राजकारणातल्या फुशारक्या आणि निसरड्या वाटा !

राजकारणात आपल्या शीर्षस्थ नेत्यांच्या जास्तीत जास्त निकटचे असल्याच्या फुशारक्या मारता येणे फारच कौशल्याचे असते. म्हणजे, आपण खरे बोलत नाहीये हे समोरच्याला कळू न देण्याचे कसब गेंड्याच्या कातडीसारखे टणक असावे लागते आणि आपण खोटे बोलतोय हे नेत्याचा कानी जाणार नाही याची कडेकोट खबरदारी कायम घ्यावी लागते. मात्र हे मूलभूतपणे उमगलेले नसले की ‘फुशारकीचे पितळ’ साफ उघडे पडते. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते-महाराष्ट्राच्या परंपरागत राजकारणाला बहुजनीय वळण देणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे गेल्या वर्षी ३ जूनला आकस्मिक अपघाती निधन झाले. असा जीवघेणा वार झाल्यावर एक वर्षांचा कालावधी फार काही मोठा नाही त्यामुळे, एकाचवेळी फुले आणि संघर्षाचा अग्नी घेऊन राजकारणात मोठी मजल मारलेल्या मुंडे यांच्या निधनाच्या जखमा अजून ओल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील युतीचे सरकार सत्तारूढ झाले. महाराष्ट्राच्या या सरकाराचे नेतृत्व खरे तर गोपीनाथ मुंडे करतील असे स्पष्ट संकेत गेल्या वर्षी दिल्लीतून मिळालेले होते. प्रत्यक्षात गड आला पण, सिंह गेला अशी झालेली. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम स्मृतिदिनाला हळवेपणाचा कातर-भळभळता स्पर्श असणे अपरिहार्य होते. पण, राजकारण एकाच वेळी सच्चे आणि बेगडीही असते; निष्ठेच्या पिकात गाजर गवतही उगवत असते. त्यामुळे एकाच वेळी मुंडे प्रेम आणि त्याचवेळी प्रेमाची बेगडी अहमहमिकाही आढळल्यास नवल काहीच नव्हते.

गोपीनाथ मुंडे यांच्याशी माझा स्नेह महाविद्यालयीन जीवनापासूनचा म्हणजे १९७१-७२पासूनचा; गरज म्हणून स्वयंस्फूर्तीने उभ्या राहिलेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठ स्थापनेच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनापासूनचा; पुढे आमचे प्रवाह वेगळे झाले, ते राजकारणात गेले आणि मी पत्रकारितेत आलो. आमची राजकीय विचारसरणी टोकाची भिन्न असली तरी आपापल्या क्षेत्रातला आमचा प्रवास समांतर होत राहिला आणि संपर्कही अतूट राहिला. आस्मादिक गोपीनाथ मुंडे यांच्या ‘किचन कॅबिनेट’ तर लांबच त्यांच्या जवळच्या गोटातीलही नव्हते. मुंडे यांच्यासंबधी मी भरपूर अनुकूल-प्रतिकूल लेखन केले त्यामुळे काही वेळा ते टीकेचे धनी झाले पण त्यांच्या स्वभावातील जन्मजात उमदेपणामुळे आमचे संबध बिघडले नाही. अनेकदा सार्वजनिक व्यासपीठावरून बोलताना कधी ठरवून तर, कधी बोलण्याच्या ओघात परस्परांशी घेतलेले पंगे गाजले.. त्या कथा राजकारण आणि मिडियात चर्चिल्या जाण्याइतकी आमची दोस्तीची वीण घट्ट होती. आमचे परस्पर स्नेहार्द्र कायम जाणते तसेच भरजरीच राहिले.

