पवारसाहेब, आम्ही दिलगीर आहोत…

राजकारणात शरद पवार यांच्या निर्माण झालेल्या करिष्म्यावर माझ्या पिढीची पत्रकारिता बहरली. डावे-उजवे, पुरोगामी-प्रतिगामी, सरळ-वाकडे, समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असे सर्व प्रवाह शरद पवार यांच्या घोर प्रेमात असण्याचा तो काळ होता. ‘पुलोद’चे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी शपथ घेतली तेव्हा मी साताऱ्याच्या ऐक्य नावाच्या दैनिकात रोजंदारीवर होतो आणि त्यांच्या शपथविधीची छायाचित्रे दुसऱ्या दिवशीच्या अंकात छापण्यासाठी सुरेश पळणीटकर यांनी मला बसने खास मुंबईला पाठवल्याची आठवण आजही आहे. पवार यांना तेव्हा प्रथम जवळून पाहिले आणि नंतर सभागृहात, व्यासपीठावर कधी मुख्यमंत्री, कधी केंद्रीय मंत्री, कधी विरोधी पक्ष नेता म्हणून अनेकदा अनुभवले. त्यांच्या असंख्य पत्रकार परिषदा, भाषणे कव्हर केली. त्यांना अनेकदा भेटलो, प्रवास केला, त्यांच्यातील सुसंस्कृत अगत्य अनुभवले. आमच्या पिढीने यशवंतराव चव्हाण यांना पाहिले नाही पण त्यांच्याविषयी जे काही वाचले-ऐकले ते आम्ही शरद पवार यांच्यात पाहिले. जनसामान्यांची नस ओळखणारा, उद्योग ते शेती, शेती ते साहित्य असा विस्तृत आवाका असणारा, वास्तवाचे विलक्षण भान असणारा, एखाद्या निर्णय वा घटनेचे भविष्यातील पडसाद आणि परिणाम सर्व ‘अर्था’ने अचूक ओळखणारा, प्रशासनावर जबर पकड असणारा, लातूर-उस्मानाबादेतील भूकंप, मोवाड गावावर कोसळलेले संकट अशा असंख्य आपत्तीतही न डगमगता आपद्ग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावणारा, राज्यातील गाव-न-गाव आणि प्रत्येक गावातील चार-दोन कार्यकर्त्यांना थेट नावाने ओळखणारा, जबर आकलन असणारा नेता.. अशी शरद पवार यांची विविध रूपे पत्रकारितेतील माझ्या पिढीने साक्षात अनुभवली आणि त्यावर प्रेमही केले. आमचे (प्रताप आसबे, धनंजय कर्णिक, धनंजय गोडबोले आणि मी) ‘अति’पवार प्रेम आम्ही ज्या वृत्तपत्रात काम करत असूत तेथेही चर्चेचा विषय असे, पण ते असो.

पत्रकारितेत असल्याने जे काही अवलोकन आणि विश्लेषण वय वाढत गेले तसे करता आले, त्यामुळे ‘राजकारणी शरद पवार’ नावडते झाले. एकाच वेळी बेरीज आणि वजाबाकीही करण्याचा बेभरवशाचा राजकारणी ही त्यांची प्रतिमा काही पचनी पडली नाही. (अर्थात त्यामुळे शरद पवार यांच्यावर परिणाम होण्याचे कारणच नव्हते!) त्यांच्या पुलोदच्या प्रयोगाने राज्यात राजकीय अस्थिरता आणि सौदेबाजी आणली असे मत बाळगणाऱ्या गटातील मी एक. नंतरच्या काळात ज्येष्ठ पत्रकार जगन फडणीस यांचे (बाजारातून गायब करण्यात आलेले) ‘शरद पवार: धोरणे आणि परिणाम’ हे पुस्तक वाचनात आले आणि राजकारणी पवार यांच्यावर थेट टीका करणाऱ्या पत्रकारांच्या गोटात मीही सहभागी झालो. कृषी क्षेत्रातील योगदानासाठी नागपूरच्या मत्स्य आणि पशू विज्ञान विद्यापीठाने जेव्हा शरद पवार यांना डी.लिट. समकक्ष ‘गो-पालक’ सन्मान देण्याचे ठरवले तेव्हा राज्यात शेतकरी आत्महत्यांचे लोण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आस्मादिकांनी ‘लोकसत्ता’तून टोकाचा विरोध केला. राज्यातील विरोधी पक्षही त्या विरोधात हिरीरीने सहभागी झाले आणि अखेर तो सन्मान पवार यांना नाकारावा लागला. (ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या माझ्या “नोंदी डायरीनंतरच्या” या पुस्तकात हे हकिकत विस्ताराने आलेली आहे.) एखाद्याचा न पटलेला एखादा गुण/अवगुण आणि त्याचे कर्तृत्व यात गल्लत करणे योग्य नाही अशी भूमिका असल्याने शरद पवार यांच्यासारखा समकालीन दुसरा जबरदस्त आवाका असणारा मोठा नेता माझ्या पिढीने पहिला नाही अशीच माझी ठाम धारणा आहे. हे सगळे आठवण्याचे कारण गेल्या काही दिवसात दाऊद इब्राहीम आणि शरद पवार यांच्यासंदर्भात प्रकाशवृत्त वाहिन्यांवर ‘जे काही’ सुरु आहे त्यातून शरद पवार यांच्यावर नाहक चिखलफेकच झाली. ‘च्यानलेश्वर’ (पक्षी: प्रकाशवृत्त वाहिन्या आणि त्यांचे) पत्रकार किती अगाध अज्ञानी आहेत याचेच त्यातून दर्शन घडले.

