■■
नवी दिल्लीत झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पृथ्वीराज चव्हाण , सुरेश प्रभू आणि श्रीमती नीलम गोऱ्हे या मान्यवरांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी मी म्हणजे प्रवीण बर्दापूरकर आणि ‘एबीपी माझा’ या प्रकाश वृत्त वाहिनीचा राजीव खांडेकर यांच्यावर सोपविण्यात आलेली होती . ‘असे घडलो आम्ही’ असा मुलाखतींचा विषय होता . कोणते प्रश्न विचारावे किंवा कोणते विचारु नयेt , याबाबत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ किंवा आयोजक ‘सरहद्द’ या संस्थेकडून कोणत्याही सूचना आम्हाला देण्यात आलेल्या नव्हत्या .
या तीनपैकी श्रीमती नीलम गोऱ्हे यांची मुलाखत विशेषत: प्रकाश वृत्त वाहिन्यांनी गाजवली आणि शिवसेनेनं वाजवली . मुलाखतीत एका ठिकाणी मी विचारलेल्या उपप्रश्नांच्या उत्तरात श्रीमती नीलम गोऱ्हे यांनी केलेला तो ‘मर्सिडिज’ हा उल्लेख ओझरता आलेला आहे . काय द्यावं लागत असे याचं ते सूचन होतं . मर्सिडिज कुणी दिली आणि कुणी घेतली याबद्दल त्यात कांहीच नाही . सांगायचं तात्पर्य हे की , सर्वच माध्यमांत आलेल्या बातम्यात जे कांही ‘प्रचंड’ प्रसारित किंवा मुद्रीत झालं , त्यातलं या मुलाखतीत कांहीच नव्हतं ! हा कार्यक्रम संपल्यावर प्रकाश वृत्त वाहिन्यांना नीलम गोऱ्हे यांनी काय सांगितलं हे मला तरी ठाऊक नाही .
नवी दिल्लीत झालेल्या या तिन्ही मुलाखतीं क्रमाने माझ्या ब्लॉगवर देत आहे .
■ मुलाखतीचं शब्दांकन आणि संपादन- अर्चना जोशी .
@ प्रवीण बर्दापूरकर
■■
प्र . ब. : नीलम गोऱ्हे सध्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभापती आहेत . त्यांचा हा परिचय पुरेसा नाही . समाजवादी चळवळीतून करिअर सुरु झालं वगैरे वगैरेतही आपल्याला फारसा इंटरेस्ट नाहीये . तुम्हाला , विशेषत: ईथं असलेल्या कवींना आनंद होईल हे सांगायला हवं की , अशात नीलम गोऱ्हे यांनी कविता लिहिणं सुरु केलं आहे. यांच्या कविता पूर्वी ऐकल्या आहेत पण , नंतर कवितेची साथ नीलम गोऱ्हेंनी सोडली ती आता पुन्हा पकडलेली आहे कारण बहुतेक राजकारणाचा त्यांना कंटाळा आला असावा , असं आपण गृहित धरु यात.
त्यांच्यावरच्या साहित्याचा जो संस्काराबद्दल अनेकांना माहीत नसेल म्हणून सांगतो . ती एक परंपरा आहे . त्यांचे पणजोबा चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे हे सयाजी सयाजीराव गायकवाड यांच्या राज दरबारात राजकवी होते . त्या काळी त्यांच्या कविता अतिशय गाजल्या होत्या. काहीतरी “काय हो चत्मकार’ या काव्यसंग्रहावर चित्रपटही निघाला आहे. एक कवियत्री , सामाजिक , विधायक क्षेत्रामध्ये काम करणारी ते राजकारणी , कसे बदल होत गेले जगण्याच्या या प्रवासामध्ये ?
नीलम गोऱ्हे : एक तर ज्या शाळांमध्ये मी शिकले त्या तीन शाळा . पहिले महानगरपालिकेच्या मुंबईच्या शाळेत शिकले . त्याच्यानंतर साने गुरुजी विद्यालय शिवाजी पार्क आणि गोरेगावचं नंदादीप विद्यालय . या तिन्ही शाळांमध्ये आमच्या शिक्षकांनी लिखाणासाठी प्रत्येक वेळेला प्रोत्साहन दिलं . निबंध लेखन आणि वक्तृत्वातून वाचनाची गोडी लागली . साने गुरुजींच्या गोष्टी वाचल्यावर ; ती “मिरी’ असेल त्यातला “गोप्या’ असेल , सगळ्या कथांचे शेवट फार करुण असायचे . त्यामुळे असं वाटायचं की हा दुःखी शेवट बदलता येईल का आपल्याला ? तो शेवट आपल्याला काहीतरी अधिक चांगला करता येईल का ? आम्ही साने गुरुजी कथा माला वाचताना खूप रडायचो . मी तर हमसाहमसी रडायचे . साने गुरुजींची सोनसाखळीची गोष्ट आहे . ज्याच्यामध्ये तिची सावत्र आई तिला त्रास देते आणि त्यानंतर त्या सोनसाखळीला मातीमध्ये पुरुन टाकलेलं असतं . तिथे एक झाड उगवतं आणि तिथून ती सारखं विचारत असते की , ‘आई मी येऊ का ?’ लहान वयामध्ये , आठ नऊ वर्षाची असताना ते वाचताना खूप रडू यायचं आणि असं वाटायचं की का सावत्र आई कोणाला अशी पुरते . मग त्यातून सातवीत असताना पहिली कविता मी लिहिली.
