मायानगरीची ज्येष्ठ मैत्रीण !

रविवारची सकाळ वीणा आलासे यांच्या मृत्युची बातमी घेऊन उजाडली. गेल्या आठवड्यातील मजकुरात त्यांची आठवण काढली होती. लिहितानाच विचार केला की खूप दिवस झाले त्यांचा फोन नाही.. आपणही केलेला नाही. बोलायला हवं एकदा. बोलणं राहून गेलं.. कायमचं राहूनच गेलं.

नावानं हाकारायचं असेल तर ‘वीणाताई’ आणि नुसतंच असेल तेव्हा ‘अहो बाई’ असं मी त्यांना म्हणत असे. अंबाजोगाईच्या मराठी साहित्य संमेलनाला मी पुणेमार्गे आणि प्रकाश देशपांडे नागपूरहून पोहोचला. ठरल्याप्रमाणे आमची भेट झाली तेव्हा प्रकाशसोबत एक, वर्णानं निमगोरी आणि स्थूल देहयष्टीची, वत्सल पण करारी जाणवणारा जरा मोठ्या ठेवणीचा चेहेरा आणि त्यावर समोरच्यावर दडपण आणणारा डॉमिनेटिंग भाव, त्याला न साजेसे चष्म्याआडचे खट्याळ डोळे, डोईवर दाट किंचित कुरळे-त्यातले काही अस्ताव्यस्त तर काही उडणारे केस असणारी बाई होती. प्रकाशनं ओळख करून दिली, ‘या वीणा आलासे’. क्षणभर आम्ही एकमेकाकडे पाहिलं आणि जुन्या संदुकीत जपून ठेवलेल्या अत्तराच्या कुपीत मुरलेल्या गंधासारखं परस्परांना भेटलो. स्वाभाविकच होतं ते कारण, ग्रेस हा आमच्यातला दुवा होता. बाईंविषयी ग्रेसकडून ऐकलेलं होतं आणि भेट न झाल्याच्या काळात त्यात बरीच भर पडलेली होती. आम्हा तिघांची भेट झाल्यावर त्यात ह. मो. मराठे जॉईन झाले. तेव्हा ते किर्लोस्करचे संपादक होते, त्यांची ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी…’ गाजत होती, वेगळ्या शैलीचा कथाकार म्हणून त्यांचं नाव स्थिरावलेलं होतं. वीणा आलासे तसंच ह.मो. यांच्या नावाभोवती लेखकूपण आणि त्या लेखनाच्या प्रसिद्धीचं वलय होतं. प्रकाश आणि मी जरासे ‘बन-चुके’ वार्ताहर होतो; आमची गट्टी जमली. पुढचे तीन दिवस आम्ही चौघांनी अंबाजोगाई साहित्य संमेलनात धूम केली.