ज्या व्यवसायात पावणेचार दशके काढली त्या, व्यवसायाच्या घसरलेल्या दर्जावर टीका करण्यास क्लेश आणि तीव्र वेदना होण्याइतकी संवेदनशीलता माझ्यात आहे. पण, शरद पवार यांच्या राजकारणाएवढा अनुभव तर सोडाच पण तेवढे वयही नसलेले पत्रकार त्यांचा एकेरी उल्लेख करत होते, इतके शरद पवार चिल्लर नेते नाहीतच. कायम देशातील सर्वात मोठ्या आरोपींचे वकीलपत्र घेणाऱ्या आणि सेना-भाजपच्या वळचणीत राहून राज्यसभेचे खासदारपद सलग मिळवणाऱ्या राम जेठमलानी यांनी म्हणे दाऊद इब्राहिमच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांच्यासमोर मांडला होता आणि तो पवार यांनी स्वीकारला असता तर मुंबईत तसेच देशात झालेले नंतरचे बॉम्बस्फोट टाळता आले असते. पवार यांच्यावर गो.रा.खैरनार ते अण्णा हजारे आणि गोपीनाथ मुंडे यांनी अनेक आरोप केले. भूखंड वाटप, मराठा हिताचे राजकारण, प्रादेशिक हिताला अशा अनेक आरोपांचा त्यात समावेश आहे पण, पवार आणि दाऊद असा बादनारायण संबंध कोणी जोडला नाही. थोडक्यात पवार यांना मुळीच अक्कल नाही आणि शरण न येऊ देत पवार यांनी एक प्रकारे दाऊदला सरंक्षण दिले, असा जो अर्थ त्या विश्लेषणातून निघाला तो सगळाच प्रकार उद्वेगजनक बौद्धिक दारिद्र्याचा, पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा तो अवमान करणारा आहे यात शंकाच नाही.