प्र . ब . : वर्ष कोणतं ?
नीलम गोऱ्हे : सातवीत होते तेव्हा मी . आगगाडी निघून जाते मला आता पूर्ण लक्षात नाही परंतु रेल्वे स्टेशनवरची माणसं मात्र पुढच्या गाडीची वाट बघत असतात त्यांची . यदुनाथजींनी “साधना’ साप्ताहिकांमध्ये बालकवींची स्पर्धा घेतली होती त्याच्यात मला पहिला पुरस्कार मिळाला होता .
प्रवीण , तुम्ही म्हणालात की, मी कवितांची साथ सोडली . पण , कवितापेक्षा मी सुरुवातीला कथा लिहायला लागले . तेव्हा मी पोदार मेडिकल कॉलेजला होते आणि खूप व्यक्त करावसं वाटायचं स्वतःला . १९८० चा जो काळ होता . १९८०-९० ला खूप संक्रमणं होत होती . विद्यार्थी चळवळी , युवक चळवळी आणि या बदलत्या काळाचा ओघ घेत असतानाच माझ्या वडिलांचा त्यांचा स्वतःचा प्रचंड अभ्यास होता . ‘लाळ्या खुरकत’ नावाच्या रोगावर त्यांनी संशोधन केलं होतं . त्यांनी डॉक्टरेट फ्रान्समधून , सिटी युनिव्हर्सिटीतून केली होती . ते परदेशी गेल्यावर आईने बीए चा अभ्यास सुरु केला होता तर ती एकटी बसायची अभ्यासाला . म्हणून मी पण पाचवी सहावीत असताना तिच्याबरोबर वाचायला बसायचे . त्याच्यामुळे हळूहळू माझा नंबर चांगला यायला लागला आणि दुसरं अजून एक सिक्रेट असं की पंढरपूर माझं आजोळ आहे . पण, ते सिक्रेट नाहीये . तिथे दोन लाकडी मोठी कपाटं होती तिथे आमचे आजोबा श्रीपाद अप्पाजी देशपांडे यांनी त्या काळची सगळी नाटक , गोविंदाग्रज , केशवसुत , ना. सी. फडके , खांडेकर , मामा वरेरकर यांची सगळी पुस्तके कपाटात होती आणि दुसरं कपाट होतं ते मोठ्या माणसांच्या पुस्तकाचं होतं . तर आजोबांकडून मी आयडिया करुन चावी घेतली आणि मोठ्या माणसांची ती पण सगळी पुस्तकं सहावी सातवीत असतानाच वाचून काढली. अशी वाचनाची आवड सुरु झाल्यावर हळूहळू मनामध्ये जास्त लिखाणाचा विचार यायला लागले .
रा. खां . : आता मोठ्या माणसांची पुस्तकं म्हणजे ?
नीलम गोऱ्हे : प्रेमकथा विशेषतः ना. सी. फडक्यांच्या प्रेमकथा , गुलाबाचं चांदणं वगैरे अशा सगळ्या कल्पना मला कळल्या . मला जरा आश्चर्यच वाटलं. असा काहीतरी प्रकार असतो काही माहीत नव्हतं . पण , दुसरं असं की तेव्हा दैनिक मराठा खूप चालायचा मुंबईमध्ये . ‘मराठा’मध्ये काही वेळेला अश्लील शब्द असायचे . असे शब्द आले की आमच्या आजी आजोबा मुंबईचे आणि आई बाबा तो पेपर गादीखाली लपवून ठेवून द्यायचे . मला ती जागा कळली होती . त्यात ‘बुवा तेथे बाया’ असा एक नारायणगावला एका आश्रमात काय प्रकार चालायचे तो लेख होता . तो वाचला तेव्हा मला लक्षात आलं की अंधश्रद्धा आहे .
प्र . ब . : म्हणजे तुमच्या प्रेम विवाहाची बीजं अशी ना. सी. फडक्यांनी रोवली आहेत…
नीलम गोऱ्हे : अजिबात नाही . एवढं रोमॅंटिक आणि ना . सी. फडक्यांच्या लेखणातलं प्रेम जगात राहिलं असेल तर मी ते करणारांचं या व्यासपीठावरुन अभिनंदन करेन !
