पद ‘काटेरी’, सुनील ‘मनोहर’ तरी….

नागपूरच्या नीरी, सेंट्रल जेल, लक्ष्मीनगर, दीक्षा भूमी, मुंडले तसेच कुर्वेज शाळा, अंध विद्यालय आणि विदर्भ वैधानिक मंडळाचे कार्यालय यांच्या बेचक्यामध्ये असलेल्या गच्च झाडीत वसंत नगर नावाची म्हाडाची चाळीस-एक वर्ष जुनी कॉलनी वसलेली आहे. वसंत नगरमध्ये प्रवेश केला आणि सरळ थेट आत गेलं की एका मोठ्या मैदानाच्या तोंडाशी समोर ‘डेड एंड’ येतो; तिथे घेऊन आलेला रस्ता डावीकडे वळून उजव्या हाताने धनवटे महाविद्यालयाच्या मैदानात उतरतो आणि सरळ पुढे ब्रम्हकुमारी आश्रमाकडे जातो. उजवीकडे वळणाऱ्या रस्त्यावर काही छोटे, कॉमनभिंत असणारे बंगले आहेत. या बंगल्यांसमोर हा छोटासा रस्ता, या रस्त्याला कवेत घेऊन क्रिकेटचे मैदान आणि या पूर्ण परिसराभोवती घनगर्द झाडी असा हा नेत्रसुखद नजारा आहे. १९८०च्या दशकाच्या सुरुवातीला काटेरी झुडुपे आणि साप-विंचवांचा सुळसुळाट असलेल्या या उजाड माळरानाचे सुनील मुजुमदार नावाच्या क्रिकेटवेड्या माणसाने हिरव्याकंच सुरेख मैदानात रूपांतर केले आहे. तिथे त्यांची क्रिकेट अकादमी आहे आणि जॉंटी ऱ्होडस् पासून ते मायकल ऑर्थरटन पर्यंत अनेकांना इथे क्रिकेट कोचिंग करताना वसंत नगरने बघितले आहे. बीसीसीआयचे चेअरमनपद भूषवलेले शशांक मनोहर मुळचे जलदगती गोलंदाज आहेत. ते बीसीसीआयचे अध्यक्ष होण्यापूर्वी, अध्यक्ष असताना आणि आज बीसीसीआयचे अध्यक्ष नसतांनाही अनेकदा गोलंदाजीची खुमखुमी भागवण्यासाठी याच वसंत नगरच्या क्रिकेट मैदानावर येतात. त्यांचे धाकटे बंधू सुनील मनोहर या क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचाही वावर या मैदानावर असतो. ते या मैदानावर खेळण्यासाठी, मॉर्निंग वॉकसाठी नेहेमी येतात. पूर्वी काळ्या मर्सिडीजमधून येत, आता सायकलिंग करत येतात. हे मला ठाऊक असण्याचे कारण असे की, या मैदानाकडे तोंड करून वसलेल्या माझ्या सासुरवाडीच्या एका बंगल्यात आम्ही अनेक वर्षे वास्तव्य केले आणि याच मैदानावर अनेक वर्ष मॉर्निंग वॉक घेतला.

भारतीय समकालीन विधि व्यवसायात दंतकथा ठरलेल्या, विलक्षण निष्णात म्हणून नावलौकिक आणि दबदबा संपादन करणाऱ्या सोराबजी, जेठमलानी, राजेंद्रसिंह यांच्यापैकी एक असलेल्या व्ही.आर.मनोहरसर यांचे शशांक आणि सुनील हे पुत्र. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक पत्रकार म्हणून वृत्तसंकलन करताना या मनोहर वकिलांशी (व्ही.आर.मनोहर यांचे पुत्र शशांक, सुनील आणि कन्या वासंती याही वकील; वासंती नंतर उच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाल्या.) माझा संपर्क प्रस्थापित झाला. त्या काळात नागपूर खंडपीठ बार असोसिएशनच्या राजकारणामध्ये व्ही.आर. मनोहर आणि अरविंद बोबडे (तेही दोन वेळा राज्याचे महाधिवक्तापदी होते) असे दोन तुल्यबळ गट होते. माझे जीवलग दोस्तयार अविनाश गुप्ता, सुबोध धर्माधिकारी तसेच श्रीहरी अणे (श्रीहरीचा गट स्वतंत्र होता!), सी.एस. कप्तान यांच्यामुळे बारच्या राजकारणात माझा वावर मनोहर गटात विस्तृत वाढला आणि शशांक मनोहरशी मैत्री झाली. (तत्कालिन आणखी काही वकिल मित्रांची नावे संकेत तसेच शिष्टाचार म्हणून टाळली आहेत कारण ते पुढे उच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले). सुनील मनोहर, आनंद परचुरे, जैस्वाल, संन्याल, हक़, ही मंडळी तेव्हा तरुण होती आणि माझा वावर त्यांच्या सिनियर्सच्या गोटात असल्याने ते सर्वजण माझ्याशी अंतर ठेऊन अदबीने वागत. (म्हणजे आता वागत नाहीत असा याचा अर्थ मुळीच नाही; आता बरोबरीने वागतात!) ‘त्या’ दिवसाबद्दल नागपूर हायकोर्ट बारच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘बारमधले दिवस’ या लेखात मी सविस्तर लिहिले आहे. सुनील मनोहरचा विवाह नागपूरचे बडे उद्योजक प्रभाकरराव मुंडले यांची कन्या मंजुश्री हिच्याशी झाला. मंजूश्रीने विवाहाआधी लक्ष्मीनगरात सुरु केलेल्या ‘फुलवारी’ या बालवाडीच्या पहिल्या दोन-तीन ‘बाल’प्रवेशात आस्मादिकांची कन्या आहे. मनोहर आणि मुंडले ही कुटुंबे नागपुरातील बडे प्रस्थ. आर्थिकदृष्ट्या अत्यंत सुस्थिर असूनही सुविद्य आणि महत्वाचे म्हणजे सुसंस्कृत. वागायला एकदम डाऊन टू अर्थ… पण परखडपणा हा मनोहर कुटुंबातील प्रत्येकाचा खणखणीत ऐवज! नागपूरच्या कला, क्रीडा, साहित्य, संगीत जगताला कोणताही गाजावाजा न करता, व्यासपीठावर न वावरता, उत्तेजन देणारी ही दोन्ही कुटंबे आहेत. अशा या कुटुंबातील सुनील मनोहर आता राज्याचे महाधिवक्ता म्हणजे; राज्य सरकारचे प्रमुख वकील झाले आहेत. व्ही. आर. मनोहर यांनी हे पद याआधीच भूषवले आहे. वडील आणि मुलगा राज्याचा महाधिवक्ता होण्याचा हा एक आगळा विक्रम आहे ! विदर्भाच्या वृत्तपत्रांत ‘नागपूरचा वकील महाधिवक्ता झाला’, ‘विदर्भाला न्याय! अखंड महाराष्ट्राचे महाधिवक्तापदी विदर्भाचे मनोहर’, ‘विदर्भाच्या वकिली क्षेत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झुकते माप’ अशा बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. आपल्याला आजकाल प्रत्येक बाबीकडे जात-धर्म-भाषा-प्रादेशिकवाद यापैकी एक किंवा या सर्वांच्या आधारे बघण्याची खोड लागली आहे; आपल्या सामाजिक आणि वैयक्तीक जीवनाचे ‘जात-धर्म-भाषा-प्रादेशिकवादी’ अतिराजकीयीकरण झाल्याने हे चष्मे आपल्या डोळ्यावर पक्के बसले आहेत. ही नियुक्ती नक्कीच राजकीय असली आणि ती तशीच असते तरीही; सुनीलची महाधिवक्तापदी नियुक्ती त्याचे विधि क्षेत्रातील नैपुण्य आणि स्वच्छ प्रतिमा याच आधारावर राज्य सरकारने केली आहे. राज्याच्या याआधीच्या महाधिवक्तांच्या तत्कालिन सरकारांनी केलेल्या नियुक्त्याही नैपुण्य आणि स्वच्छ प्रतिमा याच प्राधान्य आधारे झालेल्या आहेत, यात शंका नाही.