ज्ञानाधारीत नव्हे तर माहिती आधारीत शिक्षण घेऊन बहुसंख्येने (प्लीज नोट: सर्व नव्हे!) नवे लोक मिडियात आले याशिवाय मिडियाच्या बदलेल्या स्वरूपाचे अनेक पैलू आणि बऱ्याच अपरिहार्यता आहेत हे खरे. पण, सध्या एकूणच मिडियात भाषक आणि पत्रकारितेची जाण कमी असणारांचा भरणा जास्त आहे, असेच दर्शन कायम घडत असते. बहुसंख्य पत्रकाराना आवडणार नाहीच, माझ्यावर टीकेचा भडीमारही होईल पण, तो धोका पत्करून काही उल्लेख करतोच- न्यायालयाने निर्देश दिले की आदेश, याचिका न्यायालयात सादर झाली की दाखल झाली यातील भेद लक्षात न घेता न्यायालयाशी संबधित बातम्या दिल्या जातात, न्यायालयाच्या दृष्टीने अमुक एक मुद्दा कळीचा आहे हे anchor च जाहीर करून टाकतो! आदेश/निर्देश/सरकारी आदेश(जी.आर.) / परिपत्रक / अधिमान्यता / अध्यादेश/वटहुकूम, नियम,संकेत आणि शिष्टाचार. खुलासा आणि गौप्यस्फोट.. यात किती मोठा फरक, वेगळा अर्थ आहे, हे माहिती नसणारे पत्रकार बहुसंख्येने आज मिडियात आहेत. या प्रत्येक शब्दाला स्वतंत्र प्रशासकीय/कायदेशीर अर्थ आहे तो आणि लक्षात घेऊन प्रशासकीय प्रक्रिया घडतात, विधीमंडळातले कामकाज चालत असते हे मिडियातील बहुसंख्य पत्रकारांना मुळातच माहिती नाही. एखादा गुन्हा दाखल झाल्या क्षणी कोणाला अटक करता येत नसते-आधी त्याचा तपास करून खातरजमा करावी लागते, आरोपी जर फरार होण्याची शक्यता दिसत नसेल तर लगेच अटक करण्याची गरज नसते, निलंबनापूर्वी संबंधिताचे म्हणणे ऐकावे लागते.. या मुलभूत प्राथमिक बाबीही मिडियातील बहुसंख्यांना माहिती नाही. जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते.. अशा वेळी आधी माहिती घेऊन, मदत साधनांची जुळवाजुळव करावी लागते, तेथे पोहोचण्याची स्थिती समजून घ्यावी लागते.. याला दोन-चार तास लागतात, तोपर्यंत स्थानिक प्रशासन कामाला लागलेले असते पण, हे समजून न घेता ‘प्रशासन गाफील-अजून मदत पोहोचली नाही’ अशा बातम्या प्रसारित करून यंत्रणेचे मनोबल खच्ची केले जाते आणि पत्रकारितेच्या मूल्यांची लक्तरे वेशीवर टांगले जाण्याचे उद्योग कायम सुरु असतात. मूल्यांचा ऱ्हास वगैरे लांब राहिला पण पत्रकारितेचा आशय आणि गाभा याबाबत ही नवीन पिढी जागरूक नाही आणि त्याबाबत सीनियर्सही अजाण (की बेफिकीर?) का असावेत हा प्रश्न आहे. ‘जबरदस्तीने बलात्कार’, ‘बेकायदेशीर अतिक्रमण’ ही याच श्रेणीतील इरसाल उदाहरणे आहेत-बलात्कारात राजीखुशीने आणि जबरदस्तीने असे काही नसते, अतिक्रमणात कायदेशीर आणि बेकायदेशीर भेद नसतो हे सिनियर्स समजाऊन का सांगत नाही, कॉपीत दुरुस्ती का करत नाहीत हा खरा कळीचा मुद्दा आहे. एका बातमीत उल्लेख होता- वृत्तपत्रे खरेदी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अनेक अध्यादेश काढले आहेत, म्हणजे कोण काय काढते याबद्दल इतके अज्ञान असावे.. एका ‘च्यानल’वरचे विधान बघा- ‘आता आपण बातचीत करत गप्पा मारु या’.. म्हणजे काय?

दाऊद प्रकरणात तर बौद्धिक दारिद्र्याचा कळसाध्यायच गाठला गेला आणि या विषयाचे गांभीर्यच घालवले गेले. ज्या लालकृष्ण अडवाणी यांनी दाऊदला शरण येण्याची संधी नाकारली असे या वृत्त छोटा शकीलच्या हवाल्याने दिले, त्यांनी हे लक्षातच घेतले नाही की तेव्हा अडवाणी केंद्रीय गृहमंत्री नव्हते. जेठमलानी यांच्या म्हणण्याप्रमाणे दाऊदला शरण येण्यास अनुमती दिली गेली असती तर नंतरचा मुंबईवरचा दहशतवादी हल्ला टळला असता, पवार यांनी अनुकूलता दर्शविली नाही परिणामी, दाऊद शरण आला नाही आणि पुढचे दहशतवादी हल्ले झाले. हे विश्लेषणही अडाणीपणाचे आहे कारण, दहशतवाद्याना जणू दुसरे पर्याच उपलब्ध नव्हते, दहशतवादी एकच माध्यम पुनःपुन्हा वापरत नसतात हे लक्षात घ्यायला हवे. समजा दाऊदला शरण येण्यास अनुमती दिली असती आणि दहशतवादी कारवाया करणारांनी दुसऱ्यामार्फत हल्ले केले असते तर, ‘बघा, मुंबई बॉम्बस्फोट घटनात माझा हात नव्हता’, असा कांगावा करण्यास दाऊद इब्राहिम मोकळा झाला असता आणि भारताचे छी-थू झाली असती. या पार्श्वभूमीवर जेठमलानी यांची ऑफर मान्य करून जर पवार यांनी दाऊदला शरण येऊ दिले असते आणि कारागृहाबाहेर तो राहिला असता तर याच मिडियाने दाऊदला संरक्षण दिले असे म्हणून पवार यांना ‘उभे पिसे, नांदू कसे’, करून सोडले असते!

दुसरे म्हणजे, एखाद्या गुन्हेगाराला शरण आणण्यासाठीची प्रक्रिया फार वेगळी असते. अशा प्रक्रियेपासून सरकार आणि तपास/चौकशी करणाऱ्या शासकीय यंत्रणा खूप दूर राहतात कारण, त्यांच्यावर देशातील कायद्यांचे बंधन, न्यायालयीन प्रक्रियेचा चाप असतो. बॉम्बस्फोट आणि तत्सम दहशतवादी प्रकरणात तर जनमताचे दडपण मोठे असते. त्यामुळे सरकार किंवा प्रशासन परस्पर कोणत्याही अटी मान्य करूच शकत नाही. कोणत्याही गुन्हेगाराशी सरकार किंवा प्रशासकीय यंत्रणा थेट वाटाघाटी करत नाही, ते काम अन्यांवर सोपवलेले असते. शिवाय, अशा प्रक्रिया गुप्त असतात आणि गुप्तच ठेवल्या जातात. आणखी एक मुद्दा म्हणजे काही पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांचे दाऊदशी असलेले कथित हितसंबध उघड झाले असते म्हणून शरद पवार यांनी दाऊदला शरण येऊ दिले नाही, हे विश्लेषण तर अकलेचे दिवाळे कसे वाजले आहे याचे उदाहरण ठरावे. कारण, ही माहिती उघड करण्यासाठी शरण येऊन शिक्षा ओढवून किंवा स्वत:चा गेम करवून घेण्यापेक्षा शरण न येता आहे तेथूनच या लोकांचे बुरखे फाडणे दाऊदला जास्त सोयीचे नव्हते का? पण ते राहिले बाजूला, वकिली करण्यासाठी भरमसाठ फी घेऊन दाऊदबद्दल अकारण कळवळा दाखवणारे राम जेठमलानीही लांबच राहिले आणि मिडियातील काहींकडून शरद पवार यांना टार्गेट करण्यात आले. एकदा माणूस कानफाट्या म्हणून ओळखला जाऊ लागला की त्याचे मित्रमंडळ सगळ्या आगळीकींचे खापर त्याच्यावरच फोडून मोकळे होतात अगदी तस्साच प्रकार दाऊद शरणागती प्रकरणात काही पत्रकारांनी केला. त्यामुळे सर्वच पत्रकार आणि संपूर्ण पत्रकारिता बेजबाबदार आहे असे चित्र ‘च्यानलेश्वरां’मुळे नाहक निर्माण झाले आहे.

“मा. शरद पवारसाहेब, दाऊदच्या शरणागतीच्या विषयावरून काही ‘अजाण’ च्यानलेश्वर पत्रकारांनी काय दिवे पाजळले आहेत आणि आपला मोठा उपमर्द कसा केला आहे हे त्यांनाच कळलेले नाही, त्यांना मोठ्या मनाने माफ करा. त्यांनी तुमच्या केलेल्या गुस्ताखीबद्दल, या देशात संवेदनशीलपणे आणि जबाबदारीने पत्रकारिता करणाऱ्यांच्यावतीने (आपला टीकाकार असूनही) मी दिलगिरी व्यक्त करतो.
कळावे / कळवावे.
आपला – प्रवीण बर्दापूरकर”

=प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
[email protected]

(जिज्ञासूंसाठी – (१) ‘नोंदी डायरीनंतरच्या’, प्रकाशक-ग्रंथाली, लेखक-प्रवीण बर्दापूरकर, अजाणता राजा / पृष्ठ २५ (२) दैनिक महाराष्ट्र टाईम्सच्या १० जुलै २०१५च्या अंकातील संपादकीय पानावरील ‘दाऊद भारतात परतेल?’ हा अशोक कर्णिक यांचा लेख वाचावा)

संबंधित पोस्ट

 • Uday Kulkarni…Very apt !

 • Sachin Ketkar … Well said!!

 • Ravi Bapat … प्रविण , माझे मित्र म्हणुन नव्हे तर त्याकाळी शरदरावांनी ज्या तर्हेने त्वरित कार्यवाही केली ति वाखाणण्या जोगी होती व प्रत्येक राज्याच्या नेत्यांना मार्गदर्शक होती ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही । अतिवृष्टी असो कां भूकंप ,त्यांनी केलेले कार्य अतुलनियच आहे ।।

  • पेडर रोडवरच्या नियोजित उड्डाण पुलाला विरोध केला म्हणून लता मंगेशकर यांना बेसूरं ठरवणं जितक्या पोरकटपणाचं आहे , अश्लाघ्य आहे त्याही पेक्षा खालची पातळी दाऊदच्या शरणागती प्रकरणात शरद पवार यांच्याबाबत गाठली गेली . दर्शन घडले ते संपूर्ण पोरकटपणा आणि सिनियर्सचा बेजबाबदारपणाचं …

 • dr.shekhar

  journalism should be unbiased, it should never favor any politician ….. Mr. Pravenn may i plz ask you ….why you desperately need to clarify and polish the image of a politician ..? (even though its not your duty )

 • Adv. Satish Godsay…. Besht. Khupach chhan blog aahe

 • Vinod Deshmukh….Badhiya

 • Shahu Patole…
  प्रत्यार्पण करार करण्याचे अधिकार केंद्राने राज्याना काधिपासून दिलेत यावर कुणी पत्रकार प्रकाश टाकेल काय?
  आपण फेडरल स्टेट मधे राहतो
  इथे राज्य सूची आणि राज्य सूची पाळली जाते
  मला वाटते तेंव्हा पवार मुख्यमंत्री होते ना!
  महाराष्ट्र राज्याचा कुठल्या देशाशी प्रत्यार्पण करार झाला होता काय?
  पवार काहीही करू शकतात बुवा!

 • Sagar Watandar-patil … न्यायालयीन कामात सरकार ठवळ करू शकत नाही

 • Ravi Bapat… दाऊदचा पुळका आलेल्या मंडळींनी ते बाॅम्बस्फोट व ज़ख़्मी मुंबईकरांची परिस्थिति स्वतः पाहिली असती तर असली बेजबाबदार विधाने केली नसती !! केईएममधे त्या दिवशी जखमींवर उपचार करताना आम्हा सर्जनसना किती विषण्णपणा येत होता ह्याची कल्पनाच करता येणार नाही । ह्यावर माझा एक प्रबंध शास्त्रीय मासिकात प्रकाशित झाला आहे ।।

 • Suneel Joshi … लेख छान आहेच पण ….शरद पवार नेहमी राखून बोलतात त्यामुळे यातिल तथ्य काय हे समजणे अवघड आणि जेठमलानी हे ……जाने दो …
  दाऊद हा विषय आपल्यासाठी नेहमीच कमालीचा संताप आणणारा आहे.त्याला एकच शिक्षा म्हणजे मृत्युदंड ..नो माफी नो क्षमा.नो तडजोड..शेवटी निसर्ग न्याय देईलच..

 • Rajesh Kulkarni …
  दाऊदला येऊ दिले असते वा नसते तरी दोन्हीबाजूंनी पवारांवरच टीका करण्यात आली असती हे योग्य वाटत नाही. कारण आला असता तर दाऊद निर्दोष सुटणे कल्पनेपलीकडचे वाटते. शिवाय पवारांनी बॉंबस्फोटाला प्रत्यक्ष जबाबदार असलेल्या काहींना हवाईदलाच्या विमानातून नेले हे तेही नाकारत नाहीत. त्यांची नावे हवाई दलाच्या रजिस्टरमध्ये आहेत असे वाचले. यावर त्यांना दिल्लीत पोहोचण्याची घाई होती म्हणून मी मदत केली असा बचाव पवारांनी केल्याचेही वाचले होते. देशाचा संरक्षणमंत्री अशा अनोळखी लोकांना हवाईदलाच्या विमानातून नेतो हे संशयास्पद नाही का? आताही दाऊदच्या प्रकरणावरून पवारांचे स्वत:चेच विधान, की ‘त्याच्या अटी होत्या म्हणून मी त्याची शरणागती स्विकारण्यास नकार दिला’ हे काय दर्शवते? मुळात ही केंद्राच्या अखत्यारीतली गोष्ट, यांचा संबंधच कोठे येतो? तरी त्यांनी ते विधान केलेच ना? तेव्हा चॅनल्सना दोष देण्यात अर्थ नाही. इंटरनेटवर काही अप्रकाशित रिपोर्ट उपलब्ध अाहेत, त्यात याच पवारांचे जवळजवळ सारेच बगलबच्चे हवालामध्ये त्यांच्यासह गुंतलेले अाहेत हे स्पष्ट दाखवलेले आहे. हे अहवाल संसदेत सादरच करू दिले गेले नाहीत. पवारांनी चव्हाणांशी दगलबाजी करण्याआधी कमावलेली पुण्याई केव्हाच संपलेली आहे, त्यानंतर महाराष्ट्र व देश निव्वळ एका गुन्हेगाराला संरक्षण देत आहे हे स्पष्ट आहे. अहो, एखादा राक्षससुद्धा दिवसाचे चोवीस तास राक्षसीपणा करत नाही. समाजातील विविध घटकांना आपला मानवी संवेदनशील चेहरा दाखवायचा, त्या शिदोरीवर ते वेळ पडली की आपल्या बाजुने बोलत आपली बाजू सांभाळून घेतात, ही यांची यामागची कॅल्क्युलेशन्स आहेत. आपण का त्याला बळी पडत आहोत? संभाजी ब्रिगेड वा तत्सम लोकांनी एका पिढीतील तरूणांच्या मनात जातीयवादाचे विष कालवले, त्याविरूद्ध मौन बाळगून मुकसंमती दिली. त्यांच्या पापांची यादीच येथे देण्याचा हेतु नव्हे, पण जे मेडियात दाखवले जाते त्याबद्दल काहीही गैर वाटण्याची आवश्यकता नाही असे सांगावेसे वाटते.

 • Kishor Katti … बद्रपुरकर साहेब … फार सहज तुम्ही पवार साहेबाना क्लीन चीट देऊन टाकलीत.
  दाऊद च्या शरणागतीचा मुद्दासोडा, त्यात तारखा व नांवे यांची जरूर गल्लत झाली आहे.
  पण तुम्ही पवार आणि दाऊद यांचा काहीही संबध नाही असे छातीठोक पणे सांगू शकाल का?
  J J हॉस्पिटल मध्ये झालेला १९९२ चा शुट out चा किस्सा आठवतो का ?
  पवार साहेबांनी दाऊद च्या त्या shooters ना Indian Air Force च्या खास विमानातून कसे दिल्लीला सुखरूप नेउन सोडले होते? जरा आठवा ….
  मग क्लीन चीट द्या.
  पत्रकारांचे एक बरे असते, त्यांना सोयीनुसार सन्धर्ब घेऊन कसेही लिहिता येते!

 • Narayan Alies Dilip Deodhar… अमेरिका जशी दुसर्या देशात जाऊन त्यांच्या देशद्रोह्यांना मारू शकते तर मग आमण दाऊदला का मारू शकत नाही.

 • विजय तरवडे …. अतिशय अप्रतिम

 • Sudhakar Jadhav … वृत्तवाहिन्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीने समस्त पत्रकार जगतावर खाली मान घालण्याचे प्रसंग वारंवार येत आहेत. दुसऱ्यांची मापे काढण्याची अमाप हौस असलेल्या चैनेलेश्वराना कोणी तरी त्यांची उंची मोजण्याची फुटपट्टी त्यांच्या हातात देण्याची गरज होती. तुम्ही ते काम चोखपणे केले आहे. अभिनंदन.

 • Sandip Deshmukh …
  सर आजची शिक्षण पध्दतीच अशा पद्धतीने हकलली जात आहे की, जिथे ज्ञान, माणुसकी, कर्तव्य, संस्कृती, इतिहास, आदरभाव ही मुल्ये आज धूसर होत चालली आहेत. त्याचे परिणाम आजच्या सर्वच घटकांवर दिसून येतात त्यामुळे सर्वच क्षेत्रात ह्याबद्दल आज चिंता वाटावी अशीच गुणात्मकतेची पोकळी निर्माण झाली आहे. आपला लेख वाचून ‘पेडन्यूज’ च्या या भयावह देशात पत्रकारिता आजही शिल्लक आहे ह्याचे दर्शन घडले. आपले अभिनंदन.

 • Atul Thakur … पत्रकारांना दोषी ठरवून आपण सर्वांच्या वतीने साहेबांची माफी मागून अनेक अर्थी मोठे झालात?
  सुरवातीच्या कौतुकाच्या कॉमेंटला प्रतिक्रिया दिलीत आणि नंतर तोंड बंद केलेत का?
  पवारांना मोठे करण्यात आपल्यासारख्या समकालिन पत्रकारांचा फार मोठा वाटा आहे असे आपल्याला वाटत नाही का?

 • Parag Deval …
  Sharad Pawar is a Chanakya in modern India. But the sad thing is, he did not use his talent for the country but used it for his own party and his family members

 • Nanasaheb Borade… rajesh kulkarni sambhaji briged jatiwadi vish kalwale ase manta …aho kiti takke lokavurudh 3% bamana virudh ..aho apan darmache & dewache nirmate arthat baap ahat ..apanach jati darmawarun lokana olak nirman karun dilit ani ata sambhaji briged ne marmawar bot tewle ki sambhaji briged jatiwadi ….ha duttapi pana nahi ka apala …?

 • Rajesh Kulkarni …
  Borade, तुम्ही असा जातीयवादी विचार करू शकता याचे खरेच कौतुक वाटते. अभिनंदन

 • Prakash Kulkarni … बोराडे साहेब पूर्वीच्या ब्राम्हणांनी जे काही केले त्याबद्दल कोणी ही समर्थन करणार नाही. मी स्वतः जातीपातींचे गलिच्छ राजकारण हा कलंक मानतो. माञ गेला काही काळ दलितांवर चालू असणाऱ्या अमानुष अत्याचारांना जबाबदार कोण, याचे खरे उत्तर आपण देऊ शकता का? आणि या सर्वांना तिथल्या प्रस्थापित पुढाऱ्यांचा पाठिंबा असतो हे तुम्ही नाकारता का? जातीपातींना मूठमाती देऊन एक समाज म्हणून आपण सगळे अशा प्रवृत्तींविरुध्द एकञ येऊ नये का? असो, मूळ पोस्टपासून भरकटू नये म्हणून इथे थांबतो

 • Heramb Oak…
  वा वा. पवारस्तुतीमधे तर तुम्ही रारा परताप आसब्यांनाही मागे टाकलंत!!!!!

 • Shilpa Belgi …
  ज्या देशात सलमान निष्पाप, संजुबाबा निरागस तिथे कोणी गुन्हेगार, भ्रष्टाचारी, सामान्यांचे पैसे खाऊन सात पिढ्यांची सेय करणारं, भुखंडांचा श्रीखंड मटकावणारं, देशापेक्शा पक्श आणि घराणी मोठी मानणारं असतं यावर बुवा आपला विश्र्वास नाही. लोक कायतरी उग्गाच बरळतात राव. उगीच आपलं संतपणाला पोहोचलेल्यांना असा त्रास द्यायचा हे काय बरं नाही. साहेब कराच हो तुम्ही माफ.

 • Vikrant Deshmukh …
  फार मनापासून कळवळापूर्वक लिखाण…. !!!!

 • Umakant Pawaskar … Dear Sir, no need for apology. Pawar has lost all credibility.

 • Govind Gholve… Great n true article congrts sirji

 • सचिन अपसिंगकर…वास्तव….

 • Sooraj Mote… प्रवीण बर्दापुरकरांचा लेख आहे.पवार साहेबांचे टीकाकार.उथळ पत्रकारीतेवर टिका करणारा लेख आहे.नक्की वाचा.दाऊदसोबत सांगितल्या जाणार्या तथाकथित सम्बंधावर पण विश्लेषण केलय बर्दापुरकरांनी.

 • Balwant Meshram…
  जाणुन खोड्या करण्याचा असा उथळ छंद परवडण्यासारखा असू शकतो काय? आत्मपरिक्षण्यासाठी हा मुद्दा विचारणीय असावा!

 • Govind Sovale ·…
  Hahaha… lalghotepanachi hadda… chalu dya pawarstuti aani dawoodstrotra.. ekdam sanvedanshil barka wink emoticon

 • Balaji Kuradkar … बरेच दिवसापासून आपले काहीच वाचायला मिळत नव्हते अचानक फेसबुक वर शोध लागला पुन्हा लोकसत्ता चे दिवस सुरु झालेत प्रत्येक लेख वाचून काढला मजा आली बहोत बढ़िया.

 • Anil Khandekar

  प्रवीण बर्दापूरकर , जमून आला आहे हा लेख , नेहमी सारखाच. शरद पवार यांच्या बद्धलचे विश्लेषण योग्यच आहे. एक गोष्ट — कोणताही माणूस पूर्ण पणे स्वीकारार्या असतोच असे नाही . यालाच मूल्य मापन म्हणायचे न. पण केवळ पत्रकाराच नाही तर शहाणे सुरते लोक पण वक्तीला काळ्या पांढऱ्या रंगात रंगवतात. मग पवार यांच्या सारख्या व्यक्ती तर त्याच चष्म्यातून बघितल्या जातात, यात नवल नाही . प्रत्येकाची संवेदनशीलता आणि कुवत. यातूनच तुमचा पुढील मुद्धा , पत्रकारांबाद्धाल चा . भाषा आणि सामाजिक शास्त्रे यांची तोंड ओळख , वाचन नसल्यामुळे अनेक प्रकारे गल्लत होते. मग याची सुरुवात लोकांमधूनच होते. आणि पत्रकार आमच्यातून आलेले असतात ना. त्यांना शिकवणारे आणि वरिष्ठ पण तसेच. बघा सध्याची बातम्यांची शीर्षके — शब्दांची मोड तोड करून बालिश कोट्या केल्या जातात. वाहिन्यांवरील मराठी सोडून द्या , वर्तमान पत्रीय मराठी कशी असते. तुम्ही , प्रताप आसबे , निळू दामले — किती स्वच्छ , साधी , आशयाला पूरक मराठी लिहिता. नवीन पत्रकारांना श्री म माटे , अत्रे , माडगुळकर बंधू , शांताबाई शेळके , दुर्गाबाई , इरावती बाई अशांचे लेखन वाचणे अनिवार्य केले पाहिजे. असो. धन्यवाद.