तर, जूनच्या पहिल्या आठवड्यात गोपीनाथ मुडे यांच्या स्मृतीदिनाशी संबधित ३ कार्यक्रमांना हजर राहण्याची संधी मिळाली. नांदेडचे ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी यांनी संपादित केलेल्या ‘संघर्षयात्री’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, दिवंगत मुंडे यांच्या कन्या तसेच राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे, विजय गव्हाणे आणि अन्य काही प्रमुख पाहुणे होते. या पुस्तकासाठी एक विस्तृत लेख लिहिलेला असला तरी माझेही नाव पाहुण्यांच्या यादीत समाविष्ठ करण्याचा जिव्हाळा आयोजकांनी दाखवलेला होता. आपण मुंडे यांच्या कसे आणि किती निकटस्थ होतो, त्यांच्या भावजीवनाचा एक घटक कसे बनलेले होतो हे या कार्यक्रमात सांगताना एक वक्ते म्हणाले, ‘केंद्रीय मंत्री मंडळाची यादी जाहीर होण्याच्या शेवटच्या तीन अस्वस्थ दिवसात दिल्लीत ‘मुंडेसाहेब, पंकजाताई आणि मी असे तिघेच सोबत होतो… वगैरे’.

‘मुंडेसाहेबांच्यासोबत पंकजासह’ त्या शेवटच्या घालमेलीच्या कसोटीच्या काळात काळात तिसरा ‘मी’च कसा होतो ही जवळीकीची कथा गेल्या सहा-सात महिन्यात आस्मादिकानी त्याआधी तीन वेळा, दोन वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलेली होती. एकदा दिल्लीत आणि दोन वेळा मुंबईत. कथा तेच कथाकार मात्र वेगळा! आता हा (चौथा) पाहुणा नांदेडला ‘तेच’ कथन करत होता. फरक इतकाच की पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हे कथन म्हणा की दावा, प्रथमच ऐकला. पंकजा मुडे यांनी त्याचा इन्कार केलेला नाही याची नोंद घेत औरंगाबादला परतल्यावर दोनच दिवसांनी पुढचा प्रसंग घडला-औरंगाबादचे माजी महापौर डॉ भागवत कराड, बापू घडामोडे, शिरीष बोराळकर, थोडक्यात-भाजपच्या औरंगाबाद शाखेने गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृत्यर्थ एक व्याख्यानमाला आयोजित करून मुंडे यांच्या विकसनशील राजकारणाचे अनेक पैलू समोर आणण्याचा उपक्रम राबवला. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. नामवंत उद्योगपती राम भोगले, उद्योजक उल्हास गवळी, राष्ट्रीय समाज पक्षाचे, ‘बारामती’करांच्या तोंडाला फेस आणणारे आमदार महादेव जानकर आणि मी अशी चार व्याख्याने झाली. यापैकी भोगले आणि गवळी हे माझे दीर्घकाळचे परिचित. सत्तरीच्या दशकात पद्माकरराव खेकाळे आणि उल्हास गवळी यांच्या उत्साही नेतृत्वाखाली सरकारप्रणित’ युवक चळवळीतही मी सहभागी झालेलो, असा हा ऋणानुबंध.. पण ते असो. कारण मुख्य मुद्दा वेगळाच आहे, या व्याख्यानमालेत बोलताना एका वक्त्याला, मुंडे यांच्या ते किती निकटस्थ होते, हे सांगण्याचे उमाळेच आले.. अक्षरशः एका पाठोपाठ एक! बोलण्याच्या ओघात आणि आवेशात त्यांनी स्वत:ला गोपीनाथ मुंडे यांचे मानसपुत्र म्हणून जाहीर करून टाकले. नंतर त्याच आवेशात केंद्रातले मंत्रीमंडळ जाहीर होतानाच्या शेवटच्या तीन महत्वाच्या दिवसात ‘मुंडेसाहेब, पंकजताई आणि मी’, कसे सोबत होतो हे गहिरल्या स्वरात सांगितले आणि (सोबत आलेल्या त्यांच्या समर्थक ) श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. नेत्याच्या निकटस्थ असण्याची फुशारक्या मारण्याची अहमहमिका राजकारणात सर्वपक्षीय (म्हणजे कॉंग्रेसमध्ये सोनिया आणि राहुल तर राष्ट्रवादीत साहेब!) समान पातळीवर कशी असते याचे हे एक उदाहरण. हे पाचही तसे हुशार आहेत कारण नंबर एकवर तर मुंडे हवेतच..पंकजा यांचेही ‘दुसरे’ स्थान हिरावलेले नाही..दावा आहे तो तिसऱ्या क्रमांकाचा. या ‘कळी’च्या तिसऱ्या स्थानासाठी हे पाचच जण दावेदार आहेत की त्यात आणखी काहींची नावे आहेत? जर आणखी दावेदार नसतील तिसरा ‘नेमका’ असावा. उत्तर आहे पंकजा यांच्या हाती, तरीही माझ्यालेखी चौघांचे पितळ उघडे पडले आहे हे मात्र खरे!

