०० पट मी लहान आहे . आजवर त्यांचा राहिला तसा पाठीवरचा हात आणि आशीर्वाद यापुढेही कायम राखावा हेच शतकी प्रवासाला निघालेल्या रसाळ सरांकडे मागणं आहे .
  प्रवीण बर्दापूरकर
Cellphone  +919822055799

संबंधित पोस्ट