रा . खां . : म्हणजे चावटपणाकडे जाणं सहावी-सातवीत अअसतानापासून सुरु झालं…
नीलम गोऱ्हे : राम मनोहर लोहिया जसं म्हणतात की तसं तुम्ही तुमची दृष्टी बदला .
प्र . ब . : राजीव , त्याचं असं आहे , शिवसेनेत गेल्यावर तो चावटपणा संपला !
नीलम गोऱ्हे : असं वगैरे काही नाही . बाळासाहेब असे सटकवायचे की , बाळासाहेब ठाकरे यांचा नेहमी नर्म विनोदामध्ये असा एक वेगळा पैलू असायचा . त्याचा तो हेतू जो आहे ना तो समोरच्या माणसाला कुठेतरी हलवून सोडणं किंवा त्या माणसाची दखल घेणं असा असायचा .
रा. खां . : तू म्हणालास की शिवसेनेत गेल्यावर चावटपणा संपला त्यावर त्या म्हणाल्या, असं काही नाही म्हणजे अजूनही आहे ?
नीलम गोऱ्हे : आता मुद्दा काय आहे की , समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्यामध्ये त्या विनोदापर्यंत मर्यादित असतात तोपर्यंत त्या चालतात . नाहीतर राजीव , तो सायबर क्राइम होऊ शकतो . पण तो आजचा विषय नाही .
रा. खां : नीलमताई हे तुमचं वाचणं , लिहिणं हे खूप लहान वयापासून सुरु होतं . नंतरचं तरुण वयामध्येच महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमध्ये खूप मोठं काम आणि तुमचं खूप मोठं नाव तुम्ही खूप लहान असतानाच झालं होतं तर हे कसं झालं ? म्हणजे तुम्हाला सामाजिक चळवळीच्या बद्दलचा जो ओढा तुमच्या मनामध्ये निर्माण झाला त्याला काय कारण घडलं ? हे ओघाओघानं घडलं का ? जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये होता तेव्हा बरोबरच्या मित्रांबरोबर तुम्ही ओढत गेला कारण ते दिवस तसे होते , काय झालं ?
प्र . ब . : एक संदर्भ फक्त पुढे देतो की तुम्ही ७१-७२ च्या काळामध्ये उदगीर नावाच्या मेडिकल प्रॅक्टिस केली . त्या डॉक्टर आहेत व्यवसायाने . तर हा जो सगळा बदल राजीवच्या प्रश्नाचं मूळ आहे . इतकी चांगली मेडिकलची प्रॅक्टिस सोडून चळवळीमध्ये येणं किंवा युक्रांदमध्ये ( युवक क्रांती दल ) येणं हे कसं काय घडतं गेलं?
नीलम गोऱ्हे : माझे वडील दिवाकर गोऱ्हे . सायंटिस्ट होते . त्यांच्या मनात असं होतं की , मुलींनी फक्त स्वयंपाक, पापड, लोणची करुन चरितार्थ करणं त्यांना मान्य नव्हतं . त्यामुळे त्यांनी मला आणि माझी बहिणी झेलम , दोघींनाही प्रोफेशनल शिक्षण दिलं . त्यामुळे मी आयुर्वेदिक डॉक्टर झाले. पण आयुर्वेदिक शिकत असतानाच माझी युवक क्रांती दलामध्ये ओळख झाली . बरोबर लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या सगळ्या आंदोलनाचा तो काळ होता. ७१-७२ नाही पण १९८०ला आम्ही उदगीर मध्ये राहिलो आणि आम्हाला समाजामध्ये काय प्रकारचे बदल होत आहेत याच्याच बरोबर समाज मधल्या जातिभेद , स्त्री-पुरुष विषमता , गरिबी , सावकारी प्रथा , रोजगार हमीवरच्या लोकांना मजुरी , हे सगळं काम करणारी मोठी टीम होती आमच्याबरोबर . कुमार सप्तर्षी , अरुण लिमये , विजय , रत्नाकर महाजन अशी अनेक नावं युवक क्रांती दलातील आपल्याला माहिती आहेत . ही सगळी आमची सिनियर होती .
मी जेव्हा एक केस घेऊन गेले की , नंदुरबारमध्ये एका महिलेचं केशवपन होणार आहे . त्यावेळी दोन तास युक्रांद’च्या गच्चीवर चर्चा चालली होती की हा इश्यू घ्यायचा की नाही . त्यातले काही सिनिअर्स म्हणाले की , ही पहिलीचं मुलगी आहे की एखादी घटना घेऊन आपल्याकडे आली आहे ; म्हणजे तेव्हा मी मुलगीच होते . हळूहळू हिच्या जाणिवा बदलतील आणि हिच्यातही बदल घडून येईल आणि ती समाजच्या सर्वच घटकासाठी काम करेल . त्यामुळे तिला नाराज करण्यापेक्षा आपण सगळे जण तिच्यासोबत काम करुया .
तेव्हा सुशीलकुमार शिंदे गृहराज्यमंत्री होते . त्यांनी ताबडतोब धुळे , नंदुरबारला निरोप पाठवले आणि ते केशवपन थांबवण्याचा प्रयत्न केला . आमचा एक भोसले नावाचा कार्यकर्ता होता . त्याने नंदुरबारमधील सर्व नाभिकांची भेट घेतली आणि त्यातल्या एकाला विचारलं, “काय तुझं “, तर तो म्हणाला, “होय, मला सांगितलं होतं की , मागच्या दाराने जाऊन त्या बाईचं केशवपन करायचं आणि त्याबद्दल मला शंभर रुपये मिळणार होते.’ ही ७५-७६ ची गोष्ट . मग त्याला सांगितले की मी तुला शंभर रुपये देतो पण , तू केशवपन करायला जायचं नाही . त्या कुटुंबालाही बोलावून ते केशवपन थांबवण्यात आलं . तेव्हा माझ्या लक्षात आलं की , अत्याचार थांबवला तर थांबतो . त्यामुळे आपण अत्याचार थांबवण्यासाठी काम केलं पाहिजे . ही माझी मुख्य प्रेरणा लिखाणाचीही आहे आणि कामाचीही आहे . विधानसभेची उपसभापती असल्यामुळे मी येणारं आहे म्हटलं की , बऱ्याच वेळेला आरोपी कसा अटक होतोय हे पोलीस पाहतात . ही वस्तुस्थिती आहे . तर मला लेखी रिपोर्ट देण्यासाठी त्यांनी तयारच ठेवलेला असतो की काय एफआयआर त्यांनी केलेला आहे आणि पुढे काय त्यांनी कारवाई केलेली आहे . म्हणजे युक्रांदच्या त्या गच्चीवर आमच्या सिनिअर्सची जो माझ्यावर जो विश्वास दाखवला होता त्यातून आम्ही घडलो .
उदगीरचा तू प्रश्न केलास . उदगीरला आम्ही गेलो तर मराठवाड्यातील परिस्थिती फार बिकट होती . स्त्रीला दुय्यम स्थान होतं , महिलांचे प्रश्नही फार मोठ्या प्रमाणात होते . माझ्या ज्या महिला पेशंट होत्या त्यांचेही हिस्टरेक्टॅामीसारखे ( गर्भाशय विषयक समस्या ) प्रश्न होते आणि त्यातून मी हळूहळू स्त्रियांचे प्रश्न , आरोग्याचे पुत्रोत्पादनविषयक प्रश्न घेतले . त्यावेळला मला विद्या बाळ, ह.मो. मराठे सारखे सांगायचे की , हे अनुभव तू लिही . ते लिहायला लागल्यावर माझा हुरुप वाढत गेला . साप्ताहिक ‘मनोहर’ला महाबळ होते त्यावेळला . ‘मुंबई सकाळ’ला माधव गडकरी होते . ते माध्यमातले तेव्हाचे सीनिअर्स , हितचिंतक . त्यांच्यामुळे हळूहळू जास्त लिखाण यायला लागलं . दुसरं म्हणजे आंदोलन झालं की , त्यांच्या अभ्यासातून जे प्रश्न आले असतील ते लिहावंसं वाटायला लागलं आणि ते लिहिल्यावर जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं असं दिसायला लागलं . हा जो प्रवास आहे एका डॉक्टरकडून सामाजिक कार्यकर्त्यांचा , तो एका बाजूला खूप समृद्ध करणारा होता आणि दुसरीकडे जगाच्या दृष्टीने असं वागणारे लोक थोडे विक्षिप्त , मूर्ख , व्यवहार न कळणारे , एकांगी विचार करणारे आहेत समाज मानतो कांही वेळा पण , त्याचं कांही वाटत नव्हतं मला .
विद्यापीठ नामांतराच्या वेळी मला जेव्हा अटक झाली. त्यावेळी मी सात-आठ महिन्यांची प्रेग्नंट होते . कमालनगरच्या कस्टडीतच होतो . दुपारी मला झोप लागायची . सोबत आलेल्या मजूर बायका म्हणत , डॉक्टरीण बाईला कळत नाहीय की त्या कस्टडीत कशाला आल्या म्हणून ? त्याचं ते जे प्रेम होतं त्या प्रेमातून मला लिखाणाची आणि काम करण्याची शक्ती मिळाली.
रा.खां : पण नीलमताई तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर झालात , उत्तम प्रॅक्टिस करत होतात जेव्हा हे सोडून आपण सामाजिक कामाला जोडून घ्यायचं , जुंपून घ्यायचं , असा जेव्हा विचार आला तेव्हा तो निर्णय घेणं किती सोपं होतं , किती अवघड होतं ? काय चॅलेंजेस् त्यावेळेला तुम्हाला वाटले होते आणि त्यानंतर तुम्ही त्यावर, त्या प्रश्नांवर मात कशी केली ?