सुनील मनोहर यांनी त्यांचे वडील व्ही.आर.मनोहर यांचा निष्णात वकिलीचा वारसा गेल्या २७ वर्षात पुढे चालवला आहे याबद्दल दुमत नाहीच. हाडा-मासांचा माणूस असल्याने सुनील मनोहर यांच्या स्वभावात गुण-दोष असणारच. तरी, याआधी संदर्भ दिलेल्या वसंत नगरच्या धनवटे महाविद्याच्या क्रिकेट मैदानावर माझ्यापेक्षा वयाने पंधरा वर्ष तरुण असणाऱ्या सुनील मनोहर याच्याशी स्नेहबंध २००३नंतर अधिक घट्ट झाले आणि त्याचे एक कारण सुनीलचे असणारे कायद्याबाहेरचे विविधांगी चौफेर तसेच सूक्ष्म वाचन. सुनील मनोहरने कोणतीही पूर्वग्रह न ठेवता महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्सचे वाचन ‘डोळस’पणे केलेले आहे. महेश एलकुंचवार ते नारायण सुर्वे, मा.गो. वैद्य-दि.भा.घुमरे ते दिलीप पाडगावकर-कुमार केतकर, भास्कर लक्ष्मण भोळे ते सुहास पळशीकर, नारायण कुळकर्णी-कवठेकर ते दासू वैद्य, विजय फणशीकर ते प्रफुल्ल मारपकवार असा विस्तृत पट सुनील मनोहर यांच्या वाचनाचा आहे. जितके वैपुल्याने त्यांचे इंग्रजी आभिजात्य वाचन आहे तितकेच मराठी वाचन आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे मराठी तसेच इंग्रजी शब्दांचा मुळार्थ आणि व्युत्पत्ती शोधून काढण्याची सुनीलची वृत्ती उत्सुकतेने ओतप्रोत भरलेल्या एखाद्या विद्यार्थ्यासारखी आहे. मला हृदयविकाराचा त्रास सुरु होण्याआधी वसंतनगरच्या मैदानाला शनिवार आणि रविवारी आम्ही दोघे अनेकदा भल्या पहाटे १८/२० चकरा मारत असू. आम्ही केलेल्या वाचनाच्या संदर्भात अनेक चर्चा तेव्हा आमच्यात झडत आणि त्यावेळी सुनीलची अभ्यासूवृत्ती अचंबा वाटावा अशी असे. काही तरी नवे वाचले की ते शेअर करण्याची ओढ आमच्यात असे आणि मैदानावर त्यासाठी आम्ही अनेकदा एकमेकांची वाट पाहत अस्वस्थपणे फिरत असूत. प्याराडाईम शिफ्ट paradigm shift किंवा anti clock अशा काही शब्दांचा मुळार्थ शोधण्याच्या चर्चा आमच्यात दोन-दोन, तीन-तीन सकाळी झडल्या आहेत. हाती विषयच नसला काही तर एलकुंचवार यांचे ‘मौनराग’, आरती प्रभू आणि ग्रेस यांच्या कविता, हा आमच्यातला कायम गप्पांचा विषय असे. मराठी- इंग्रजी साहित्यातील काही नवीन किंवा एखादा राजकीय विषय वेगळेपणाने प्रतिपादन करणारे काही वाचले की ते शेअर करून त्यावर कीस काढत चर्चा करण्याचे उद्योग अनेकदा आमच्यात झडत असत. ठामपणा ढळू न देता वाद घालायचा; वितंडवाद घालायचा नाही आणि परखडपणा म्हणजे हेकटपणा नाही याचे भान सुनीलला असल्याचे यावेळी लक्षात यायचे. ‘कायदा, घटना, केस-लॉ सोडून तू भलतंच का वाचतो बाबा हे सारं?’ हा माझा त्याला कायम प्रश्न असे आणि ‘ती माझी मानसिक गरज आहे’ हे त्याचे त्यावरचे ठरलेले उत्तर असे.

सुनीलचे आजोबा संघाचे स्वयंसेवक असल्याचा आणि त्यांना महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर तुरुंगवास झाला असल्याचा उल्लेख एका बातमीत वाचला आणि हसू आले कारण, सुनील यांच्या वर्तन आणि व्यवहारात, विचार शैली आणि प्रतिपादनात, कधीही असा कोणता ‘इझम’ किंचितही डोकावला असे मला आठवत नाही. कोणत्याही चर्चेत किंवा मांडणी करताना तो असा ‘लोडेड’ मला तरी जाणवला नाही. आज राज्याचा महाधिवक्ता झाल्यावरही सुनील असा काही एकांगी विचार करेल असे मला मुळीच वाटत नाही कारण, अशा कोणत्या एकारलेपणा किंवा एकांगीपणाला थारा देण्याचा त्याचा स्वभाव नाही. न्यायालयीन प्रक्रियेत ‘इझम’ला प्राधान्य आणि राजकीय भूमिका अग्रस्थानी ठेवत कायद्याला बगल देण्याची प्रतारणा सुनील करेल असे मला मुळीच वाटत नाही. महाधिवक्ता ही नियुक्ती राजकीय असते आणि ते पद काटेरी असते. कारण कोणतेही सरकार हे एका (किंवा जास्त) राजकीय पक्षाचे असते आणि त्या पक्षीय सरकारच्या धोरणांना कायद्याच्या चौकटीत बसवण्याची अवघड जबाबदारी या पदावर असते. त्यासाठी जशी वैयक्तीक धारणांना मुरड घालावी लागते तसेच सरकाराचा राजकीय विचार समाजहिताच्या तसेच घटनेच्या आड येणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. गेल्या सरकारने घेतलेल्या काही न्यायालयातील भूमिका बदलताना, काही निर्णयाची वकिली नव्या सरकारच्या धोरणानूकुल करताना सुनील मनोहर यांचा म्हणूनच कस लागणार आहे . काही धार्मिक आणि जातीय आरक्षण, प्रादेशिक विकासाचा अनुशेष, कुपोषण तसेच अनेकांचे आर्थिक हितसंबध दुखावणारे विषय सुनील मनोहर यांना सरकारची बाजू मांडताना महाधिवक्ता म्हणून हाताळावे लागणार आहेत. शिवाय या सरकारवर पहिल्या दिवसापासून अस्थिरतेचे सावट आहे म्हणून तर सुनील मनोहर यांची जबाबदारी क्लिष्ट आहे. या अस्थिरतेच्या सावटात कायद्याचा दिवा तेवत ठेवण्याची जबाबदारी अतिशय काळजीपूर्वक पेलावी लागणार आहे . म्हणूनच हे पद कितीही मनोहर असले तरी ते काटेरी आहे. या पदाचे आव्हान पेलण्यासाठी माझ्या या तरुण मित्राला मन:पूर्वक शुभेच्छा.

=प्रवीण बर्दापूरकर

९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट