( मनोहर सप्रे यांचं सुमारे तीस वर्षांपूर्वीचं हे व्यंगचित्र आजही तंतोतंत लागू पडतं आहे ! )
मनोहर सप्रे यांची ओळख आधी त्यांच्या व्यंगचित्रातून झाली . तेव्हा त्यांची व्यंगचित्र ‘लोकसत्ता’च्या पहिल्या पानावर प्रकाशित होत असत . एक जबरदस्त पंच त्यांच्या व्यंगचित्रात असे . चित्रातली माणसं जणू आपल्या आजू-बाजूलाच वावरतात असे वाटत असे . त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख व्हायला मात्र बराच काळ जावा लागला आणि त्यासाठी मला नागपूरला पडाव टाकावा लागला .
नागपूरचा विदर्भ साहित्य संघ तेव्हा सर्वार्थानं दिग्गज लोकांचा होता . ‘युगवाणी’चं संपादकपद कवीश्रेष्ठ ग्रेसकडे होतं . वि. भि. कोलते , वामनराव चोरघडे , ना. रा. शेंडे , मधुकर आष्टीकर , मधुकर केचे , उद्धव शेळके , मनोहर तल्हार यांच्यासोबतच सुरेश भट , महेश एलकुंचवार , यशवंत मनोहर , भास्कर लक्ष्मण भोळे , सुरेश द्वादशीवर अशा अनेक वैदर्भियांची नावं मराठी साहित्य प्रांतात अप्रुप आणि आदरानं घेतली जात होती ; ग्रेस आणि सुरेश भट तर जिवंतपणीच दंतकथा बनलेले होते आणि महेश एलकुंचवार यांचा दबदबा अख्ख्या महाराष्ट्राच्या मराठी सांस्कृतिक वर्तुळात पसरलेला होता . वास्तव्य अरण्य प्रदेशातील चंद्रपूर या आडगावी होतं तरी या मंदियाळीत एक नाव मनोहर सप्रे यांचं होतं . १९७०/८० चा तो काळ लक्षात घ्या , दळणवळणाची साधनं अपुरी , संदेश वहनाच्या सोयी तर जगाच्या तुलनेत अतिशय बाल्यावस्थेत होत्या . इंटरनेट वगैरे स्वप्न होतं आणि फॅक्स वगैरे तर सोडाच टेलिफोनची सुविधाही शहरी भागातही नाममात्र होती . अशा काळात राजकारण , समाजकारण , साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींवर मुंबईच्या ‘लोकसत्ता’ ( मराठी वृत्तपत्रात नंबर एकचं ‘लोकसता’ असल्याचा तो काळ होता… ) या दैनिकात चंद्रपूरहून मनोहर सप्रे व्यंगचित्रातून भाष्य करत होते . ते भाष्य चुरचुरीत , कधी बोचरं तर कधी वाचकांच्या चेहेऱ्यावर आपसूक उत्स्फूर्त दाद देणारं हसू फुलवणारं असायचं .
विदर्भ साहित्य संघाच्या कट्ट्यावर वावरताना मनोहर सप्रे यांची ओळख झाली आणि सुरुवातीच्या काळात सप्रे यांच्या व्यक्तिमत्वाचं दडपणच आलं ; ही भेट मनोहर म्हैसाळकर यांनी करुन दिली . लख्ख गोरा वर्ण , सहा फुटाच्या जवळ पोहोचणारी शरीरयष्टी , मस्तपैकी ‘कलावंतीय’ अस्ताव्यस्त डोईवरचे दाट केस , चष्म्याआडचे डोळे उत्सुकतेनं भरलेले , समोरच्याशी बोलतांना प्रतिक्रिया म्हणून चेहेऱ्यावरचे सतत बदलणारे भाव , ‘मेलोडियस’ म्हणता येईल अशी वाणी , स्वभाव गप्पीष्ट आणि अत्यंत टीपटाप कपडे . कपड्यांची निवड चोखंदळ . मनोहर सप्रे यांना मी कधीच चुरगाळल्या-मुरगाळल्या कपड्यात बघितलंच नाही . मनोहर सप्रे चंद्रपुरात प्राध्यापकी(ही) करत . त्यांनी राज्यशास्त्रासोबतच तत्त्वज्ञान याही विषयात एम ए केलेलं होतं . मराठी सोबतच हिन्दी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं . त्यांचं मराठी , इंग्रजी , हिन्दी वाचन चौफेर होतं . अफाट या एका शब्दांतच त्याच्या वाचनाचं वर्णन करता येईल , शिवाय हे वाचन अभिजात कुळातलं होतं .