हळव्या निसरड्या वाटा…

बबन(राव) लोणीकर हे नाव जालना जिल्ह्याच्या राजकारणापुरते मर्यादित असणारे नाव गेल्या वर्षी मंत्रीपद मिळाल्यावर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात कळले. बरे, समस्त जनतेला माहिती व्हावे असे काही बबन(राव) लोणीकर कोणी राजकारणातले ‘सिद्ध’ पुरुष नाहीत किंवा ते राज्याच्या-मराठवाड्याच्या तर सोडाच पण जालना जिल्ह्यातीलही राजकारणाचे ‘गेमचेंजर नाहीत’. तसे ते जिल्ह्याच्या राजकारणात म्हणे रावसाहेब दानवे यांचे प्रतिस्पर्धी असल्याने त्यांना राजकीय खेळी म्हणून मंत्रीपद देण्यात आलेले आहे असे म्हणतात (आणि ‘शहनशहा-ए-बेरके’ दानवे ते चांगले ओळखून आहेत.) आजवर सत्तेतच नसल्याने भ्रष्टाचार प्रकरणात नाव येण्याइतके कर्तृत्व बबन(राव) लोणीकरांना दाखवता आलेले नव्हते, यात त्याचा दोष नाही. सभागृहात आपल्या भागाचे प्रश्न पोटतिडीकेने मांडणारे अभ्यासू, आग्रही सदस्य म्हणूनही त्यांचे नाव ऐकल्याचे स्मरत नाही. त्यामुळे जालना जिल्ह्याबाहेरील मिडियाला त्यांचा फारसा काही परिचय नव्हता.

विधी विषयाची बोगस पदवी सादर केल्याबद्दल दिल्ली राज्याचे आम आदमी पार्टीचे कायदा मंत्री जितेंदर तोमर यांचे नाव प्रकाशात आले. केंद्र सरकारची हुकमत असणाऱ्या दिल्लीच्या पोलिसांनी तोमर यांना अटक केल्यावर एक मोठा ‘पोलिटिकल ड्रामा’ सुरु असतानाच प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी बबन(राव) लोणीकर यांच्या शिक्षणाबद्दल शंका असल्याचे पुरावे मिडियासमोर मांडले. विषयात फार दम नसला तरी तोमर प्रकरण अगदीच ताजे असल्याने बबन(राव) लोणीकर चर्चेत आले. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले एकेकाळचे ‘ढाण्या वाघ’ छगन भुजबळ यांनीही त्यांच्या शिक्षणासंबधी परस्परविसंगत माहिती सादर केल्याच्या बातम्या झळकण्याच्या बेतात असतानाच पावसाच्या प्रतिक्षेच्या बातम्या देऊन दमछाक झालेल्या मिडियाने ‘बबन(राव) लोणीकर हे महाराष्ट्राचे तोमर’ असल्याचे जाहीर करून टाकले, रणरणत्या उन्हाने निर्माण झालेली काहिली थंड करण्यासाठी एसीच्या गारव्यात सुस्तावलेल्या राज्याच्या राजकारणातही बबन(राव) लोणीकर प्रकरणाने धुगधुगी आली.