नीलम गोऱ्हे : खूप सुंदर प्रश्न आहे हा . ज्यावेळी आर्थिक अडचणींतूनही सामाजिक काम करायला लागता त्यावेळला तुम्हाला कशावर तरी अवलंबून राहावं लागतं . तसं मला अवलंबून राहण्यासारखं फारसं काही नव्हतं . ८०-९० या काळामध्ये मी दवाखाना चालवून स्त्री आधार केंद्र , क्रांतीकारी महिला संघटना आणि नारी समता मंचाची कामं करत असतानाच दलित चळवळीत सुद्धा काम करत होते . त्याच्यानंतर माझं काही लिखाण इंग्रजीतही झालं . रिसर्च प्रोजेक्ट घेतले . त्यातून काही पैसे मिळायला लागले. मुक्ता आमची ८१ साली जन्मली . मुलीला सांभाळतांना माझ्या आई आणि वडिलांची मदतही खूप झाली . तशा आमच्या संस्थेच्या ज्या महिला कार्यकर्त्या होत्या त्याही संसारिकच होत्या . त्यांचीही मदत झाली . दुसरं म्हणजे दलित चळवळीत असेल किंवा कुठेही असेल समाजमन तुम्हाला तुमचा प्रश्न समजून घेऊनच वागवत असतं . त्यांच्यामध्ये प्रचंड सहानुभूती , सहृदयता आणि मदतीची भावना आहे . त्यामुळे पुढची वाटचाल जी आहे त्यात कोणी ना कोणी, कार्यक्रमासाठी मदत करणं . त्या कार्यकमासाठी येणं . त्या कार्यक्रमाला प्रतिष्ठा मिळेल असं बघणं . अशी कामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली . पूर्णवेळ झालोय असा निर्णय मी काही घेतला नाही . हळूहळू ९० नंतर माझ्या असं लक्षात यायला की आपण दवाखान्यात जाऊ शकत नाहीय . रोज काही ना काही महत्त्वाच्या मिटिंग येत आहेत . रोज कुठे तरी मोर्चा असतो आणि मग मी ९२-९३ च्या सुमाराला दवाखाना बंद करण्याचा निर्णय घेतला . तो फार अवघड निर्णय होता . कारण रुग्णांचं आपल्यावर फार प्रेम असतं . काही जणी पंढरपूरला पडल्या तर तशीच खोक घेऊन दवाखान्यात आल्या होत्या की , हे तुमच्याच कडून बरं होणार म्हणून . त्यामुळे भेटण्यासाठी आलेल्या माझ्या पेशंटच माझ्या कार्यकर्त्या झाल्या . त्या म्हणायला लागल्या की , तुम्हाला भेटलं की आम्हाला बरं वाटतं . माझ्या ट्रस्टवरतीही माझ्या अनेक बऱ्या झालेल्या पेशंट आहेत . नंतर स्त्रियांच्या आरोग्यवर आम्ही अधिक काम करायला लागलो . सांगायला काहीच हरकत नाहीय. ९१ साली शरदराव पवारांनी मला सुचवलं की , यशवंतराव चव्हाण सेंटरच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठाचं तुम्ही काम का करत नाही ? मग सहा वर्ष तिथं मी महिला व्यासपीठाचं काम केलं . ज्यामध्ये, महिलांना प्रशिक्षिण देणं होतं . मग ९४ला महिला धोरण झालं. या सगळ्या कामामध्ये मला त्याचा सपोर्ट मिळाला.
प्र.ब. : हे सगळं चालू असतांना म्हणजे पुरोगामी चळवळी , डाव्या चळवळीत असणं आणि अचानक यू टर्न घेऊन हिंदुत्ववादी होणं , ही मानसिक कोंडी कशी काय फोडली ?
नीलम गोऱ्हे : याबद्दल मी तपशीलवार लिहिलेलं आहे . मॅजेस्टिक प्रकाशनच्यावतीने ( ते राजहंस प्रकाशन आहे ! ) करुणा गोखले यांनी लिहिलेल्या नीलम गोऱ्हे यांच्याशी एैसपैस गप्पा यामध्ये हा टप्पा मी सविस्तर घेतला आहे . मी पूर्ण अशी नास्तिक कधीच नव्हते . बाकीचे लोकं अगदी सिद्धटेकच्या गणेशाला आले नाहीत तरी मी जाऊन नमस्कार करुन येत होते . कारण आईचं पंढरपूरची असल्यामुळे तिचा माझ्यावर आस्तिकतेचा फार संस्कार होता. तिचं माझ्यावर प्रचंड प्रेम होतं. सगळ्याच आईचं असतं पण , मला घडवण्यामध्ये माझ्या आई-वडिलांचा खूप मोठा वाटा होता . दरम्यान राष्ट्रीय पातळीवर जे बदल झाले , ज्याच्यामध्ये जे द्विध्रुवीकरण झालं , राजीव , त्याबद्दल मी तुमच्या एबीपी पण बोललेले होते . जॉर्ज फर्नांडिस , रामविलास पासवान यांच्यासारखे समाजवादी चळवळीतले लोक मोठ्या प्रमाणामध्ये ऑलरेडी अटल बिहारी वाजपेयी यांचे बरोबर ‘एनडीए’मध्ये गेलेले होते . महाराष्ट्रामध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे काही जणांनी समता पार्टी वगैरे जॉइनसुद्धा केलेली होती .