बाय द वे , एकदा कुमार केतकर आणि मी , मनोहर सप्रे यांना भेटायला त्यांच्या चंद्रपुरातल्या घरी गेलो . ( एक स्वतंत्र लेख करता येईल इतकं सप्रे यांचं घर कलात्मक आहे . ) पुस्तकांचा विषय निघाला . त्यांच्या गप्पातून कानी पडणाऱ्या बहुतेक इंग्रजी पुस्तकांची नावं माझ्यासाठी अनोळखी होती , जी ओळखीची होती त्यातली बहुसंख्य मी वाचलेली नव्हती . बोलता बोलता सप्रे यांनी ५० इंग्रजी अभिजात पुस्तकांची यादी केतकर आणि माझ्या हाती ठेवली . आई शपथ सांगतो , त्यातलं एक वगळता कोणतंही पुस्तक मी वाचलेलं नव्हतं ; एकमेव जे वाचलं ते कॅथरिन फ्रँक लिखित भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचं चरित्र होतं . मग , पुढचा सव्वा-दीड तास केतकर आणि सप्रे त्या पुस्तकांवर बोलत होते आणि मी ढिम्म बसून होतो . अशा माणसाचं सुरुवातीच्या काळात दडपण न येतं तर नवल होतं .
कोणताच माणूस दोन-चार भेटीत समजत नाही . तो तुटक-तुटक समजत जातो आणि मग त्याची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते , तसंच मनोहर सप्रे यांच्या बाबतीत घडत गेलं . आमच्यातल्या भेटी वाढल्या , घसट वाढत गेली , सूर जुळत गेले आणि मनोहर सप्रे नावाचा माणूस बुद्धीवंत तर आहेच आहे शिवाय कलंदरही आहे , हे उमगत गेलं . खानदेशात जन्मलेल्या , विदर्भाच्या अरण्य प्रदेशात राहणाऱ्या आणि संपूर्ण मराठी मुलुखावर कर्तृत्वाचे झेंडे फडकावणाऱ्या या माणसाचा आवाका कुणा एकाच्या कवेत येणारा नाही , हेही हळूहळू जाणवत गेलं .
चित्रकलेचं कोणतंही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या मनोहर सप्रे नावाच्या या माणसाची बोटं म्हणजेच कुंचला होता , व्यंगचित्रकार म्हणून व्यक्ती रेखाटण्याची त्यांची रेषेवरची हुकमत स्तिमित करणारी होती ; एकाच वेळी ‘लोकसत्ता’ , ‘केसरी’ , ‘तरुण भारत’ या मराठी आणि ‘हितवाद’ या इंग्रजी दैनिकांसाठी मनोहर सप्रे यांनी दररोज व्यंगचित्रे करतांना विषयाची पुनरावृत्ती कधीच होऊ दिली नाही . त्यापेक्षा आश्चर्यस्तंभित व्हावं अशी त्यांची शब्दावरची हुकमत होती . त्यांची निरीक्षण वाचन क्षमता किती अफाट असेल ते त्या व्यंगचित्रांखालच्या ओळीतून जाणवत असे . शास्त्रीय गायनासोबतच जुन्या हिन्दी चित्रपट गाण्याची त्यांची जाणकारी डोहखोल होती . त्यांच्या लेखनाला दरबारी गायनाची लयबद्धता होती . काष्ठशिल्प करणं त्यांनी तसं उशिरा सुरु केलं आणि त्यात अविश्वसनीय प्राविण्य संपादन केलं . अफाट लोकसंग्रह हे त्यांचं भांडवल होतं ; समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांशी त्यांचा हृद्य संपर्क होता . अगदी इंदिरा गांधी , बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते एकेकाळी सनदी अधिकारी असलेले प्रभाकर करंदीकर असा त्यांचा लोकसंग्रहांचा व्यापक पट होता . निसर्ग , त्यातील पशू-पक्षी आणि सामाजिक चळवळींविषयी त्यांना आस्था होती . त्या सामाजिक चळवळींची मूलभूत , सूक्ष्म चिकित्सा करण्यात त्यांना रुची होती . हा माणूस खरंच हाडामासाचा आहे की नाही , अशी शंका म्हणूनच मला तरी अनेकदा येत असे .