खरे तर, एखाद्या जाणत्याकडून बाजू नीट मांडणारा मसुदा लेखन करवून घेऊन, वकिलाला दाखवून एक पत्रक काढून मोकळे होत मौनात जाण्याची तरबेज राजकारण्याला शोभणारी समंजस भूमिका लोणीकर यांनी घ्यायला हवी होती. पण, राजकारणात लोणीकर उत्साहाने मिडियाच्या तोंडी लागले आणि अडकतच गेले. बबन(राव) लोणीकर यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य असे काही वाढले की ते थेट ‘हळव्या निसरड्या वाटां’वरच्या द्विभार्याप्रतिबंधक कायद्याच्या उल्लंघनापर्यंत पोहोचले. ‘पार्टी विथ डिफरन्स असणाऱ्या भाजपातील नेत्यांचेही पाय मातीचेच आहेत, ते काही वेगळ्या वाटेवरचे आणि साधनशुचितेचे राजकारण करणारे लोक नाहीत हे बबन(राव) लोणीकर प्रकरणाने पुन्हा एकदा समोर आले. स्वत:च निर्माण केलेल्या बनवाबनवीत बबन(राव) लोणीकर अलगद अडकलेच नाही तर त्याचवेळी त्यांनी सत्ताधारी भाजप-सेनेलाही अडचणीत आणून ठेवले आहे. विरोधी पक्षाकडे सत्ताधारी आघाडीला पावसाळी अधिवेशनात अडचणीत पकडण्यासाठी मुद्दाच नव्हता. सार्वजनिक खात्यातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात ‘ढाण्या वाघा’सह अनेकांवर कारवाईचा बडगा उगारला गेल्याने आणि सिंचन घोटाळ्यातील ‘संभाव्य’ आरोपींवर कारवाईची टांगती तलवार असल्याने सभागृहात राष्ट्रवादीच्या मुसक्या बांधल्या गेलेल्या आहेत. काँग्रेसचे अवसान निवडणुकीआधीच गळालेले आहे. राजकीय आघाडीवर सारे कसे शांत असताना विरोधी पक्षाच्या हाती येत्या पावसाळी अधिवेशनात बबन(राव) लोणीकर यांनी आयतेच हत्यार दिले आहे. अर्थात गदारोळ होईल तो बबन(राव) यांचे शिक्षण किती यावरच.. कारण द्विभार्याप्रतिबंधक कायद्याच्या उल्लंघनाचा मुद्दा काढला गेला तर तो आपल्यावर उलटणार याची खात्री कॉग्रेस/राष्ट्रवादीला नसणार असे थोडेच आहे? ही ‘नाजूक बाब’ निसरड्या वाटेवरून थेट भूतकाळात आचार्य अत्रे यांच्यापर्यंत पोहोचते आणि वर्तमानात अनेक तसे पतंग/टोप्या राज्याच्या राजकारणात मुक्तपणे उडत आहेतच की! आमच्या पिढीच्या राजकीय रिपोर्टिंगच्या काळातही दोन भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षातील ‘तीन साड-भाऊ’ राजकारणात प्रसिद्ध होते, त्याचे या निमित्ताने स्मरण झाले. ही एक सर्वपक्षीय एकमतीय लागण आहे याची प्रचीती पुन्हा आली, इतकेच

सत्तेत असताना संयम आणि समंजसपणा महत्वाचा असतो केवळ उत्साह नाही, हे नीट लक्षात घेत तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करणे आणि निसरड्या वाटांवरून चालण्यासाठी ‘ट्यूशन’ लावणे गरजेचे आहे हा धडा बबन(राव) लोणीकर यांना या घटनेतून शिकावयाचा आहे!

=प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९ / ९०११५५७०९९
praveen.bardapurkar@gmail.com

संबंधित पोस्ट