धक्कादायक अन् अनपेक्षित या दोन शब्दांत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाचं वर्णन करावं लागेल . निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली तेव्हाच महायुतीला विजयाची संधी असल्याचा कल जाणवत होता मात्र , महायुतीचा असा अभूतपूर्व विजय होईल यांचा अंदाज कुणालाच आलेला नव्हता . महायुतीतल्या भाजप , एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं या निवडणुकीत संपादन केलेलं यश विरोधकांचा अक्षरक्ष: धुव्वा उडवणारा आहे . लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेचे निकाल लागत नाहीत , असं प्रतिपादन या स्तंभातून करण्यात आलं होतं त्याला पुष्टी देणाराच हा निकाल आहे . लग्नाच्या पंगतीत जेवायला पोहोचावं तर अन्न संपलेलं आणि परत जाण्यासाठी बाहेर यावं तर चपला-बूट चोरीला गेलेले , अशी अवस्था विरोधकांची झालेली आहे !
या निवडणुकीच्या निकालाचे तीन महत्त्वाचे निर्णय असे आहेत – एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जनतेचा पाठिंबा आहे आणि हेच म्हणणं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही लागू आहे . याचा अर्थ खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणती यावर महाराष्ट्रातील मतदारांनी शिक्कामोर्तब केलं आहे . हे दोन्ही पक्ष राज्यस्तरीय असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत जर जनतेचा कौल अनुकूल मिळाला नसता तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षच ‘दस नंबरी’ आहेत असा दावा करता आला असता पण , मतदारांनी ती संधी नाकारली आहे .
लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर देवेंद्र फडणवीस , अजित पवार आणि एकनाथ शिंदे खडबडून जागे झाले आणि त्यांनी अतिशय चतुराईनं मतदारांना आकर्षित करणारे निर्णय घेतले . त्यात लाडकी बहीण , लाडका भाऊ यासारख्या योजनांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केडर महायुतीच्या बाजूनं ठोसपणे उभं राहिलं . या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे हा महायुतीचा विजय आहे . काँग्रेस , उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष विधानसभा निवडणुकीत महायुती इतके नियोजनबद्ध नव्हते , हे वारंवार दिसून आलं . राजकारण हा जसा अनिश्चितेचा खेळ आहे तसाच तो अनेक शक्यतांचाही खेळ असतो ( politics is game of possibilities ) आणि त्या सगळ्या शक्यता आपल्या पदरात पाडून घेण्यात महायुतीनं निर्णायक धोरणीपणा दाखवला . जागा वाटपासपासून ते प्रचारापर्यंत महायुतींच्या नेत्यांमध्ये संवाद असल्याचं दिसत होतं . महाआघाडीत मात्र नेमक्या याच राजकीय समंजसपणाचा अभाव होता . जागा वाटपापासून महायुतीत खडाखडी सुरु झाली ती शेवटपर्यंत थांबलीच नाही . निकाल येण्याआधीच मुख्यमंत्री कोण असा कलगीतुरा महाआघाडीत रंगला आणि तो बाजारात तुरी…ला साजेसा होता . प्रचारातही महाआघाडीकडून जेवढा काही वाचाळपणा झाला त्याचा शिक्षित मतदारांवर निश्चितच विपरित परिणाम झाला . लाडकी बहीण , लाडका भाऊ यासारख्या महायुतीच्या योजनांवर उधळपट्टी म्हणून टीका करणाऱ्या महाविकास आघाडीनं नंतर या योजना जशाच्या तशा उचलाव्यात , हा ‘आदर्श विराधाभास’ होता आणि तो चाणाक्ष मतदारांच्या लक्षातही आला .
राजकारण म्हटलं की नेतृत्वाबद्दल राजी-नाराजी , पक्षात फूट , आमदार-खासदार इकड-तिकडं जाणं , हे अपरिहार्यच असतं आणि त्यामुळे भावानाक्षुब्ध होणं अपरिहार्यच असतं . पक्षफुटीचा तो वार मोठी जखम करणारा असला तरी झालेली जखम बाजूला ठेवून राजकारण पुढे नेणारा नेता लोकांना आवडतो . भावनांची ही लाट फार काळ टिकत नाही याचं भान पक्ष नेतृत्वाला ठेवावंच लागतं . उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मात्र हे भान पूर्णपणे सुटलं . उद्धव ठाकरेसह त्यांच्या नेतृत्वाखालील सेनेचे सर्वच नेते मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला मिंधे , खोके , गद्दार अशी हेटाळणी करत बसले . अशी हेटाळणी भावनेची लाट ओसरल्यावर लोकांना ऐकायला नकोशी वाटते, हे उद्धव ठाकरे गटाला कळलं नाही आणि त्यांच्यासह आक्रस्ताळ्या प्रचाराचा फटका शिवसेनेला बसला . चाळीस वर्ष आक्रमक हिंदुत्व मांडणाऱ्या कार्यकर्त्याला एका रात्रीतून समोरच्याशी हातमिळवणी करणं कठीण जात होतं . भावनेच्या भरात नेतृत्वासोबत हा शिवसैनिक लोकसभा निवडणुकीत राहिला खरा पण , ती लाट ओसरताच विधानसभा निवडणुकीत तो एकनाथ शिंदे यांच्याकडे वळला आहे , हाही या निकालाचा एक अर्थ आहे . भाजपला विरोध करण्याच्या नादात शिवसेनेचा संकोच होत आहे हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षातच आलं नाही आणि या निकालानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राज्यात पाचव्या क्रमांकावर ढकलंल आहे . उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या मर्यादाच या निकालातून उघड झाल्या आणि त्याचा अचूक फायदा एकनाथ शिंदे यांनी उचलला .
राज्यात सराकार कोणत्याही पक्षाचं असो , मुख्यमंत्री कोणीही असो , गेली पाच दशकात महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार यांच्याभोवती केंद्रित झालेलं आहे . शरद पवार यांच्याशी पंगा म्हणजे आत्मघात , असं समीकरण रुढ झालेलं आहे . शरद पवार यांचं राजकारण भाजपनुकूल आहे हे प्रस्तुत पत्रकाराचं लाडकं प्रतिपादन आहे आणि त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील . एकाच वेळी भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही डगरीवर पाय ठेवत शरद पवार यांची राजकीय वाटचाल सुरु आहे . तरी त्यांची प्रतिमा सेक्युलर अशीच रंगवली गेली . अजित पवार फुटून निघाल्यावर मात्र पवारांनी भाजपशी केलेली चुंबाचुंबी प्रकाशात येत गेली आणि पवारांच्या महाराष्ट्रावरील एकछत्री अंमलाला तडे जाऊ लागले . अर्थात शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटण्याचं हे एकमेव कारण नाही तर केंद्र सरकारच्या चौकशी यंत्रणांनी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना निर्दयपणे कोंडीत पकडलेलं होतं हेही तेवढंच खरं . वयाच्या या टप्प्यावर या विधानसभा निवडणुकीत शरद पवार ज्या तडफेनं फिरले , ज्या कुशलतेनं त्यांनी पक्ष पुन्हा उभा केला , प्रचाराला गती दिली , ते सगळंच स्तिमित करणारं होतं . शरद पवारांची साथ सोडलेले पुन्हा निवडून येत नाही , हा आजवरचा समज शरद पवार पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवणार , अशी हवाही निर्माण झाली होती . मात्र , मतदारांनी पवारांना पूर्वीसारखी साथ दिली नाही आणि त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष सहाव्या नंबरवर फेकल्या गेला .
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबतच काँग्रेसची दैना उडाली आहे . गेल्या विधानसभा निवडणुकीत असलेल्या ४४ जागांवरुन काँग्रेस पक्ष निम्म्यावर घसरला आहे . मुळात काँग्रेसला राज्यात एकमुखी लोकप्रिय नेतृत्वच नाही . राज्यातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचा वाडी-तांड्यापर्यंत थेट संपर्क नाही . राहुल गांधी नावाच्या वृक्षाखाली वाढ खुंटलेलं बोन्साय म्हणजे राज्यातील काँग्रेसचे बहुसंख्य नेते आहेत . हे ना राज्याचे नेते , ना विभागाचे , ना जिल्ह्याचे . बाळासाहेब थोरात , पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे काही अपवाद वगळता महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते त्या त्या मतदार संघाचे सुभेदार आहेत आणि त्यांची ही सुभेदारी मोडीत निघाल्याचं जमा आहे . त्यातच राज्यातल्या बहुसंख्य काँग्रेस नेत्याला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडलेली आहेत . हे म्हणजे सैन्याशिवाय लढणाऱ्या सरदारासारखा आहे . राहुल गांधींच्या भांडवलावर या नेत्यांनी निवडणुका तर लढवल्या पण , ते भांडवल तुटपुंज आहे हेही या निवडणुकीनं सिद्ध केलं आहे . मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पाहणाऱ्या नाना पटोले यांचा अवघ्या काही शे मतांनी विजय या म्हणण्याला पुष्टी देणारा आहे . म्हणूनच काँग्रेस पक्षाच्या अनेक मातब्बरांना निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं . महायुतीच्या विजयानं काँग्रेस , उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष इतके दिवाळखोरीत निघाले आहेत की स्वबळावर विधानसभेचं विरोधी पक्ष नेते पदही यापैकी एकाही पक्षाच्या वाट्याला येऊ शकत नाही .
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढला आणि या निवडणुकीत सगळ्यात जास्त बॅकफूटवर देवेंद्र फडणवीसच होते . मराठ्यांचा शत्रू , पेशवा , टरबुज्या अशा शेलक्या विशेषणांनी विरोधी पक्ष आणि त्यांच्या भक्तांनी देवेंद्र फडणवीस यांची यथेच्छ टिंगल टवाळी केली . शिवाय लोकसभा निवडणुकीतील पराभवही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारा होता . या निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणातले देवेंद्र फडणवीस हे खलनायक क्रमांक एक ठरविले गेलेले होते . समाज माध्यमांवरुन त्यांना अवमानाची लाखोळीच वाहिली गेली होती . थोडक्यात परिस्थिती खूपशी प्रतिकूल आणि प्रतिस्पर्धांत शरद पवार यांच्यासारखा कसलेला मल्ल होता . या निकालात भारतीय जनता पक्षानं आजवर कधी नव्हे एवढं यश महाराष्ट्रात संपादन केलं आहे . विरोधी पक्षातील पक्षांचं बळ भाजपच्या तुलनेत अतिशय नगण्य आहे . अर्थात भाजप सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्तबद्ध साथ हेही देवेंद्र फडणवीस यांच्या यशातील महत्त्वाचे घटक आहेत .
या वेळेची निवडणूक वाढता सामाजिक द्वेष वृद्धिगंत करेल अशी भीती संवेदनशील माणसाकडून व्यक्त केली जात होती . महाराष्ट्र जात आणि धर्माच्या आधारावर विभागला जाणार असाही धोका होता . मात्र , मतदारांनी ही भीती आणि धोका उधळून लावला आहे आणि महायुतीच्या पारड्यात भक्कम यश टाकलं आहे . जनतेच्या विश्वासाला उतरण्याची जबाबदारी आता महायुतीतल्या तिन्ही पक्षांची आहे . महायुतीच्या या यशातून काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष प्रगल्भपणे वेध घेऊन पुन्हा सावरतील , अशी आशा बाळगू या .
निवडणूक म्हटल्यावर जय-पराजय चालणारच . महायुतीतील तिन्ही पक्षांनी अभूतपूर्व यश मिळवलं आहे हे काही विरोधी पक्षाला उमदेपणानी मान्य करता आलं नाही . निकोप लोकशाहीचं हे लक्षण नव्हे . मतमोजणी सुरु झाल्यावर मतदान मॅनेज करता येत नाही , इतकंही प्राथमिक ज्ञान विरोधी पक्षांना नसावं हे फारच बौद्धिक दारिद्रयाचं लक्षणं आहे . त्यापेक्षा बचे हैं तो और लढेंगे असा सकारात्मक पवित्रा जर विरोधी पक्षांनी घेतला असता , तर ते शोभून दिसलं असतं . महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित हे महाराष्ट्राच्या राजकारणातील बुडबुडे आहेत हेही या निकालानं सिद्ध केलं आहे .
जाता जाता – कोणत्याही निवडणुकीतील लोकप्रियतेचे निकष पूर्णपणे मतदारांच्या हाती कसे असतात याची एक गंमत – कुणी अझहर खान नावाचा एक नट आहे , इन्टाग्रामवर म्हणे त्याचे ५ .६ मिलियन फॉलोअर आहेत म्हणे . त्याला या निवडणुकीत ९२ मतं पडली आहेत !
■प्रवीण बर्दापूरकर
Cellphone +919822055799
www.praveenbardapurkar.com