पत्रकारितेतील माझे व्याप वाढत गेले आणि मग मनोहर सप्रे यांच्याशी असलेल्या भेटी कमी होत गेल्या . जो कांही संपर्क उरला तो सेलफोनवरचा . मनोहर सप्रे यांचा फोन आला की , किमान अर्धा ते पाऊण तरी तास काढून ठेवावा लागे कारण , त्यांना खूप बोलायचं असे . माझं नागपूर सुटलं ( त्याला आता बारा वर्ष होतील ) . नंतर दिल्ली आणि औरंगाबाद असे मुक्काम होत गेले . माझी बेगम अंथरुणाला खिळेपर्यंत आमच्यातला संपर्क नियमित होता मग ते सेलफोनवरचं बोलणही हळूहळू खंडीत झालं .
गेल्या वर्षी साहित्य महामंडळाच्या एका कार्यक्रमासाठी भोपाळला गेलो तेव्हा तिथे पुरुषोत्तम सप्रे नावाचे एक अगत्यशील
आणि गप्पीष्ट गृहस्थ भेटले . माणूस एकदम मस्त , उमदा . डॉ . दादा गोरे , डॉ. हृषीकेश कांबळे , जीवन कुळकर्णी रंगलेल्या मैफिलीतल्या गप्पात समजलं पुरुषोत्तम सप्रे हे मनोहर सप्रे यांचे धाकटे बंधू आहेत . कॉमन दुवा सापडला . म्हणून आमच्यातल्या गप्पातील सलगी वाढली . पुरुषोत्तम सप्रे यांच्याकडून समजलं , मनोहर सप्रे यांनी आता वयाची नव्वदी पार केली आहे . त्यांची तब्येत ठीक नाही . जाणीव-नेणीवेच्या पलीकडे ते गेले आहेत . मनातल्या मनात मी म्हणालो , यांचा अर्थ मनोहर सप्रे नावाच्या झाडावरचं पान आता पूर्ण पिकलं आहे .
माझं मन भूतकाळात गेलं . एकदा गप्पा मारताना मनोहर सप्रे म्हणाले होते , ‘माझं पहिलं व्यंगचित्र १९५७ साली प्रकाशित झालं .’
‘तेव्हा मी दोन वर्षांचा होतो’ , मी लगेच सांगितलं .
मनोहर सप्रे यांनी त्यांच्या सवयीप्रमाणं दाद देण्याच्या टाळीसाठी हात पुढे केला , मी टाळी दिली . म्हणजे हा माणूस त्याच्या आवडीच्या छंदात किती वर्ष आहे असा प्रश्न मला तेव्हा पडला होता .
अखेर या १३ डिसेंबरला दुपारी उत्तर मिळालं . पिकलं पान गळून पडलं… निधन समयी त्यांचं वय ९२ होतं .
नशीब , नियती , प्रारब्ध , पाप-पुण्य यावर माझा विश्वास नाही . तरी , कधी कधी वाटतं , गेल्या जन्मी कांही तरी पुण्य नक्कीच केलं असावं , म्हणून मनोहर सप्रे यांच्यासारखी कवेत न येणारी प्रतिभावंत माणसं पत्रकारिता करताना मलाभेटली असावीत .
■प्रवीण बर्दापूरकर
Cellphone+919822055799
www.praveenbardapurkar.com