  • खरंय आपलं म्हणणं . शरद पवार यांच्या संदर्भात मिडिया एखाद्या वेळी बेजबाबदारपणे वागला हे महत्वाचं नाही तर तर हा बेजबाबदारपणा दिवसेदिवस वैपुल्याने फोफावतच चालला आहे हा तीव्र चिंतेचा मुद्दा आहे .

 • Satish Salpekar @ प्रविण, तुझे शरद पवारांबद्दलचे लिखाण वाचले. फार कमी लोकांना शरद पवार कळलेत, त्यात तुझी पण गणना व्हायला पाहिजे. शरद पवार राजकारणी म्हणून राम जेठमलानीं पेक्षा फार वरच्या दर्जाचे राजकारणी आहेत यांत काहीच वाद असू शकत नाही. एकाच वेळी बेरीज आणि वजावाकीचं राजकारण करणे हा जो त्यांच्यातला दोष आहे अगदी तसाच किंवा काकणभर जास्त दोष राम जेठमलानीं मध्ये पण आहे. एकाच वेळी संघ / भाजप आणि काॅंग्रेस असा दोन्ही डगरींवर पाय त्यांनी पण ठेवले. खरं पाहिले तर ते मनाने संघ/भाजप च्या जवळ कधीच नव्हते. त्यांच्या सगळ्या सवयी आणि वागणं काॅंग्रेसीच आहे. एक ऊत्तम वकील म्हणून भाजपला त्यांची गरज होती. या गरजेतून आणि मुंबईतल्या सिंधी समाजाला आकर्षित करण्याच्या उद्देशाने भाजपाने त्यांना जवळ केलं असावं. त्यांना पण जो पर्यंत भाजपा कडून मंत्रीपद मिळाले तो पर्यंत ते भाजपाच्या जवळ होते. भाजपाने जेव्हा पासून त्यांना मंत्रीपद देणे बंद केलं तेव्हा पासून ते भाजपावर टीका करायला लागलेत.
  खरं म्हणजे दाऊद किती मोठा गुन्हेगार आहे हे माहीत असताना त्याच्याशी बोलल्याबद्दल जेठमलानींवरच खटला चालवायला हवा. एकाच वेळी गुन्हेगाराचा वकील आणि देशाचा दूत या दोन्ही भूमिका करता येणार नाही.

  • सतीश, शरद पवार मला कळले आहेत असे मी तरी म्हणणार नाही..खरं तर , कुणीच म्हणणार नाही ! जेठमलानी यांच्यावरच खटला चालवायला हवा हा तुझा मुद्दा पटण्यासारखा आहे .

   • Ramesh Zawar…. गुन्हेगार आणि वकील ह्यांच्यात झालेले फोनवरचे संभाषण हा खटला भरण्याच्या दृष्टीने पुरेसा मुद्दा नाही. हो, त्यांच्या कोलांटउड्याबद्दल तुम्ही हवी टीका करू शकता.

    • विजय तरवडे ….त्यांच्या किंवा इतरांच्या कोलांटउड्या हे विनोदी लेखकांचे टॉनिक असते

     • शरद पवार यांच्या कोलांत उड्यामागे विनोदनिर्मितीचे टॉनिक नसते तर एक राजकीय लॉजिक असते कायम ! ब्लॉगवरील मजकुरात उल्लेख असलेले ज्येष्ठ पत्रकार जगन फडणीस यांचे पुस्तक नक्की वाचा , ते लॉजिक समजून घेण्यासाठी .

 • Milind Jiwane … सर तुम्ही पत्रकारांनी या शरद पवार नावाच महात्म वाढवलय .ईतका जातीयवादी व चळवळी मोडणारा नेतां ,सोपा राजकारणी तुम्हालाही कळत नाही म्हटल्यावर नवलच…!!!

  • हाssssss… ! हे सगळं इतकं सरळ नाहीये , जीवने . तसं असतं तर किती चांगलं झालं असतं .बाकी तुमच्या मताशी ९५ टक्के सहमत . पण, चळवळीच्या नेतृत्वालाही त्यासाठी जबाबदार धरावे लागेल . असो , तो फार मोठा आणि स्वतंत्र विषयआहे !

 • Bhupendra Kusale …
  जगाच्या इतिहासात शरद पवार यांच्या वर जितके लिखान झाले
  तितके कोणावर ही झाले नसेल
  शरद पवार अजून कोणाला समजले
  नाही
  छान लेख

 • Harish Hardikar
  काही नाही प्रवीणजी त्यानी महाराष्ट्रातील पत्रकार ( काहि) पकडून स्वतला मोठे केले आहे हा माणूस कधीही युद्धचे घोड़े नव्हता एकवेलि 60 आमदार निवडून अनु शकत नहीं ना एक हाती महाराष्ट्र जिंकला