एक नेते आहेत , मी आता नाव घेत नाही . मला बरेच वर्ष अर्थात इच्छा होती विधान परिषद किंवा विधानसभेत जायची तर दर निवडणुकीच्या आधी ते सांगायचे मला की “तुमचं या वेळेला होईल .” ते काही व्हायचं नाही . मग ९८ साली मी एका ठिकाणी तिकीट मागितलं . खेड लोकसभा मतदारसंघात . तेव्हा ते मला म्हणाले की, “तुम्ही कशाला घाई करताय आता आरक्षण येणार आहे आणि आरक्षण आल्यावर पुणे जिल्ह्यातल्या २१ जागांपैकी सात जागा महिलांना मिळणार आहेत , तर तुम्हाला नक्कीच जागा मिळेल .”
माझ्या वडिलांना राजकारण काही कळत नव्हतं पण, माझे वडील म्हणाले ‘मला नाही वाटत नीलम हा माणूस खरं बोलतोय . तुला न फसवता करेल अशा ठिकाणी तू जा .’ तोपर्यंत मला शिवसेनेतून निरोप आला होता . बाळासाहेब ठाकरे यांना मी भेटले . बाळासाहेब मला म्हणाले की, “तुम्ही इतक्या लोकांवर विश्वास टाकून बघितला आहे. आमच्यावर एकदा विश्वास टाकून तर बघा तुम्ही ,” आणि तसा मी त्यांच्यावर विश्वास टाकला . एनडीएची संपूर्ण गटबांधणी हिंदुत्ववादाकडे झालेली हे एक. दुसरं मुंबई दंगलीच्या वेळेला मी पाहिलं सगळं द्विध्रुवीकरण झालेलं . दलित समाज मोठ्या प्रमाणात ऑलरेडी शिवसेनेकडे झुकलेला होता . बीआयटी चाळी असतील , मानखुर्द असेल , संजय गांधी नगर असेल , टाटा नगर असेल, बैंगनवाडी असेल…कारण मी जवळून त्यांच्यासोबत काम केलेलं होतं . तिसरं म्हणजे “मराठी भाषा आणि महिला धोरण याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे ते काम करा . आम्ही कधीही तुमच्यात आडकाठी आणणार नाही.’ असं मला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आश्वासित केल्यावर मी विचार केला की ठिकय , आपण विश्वास टाकून बघूया .
चार वर्षांनी मी विधान परिषदेत गेले कुठलेही आरक्षण नसताना. चार वेळेला शिवसेनेने मला संधी दिली आणि आरक्षण मात्र आलं ते शेवटी आता , कागदोपत्री लोकसभेमध्ये मोदी साहेबांमुळे आलं . पण , मी जर का त्या नेत्यांवर विश्वास ठेवून बसले असते तर कुठेतरी विधान परिषदेत न जाता किंवा हे काम न करता निराश झाले असते .
रा.खां. : निराश कशाला होता . तुमच्या हातून आणखी मोठं समाजिक काम झालं असतं . महाराष्ट्राला सामाजिक कार्यकर्त्यांची गरज आहे .
नीलम गोऱ्हे : हे बघा राजकारणामध्ये निर्णय घेतले जातात . सामाजिक कामामध्ये आपण निवेदन देणारे असतो आणि राजकारणामध्ये आपण निर्णय घेणारे असतो . त्यामुळे विधान परिषदेत किंवा लोकसभेत किंवा जे प्रतिनिधी जातात त्यांनी सगळ्यांनी समाजकारण करायचं म्हटलं तर मग असं होईल की , सगळे पुरुष राजकारणामध्ये आणि महिला समाजकारणामध्ये . ही विभागणी मला मान्य नाही . ही विभागणी मला मान्यच नाही . राजकारणात जे लोक नको असतील त्यांना ढकलण्याचा समाजकारण हा मार्ग असू नये. ज्यांना फक्त समाजकारण करायचे त्यांनी जरुर समाजकारण करावं . ज्यांना फक्त पत्रकारिता करायची तरी पत्रकारिता करावी पण , उद्या त्यांना असं वाटलं राजकारणात यावं तर त्याचं स्वागत आहे .
रा. खां . : थोडक्यामध्ये जर राजकारण करायचं असेल तर जिथे पंगत असेल तिथे जाऊन बसा . आचारी कोण आहे , जेवायला काय मिळतय , याचा विचार करु नका. जा घुसा बसा आणि जेवून घ्या .
नीलम गोऱ्हे : याचं कारण असं झालंय की, सगळीच पंगत एक होत चाललीयं . वेगळ्या पंगती राहिल्यात कुठे ? कोण , कोणाचे हे रहस्य मला आठ-दहा वर्षांनी हळूहळू कळत गेलं . सगळ्यांची सगळ्यांशी मैत्री आहे . त्यामुळे पंक्तीत जाण्याचा प्रश्न नाहीये . आपण पंगतीमध्ये वेळप्रसंगी वाढणारे झालो तर आपण समानतेने तरी सगळ्यांना वाढू . पंक्ती प्रपंच करणार नाही. हा मला त्याच्यात विचार आला.
रा. खां. : पण असं की, ज्या भटारखाण्यामध्ये तुम्ही गेला होतात त्याला सोडून नंतर तुम्ही भलत्यात म्हणजे तिथल्या गल्ल्यावरच्या माणसाला बाजूला काढून भटारखाण्याचं नाव तेच ठेवलं आणि त्याचा मॅनेजर मात्र तुम्ही वेगळाच निवडलात !
नीलम गोऱ्हे : मला वाटलंच होतं की , साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत करणार आहात. त्यामुळे जरा वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदे यांचं अजून मला गुण वर्णन करता आलं असतं . परंतु , आता मला फार…
रा. खां . : मॅनेजरमध्ये प्रॉब्लेम होता आधी ?
नीलम गोऱ्हे : मॅनेजरचा प्रश्न नाहीये . कार्यकर्ता जो आहे त्याला कमी समजण्याचं कारण नाहीये . शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे , मला आठवतंय २०११, १३, १४ पासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते , एक हा भाग . दुसरा आता त्या सगळ्या तपशीलात जायला एबीपीची ती मुलाखत बघायला हरकत नाहीये आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकंही समोर नाहीयेत . त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं . मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना तिथे तर आपण जिथे नकोसे आहोत , तिथे आपण कितीसे टिकून आहोत .
प्र.ब. : म्हणजे गल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा १२-१३ पासूनचा होता…
नीलम गोऱ्हे : नाही. नाही. त्यांच्यावर ढकलला जात होता. दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यानंतर एक पद…
रा.खां. : थोडक्यात असं आहे की , आधीच्याच मॅनेजरला गल्ला सांभाळण्यामध्ये रस नव्हता . त्यामुळे जेव्हा नव्या मॅनेजरने गल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भटारखाण्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी या नव्या मॅनेजरला साथ देण्याचं…
नीलम गोऱ्हे : मला वाटतं राजीव तू जे विश्लेषण करतोय त्यात तू एक फार मोठी व्यक्ती विसरतायेस . ते म्हणजे नेते बाळासाहेब ठाकरे . बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्याचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये अवनती होत गेली . पण आम्हालाही खूप धन्य वाटलं होतं २०१९ ला जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला . त्याच्यासाठी की बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला पण , आम्हाला हे माहिती नव्हतं की त्यावेळेला आमदारांना भेटी मिळणार नाहीयेत . कुठल्याच विषयाला भेटी मिळणार नाहीयेत . दिवसातून दोन तीनवेळा आरटीपीसीआर केली तरीही भेट मिळणार नाहीयेत . या सगळ्या गोष्टींचा विचार केला आपण तर मग प्रश्न असा तयार होतो की स्थित्यंतरं होतात ती मला असं वाटत नाही की, मुदपाकखाण्याच्या विश्लेषणातून होतात . जशी तू मांडतोयस तशी . त्याच्या पलीकडे बरेचसे मुद्दे असतात त्याची वेगळी चर्चा करायला माझी जरुर तयारी आहे पण, आमच्याकडचे शिंदे जे आहेत त्यांना महादजी शिंदेचा पुरस्कार देऊन ते त्याच्यामध्ये लढायला तयार आहेत ना . ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील .
रा . खां . : आता शेवटचा प्रश्न प्रश्न प्रवीण विचारेल .
नीलम गोऱ्हे : मला एखादा प्रश्न माझ्या पुस्तकावर तरी विचारा. माझी ३० पुस्तकं झाली आहेत. नीलम गोऱ्हे : समग्र वाडमय, येथे १४ नंबरचा स्टॉल आहे. त्याच्यामध्ये कायदा, ललित लेख, कथा, विधान परिषद माझं कामकाज, आरोग्य विषयक पुस्तकं अशी माझी ३० पुस्तकं झालेली आहेत.
रा.खां. : माझ्या मते, सर्वांत जास्त पुस्तकं, पुस्तिका असणाऱ्या आताच्या काळातल्या राजकारणी फक्त महाराष्ट्रातल्या कदाचित देशातल्या तुम्ही असाल. त्याबद्दल आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. मघाशी तुम्ही सुरुवातीला बोलाताना पुस्तकं वाचून तुम्हाला रडू यायचं . त्यातल्या इतकं संवेदनशील , राजकारण गेल्यानंतर ती संवेदना राखता आली का ? आणि असा कोणता प्रसंग आणि कोणती घटना तुम्ही सांगाल की, जे काम आपल्या हातून झालं त्याबद्दल आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आतून खूप समाधान वाटेल?
नीलम गोऱ्हे : राजू तुझ्या यशाचं गमक हेच आहे की, काही काही वेळेला तू प्रश्न फार सुंदर विचारतोस. २००७ पासून ते आतापर्यंत शिवसेनेची प्रवक्ता म्हणून काम केलंय . अशा वेळला मला अशा प्रश्नाचं फारसं काही वाटत नाही . विधान परिषदेत काम करायला लागले तेव्हा खूप सीनियर्स होते आमचे सगळे. त्यांची नावं घेत नाही मी . ते खूप सुंदर वक्ते होते . प्रमोद नवलकरांसारखे मार्मिक लोकं होते. एक गोष्ट ते करायची आणि त्यामध्ये सर्व सभागृह दिवसभर चर्चेमध्ये जायचं . एकदा नवलकर पिस्तुल घेऊन आले होते . तेवढी एकच वस्तू त्यांनी सभागृहात आणली होती . दिवसभर चर्चा त्याच्यावरती . अशावेळी कामकाज करायचं कसं मला कळायचं नाही . त्यात मला बोलायला संधी मिळाली आणि मी माझ्या भाषणामध्ये “जयभीम, जय महाराष्ट्र” म्हणाले . एक आमचे जे नेते होते . त्यांना ते खूप खटकलं . ते म्हणाले , “आतापर्यंत इतके आमदार होऊन गेले , कोणी जयभीम म्हणाले नाही इथे . तुम्ही कसं काय जयभीम बोललात ?” मी म्हणाले, मी नेहमीच म्हणते. शिवाजी पार्कला सुद्धा बाळासाहेबांसमोर भाषण केलं होतं तेव्हाही मी “जय भीम, जय महाराष्ट्र’ म्हणाले होते. तर ते म्हणाले, हे काही बरोबर नाहीये तुमचं . त्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर परत मला बोलले . खरं तर , सार्वजनिक जीवनात मी डोळ्यातून कधी पाणी येऊ देत नाही , त्या दिवशी मात्र, माझ्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं . खूप वाईट वाटलं या गोष्टीचं . त्याच्यात एका आमदारात कोणीतरी होते . मी नव्हते त्याच्यात कारण माझी एवढी हिंमतच झाली नसती . त्या आमदारांनी लोकसत्तामध्ये ती बातमी छापली की “नीलम गोऱ्ह्यांना अश्रूपात, रडू आलं कारण जयभीम म्हणायला नकार दिला .” मी ती बातमी पाठवली नव्हती. सुरेश प्रभू येथे आहेत. त्यांना बाळासाहेबांच्या सर्व कार्यपद्धती माहित आहेत . बाळासाहेबांनी ती बातमी पूर्ण वाचली . बाळासाहेबांनी मला भेटायला बोलावलं आणि सांगितलं. “तुला कोण अडवतंय जयभीम म्हणायला मी बघतो. तू खुशाल जयभीम म्हणत जा. जयभीम, जय महाराष्ट्र दोन्ही एकत्र जाऊ शकतं . त्यामुळे हे तू मनाला लावून घेऊ नकोस .” या गोष्टीबद्दल खूप चांगलं वाटतं की, बाळासाहेबांनी जो शब्द दिला होता तो पाळला . इतक्या मी अत्याचाराच्या घटना हाताळल्या की , शिवसेनेकडून तिकडेही नाही, इकडेही नाही. कुठल्याही नेत्यानी तुम्ही ही केस अमक्या पोलिस अधिकाऱ्याची घेऊ नका , त्या राजकारण्याची घेऊ नका. असं कधीही कुणी सांगितलं नाही . त्यामुळे मी शिवसेनेत गेले आणि शिवसेनेतच शेवटपर्यंत राहणार आणि शिवसेनेतच भगव्यात वर जाणार हे मला सांगायला कमीपणा वाटत नाही.
प्र.ब. : आपल्यावर वेळेचं बंधन आहे. नीलमताई आपली बुद्धी जागरुक ठेवून राजकारण करतील आणि महिलांचे प्रश्न संवेदनशीलपणे समजावून घेतील अशी अपेक्षा बाळगून त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देऊ यात.
■ शब्दांकन आणि संपादन- अर्चना जोशी