वीणा आलासे म्हणजे प्रचंड आखडू आणि जे वाटतं ते स्पष्टपणे सुनावणारी बाई.. शिवाय ग्रेस, द. भि.कुलकर्णी यांच्या साहित्यावर भाष्य करण्याची त्यांची क्षमता हे ऐकून होतो. वीणाताईंच्या निधनाच्या बातमीत त्या महेश एलकुंचवार यांच्या साहित्याच्याही त्या भाष्यकार असल्याचं नमूद आहे पण, मी मात्र एलकुंचवारांच्या संबंधी त्यांचं लेखन वाचल्याचं आठवत नाही. आमच्या भेटीतही कधी एलकुंचवार किंवा एलकुंचवार आणि माझ्या भेटीत वीणा आलासे हा विषय आजवर निघाला नाही, माध्यमांचे ते स्वप्नरंजन असावं! शिवाय त्या शांतीनिकेतनात मराठी शिकवतात, उत्कृष्ठ अनुवादक आहेत, रबीन्द्र संगीताच्या जाणकार आहेत इत्यादी, इत्यादी जरबदार माहिती होतीच. माझी कविवर्य ग्रेसशी मैत्री होती, (त्याबद्दल मी संपादित केलेल्या ‘ग्रेस नावाचे गारुड’ या पुस्तकात विस्ताराने लिहिलेलं आहे) तर द.भिं.कडे केव्हाही जाता-येता यावं अशी ओळख होती, त्यामुळे वीणा आलासे या नावाचं दडपण नव्हतं मुळीच. शिवाय पत्रकारितेतून येणारा एक कोडगेपणा होता, त्यामुळे ‘जमलं तर ठीक नाही तर आपलं काय अडतंय’ हा भाव मस्त मुरलेला होता. ‘वळलं तर सूत म्हणजे लाखातही असा उमदा दोस्त मिळणार नाही आणि नाही वळलं तर भूत आहे’ असं वीणा आलासे यांच्याविषयी बोलताना एकदा ग्रेस म्हणाले होते. पण पहिल्या काही मिनिटातच आमचे सूर जुळले. मी नागपुरात तसा नवखा होतो पण, वीणाताईंना नागपूरची गल्लीबोळ माहिती होती आणि त्यांच्याकडे साहित्य क्षेत्रातील असाहित्यिकही माहितीचा भरपूर साठा आहे हे, पहिल्या काही तासातच लक्षात आलं. त्यात आश्चर्य काही नव्हतं कारण त्यांचं बहुतांश शिक्षण नागपुरातच झालेलं आणि सासरही धरमपेठेत. बाईंना अनेक बाबींचं कुतुहुल असे. त्याचे निराकरण करून घेण्याची त्यांची एक शैली आहे हे अंबाजोगाईच्या तीन दिवसातच लक्षात आलं. काही वेळा हे कुतुहुल जरा जास्तच खाजगी पातळीवर उतरत त्यातला निरोगीपणा नष्ट होतोय हेही लक्षात आलं पण, मला त्याच्याशी काहीही देणं-घेणं नव्हतं. अधूनमधून त्या मराठी किंवा बंगालीत गुणगुणत. आवाज जरा जाड आणि खर्जातला पण, त्यात लुब्ध करणारी नादमयता आहे, याचीही नोंद झाली.

जरी कोलकत्यात राहात असल्या तरी बाईंचं मराठी वाचन अफाट; त्यांच्याकडे मराठी साहित्यविषयक बहुतांश खडा-न-खडा माहिती आहे, हे त्यांनी गप्पांच्या ओघात खजिना खुला केल्यावर लक्षात आलं. नंतर काही वर्षांनी लक्षात आलं की, दरवर्षी बहुदा उन्हाळ्यात एकदा नागपूर, पुणे आणि मुंबईत काही दिवस घालवून बाई त्यांच्या माहितीच्या खजिन्यात भर घालत असतात. सेलफोननं नंतर हे काम आणखी सुकर झालं असावं. महत्वाच्या, बड्या मराठी प्रकाशकांशी त्यांची वैयक्‍तिक जान-पहचान होती आणि त्यातूनही त्यांच्या खजिन्यात भर पडत असे.

मी आणि प्रकाश बाईंपेक्षा वयाने लहान. आम्हा दोघांचीही लग्न व्हायची होती त्यामुळे, आम्ही अंबाजोगाईत चौखूर उधळलो आणि त्यात बाई नि:संकोच बिनधास्त सहभागी झाल्या. अर्थात त्यात एक आदब त्यांनी पाळली यात शंकाच नाही. रात्री उशीरापर्यंत त्या आमच्यासोबत हुंदडल्या, अगदी बारमध्येही आल्या पण त्यांच्या खांद्यावरचा पदर कधी ढळला नाही. अंबाजोगाईत त्याकाळी हॉटेल्समध्ये ‘फमिली रूम’ नावाचा प्रकार होता पण, बाई आग्रहाने आमच्यासोबत खुल्या वातावरणात बसत आणि आमचे शब्द जरा जरी ‘लडखडले’ तर वडीलकीच्या जबाबदारीने आवरते घ्यायला लावत, अशा वेळी त्यांचा आवाज जरा वाढत असे आणि त्याच चढ्या आवाजात बिल आणण्याचे फर्मान त्या सोडत. मला त्यांचं हे असं आदबशीर वागणं भावलं. आम्ही सोबतच नागपूरला परतलो. एकदा जेवायलाही सोबत गेलो. काही दिवस नागपुरात राहून त्या कोलकत्याकडे रवाना झाल्या आणि आम्ही ‘संपर्ककक्षे’च्याही बाहेर गेलो. याला कारण, माझी रवानगी माधवराव गडकरी यांनी राजकीय वृत्तसंकलनाच्या बीटमध्ये केली.

नंतर मी मुंबईत आणि तेथून औरंगाबादला बदलून गेलो. कधी तरी-कोणाकडून तरी परस्परांविषयी काही क्षेम-कुशल कळत असे. प्रत्यक्ष भेट मात्र झालीच नाही. २००३च्या मार्च महिन्यात ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचा संपादक म्हणून मी बदलून गेलो. आता सेवानिवृत्त विंग कमांडर असलेले, ज्येष्ठ स्नेही-लेखक अशोक मोटे यांच्याशी एक दिवस गप्पा मारताना वीणाताईंचा संदर्भ निघाला. अशोक मोटे यांच्यामुळे आम्ही पुन्हा ‘संपर्ककक्षेत’ आलो. दोन-तीन वेळा सेलफोनवर बोलणं झालं. मग एकदा अशोक मोटे यांच्यासोबत त्यांच्या धरमपेठेतील घरी गेलो. बंगल्याच्या जागी अपार्टमेंट उभं झालेलं होतं. वीस वर्षात आम्हा दोघांतही वयोमानपरत्वे बरेच बदल झालेले होते. बाई वयाच्या सत्तरीकडे तर आस्मादिक साठीकडे झुकलेले होते. आम्ही भेटलो आणि स्नेहाची प्रदीर्घकाळ आकस्मिक तुटलेली वीण पुन्हा अगदी सहज जुळली. बाई वर्षातून एकदा साधारण महिनाभर महाराष्ट्रात येत. नागपुरात मुक्काम ठोकत आणि सर्वत्र फिरत. कोलकत्याला जाताना माहितीच्या खजान्यात त्यांनी पुरेशी भर टाकलेली असे आणि पुढचे दहा-अकरा महिने ती भर पुरेशी असे. हा खजिना भरून घेणे ही त्यांची एकाच वेळी मानसिक गरज आणि आंतरिक सांस्कृतिक आंस असायची. या काळात आम्ही दोन-तीनदा तरी भेटायचो.. अनेक बाबींची त्या खात्री करून घेत. अर्थात अशी खातरजमा त्या भेटीला येणाऱ्या अन्य स्नेह्यांकडूनही करून घेत असणार याची मला खात्री होती. एक मात्र खरं, मराठी साहित्य प्रांतातील वाद-प्रवाद-चर्चा-रुसवेफुगवे-गॉसिप याविषयी त्यांना इत्थंभूत माहिती असे! लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ आणि नागपूरच्या तरुण भारत या दैनिकांच्या रविवार पुरवण्यात काय मजकूर आला हे अवगत असे, वामन तेलंग कोणाविषयी काय लिहितात, कोणाला लिफ्ट देतात याबद्दल त्यांना कुतुहुल असे. साहित्यासोबतच ‘असाहित्यिक’ गप्पा मारणं त्यांना आवडायचं. अनेकदा अशोक मोटे यांनी हल्दीराममधून आणलेल्या लस्सीचे कप फस्त करत आमच्या या टवाळक्या चालत. विजय फणशीकर याने त्या काळात तो संपादक असलेल्या हितवाद या इंग्रजी वृत्तपत्रात मराठी साहित्यिकांविषयी एक स्तंभ सुरु केलेला होता. मराठी साहित्य अक्षरशः कोळून प्यायलेल्या पत्रकाराचा तोरा उतरवण्याच्या दर्जाचा तो इंग्रजी मजकूर असायचा. त्या स्तंभात एकदा बंगाली आणि मराठीतील सेतू असा त्यांचा झालेला उल्लेख वीणाताईंना खूपच वैपुल्यानं सुखावून गेला. बाईची आकलनाची झेप मोठी, लेखन कसदार होतं आणि साहित्य अकादमीनं त्यांचा अनुवादासाठी दोन वेळा सन्मान केलेला-एकदा मराठी तर एकदा बंगालीसाठी! दोन भाषातील अनुवादासाठी सन्मान होणाऱ्या वीणाताई या बहुदा एकमेव भारतीय साहित्यिक असाव्यात. मराठी साहित्य संस्थांच्या मार्तंडरावांना मात्र त्याचं काहीच सोयरसुतक नव्हतं ; त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, अशी बाईंची त्याबद्दल खात्रीपूर्ण भावना होती.

विवाहानंतरची चार-साडेचार दशकं दुरदेशी-कोलकत्यात राहूनही बाईंची मराठीशी असणारी नाळ कधीच तुटली नाही. जेथे दीर्घ वास्तव्य झाले त्या कोलकत्याचा उल्लेख त्या प्रेमानं ‘मायानगरी’ असा करत. त्यावरून मी अनेकदा ‘अहो, मायानगरीच्या मराठी बाई, पुरे आता’ असं म्हणत एखादा लांबलेला किंवा अप्रिय विषय संपवायला लावत असे. खरं तर त्यांनी मराठी आणि बंगालीतही लिहिलं. भरपूर अनुवाद केले. एकदा तर त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ‘गुलामगिरी’चा केलेला बंगाली अनुवाद एखादा मौल्यवान ऐवज दाखवावा तसा दाखवला..हातात दिला न दिला लगेच ती प्रत काढून घेत त्यांनी आतल्या खोलीत नेऊन ठेवली! त्यांचे लेखनाचे सर्वच पैलू नीटसे नोंदवले गेलेले नाहीत, हेच खरं.

ग्रेसबद्दल त्या हळव्या असत. त्या हळवेपणात ग्रेसच्या वाट्याला आलेल्या एकाकीपणाबद्दल ममत्व आणि कणव जास्त असे. ती कणव त्यांनी कधी लपवूनही ठेवली नाही. ‘ग्रेस मन में आ जाते है, समझ में नही’ ही त्यांची ग्रेसबद्दलची मांडणी होती. ‘माझ्या पती आणि सासू-सासऱ्यांनी ग्रेसला माझ्यापेक्षा जास्त समजून घेतलं. ते जर समजूतदार नसते तर आफतच आली असती’, असं त्यांनी दोन-तीन वेळा म्हटल्याचं पक्क आठवतंय. ग्रेस वारल्यावर, विलक्षण प्रातिभ आवाका असणाऱ्या आणि जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या ‘ग्रेस’ नावात लपलेल्या कवी-माणसाचा शोध घेणारं पुस्तक तयार करण्याची कल्पना माझ्या मनात आली. त्या ‘ग्रेस नावाचे गारुड’ प्रकल्पाच्या निमित्तानं आमच्या अनेकदा भेटी झाल्या. पत्नीचं निधन झाल्यावर अस्थिविसर्जनासाठी ग्रेस त्यांच्या मुलांसोबत कोलकत्याला गेले तेव्हा वीणाताईंकडेच राहिले. त्याबद्दल लिहावं असा माझं वीणाताईंकडे आग्रह होता. ग्रेस यांच्या वास्तव्याच्या त्या दिवसांबद्दल लिहिण्यास प्रारंभी वीणाताईंनी ठाम नकार दिला. ‘ते लिहिणं कठीणच नाही तर अशक्य आहे’ असा सूर त्यांनी लावला. मी संततधार धोशा लावला. अखेर त्यांनी ‘मायानगरीचा पाहुणा’ हा लेख लिहिला. ग्रेस यांच्याबद्दल वर्तन आणि संवयीबद्दल ज्या संयतपणे वीणाताईंनी लिहिलं आहे तो सुसंस्कृत लेखनाचा उत्तम अविष्कारच म्हणायला हवा! पुस्तक सिद्ध झाल्यावर प्रकाशनासाठी वीणाताईंनाच आमंत्रित केलं. तेव्हाही त्या असोशीने बोलल्या. ते भाषण रेकॉर्ड करून ठेवायला हवं होतं, अशी रुखरुख नंतर लागली.

गेल्या वर्षी भेट झाली तेव्हा आम्ही औरंगाबादला स्थलांतर करण्याच्या तयारीत होतो. भेट संपवून निघताना त्यांनी विचारलं, ‘आता पुन्हा भेट होईल नं? स्वरात कातरता होती, संदर्भ आजारानं बुरुजाचे टवके उडत चालल्याचा होता.

मी म्हणालो, ‘भेटू या नक्की, असं म्हटलं की बरं वाटतं’ आणि वळलो. नंतर ३/४ वेळा सेलफोनवर बोलणं झालं. आता तेही संपलं… जीवाभावाच्या अनेकांचे नंबर्स सेलफोनच्या मेमरीत आहेत पण ती माणसं मात्र नाहीत. त्या यादीत वयानं ज्येष्ठ असणाऱ्या मायानगरीतल्या वीणाताई आल्या आहेत…

=प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट