‘ऐसे’ राजकारणी आता दुर्मीळ झाले आहेत…
पत्रकारांच्या माझ्या पिढीनं महाराष्ट्राच्या रस्त्यावरच्या आणि विधिमंडळातल्या राजकारणात अनेक ‘बलदंड’ नेते पाहिले . १९७५ ते ९० चा तो कालखंड होता . तेव्हाचे बहुसंख्य नेते उच्चविद्याविभूषित नव्हते पण , सुसंस्कृत आणि जनतेच्या समस्यांविषयी तळमळ असणारे होते . भलेही बहुसंख्य नेते शैक्षणिक आघाडीवर फारशी चमक दाखवू शकले नसतील पण , त्याच्या आकलनाच्या कक्षा वैपुल्यानं व्यापक होत्या . महाराष्ट्राच्या राजकारण , समाजकारण , सहकार , प्रशासन , अर्थकारण या क्षेत्रांची त्यांना असणारी सूक्ष्म जाणकारी अनुभवतांना चकित व्हायला होत असे . प्रशासनावरची त्यांची पकड वाखाणण्यासारखी असे . एखादा प्रश्न पूर्णपणे जनहिताचाच आहे हे लक्षात आलं की , नियम आणि कायदे बाजूला कसे सारावेत , हे त्यांना चांगलं ठाऊक होतं . सरकारनं एकदा निर्णय घेतला की , कामाचे आदेश (जीआर) आजच्यासारखे महिनोगणती रेंगाळण्याचे ते दिवस नव्हते . वसंतदादा पाटील , शंकरराव चव्हाण , शरद पवार , सुधाकरराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तर सरकारनं सकाळी एखादा निर्णय घेतला की, दुपारपर्यंत आदेश जारी झालेला असे . सत्तेत प्रामुख्यानं काँग्रेस असण्याचा तो काळ होता आणि विरोधी पक्षात जे बलदंड नेते होते त्यापैकी बबनराव ढाकणे एक. बबनराव ढाकणे नावाचं ते वादळच होतं .
१९७७ साली मी पत्रकारितेत आलो तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात बबनराव ढाकणे ( १० नोव्हेंबर १९३७-२६ ऑक्टोबर २०२३ ) यांचं नाव चांगलंच गाजत होतं . याचं कारण त्यांच्यातली वादळी आक्रमकता . बबनराव अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी या दुष्काळी तालुक्यातले . पाथर्डी तालुक्याचे प्रश्न सरकार सोडवत नाही म्हणून तेव्हा तरुण असलेले बबनराव इतके संतप्त झाले की , विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सरकार विरोधी पत्रकं फेकत त्यांनी चक्क सभागृहात उडी घेतली . महाराष्ट्राच्या विधानसभेत अशी घटना तत्पूर्वी घडली नव्हती त्यामुळे सभागृह अवाकच झालं होतं . बबनरावांची उडी हा सभागृहाचा मानभंग आहे म्हणून बबनरावांनी माफी मागावी असा प्रस्ताव विधानसभेनं संमत केला . पण, बबनराव बधले नाहीत . या ‘अँग्री यंग मॅन’नं माफी मागायला ठामपणे नकार दिला आणि आठ दिवस तुरुंगवास पत्करला . बबनरावांची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात झाली पण , आवर्जून सांगायचं म्हणजे तेव्हाचे राजकारणी सुसंस्कृत होते . कारागृहातून सुटका झालेल्या बबनराव ढाकणे यांना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बोलावून घेतलं . बबनरावांचं म्हणणं काय ते समजावून घेतलं आणि पाथर्डी तालुक्यात विकासाची अनेक काम सुरु करण्याचे आदेश तेव्हा वसंतराव नाईक यांनी दिले ; असं सुसंस्कृत आणि उमदं राजकारण आणि राजकारणी आता केवळ आठवणीतच उरले आहेत . गमतीचा भाग असा की , प्रेक्षक गॅलरीतून विधानसभेत उडी मारणारा बबनराव ढाकणे नावाचा अँग्री यंग मॅन पुढे त्याच सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आला . एवढंच नाही तर पुलोदच्या
काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळात बबनराव मंत्री होते , पुढे बॅ. अंतुले
